অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी साहित्य - अठरावे शतक

ह्या शतकातील इंग्रजी वाङ्‍‍मयेतिहासाचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात. १७०० ते १७४० हा अलेक्झांडर पोप (१६८८–१७४४) ह्या कवीचा कालखंड, १७४० ते १७७० हा साहित्यिक आणि टीकाकार सॅम्युएल जॉन्सन (१७०९–१७८४) ह्याच्या प्रभावाचा कालखंड आणि तिसरा १७७० ते १७९८ हा संक्रमणाचा कालखंड. ह्या शेवटल्या कालखंडातील इंग्रजी वाङ्‍मयात आगामी काळातील स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचे दर्शन होऊ लागते.
पोपच्या कालखंडाला ‘ऑगस्टन युग’असेही म्हणतात. ऑगस्टस ह्या रोमन बादशाहाच्या कारकीर्दीचा काळ (इ. स. पू. २७–इ. स. १४) हा लॅटिन वाङ्‍मयाचा सुवर्णकाळ मानला जातो. ह्या काळातील व्हर्जिल ( ७०–१९ इ. स. पू.), हॉरिस (६५–८ इ. स. पू.), ऑव्हिड (इ. स. पू. ४३–इ. स. १८) इ. व त्या अगोदरच्या होमर, सिसेरो (१०६–४३ इ. स. पू.) ह्यांसारख्या प्राचीन साहित्यिकांचा आदर्श पोपच्या कालखंडातील साहित्यिकांपुढे होता. त्या कालखंडातील साहित्यिक दृष्टिकोण, परंपरा व व्यवहार ह्यांना जॉन्सनच्या कालखंडात बळकटी आणि स्थैर्य प्राप्त झाले. प्राचीन अभिजात वाङ्‍‍मयातील संयम, रचनेचा रेखीवपणा, शब्दांचा नेटका उपयोग, शब्दालंकार आणि अर्थालंकार ह्यांचा उपयोग नियमबद्धता आणि सांकेतिकता तसेच उपरोध, उपहास आणि विडंबन ह्यांचा खंडनमंडनासाठी उपयोग ह्यांचा प्रभाव पडून त्याच नमुन्यावर वाङ्‍‍मय निर्माण होऊ लागले. ह्या प्रवृत्तीला नव-अभिजाततावाद असे नाव पडले.

 

इंग्‍लंडात १६८८ साली जी राज्यक्रांती झाली ती केवळ राजकीय क्रांती नव्हती, तर तो एका सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचा आरंभ होता. सतराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात ज्या साहित्यिक आणि वैचारिक प्रवृत्तींचा उगम झालेला होता, त्यांनाच पुढल्या शतकात अधिक गती अली आणि त्या निरनिराळ्या रूपांनी प्रकट झाल्या; म्हणून ह्या शतकातील सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक आणि वैचारिक घडामोडी समजून घेणे वाङ्‍मयीन प्रवृत्तींच्या आकलनाला उपकारक ठरेल.

 

स्ट्यूअर्ट राजा दुसरा जेम्स ह्याला १६८८ साली इंग्‍लंडच्या सिंहासनावरून काढून विल्यम ऑफ ऑरेंजला तिथे बसविण्याची जी राज्यक्रांती झाली, ती जुना सरंजामदार-जमीनदार वर्ग (टोरी) आणि व्यापार-उद्योग ह्यांमुळे संपन्न झालेला नवा धनिक वर्ग (व्हिग) ह्या दोन वर्गांच्या सहकार्याने झाली. ह्या राज्यक्रांतीमुळे राजसत्ता ईश्वरदत्त असते, ह्या कल्पनेला तडा गेला. पार्लमेंट सार्वभौम झाले. इंग्‍लंड हे लोकशाहीनिष्ठ राष्ट्र झाले. राजकारणात द्विपक्षीय पद्धतीला महत्त्व आले. ह्या नव्या धनिक वर्गाने राज्यक्रांतीत जुन्या सरंजामदार वर्गाशी सहकार्य केले असले, तरी सत्तेच्या राजकारणात तो जुन्या सरंजामदार-जमीनदार वर्गाचा प्रतिस्पर्धी होता. हा वर्ग मुख्यतः शहरी आणि व्यापारी होता, पण आपल्या संपत्तीच्या बळावर तो जमीनदारही होऊ लागला होता. समाजव्यवस्थेत त्याला मानाचे आणि अधिकाराचे स्थान मिळू लागले होते. त्यामुळे खानदानी चालीरीती शिकण्याची आणि आपली अभिरुची सूक्ष्म व सुसंस्कृत करण्याची गरज त्याला वाटू लागली होती. हा वर्ग धार्मिक बाबतीत प्यूरिटन होता, बंडखोर होता, स्वातंत्र्यवादी होता. आपल्या विचारांचा प्रसार करण्याची त्याला आवश्यकता वाटत होती. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक तसेच आर्थिक संघर्ष करण्याची व वाङ्‍मय निर्माण करण्याची आवश्यकता होती. ह्या साऱ्या आकांक्षा पुऱ्या करण्याचा प्रयत्‍न ह्या शतकाच्या वाङ्‍मयात दिसतो. नव्याजुन्या राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारांचा संघर्ष, ग्रामीण भागातील जमीनदारीनिष्ठ आर्थिक हितसंबंध आणि शहरी भागातील व्यापार उद्योगनिष्ठ आर्थिक हितसंबंध ह्यांतील संघर्ष, व्यक्तिव्यक्तींत सभ्यता आणण्याचे प्रयत्‍न इ. विशेष ह्या काळातील साहित्यात दिसतात.

 

ग्रामीण भागातील जमीनदार वर्ग नवीन शास्त्रीय शोधांच्या साहाय्याने आपली शेती सुधारू लागला. खुल्या शेताऐवजी त्यात कुंपण घालून नव्या पद्धतीने तो शेती करू लागल्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. वरकस जमीन लागवडीखाली आली आणि पिढीजाद जमीनदार वर्ग अधिक संपन्न झाला. त्याबरोबरच नवीन व्यापारी भांडवलदार वर्गही जमीन खरेदी करून जमीनदार होऊ लागला. मात्र अशा रीतीने जुना सरंजामी जमीनदार आणि नवा भांडवलदार जमीनदार हे वर्ग एकमेकांत मिसळले आणि एक प्रकारच्या संयमाची, सामंजस्याची सामाजिक गरज निर्माण झाली. ह्या शतकातील वाङ्‍मयात ह्या बाबींवरही भर दिलेला दिसून येतो.

 

शेतीच्या नव्या पद्धतीमुळे अनेक शेतमजूर जमिनीवरून हाकलले गेले. खेड्यातील परंपरागत जीवन उद्‍‍ध्वस्त झाले. हजारो भूमिहीन मजुरांची शहराकडे रीघ लागली. शहरात नवे कारखाने निघत होते. त्यांना कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यांना हे भूमिहीन लोक कामगार म्हणून मिळाले; पण ह्या कामगारांना अत्यंत निर्घृणपणे वागवले जात असे. त्यांना चरितार्थाचे साधन मिळाले; पण जीवनातला रस गेला. शिवाय सगळ्यांनाच कामे मिळाली नाहीत. ज्यांना मिळाली नाहीत, त्यांपैकी कोणी भटक्याचे जीवन जगू लागले, कोणी चोरी, दरोडेखोरी करू लागले. ह्या सामाजिक उलथापालथीचे प्रतिबिंबही ह्या शतकातील वाङ्‍मयात पडले आहे.

 

अमेरिकेतील वसाहतीतून आणि हिंदुस्थानातून संपत्तीचे ओघ इंग्‍लंडकडे वाहत होते. इंग्‍लंडच्या इतिहासात हे शतक समृद्धीचे व उत्कर्षाचे होते. ह्याचाच परिणाम म्हणून ज्यांना रिकामपण आहे, असा एक वर्ग समाजात अस्तित्वात आला होता. विशेषतः संपन्न स्थितीतील स्त्रिया त्यात होत्या. शिवाय शिक्षणाच्या प्रसारामुळे सामान्यजनातही वाचकवर्गाची वाढ होत होती. ह्या वाचकांत विविध थरांतील लोक होते आणि त्यांना विविध प्रकारचा वाचनीय मजकूर हवा होता. कोणाला करमणूक हवी होती, कोणाला माहिती, कोणाला धर्मपरनीतिपर उपदेश, कोणाला धार्मिक, राजकीय, सामाजिक मतांची चर्चा, कोणाला कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनाप्रधान गोष्टी, तर कोणाला धाडसाच्या. थोडक्यात, नाना प्रकारच्या गद्यलेखनाला अनुकूल अशी परिस्थिती ह्या शतकात निर्माण झाली होती. एक नाटक सोडले, तर इतर बहुतेक सर्व गद्य साहित्यप्रकारांना ह्या शतकात बहर आला. कादंबरी आणि ललित तसेच सामान्य विषयांवरील चर्चात्मक निबंधाचा पाया ह्या शतकात घातला गेला. साहित्यसमीक्षा अधिक पद्धतशीरपणे आणि काही महत्त्वांच्या अनुरोधाने होऊ लागली. रेस्टोरेशन काळात ड्रायडनने तिचा पाया घातला होताच. ह्या शतकात डॉ. जॉन्सनच्या विद्वत्तापूर्ण टीकालेखनाने समीक्षेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्यकृतींची भाषांतरे झाली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या आवृत्त्या निघाल्या. त्यांचे नव्याने मूल्यमापन होऊ लागले. असे सर्वांगांनी साहित्य बहरले.

 

लेखकांना इतरही मार्गांनी प्रोत्साहन मिळाले. टोरी आणि व्हिग अशा दोन्ही पक्षांच्या संपन्न पुढाऱ्यांना आपापल्या मतांचा आणि विचारसरणींचा प्रसार करण्यासाठी समर्थ लेखकांची आवश्यकता जाणवू लागली. ते आपापल्या मतांच्या आणि विचारसरणीच्या लेखकांना आश्रय देऊन त्यांच्याकडून वाङ्‍मयनिर्मिती करून घेऊ लागले. अठराव्या शतकाच्या प्रथमार्धात अनेक प्रमुख लेखकांनी अशा आश्रयाखाली लेखन केले.

 

जसजशी वाचकवर्गाच्या संख्येत वाढ होत गेली, तसतसा पुस्तक प्रकाशनाचा धंदा फायदेशीर होऊ लागला. त्यांच्याकडून प्रतिष्ठित, प्रभावी आणि लोकप्रिय लेखकांना पैसा मिळू लागला आणि एखाद्या धनिकाचा आश्रय घेण्याची लेखकांना गरज उरली नाही. लेखनाचा व्यवसाय भरभराटीला आला, तशी लेखकांच्या संख्येत वाढ झाली आणि परिणामी कधीकधी चांगल्या लेखकांनादेखील पैसा मिळेनासा झाला. डॉ. जॉन्सन आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथ ह्यांच्यासारख्या लेखकांनासुद्धा कर्जबाजारी आणि अकिंचन स्थितीत दिवस काढावे लागले.

 

उद्योगधंदे आणि व्यापार ह्यांच्या भरभराटीमुळे शहरांची वाढ झाली. लंडन हे नुसते राजकीय उलाढालींचेच केंद्र राहिले नाही, तर ते साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र बनले. लंडनमधल्या कॉफीगृहांना लंडनच्या बौद्धिक जीवनात महत्त्वाचे स्थान मिळाले. सुशिक्षित, सुखवस्तू लोक, मोठमोठे साहित्यिक आणि कलावंत कॉफीगृहांत जमून गंभीर विषयांवर चर्चा करीत. लेखक-कलावंतांचा आणि सामान्य जनतेचा साक्षात संबंध येत असे. त्यामुळे ह्या शतकातील वाङ्‍‍मयात तात्त्विक चर्चेप्रमाणे सामान्य माणसाच्या गरजा, त्याच्या आशाआकांक्षा आणि त्याचे जीवन ह्यांचेही चित्रण झालेले दिसते.

 

सतराव्या शतकात फ्रान्सिस बेकनने विगमनवादी तर्कपद्धतीचा अवलंब करून शास्त्रशुद्ध विचारसरणीचा पाया घातला. पुढील काळात शास्त्रीय शोधांमुळे आणि सिद्धांतांमुळे भौतिक विश्वासंबंधी नवा दृष्टिकोण प्राप्त झाला होता. सबंध सृष्टीचा व्यवहार काही निश्चित नियमांनुसार चालला आहे; ह्या नियमांचे अधिष्ठान नैतिक स्वरूपाचे आहे; हे नियम ओळखून आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन त्यांनुसार आखणे हे मानवी बुद्धीचे कार्य आहे; ही विचारसरणी प्रभावी झाली. त्यामुळे ईश्वरा-वरील श्रद्धा आणि शास्त्रीय बुद्धिवादी विचारसरणी ह्यांची सांगड घातली गेली. श्रद्धा आणि बुद्धी ह्यांच्या सरहद्दी कुठे मिळतात आणि त्यांच्यात विरोध कुठे येतो, ह्यांचा शोध तत्त्वज्ञानात्मक वाङ्‍‍मयात घेतला गेला.

 

नवा मध्यम वर्ग कडक धर्मनिष्ठ होता; पण धार्मिक बाबतींत वैयक्तिक स्वातंत्र्यवादी होता. १६८८ च्या राज्यक्रांतीला साहाय्य करण्यात त्याचा उद्देश इंग्‍लंडच्या राजकारणात कॅथलिक पंथाचे आणि पर्यायाने पोपचे वर्चस्व पुन्हा येण्याची शक्यताच नाहीशी करावी, हा होता. म्हणूनच इंग्‍लंडच्या सिंहासनावर येणारी व्यक्ती प्रॉटेस्टंटच असावी, असा कायदाच करण्यात आला. हा नवा मध्यम वर्ग व्यापार-उद्योगात गुंतलेला होता. व्यापारउद्योग यशस्वीपणे करण्यासाठी एक प्रकारची व्यावहारिक नीतिमत्ता, परस्परविश्वास, प्रामाणिकपणा, सभ्यता असावी लागते. ती नीतिमत्ता ज्यामुळे अंगी बाणेल असे व्यवहारवादी शिक्षण आणि वाङ्‍मय ह्या समाजाला हवे होते व तसे ते निर्माण होत होते.

 

परंतु ही व्यापारी-व्यवहारवादी नीती, सज्‍जनता, सभ्यता पुष्कळदा ढोंगाला कारण होते आणि तसे तेथेही होत होते. सभ्यता, सुसंस्कृतता ह्यांना महत्त्व देणारा हा वर्ग आपल्या कारखान्यांत, उद्योगधंद्यांत कामगारांना फार वाईट रीतीने वागवी. त्यांच्याशी वागताना नीतीची चाड बाळगीत नसे. हा दुटप्पीपणाही ह्या शतकातील साहित्यात व्यक्त झाला आणि हे ढोंग उघडे केले गेले.

 

बुद्धिवादी शास्त्रशुद्ध दृष्टिकोणाला कितीही महत्त्व असले, तरी मानवी संबंध आणि सामाजिक व्यवहार निव्वळ बुद्धिवादावर चालत नाहीत. अंत:प्रेरणा, जिव्हाळा, सहानुभूती, माणुसकीचा ओलावा ह्यांमुळेही मानवाचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन प्रेरित होते. सामान्य वाचकाला बुद्धिवादी विचारप्रधान वाङ्‍‍मयाप्रमाणेच, किंबहुना अधिकच, उत्कट भावनांचे दर्शन घडविणारे वाङ्‍‍मय हवे असते. साहजिकच भावनाप्रधान साहित्यही लिहिले गेले. अर्थात भावनोत्कटतेचे पर्यवसान पुष्कळदा भावाकुलतेत, भावनाविवशतेत आणि खोट्या भावनाप्रदर्शनात होते, तसेही झाले.

 

एकीकडे निर्जीव, संकेतबद्ध नव-अभिजाततावाद आणि दुसरीकडे भावनातिरेक ह्यांमुळे जीवनातील साध्या साध्या घटनांकडे मुक्तपणे पाहणे, कल्पनाशक्तीने त्यांचे अंतरंग जाणणे अशक्य होते. पण लेडी विंचिल्सी (१६६१–१७२०) हिच्या काही कवितांत ही मुक्त, सहज प्रवृत्ती दिसते. तसेच राबर्ट बर्न्सच्या (१७५९–१७९६) कवितेत आत्माभिमुखता, संवेदनक्षमता, निसर्गप्रेम आणि उत्कट कल्पनाशक्ती ही स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये दिसून येतात आणि विल्यम ब्‍लेकच्या काव्यात तर ती अधिक प्रकर्षाने दिसून येतात.

 

ह्या शतकाच्या शेवटच्या तीस वर्षांत पूर्वोक्त वाङ्‍मयीन प्रवृत्ती मागे पडून स्वच्छंदतावादाकडे जाणाऱ्या नवीन प्रवृत्ती दिसून येऊ लागल्या. ह्या सबंध शतकातील वाङ्‍‍मयीन प्रवृत्तीच्या आतापर्यंत केलेल्या स्थूल विवेचनाच्या आधारे आता अठराव्या शतकातील नियतकालिके, पुस्तपत्रे, इतिहासलेखन, पत्रलेखन, चरित्र, काव्य, नाटक, कादंबरी, समीक्षा इत्यादींचा परामर्श घेता येईल.

 

नियतकालिके

१६९५ साली ‘लायसेन्सिंग अ‍ॅक्ट’ नावाचा वृत्तपत्रे व इतर लेखन ह्यांवर जाचक निर्बंध घालणारा कायदा रद्द झाला व इंग्‍लंडमध्ये मुद्रणस्वातंत्र्याची व लेखनस्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. जीवनाच्या विविध पैलूंवर निर्भयपणे व चिकित्सकपणे भाष्य करण्याचा मार्ग खुला झाला. १७०९ साली लेखाधिकाराचा कायदा किंवा ‘कॉपी राइट अ‍ॅक्ट’ मंजूर झाला. त्यामुळे लेखकाचे त्याच्या लेखनावरचे हक्क प्रस्थापित झाले. ग्रंथलेखन आणि ग्रंथप्रकाशन ह्यांना उत्तेजन मिळाले. ह्या शतकात नवनवीन नियतकालिके निघत गेली. डीफोचे द रिव्ह्यू (१७०४), स्टीलचे द टॅटलर (१७०९), स्टील आणि अ‍ॅडिसन ह्यांनी चालविलेले द स्पेक्टेटर (१७११), जॉन्सनचे द रँब्‍लर (१७५०-१७५२), गोल्डस्मिथचे द बी (१७५९) इत्यादींनी सामान्य वाचकांपर्यंत विविध विचार नेऊन पोचविण्याचे कार्य चोखपण केले. केवळ वाङ्‍मयीन समीक्षेला वाहिलेली द मंथली रिव्ह्यू (१७४९–१८४५) व द क्रिटिकल रिव्ह्यू (१७५६–१८१७) ह्यांसारखीही नियतकालिके होती. नियतकालिकांनी जोपासलेला महत्त्वाचा वाङ्‍मयप्रकार म्हणजे ‘पिरिऑडिकल एसे’ किंवा नियतकालिक निबंध. जोसेफ अ‍ॅडिसन (१६७२–१७१९) आणि रिचर्ड स्टील (१६७२–१७२९) हे ह्या शतकाच्या सुरुवातीचे प्रमुख निबंधकार.

 

इंग्‍लंडमधला सरदार-जमीनदार वर्ग हा सुसंस्कृत, अभिरुचिसंपन्न आणि नौतिक दृष्ट्या शिक्षित झालेला होता. सत्ता आणि संपत्ती ह्या दोन्ही बाबतींत ग्रामीण भागातील गर्भश्रीमंत जमीनदारांच्या बरोबरीला येत चाललेला नवा व्यापारी मध्यम वर्ग नैतिक दृष्ट्या कठोर होता; पण खानदानी चालीरीती, वागण्याबोलण्याची सभ्यता, कला, साहित्य इत्यादींची अभिरुची ह्यांचा त्याच्यामध्ये अभाव होता. ह्या दोन वर्गांत समन्वय घडवून आणणे हा अ‍ॅडिसन आणि स्टील ह्या दोघांचाही उद्देश होता; तसेच झपाट्याने वाढत चाललेल्या सामान्य वाचकवर्गाला बहुश्रुत करणे आणि त्यांच्या अभिरुचीला वळण लावणेही आवश्यक होते. अ‍ॅडिसन आणि स्टील ह्या दोघांच्या मन:प्रवृत्ती भिन्न, पण परस्परांना पूरक होत्या. स्टीलच्या लेखनात अधिक उत्स्फूर्तता, कल्पकता, संवेदनशीलता असे. कौटुंबिक जिव्हाळा, भावनात्मकता आणि सहानुभूती ह्यांवर त्याचा भर असे; पण त्याच्या लेखनात त्यामुळेच शैथिल्य येत असे आणि भावनात्मक अतिरेक होत असे. ह्याच्या उलट अ‍ॅडिसनमध्ये शिस्त, संयम, समतोलपणा, रेखीवपणा आणि गांभीर्य असे. प्राचीन अभिजात साहित्यात तो मुरलेला होता. सूक्ष्म अवलोकन, विश्लेषण, समजूतदारपणातून आलेली सहानुभूती त्याच्या निबंधांत दिसते. पण ह्या दोघांच्याही लेखनाने इंग्रजी गद्यलेखनशैलीचा पाया तर घातलाच, पण ‘सभ्य गृहस्था’चा आदर्श निर्माण करून मध्यमवर्गीय इंग्रजांच्या अभिरुचीला जवळजवळ कायमचे वळण लावले. सत्प्रवृत्त, सधन, जमीनदार वर्गाचा प्रतिनिधी सर रॉजर डी. कॉवुर्ली आणि धनिक व्यापारी वर्गाचा प्रतिनिधी सर अँड्रू फ्रीपोर्ट हे स्पेक्टेटरमधले दोन सद्‍गृहस्थ इंग्रजी साहित्यात चिरंजीव झाले आहेत.

 

ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या (१७३०–१७७४) शैलीत प्रसन्नता व टवटवीतपणा आहे. त्याची विनोदबुद्धी अव्वल दर्जाची व सूक्ष्म आहे. द सिटिझन ऑफ द वर्ल्डमध्ये गोल्डस्मिथने इंग्‍लंडच्या जीवनावर एका चिनी प्रवाशाच्या दृष्टिकोणातून भाष्य केले आहे (१७६२). गोल्डस्मिथने व ह्या शतकाच्या उत्तरार्धातील इतर निबंधकारांनी नियतकालिक निबंधाला ललित स्वरूप प्राप्त करून दिले. त्याच प्रवृत्तीतून पुढे स्वच्छंदतावादी युगात आजच्या ललित निबंधाचा अवतार झाला.

 

पुस्तपत्रे

नियतकालिकांत प्रसिद्ध होणाऱ्या विविध लेखांखेरीज पुस्तपत्रांतून (पँफ्लेट्स) काही तात्कालिक महत्त्वाच्या विषयांवर प्रसंगोपात्त लिखाणही मोठ्या प्रमाणावर झाले. राजकारणात सबंध शतकभर व्हिग व टोरी या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा अविरत झगडा चालू होता. व्हिग पक्ष हा पार्लमेंटचा व नियंत्रत राजसत्तेचा पुरस्कर्ता, तर टोरी पक्ष हा जुन्या स्ट्यूअर्ट घराण्याचा पक्षपाती. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतही निरनिराळे वाद अटीतटीने व हिरिरीने खेळले गेले. त्यांत उपहास, उपरोध, विडंबन वगैरे सर्व अस्त्रे कौशल्याने वापरण्यात येत. राजद्रोहाच्या आरोपाचे किंवा अन्य रोषाचे बळी व्हावे लागू नये म्हणून प्रतीककथा, रूपके, कृत्रिम परंतु स्वभावदर्शक व आचारनिदर्शक नावे प्रतिस्पर्ध्यांना देणे यांसारखे उपाय उपयोगात आणले गेले. हे वाद पुस्तपत्रांच्या रूपात प्रसिद्ध होत. त्यांचे लेखक पुष्कळदा टोपणनावे घेत.

 

या संदर्भात जॉनाथन स्विफ्टचे (१६६७–१७४५) नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्याने आलटून पालटून दोन्ही राजकीय पक्षांच्या वतीने लेखणी चालविली.

 

काव्य

अठराव्या शतकाची प्रमुख प्रवृत्ती बुद्धिवादी होती. प्राचीन अभिजात वाङ्‍मय हा साहित्याचा आदर्श होता. ही गोष्ट काव्याच्या क्षेत्रातही दिसून येते. कवीच्या स्वत:च्या भावभावनांना त्यात महत्त्व नव्हते, तर सर्वसामान्यपणे माणूस आणि त्याचे व्यवहार ह्यांना होते. सर्जनशील भावना, कल्पनाशक्ती किंवा उन्मेषशालिनी प्रतिभा ही ह्या शतकातील काव्याची प्रेरणा नसून एखाद्या विचाराची वा कल्पनेची रेखीव मांडणी करणे, ही होती. ह्या शतकातले काव्य म्हणजे प्रामुख्याने अभिजात साहित्यातल्या आदर्शांनुसार किंवा अभिजात साहित्यातील संकेतांनुसार शब्द, अलंकार, वृत्ते ह्यांची योजना करून केलेली पद्यरचना आहे. गद्याप्रमाणेच पद्याचाही उपयोग राजकीय आणि धार्मिक मतांच्या खंडनमंडनासाठी; तसेच नैतिक, सामाजिक किंवा वैश्विक विचारांच्या प्रतिपादनासाठी केला गेला. गद्याप्रमाणेच काव्यातही उपहास, उपरोध, विडंबन इ. शस्त्रांचा उपयोग करण्यात आला. साहजिकच भावनांचा विलास किंवा काव्यप्रतिभेची झेप त्यात क्वचितच दिसते आणि कृत्रिमपणा अधिक जाणवतो; पण विचारविलास, शब्दयोजनेचे चातुर्य, रचनेची सफाई, घाटाचा बांधेसूदपणा आणि सुभाषितवजा वचने इ. गुणांमुळे उच्च दर्जाचा काव्यगुण नसूनही हे काव्य मनावर छाप पाडते. नवअभिजाततावादाच्या प्रभावामुळे ह्या शतकात प्राचीन ग्रीकलॅटिन महाकाव्यांची भाषांतरे झाली. त्या काव्यांच्या धर्तीवर काही स्फुट काव्ये व दीर्घकाव्ये रचिली गेली. १७६० पर्यंतच्या काळात प्राचीन श्रेष्ठ वाङ्‍मयीन कृतींची बरीच भाषांतरे झाली. त्यांना लोकप्रियता लाभली आणि भाषांतरकारांना प्रतिष्ठा आणि पैसा मिळाला.

 

ह्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वांत मोठा आणि प्रभावी कवी अलेक्झांडर पोप हा होय. हे युग पोपचे युग म्हणूनच ओळखले जाते. स्फुट काव्य, दीर्घकाव्य, खंडकाव्य, विडंबनकाव्य, तत्त्वचिंतनपर काव्य अशी अनेक प्रकारची काव्यरचना त्याने केली. होमरच्या महाकाव्यांची भाषांतरे केली आणि हॉरिसच्या धर्तीवर उपरोधपर काव्य लिहिले. श्रुतयोजन, रचनेची सफाई, सूक्ष्म आणि टोकदार उपरोध, सुभाषितवजा वचने, प्रवचनकाराची आणि निर्णयकाराची भूमिका ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. पास्टोरल्समध्ये (१७०९) त्याने मेंढपाळांचे जीवन चित्रित करण्याच्या निमित्ताने तत्कालीन जीवनावर भाष्य केले आहे. व्हर्जिलच्या धर्तीवर रचिलेल्या ह्या कवितांत सहजता आणि कृत्रिमता ह्यांचा परिणामकारक मिलाफ झाला आहे. एसे ऑन क्रिटिसिझममध्ये (१७११) त्याने काव्यरचना आणि काव्यसमीक्षा ह्यांसंबंधींचे अभिजात आदर्श आणि संकेत ह्यांवर आधारलेले विचार मांडले आहेत. विंडसर फॉरेस्टमध्ये (१७१३) वातावरणाचा ताजेपणा आणि निसर्गाविषयी प्रेम दिसून येते. रेप ऑफ द लॉकमध्ये (१७१४) महाकाव्याच्या तंत्राचे विडंबन केलेले आहे. एसे ऑन मॅनमध्ये (१७३३–३४) त्याने आपले ईश्वरविषयक विचार मांडले. खरेखुरे तत्त्वचिंतनपर काव्य कसे असू शकेल, ह्याचे हे काव्य नमुना आहे. त्या काळातील धार्मिकराजकीय वाद आणि पोपचा स्वभाव ह्यांमुळे त्याचे अनेकांशी वाङ्‍मयीन खटके उडाले. अनेकांशी शत्रुत्व आले. त्याच्या डन्सियड (४ खंड, १७२८–१७४३) ह्या काव्यात अनेक समकालीनांवर हल्ले आहेत.

 

ह्या काळात छोट्याछोट्या भावकविताही लिहिल्या गेल्या; पण त्यांचे स्वरूप एकंदरीने गद्यच आहे. त्यांत भावनांची उत्कटता बेताचीच आहे; पण त्या वाचनीय वाटाव्यात इतपत भाषासौष्ठव आणि रचनागुण त्यांत आहेत.
अनेक फुटकळ वाङ्‍मयप्रकारही ह्या काळात लोकप्रिय होते. उदा., जॉन गेची (१६८५–१७३२) बेगर्स ऑपेरा (१७२८) ही संगीतिका, जेम्स टॉमसनच्या (१७००–१७४८) ‘रूल ब्रिटानिया’सारखी देशभक्तिपर गीते, गोल्डस्मिथचे विनोदी 'एलेजी ऑन ए मॅड डॉग' इत्यादी.

 

टीकात्मक व उपरोधपूर्ण काव्यही विपुल लिहिले गेले. पोपच्या द रेप ऑफ द लॉकचा उल्लेख वर आलेलाच आहे. काँग्रीव्ह, पोप, स्विफ्ट, गे वगैरेंनी ‘स्क्राय्‌ब्‍लेरस क्लब’ नावाचे मंडळ स्थापन केले होते (सु. १७१३). ह्या मंडळाच्या सभासदांनी विद्वत्तेच्या बडेजावावर उपरोधपूर्ण काव्ये व गद्य लिहिले. ‘स्क्राय्‌ब्‍लेरस’ ही काल्पनिक व्यक्ती त्यासाठी निर्माण केली गेली व वरीलपैकी काहींनी त्या नावाने लिहिले. मिसेलेनी (३ भाग) हे ह्या टीकात्मक कवितांच्या संग्रहाचे नाव. स्विफ्टच्या ‘ऑन द डेथ ऑफ डॉ. स्विफ्ट’ (१७३१) व ‘मिसेस हॅरिएट्स पिटिशन’ ह्या दोन कवितांत उपहास, कडवटपणा, संताप, जीवनाचे सूक्ष्म ज्ञान इत्यादींचे एक चमत्कारिक मिश्रण झाले आहे.

 

पोप-जॉन्सन युगातील आणखी एक लोकप्रिय काव्यप्रकार चिंतनपर व चर्चात्मक काव्याचा. यात कवी स्वताची मते, विचार, अनुभव, निरीक्षण इत्यादींवर भाष्य करतो. तसेच उपरोधपर काव्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. त्याचप्रमाणे आत्मलक्षी असूनही तो भावकवितेपासून अलग पडतो. ह्या प्रकाराचा जनक प्राचीन कवी हॉरिस. त्याच्या काव्यातील सुवर्णमध्यवादी दृष्टिकोण, जीवनासंबंधीचा परिपक्व नैतिक दृष्टिकोण स्‍नेहभावाचे महत्त्व, सुसंस्कृत व सभ्य माणसाच्या जीवनातील निर्व्याज सुखाची भलावण इ. विशेषांमुळे त्याला ह्या शतकात अनेक अनुयायी व भाषांतरकार मिळाले : विल्यम कूपर (१७३१–१८००, द टास्क १७८५), जॉन डायर (१६९९–१७५८, ग्रोंजर हिल १७२६ व द फ्लीस १७५७), गोल्डस्मिथ (द ट्रॅव्हलर १७६४ व द डेझर्टेड व्हिलेज १७७०), जेम्स टॉमसन (१७००–१७४८, द सीझन्स १७२६–१७३०), विल्यम ब्‍लेक (१७५७–१८२७, साँग्ज ऑफ एक्स्पिरिअन्स १७९४ व साँग्ज ऑफ इनोसन्स १७८९), टॉमस ग्रे (१७१६–१७७१, एलिजी इन अ कंट्री चर्चयार्ड १७५०), सॅम्युएल जॉन्सन (लंडन १७३८ व द व्हॅनिटी ऑफ ह्यूमन विशेस १७४९).

 

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात वाङ्‍‍मयात नवीन जाणिवा व्यक्त होऊ लागल्या. सांकेतिकतेकडून स्वाभाविकतेकडे होणारे संक्रमण ह्यात सूचित आहे. नव-अभिजाततावादी काव्यातील सांकेतिककेमुळे कवितांना साचेबंदपणा येत चालला होता. नकलेची नक्कल होऊन निर्जीवपणा आला होता. ह्या सांकेतिकतेमुळे जीवनाच्या फार मोठ्या भागाच्या आकलनाला आणि अनुभवाला आपण मुकत आहो, हे जाणवू लागले. सामान्य जीवनात आणि सामान्यांच्या जीवनातील नित्याच्या अनुभवांतदेखील नावीन्य, अद्‍‍भुतता ह्यांचा प्रत्यय येऊ शकतो, ह्याची जाणीव होऊ लागली. एका नव्या प्रवृत्तीची ही चाहूल होती. निसर्गवर्णनांतून नीतिमूल्ये जोपासणारे व निसर्गात निर्भेळ आनंद अनुभवणारे टॉमसनचे ‘द सीझन्स’ हे काव्य ह्या शतकाच्या पूर्वार्धातच लिहिले गेले होते. निसर्ग व मानव ह्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, ही जाणीव त्यातून दिसते.

 

कवितांच्या वृत्तांमध्ये व विषयांमध्ये आता विविधता येऊ लागली.  जेम्स मॅक्फर्सनने (१७३६–१७९६) ओसियन ह्या मध्ययुगीन कवीच्या एका महाकाव्याचे इंग्रजी भाषांतर म्हणून ८ खंड प्रसिद्ध केले (१७६३). त्यात मॅक्फर्सनचे स्वत:चेच कवित्व जास्त होते आणि मूळ कवीच्या कवितांचा भाग थोडा होता. मात्र ह्या कविता लोकप्रिय झाल्या.  टॉमस चॅटरटननेही (१७५२–१७७०) स्वत:च्याच काव्याला मध्ययुगीन डूब देऊन ते अस्सल भासविण्याचा प्रयत्‍न केला.

 

पण ह्या कालखंडातील सर्वांत प्रभावी कवी म्हणजे रॉबर्ट बर्न्स आणि विल्यम ब्‍लेक. बर्न्स हा स्कॉटिश कवी होता. त्याची पुष्कळशी कविता स्कॉटिश भाषेत आहे. त्याच्या इंग्रजी कवितांत शब्दांचा नेमकेपणा, रचनेचा रेखीवपणा आणि संयम ह्यांबरोबरच साध्या साध्या घटनांसंबंधी एक उत्कट भावनाशील जाणीव दिसते. त्यातून दृष्टिकोणाचे, अनुभूतीचे, नाजूक सहानुभूतीचे नावीन्य प्रत्ययाला येते. त्याची काही कविता गेयही आहे.

 

ब्‍लेकच्या प्रतिभेची आणि कल्पनाशक्तीची झेप विलक्षण उंच आहे. जीवनाकडे आणि जगाकडे बालकाच्या सहज-सरल दृष्टीने पाहणे, त्याच वृत्तीने त्याचा अनुभव घेणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे त्याच्या कवितेचे एक अंग आहे. त्याचबरोबर गूढ, आध्यात्मिक तत्त्वांचेही त्यात प्रतिबिंब आहे. प्रभावी प्रतिमा, अंत:करणाची पकड घेणारी भाषा, यथायोग्य वृत्तांची योजना आणि विलक्षण आत्मनिष्ठ वृत्ती ह्यांमुळे त्याचे काव्य खोल जाऊन मनाचा ठाव घेते. म्हणूनच बर्न्स आणि ब्‍लेक हे पुढे येणाऱ्या स्वच्छंदतावादी युगाचे अग्रदूत ठरतात. ह्या शतकातील एक महत्त्वाचा काव्यप्रकार म्हणजे ⇨ ओड किंवा उद्देशिका. पिंडर आणि हॉरिस ह्यांसारख्या प्राचीन ग्रीक-रोमन कवींनी पूर्णत्वास नेलेला हा काव्यप्रकार इंग्रज कवींनी हाताळला. टॉमस ग्रे (ऑन स्प्रिंग, ईटन कॉलेज, द बार्ड, प्रोग्रेस ऑफ पोएझी) आणि ⇨ विल्यम कॉलिंझ (१७२१–१७५९) हे प्रमुख उद्देशिकाकार. त्याच्या उद्देशिका रचना, अर्थ, विचारांचे गांभीर्य, समर्पक शब्दयोजना ह्या गुणांनी नटल्या आहेत. कॉलिंझची प्रतिभा फार तरल आहे. तो वर्ण्यविषयाच्या अंतरंगात फार खोलवर पाहू शकतो. उदा., ओड टू सिंप्लिसिटी, ओड टू ईव्हनिंग इत्यादी.

 

एकंदरीने अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात प्राचीन अभिजात वाङ्‍मयातील संकेतांच्या चौकटीत राहून काव्यनिर्मिती झाली, तर शेवटच्या चाळीस वर्षांत ही चौकट मोडून इंग्रजी काव्य स्वच्छंदतावादी युगाकडे वाटचाल करू लागले.

 

नाटक

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी नाट्यवाङ्‍मयात ‘कॉमेडी ऑफ मॅनर्स’ किंवा आचारविनोदिनी व हिरोइक ट्रॅजेडी ह्या दोन प्रकारांचे वर्चस्व होते. पहिला नाट्यप्रकार सुखान्त असून त्यात मध्यमवर्गीय लोक आणि ग्रामीण चालीरीती व संस्कृती यांची भरपूर थट्टा करून प्रेक्षकांना हसविण्यात येई. हिरोईक ट्रॅजेडी हा दु:खान्त नाट्यप्रकार. ह्यात एक भव्य कथावस्तू घेऊन प्रेम व प्रतिष्ठा ह्याची प्रमाणाबाहेर महती गायलेली असे. ह्या प्रकारातील काव्य व भाषा ओढून ताणून ओजस्वी केलेली असे व तिच्यात कृत्रिम व भडक शब्दालंकारांची रेलचेल असे.

 

परंतु सतराव्या शतकाच्या शेवटी मध्यम वर्ग व्यापार-उदीम करून आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला व त्याच्याकडे इंग्रजी समाजाचे नेतृत्व आले. हा समाज जीवनाकडे अत्यंत गंभीरपणे पाहणाऱ्या प्यूरिटन पंथाचा अनुयायी होता. ह्यामुळे वर उल्लेखिलेल्या दोन नाट्यप्रकारांविरुद्ध ह्या वर्गातून जोराची प्रतिक्रिया उमटली. तिचे प्रत्यंतर जेरेमी कॉलिअर (१६५०–१७२६) ह्या प्यूरिटन धर्मोपदेशकाच्या १६९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शॉर्ट व्ह्यू ऑफ द इम्मोरॅलिटी अँड प्रोफेननेस ऑफ द इंग्‍लिश स्टेज ह्या पुस्तिकेत मिळते. यात त्याने वरील दोन नाट्यप्रकारांविरुद्ध कडाडून टीका केली. त्याचा विशेष रोष काँग्रीव्ह आणि व्हॅनब्रू (१६६४–१७२६) ह्या नाटककारांवर होता. ह्या नाटकांतील अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या कथावस्तू व पात्रचित्रण या दोषांवर त्याने बोट ठेवले. मध्यम वर्गाची जीवनदृष्टी या पुस्तिकेत उत्तम तऱ्हेने स्पष्ट झाली आहे. ही टीका खूप गाजली. अशा तऱ्हेची टीका व त्या टीकेतल्यासारखीच मते बाळगणारा, झपाट्याने बदलणारा इंग्रजी समाज नाटकाच्या उत्कर्षाला बाधक ठरला. या सामाजिक स्थित्यंतराशी नाटककारांनाही जुळवून घेता आले नाही. जुन्या नाटकांतली नव्या मध्यमवर्गीय नागरी समाजाची थट्टा आता खपण्यासारखी नव्हती. तद्वतच त्यांतील अवास्तवतेलाही आता वाव राहिला नव्हता.

 

ह्यामुळे जवळजवळ शतकभर चांगल्या नाट्यकृतींचे दुर्भिक्ष्यच जाणविले. मात्र रंगभूमी ओस पडली असे नाही. नाट्यव्यवसाय चालू होता. ह्या शतकात फार विख्यात नट आणि नट्या होऊन गेल्या. कॉली सिबर, जेम्स क्विन, चार्ल्स मॅक्लिन, डेव्हिड गॅरिक, अ‍ॅन ओल्डफील्ड, सेअरा सिडन्झ ही काही प्रख्यात नावे. ह्या नटनट्यांनी नव्या, त्याचप्रमाणे जुन्याही नाटकांत भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे अत्यंत सामान्य नाटकांनीही या वेळची रंगभूमी गाजविली. शेक्सपिअरच्या नाटकांची लोकप्रियता या नटांमुळे वाढली.

 

ह्या कालखंडातील नाटकांना नटांच्या अभिनयकौशल्याला वाव देण्यापुरतेच महत्त्व आहे. काही ओजस्वी भाषणे व सनसनाटी प्रसंग रंगभूमीवर दाखवायला ह्या नाटकांनी संधी दिली. वाङ्‍मयीन मूल्यांच्या दृष्टीने ही नाटके टाकाऊच ठरली. त्यांत ओढूनताणून केलेल्या शाब्दिक कसरती व कृत्रिम संवाद आहेत. त्यांतील मनुष्यस्वभावाचे दिग्दर्शन बेताचेच असून रचना उगाचच गुंतागुंतीची केल्यासारखी वाटते. ह्या काळात करण्यात अलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांवरही प्रथम ह्या वेळेच्या अभिरुचीला साजेसे संस्कार करण्यात आले. उदा., त्याच्या शोकात्मिकांना सुखात्मिकांची कलाटणी देण्याचे प्रयोग झाले.

 

मध्यम वर्गाने रंगभूमीवर बहिष्कार टाकल्यामुळे नाटकाला फक्त खालच्या वर्गातील प्रेक्षकांकडूनच आश्रय मिळाला. हे प्रेक्षक व नाटककंपनीचा व्यवस्थापक यांच्या कात्रीत ह्या वेळची रंगभूमी सापडली होती. व्यवस्थापकास प्रेक्षकांवर अवलंबून राहावे लागले. चटकन रिझविणारी हलकीफुलकी नाटके लिहिणारे नाटककार लोकप्रिय झाले व खरे प्रतिभावान लेखक नाट्यक्षेत्र सोडून कांदबरीकडे वळले.

 

मध्यम वर्गाच्या वर्चस्वामुळे त्याला रुचतील अशी नाटके लिहिण्याचा प्रयत्‍नही अनेकांनी केला. पण ह्याही तऱ्हेच्या नाटकांच्या रचनेचा एक साचा निर्माण झाला. उदा., ही नाटके बहुतांशी सुखान्त असत. पहिल्या चार अंकांत त्यांतील पात्रे सर्व तऱ्हेचा अनाचार व स्वैर वर्तन करताहेत, असे दाखवून शेवटच्या अंकात त्यांचे हृदयपरिवर्तन झाल्याचे दाखविण्यात येत असे. परंपरागत नीतिनियम व त्यांचे व्यावहारिक फायदे ह्यांवर अवास्तव भर देण्यात येत असे. अनीतिमान, दुष्ट माणसाचे पारिपत्य व सद्‍गुणी माणसाचा विजय हे नैतिक सूत्र पुष्कळ नाटकांत अनुस्यूत होते. ह्या नैतिक दृष्टिकोणाचा अतिरेक ह्या नाटकांना कलेच्या दृष्टीने मारकच ठरला.

 

अशा ह्या परिस्थितीत फारच थोडे नाटककार आपल्या वैशिष्ट्याने चमकले. अर्थात त्यांची प्रसिद्धीही केवळ त्यांच्या कारकीर्दीपुरतीच टिकली. स्टीलने द टेंडर हस्‌बंड (१७०५) व द कॉन्शस लव्हर्स (१७२२) ही दोन नाटके लिहिली. त्यांत त्याने माणसाची प्रवृत्ती निसर्गत:च नैतिक असते, हे फारसे अवडंबर न माजविता मांडले आहे. नाटकांतल्या कृत्रिम भावविवशतेला आवर घालायचा एक स्तुत्य प्रयत्‍न म्हणून ही नाटके त्यावेळी प्रसिद्धीस आली. हेन्‍री फील्डिंग (१७०७–१७५४) या सुप्रसिद्ध कादंबरीकाराने टॉम थंब (१७३०) हे नाटक लिहिले. त्यात त्याने हिरोइक ट्रॅजेडीची भरपूर थट्टा केली आहे.

 

प्राचीन ग्रीक व लॅटिन नाटकांतील विचारांचे व त्यांच्या रचनेचे अनुकरण करणारी नाटकेही लिहिली गेली. त्यांत जोसेफ अ‍ॅडिसनचे केटो (१७१३) व डॉ. जॉन्सनचे आयरीन (१७४९) ही दोन प्रसिद्ध आहेत.
जॉर्ज लिलोच्या (१६९३–१७३९) द लंडन मर्चंट (१७३१) ह्या नाटकात एक प्रबळ खलनायक व दुर्बळ सत्प्रवृत्त नायक ह्यांच्यातील तीव्र संघर्ष दाखविण्यात आला आहे. ह्यात भडक शोकात्मकतेचे वातावरण निर्माण करून प्रेक्षकांना हेलावून सोडण्याचा प्रयत्‍न केला आहे. जॉन गे ह्या लेखकाची बेगर्स ऑपेरा ही संगीतिका हे ह्या शतकातील आणखी एका लोकप्रिय नाट्यप्रकाराचे उदाहरण. ह्या शतकाच्या उत्तरार्धातील दोन महत्त्वाचे नाटककार म्हणजे ऑलिव्हर गोल्डस्मिथ व रिचर्ड शेरिडन (१७५१–१८१६). गोल्डस्मिथच्या शी स्टूप्स टू काँकर (१७७३) ह्या नाटकाला अफाट लोकप्रियता लाभली. ह्या नाटकाच्या रचनेतली सहजता व नैसर्गिकपणा ह्यांचे तत्कालीन प्रेक्षकांना एकदम आकर्षण वाटले; कारण त्या आधीच्या साठ वर्षांत इंग्रजी रंगभूमीवर असे काही पहावयास मिळाले नव्हते. शेरिडनची द रायव्हल्स (१७७५) व द स्कूल फॉर स्कँडल (१७७७) ही ह्या शतकातील अत्यंत विनोदी प्रहसने. शेरिडनचे संवाद विनोदाने बहरलेले असतात व त्याच्या भाषेवर एक अपूर्व झळाळी असते. द रायव्हल्समधील मिसेस मॅलप्रॉप हे पात्र तर अमरच झाले आहे. बोलताना भलभलते शब्द वापरून विनोदनिर्मिती करणे, हे ह्या पात्राचे वैशिष्ट्य. तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून एक शब्दच (मॅलप्रॉपिझम) इंग्रजी शब्दकोशात दाखल झाला आहे.

 

कादंबरी

१६७८ साली प्रसिद्ध झालेल्या बन्यनच्या पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेसमध्ये कादंबरीचे काही गुण आहेत; पण ती मुख्यत: एक रूपक कथा आहे, रूढ अर्थाने कादंबरी नाही; म्हणून इंग्रजी कादंबरीचा पाया खऱ्या अर्थाने अठराव्या शतकात घातला गेला आणि तो डॅन्यल डीफोच्या (१६६० ?–१७३१) कादंबऱ्यांनी घातला, असे म्हणता येईल, एका प्रत्यक्ष प्रसंगावर आधारलेल्या रॉबिन्सन क्रूसो (१७१९) ह्या त्याच्या कादंबरीत सत्य आणि कल्पित ह्यांचे इतके प्रभावी आणि मनोवेधक मिश्रण आहे, की प्रसिद्ध होताच ती लोकप्रिय झाली आणि आजही तिची लोकप्रियता कायम आहे. जगातील सर्व प्रमुख भाषांत तिची भाषांतरे झाली आहेत. त्यानंतर त्याने सत्य आणि कल्पित ह्यांवर आधारलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्या लेखनात भाषासौष्ठवाचे किंवा कलात्मक शैलीचे गुण नाहीत; पण सत्य घटनांना कल्पिताचा आधार देऊन त्या मनोवेधक रीतीने उभ्या करण्यात तो यशस्वी झाला आहे आणि त्याच्या लेखनात एक जोमदारपणा आणि वास्तवाचे जिवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य आहे. पुढे ह्या शतकात कादंबरीवाङ्‍‍मयाने वास्तववादी, सूक्ष्म मनोविश्लेषणात्मक अथवा मुक्त चिंतनपर असे वळण घेतले आणि मध्यमवर्गीयांच्या मनोभावनांचे चित्रण करणारा हा निवेदनप्रकार गद्यमहाकाव्याच्या पंक्तीला नेऊन बसविला. १७४० मध्ये सॅम्युएल रिचर्ड्‌सन (१६८९–१७६१) ह्या छपाईचा धंदा करणाऱ्या अल्पशिक्षित लेखकाने पॅमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड ह्या नावाची पत्रात्मक कादंबरी प्रसिद्ध केली. ह्या कादंबरीचा दुसरा भाग १७४१ मध्ये प्रसिद्ध झाला. व्यक्तिरेखेच्या भोवती जाणीवपूर्वक गुंफलेले एकसंध गतिमान कथानक व त्यातून फुलणारा मानवी स्वभाव दीर्घ गद्यकथानकात प्रथमच निर्माण झाला. म्हणून रिचर्ड्‌सनला कादंबरीच्या जनकत्वाचा मान अनेक वेळा दिला जातो. पॅमेला, क्‍लॅरिसा हार्लो (२ भाग, १७४७–४८) द हिस्टरी ऑफ सर चार्ल्स ग्रँडिसन (७ खंड, १७५३–५४), ह्या कादंबऱ्यांतून रिचर्ड्‌सनने मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण करून मध्यमवर्गीय नीतिमूल्यांचा गौरव केला. हळुवार, सूक्ष्म भावच्छटा निर्माण करणे, हे त्याचे वैशिष्ट्य. ह्या भावच्छटा नीत्युपदेशाच्या आवरणाखाली कित्येक वेळा झाकून जातात. क्‍लॅरिसा ही शोकात्म कादंबरी तिच्यातील कुंटणखान्यांच्या आणि शहरी भपकेबाज जीवनाच्या वास्तववादी चित्रणामुळे संस्मरणीय झाली आहे. चार्ल्स ग्रँडिसन मधील धनिकाचे चित्रण त्याच्या सर्वगुणसंपन्नतेमुळे फिके वाटते. रिचर्ड्‌सनच्या भावविवश चित्रणाचा आणि बारकाव्याचा फार मोठा प्रभाव सर्व समकालीन यूरोपीय कथावाङ्‍मयावर पडला. हेन्‍री फील्डिंग हा अठराव्या शतकातील आणखी एक महत्त्वाचा कादंबरीकार. फील्डिंगच्या जोसेफ अँड्रूज (१७४२) ह्या कादंबरीचा उदय रिचर्ड्‌सनच्या संकुचित, मर्यादित व पुस्तकी नीतिकल्पनांचे आणि सांकेतिक भावविवशतेचे विडंबन करण्यासाठी झाला; परंतु केवळ विडंबनाने वा उपहासाने फील्डिंगच्या खऱ्या सर्जनशक्तीला वाव मिळण्यासारखा नव्हता. जोसेफ अँड्रूज ह्या कादंबरीत भोळ्या, सालस, ध्येयवादी पार्सन अ‍ॅडम्सचे फील्डिंगने केलेले चित्रण श्रेष्ठ दर्जाचे ठरले व त्यातूनच पुढील प्रगत स्वभाव-चित्रणाची पूर्वसूचना मिळाली. ए जर्नी फ्रॉम धिस वर्ल्ड टू द नेक्स्ट (१७४३), मि. जॉनाथन वाइल्ड द ग्रेट (१७४३) ह्या अनुक्रमे अद्‍‍भुतरम्य व विडंबनात्मक कथांनंतर फील्डिंगच्या टॉम जोम्स, अ फाउंडलिंग (१७४९) आणि अमीलिया (१७५१) ह्या श्रेष्ठ कादंबऱ्या प्रकटल्या. रिचर्ड्‌सनच्या संकुचित नीतिमूल्यांपेक्षा हृदयांच्या श्रीमंतीवर, मनाच्या व संस्कृतीच्या प्रगल्भतेवर नीती अवलंबून आहे, हे फील्डिंगने दाखविले. उदार मनाचा आणि साधेपणाचा वारसा ज्याला लाभला, तो टॉम जोन्स त्याची रूढ नैतिक स्खलनशीलता जमेस धरूनही प्रशंसनीय आदर्श ठरतो. त्याने रहस्यपूर्ण उत्कंठेला ताण देईल अशा कल्पक कथानकाचा आदर्श ह्या कादंबरीत उभा केला. आपल्या कादंबऱ्यांतून अनेकविध व्यक्तिरेखांचे वास्तववादी चित्रण त्याने केले व विविध जीवनानुभवांना कलारूप देण्याचे आपले कौशल्य प्रकट केले. टोबायस स्मॉलिट (१७२१–१७७१) ह्याच्या रॉडरिक रँडम (१७४८) व पेरीग्रीन पिकल (१७५१) ह्या कादंबऱ्यांत जीवनातील भीषण अनुभवांचे हृद्य चित्रण दिसते. हंफ्री क्‍लिंकर (१७७१) ही त्याची अधिक प्रगल्भ कलाकृती ब्रँबल कुटुंबातील विचित्र, विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्ती साकार करते. अशाच प्रकारच्या तऱ्हेवाईक परंतु मानवतेने ओथंबलेल्या व्यक्तिरेखांवर भर देऊन लॉरेन्स स्टर्न (१७१३–१७६८) ह्याने ट्रिस्ट्रम शँडी (९ खंड, १७६०–१७६७) ही कादंबरी प्रसिद्ध केली. कोठल्याही रूढ निवेदनपद्धतीत न बसणाऱ्या ह्या कथेत अंकल टोबी, कॉर्पोरल टिम, पार्सन योरीक ह्यांसारख्या श्रेष्ठ व्यक्तिरेखा निर्माण झाल्या. मनोव्यापारांचे दर्शन घडवीत लिहिलेल्या ह्या कादंबरीत एक प्रकारचा आधुनिकपणा आहे. व्यक्तींच्या मनोव्यापारांचे चित्रण करीत असताना काही बोध करणे, काही प्रवृत्ती दडपणे, नाट्यपूर्ण परिणाम घडवून आणणे ही बंधने स्टर्नने टाळली. भावनेला, संवेदनक्षमतेला त्याने स्थान दिले आहे; पण नीतिनिष्ठेच्या दडपणातून ही कादंबरी मुक्त झाली आहे. व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविण्याचे सर्वोत्कृष्ट साधन या दृष्टीने पुढल्या काळात कादंबरी ह्या वाङ्‍‍मयप्रकाराला जे महत्त्व प्राप्त झाले, त्याचा हा प्रारंभ म्हणता येईल. तसेच एक प्रकारे ही कादंबरी स्वच्छंदतावादाचीही पूर्वसूचक आहे. सेंटिमेंटल जर्नी (१७६८) हे त्याच्या फ्रान्सच्या प्रवासाचे वर्णनही त्यातील सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण, सौम्य विनोद, आत्मनिष्ठा आणि सहज केलेले जीवनचिंतन ह्यांमुळे आधुनिक झाले आहे. हॉरिस वॉल्पोल (१७१७–१७९७) ह्याने जुनाट पडके वाडे, गढ्या, अंधारी तळघरे, भुयारे इत्यादींची वर्णने असलेल्या आणि गूढ, भयानक वातावरण निर्माण करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या (उदा., कॅसल ऑफ ऑट्रँटो, १७६४). त्यांचा परिणाम काही अंशी पुढे वॉल्टर स्कॉटवरही झाला.

 

अठराव्या शतकाच्या अखेरीस सामाजिक चालीरीतींमध्ये विशेषत: स्त्रीपुरुष-संबंधांत-हळुवारपणा, नागरी सभ्यता हे गुण आले. त्यामुळे काही स्त्री कादंबरीकारांनी स्त्रीपुरुषसंबंधांवर आधारलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. हॅना मोर (१७४५–१८३३) हिने लिहिलेली एकच कादंबरी (सीलेब्ज इन सर्च ऑफ अ वाइफ, १८०९) अतिशय लोकप्रिय ठरली. फॅनी बर्नी (१७५२–१८४०) हिच्या कादंबऱ्यांत तत्कालीन समाजाचे चित्र दिसते, तर मराया एजवर्थ (१७६७–१८४९) हिच्या कॅसल रॅकरेंट (१८००) व बेलिंडा  (१८०१) ह्यां आयरिश जीवनावरील कादंबऱ्या अधिक वास्तववादी आहेत. त्यांचे महत्त्व म्हणजे त्यांनी स्कॉटसारख्या श्रेष्ठ एतिहासिक कांदबरीकाराला स्कॉटिश आयुष्याबद्दल लिहिण्याची स्फूर्ती दिली.

 

वाङ्‍‍मयसमीक्षा

वाङ्‍मयसमीक्षेला आरंभ सतराव्या शतकात ड्रायडनच्या लेखनापासून झाला असला, तरी तिला अधिक भरीवपणा अठराव्या शतकात आला. ह्या शतकातील वाङ्‍मयसमीक्षा वाङ्‍मयाचा नित्य व अविभाज्य भाग बनून गेली. ह्या साहित्यविचारांवर अ‍ॅरिस्टॉटल, सिसेरो, हॉरिस यांसारख्या प्राचीन ग्रीक व लॅटिन आणि आधुनिक ब्वालो (१६३६–१७११) व रापँ (१६२१–१६८७) या फ्रेंच समीक्षकांचा खोल परिणाम झाला. प्राचीनांच्या साहित्यकृती व साहित्यविचार यांचे अनुकरण केल्यानेच इंग्रजी वाङ्‍मय आधीच्या काळातील अराजकातून बाहेर पडेल, अशी विचारधारा होती उदा., पोपचे एसे ऑन क्रिटिसिझम (१७११). परंतु अ‍ॅडिसन, पोप व डॉ. जॉन्सन यांनी साहित्यसमीक्षेचा प्रसंगानुसार स्वतंत्रपणे व निर्भीडपणे विचार केला.

 

‘निसर्गाला अनुसरा’ या संदेशाला अठराव्या शतकातील वाङ्‍मयात एक विशिष्ट अर्थ होता. मानवी जीवनाचे निरीक्षण करणे, त्याचा अर्थ समजावून घेणे व तो प्रभावी भाषेत मांडणे हा तो अर्थ. ही जीवनाकडे बुद्धिवादी चिकित्सकपणे पहाण्याची भूमिका. यातून जीवनावर चिकित्सक व टीकात्मक भाष्य करणारे वाङ्‍मय निर्माण झाले.

 

वरील संदेशाचा दुसरा अर्थ

निसर्गात सर्व गोष्टी एक सुसूत्र पद्धतीने रचिल्या आहेत. ह्याचे वाङ्‍मयात प्रतिबिंब दिसले पाहिजे, म्हणजेच कलाकृती रेखीव असली पाहिजे. योग्य शब्द योग्य ठिकाणीच वापरले पाहिजेत. अभिव्यक्तीत स्वच्छपणा, ओज व भारदस्त साधेपणा हवा. शैलीत खटाटोप दिसू नये; पण काही खास अलौकिक वेगळेपणा जाणवावा. वाङ्‍मयाच्या भाषेत सभ्यता पाहिजे. त्या भाषेचा सूर सुसंस्कृत मनाला पटला पाहिजे.

 

ललित लेखनामागील प्रतिभेचे स्वरूप व वाङ्‍मयाभिरुचीचे स्वरूप यांचा फारच तपशीलवार विचार झाला. प्रतिभा ही एक दिव्य शक्ती आहे; तिच्या योगाने लेखकाला जीवनातील अनुभवांमधला आगळेपणा उमगतो; त्यांतील सौंदर्य उमगते; जीवनातील दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो; असे अ‍ॅडिसनने व जॉन डेनिसने (१६५७–१७३४) म्हटले आहे. अ‍ॅडिसनने पॅरडाइस लॉस्ट या मिल्टनच्या महाकाव्याचे समीक्षण नि:पक्षपातीपणे केले आहे.

 

शाफ्ट्स्बरीने (१६७१–१७१३) वाङ्‍मयाभिरुचीविषयी मौलिक विचार व्यक्त केले. तो म्हणतो: जे चांगले व सुंदर आहे त्याकडे मनाची असलेली स्वाभाविक ओढ ही मनुष्यस्वभावातल्या नैतिकतेचीच साक्ष देते. साहित्य समीक्षकाने जाणीवपूर्वक या नैतिकतेची जोपासना केली पाहिजे. तो पूर्वग्रहदूषित व पक्षपाती समीक्षेचा निषेध करतो.

 

वाङ्‍मयाचे विषय कोणते, तर प्रातिनिधिक, नित्य परिचयाची, परंपरेने माहीत असलेली जीवनविषयक सत्ये; कारण मानवी स्वभाव व मन ह्या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही सत्ये सर्वसाधारण मनुष्यांच्या जीवनात आढळतातच. नेमके या गोष्टीत डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरचे मोठेपण हेरले. तऱ्हेवाईक, एकांगी किंवा एकरंगी व्यक्तिमत्त्व रंगविणे म्हणूनच कालापव्यय मानला गेला. त्याचप्रमाणे समाजाच्या वरच्या थरातच जीवनाची अंगे फुलतात व जोपासली जातात म्हणून ह्या समाजाचेच चित्रण वाङ्‍मयात आवश्यक ठरते, अशी डॉ. जॉन्सनसारख्यांची भूमिका होती.

 

प्रतिभेच्या योगानेच प्रातिनिधिक सत्यांचा जिवंत साक्षात्कार होतो. जे आहे त्यालाच नव्याने गवसलेल्या गोष्टींची नवलाई आणणे किंवा आहे त्याचे वास्तविक स्वरूप विशद करणे म्हणजेच प्रतिभेची नवनिर्मिती. यामुळेच शेक्सपिअरच्या काळातला प्रतिभेचा बेबंद व मुक्त संचार या शतकात नीट आकलन झाला नाही. प्रातिनिधिक सत्याच्याच अभिनव मांडणीवर पुन्हापुन्हा भर देण्यात आला. तथापि शेक्सपिअरप्रभृती जुन्या कवींचे वास्तविक वाङ्‍‍मयीन महत्त्व याच शतकातल्या समीक्षेने प्रथम पटवून दिले. टॉमस हॅन्मर, थीओबॉल्ड (१६८८–१७४४), पोप व जॉन्सन यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचे अधिकृत पाठ निश्चित करण्यात खूपच मेहनत घेतली. अशा प्रयत्‍नांतूनच एखाद्या साहित्यकृतीतील मूळ पाठ चिकित्सकपणे ठरविण्याची तत्त्वे उदयास आली. ह्या संदर्भात डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरकृत नाटकांच्या खंडांसाठी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना फारच मोलाची आहे.

 

डॉ. जॉन्सन हा ह्या शतकातील समीक्षकांचा मुकुटमणी. त्याचे समीक्षाविषयक सिद्धांत फारच मोलाचे आहेत. समीक्षा केवळ सिद्धांत व पूर्वीची उदाहरणे यांवर अवलंबून ठेवू नये. साहित्यकृतीचे डोळस परीक्षण हाच तिचा खरा आधार असला पाहिजे. समीक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाशी निगडित झाली पाहिजे. लेखकाचे मनोगत लक्षात घेऊन समीक्षा केली पाहिजे, या मतांचे समर्थनच जणू त्याने द लाइव्ह्‌ज ऑफ द पोएट्स (१७७९–१७८१) ह्या ग्रंथाच केले. लेखकाच्या जीवनाचे त्याच्या साहित्यकृतींच्या समीक्षेमध्ये केवढे महत्त्वाचे स्थान आहे, हे त्याने दाखवून दिले. त्याच्या मते वाङ्‍‍मयाचा हेतू जीवनातील अनुभवांचे स्वरूप स्पष्ट करणे हा आहे. सर्वसामान्यांचे अनुभव म्हणजेच खरे नैसर्गिक अनुभव असतात. त्यांचेच चित्रण वाङ्‍मयात झाले पाहिजे. हा सर्वसाधारणपणे नैतिक दृष्टिकोण आहे, असे म्हणावे लागते. ह्यामुळे जॉन्सनने मिल्टन व डन या कवींवर त्यांचे काव्य नीट समजावून न घेता टीकास्त्र सोडले.

 

साहित्यकृतींवरील परामर्शात्मक लेखनामुळे टीकाकारांना वाङ्‍मयीन जगतामध्ये एक आदरयुक्त भीतीचे स्थान प्राप्त झाले. वाङ्‍मयव्यापार ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती नीट पायावर उभी राहिली पाहिजे, निकोप राहिली पाहिजे, दर्जेदार पाहिजे, असे सांगणाऱ्या समीक्षकांना एक उच्च दर्जा प्राप्त झाला.
अठराव्या शतकातील इंग्रजी भाषेची घडण : १६६० पासूनच इंग्रजी भाषेच्या सुधारणेचा विचार सुरू झाला; कारण इंग्रजीत प्रचंड संख्येने इतर भाषांतून शब्द व वाक्‌प्रचार येऊन दाखल झाले होते. परंतु इंग्रजीतील सर्वच शब्दांच्या अर्थांची आणि शब्दांतील अक्षरांची व त्यांच्या उच्चारांची निश्चिती व्हायची होती. इंग्रजी व्याकरणाबाबतही गोंधळाचीच परिस्थिती होती. ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्यावर भाषासुधारणेचे युग सुरू झाले. फ्रेंचांप्रमाणे एक संस्था (अकॅडमी) स्थापून हे कार्य करावे असे विचार ड्रायडन, डीफो, स्विफ्टप्रभृती अनेकांनी व्यक्त केले; पण संस्था स्थापून असले काम होत नाही, असे डॉ. जॉन्सनचे मत होते. प्रत्यक्षात अशी संस्था स्थापन झाली नाहीच. शेवटी अठराव्या शतकातील वाचकवर्गाच्या अपेक्षा व त्या पुऱ्या करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्‍न ह्यांमुळेच इंग्रजी भाषेत व अभिव्यक्तीत इष्ट ती सुधारणा घडून आली. एक सहजसुगम, वैयक्तिक व तऱ्हेवाईक वैशिष्ट्यांपासून मुक्त अशी इंग्रजी शैली निर्माण झाली. सबंध सुशिक्षित समाजाने एकसंधपणे अशा रीतीने भाषा वापरण्याचा इंग्‍लंडच्या जीवनातील हा पहिला व शेवटचाच कालखंड.
ह्या संदर्भात ‘रॉयल सोसायटी’ने केलेल्या प्रयत्‍नांचा अवश्य निर्देश हवा. या संस्थेने जाणीवपूर्वक सोप्या, स्वच्छ, ओजस्वी व थोड्या शब्दांत पूर्णपणे अर्थ व्यक्त करणाऱ्या लेखनशैलीचा व भाषणशैलीचा सातत्याने पुरस्कार केला. त्याचप्रमाणे अ‍ॅडिसन, स्विफ्ट, स्टीलप्रभृती लेखकांनी इंग्रजी शैलीत आमूलाग्र बदल घडवून आणले. स्विफ्टने योग्य ठिकाणी योग्य शब्द, अशी शैलीची व्याख्या केली आहे. जॉन ह्यूज ह्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या लेखकाने शैलीवर निबंध लिहिला. त्या त्या लेखनप्रकाराला आणि विषयाला अनुरूप अशी शैली असावी, याचाही जाणीवपूर्वक विचार झाला.
शब्दकोश रचण्याचेही अनेक प्रयत्‍न झाले. सर्वांनीच शब्दांचे अर्थ, वर्णलेखन (स्पेलिंग), उच्चार व व्युत्पत्ती देण्याचा हेतू बाळगला. त्यात डॉ. जॉन्सनचा प्रयत्‍न भव्य व मूलगामी आहे. त्याने शब्दांचे सोदाहरण अर्थ दिले; पण शब्दोच्चार मात्र दिले नाहीत.
इंग्रजीची व्याकरणेही अनेक झाली. इंग्रजी भाषेचा प्रचलित वापर लक्षात घेऊन व्याकरण रचायचे, का तर्ककर्कश नियमांत भाषा बसवावयाची, ह्या वादात दुसरी विचारसारणी प्रबळ ठरली. शतकाच्या शेवटीशेवटी शब्दांचे वर्णलेखन व उच्चार ह्यांना सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
काव्याची भाषा मात्र कृत्रिम ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्‍न झाला; कारण प्रचलित भाषा काव्यास अनुकूल नसते, असे मत रूढ होते. यासाठी होमर, व्हर्जिल, स्पेन्सर, मिल्टन इत्यादींच्या शैलींचा अभ्यास झाला. साध्या भाषेत लिहिलेल्या काव्याचे विडंबन होण्याची भीती वाटल्यामुळेही काव्याच्या शैलीत कृत्रिमता जोपासण्यात आली. त्यामुळे ठराविक विशेषणे, वाक्प्रचार, वर्णानांचा तोचतोपणा या काव्यात आला.
एकंदर समाज सर्वच बाबतींत सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी ह्या शतकात जो प्रयत्‍न झाला, त्याचाच एक भाग म्हणजे भाषेला वळण लावणे हा होता. त्यातूनच एकसंध, सहजसुलभ, लोकशिक्षणाला अनुकूल अशी इंग्रजी भाषा निर्माण झाली.
शैलीसाठी विशेष नावाजलेल्या लेखकांचा स्वतंत्र निर्देश करणे आवश्यक आहे. अ‍ॅडिसनने नियतकालिक निबंधास योग्य अशा शैलीची जोपासना केली. स्विफ्टने अत्यंत धारदार व ओजस्वी भाषा निर्माण केली. डॉ. जॉन्सनने अभिव्यक्तीमध्ये विद्वत्तेला साजेसे गांभीर्य आणले. त्याच्या लेखनाने इंग्रजी भाषा प्रगल्भ बनली. गोल्डस्मिथच्या भाषेतील प्रसन्न खेळकरपणा जॉन्सनच्या शैलीच्या तुलनेने अधिकच विलोभनीय वाटतो. गोल्डस्मिथच्या निबंधांमध्ये जे लालित्य दिसते ते आजच्या ललितनिबंधाचे पूर्वरूपच म्हणता येईल. गिबनची शैली डौलदार आहे. त्याची पल्लेदार वाक्ये त्याच्या गंभीर आशयाला साजेशीच आहेत. ह्या सर्व व्यक्तिगत वैशिष्ट्यांशिवाय सर्वांच्याच शैलींमध्ये अठराव्या शतकातील इंग्रजीच्या प्रातिनिधिक खुणा दिसतातच. सर्वांत ठळक खूण म्हणजे आपले लिखाण लोकांच्या नित्याच्या भाषेत करण्याची प्रत्येकाची धडपड; कारण ह्या शतकातील सर्वच लेखनाचे उद्दिष्ट प्रामुख्याने लोकशिक्षण हेच होते.
लेखक : रा. भि. जोशी, ; अ. के. भागवत, ; वा. चिं. देवभर,

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate