অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह

भारतात आढळणाऱ्या भाषासमूहांपैकी एक. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे या समूहात जवळजवळ साठ भाषा बोलल्या जात असून त्याच्या भाषिकांची संख्या ६१,९२,४९५ म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सु. १·५० टक्के होती.

भारताच्या डोंगराळ भागात पसरलेल्या भाषा

या भाषा मध्य व पूर्व भारताच्या डोंगराळ भागात व भारताबाहेरही पसरलेल्या आहेत. १९६१ च्या खानेसुमारीत नोंद झालेल्या भारतातील भाषा पुढीलप्रमाणे : खैरवारी, संथाळी, हार, करमाली, माहली, माझी, पहाडिया, मुंडारी, भूमीजी, कुरमी, बिर्‍होर, कोंडा, खैरा, हो, तुरी, असुरी, आगरिया, बिरजिआ, कोरवा, कोराकू, सिंगली, कोरकू, मुवासी, नीहाली, खाडिया, जुआंग, सावार, गदाबा, कोल, थार, गायारी, गोरा, लोहरी-संथाळी, मुरा, भुईया, लारका, राहिया, मीर्धाकोंडा, उदंगमुद्रिया, लोहरा, मानकिडी, बईटी, ढेलकी, लोधा, मीर्धाखाडिया, आदीभाषा-मुंडा, लोहरी-मुंडा, महत्तो, पारेंगा, पर्‍हैया, कमारी-संथाळी, किसान-संथाळी, किसान-भूमीजी, परसी-भूमीजी, पहाडी-बिरजिआ, जंगली-कोरवा व माझी-कोरवा. काही भाषांचे नामकरण झालेले नाही.

तीन गट

या भारतीय भाषांचे कोल किंवा मुंडा, खासी व निकोबारी असे तीन गट आहेत. मुंडा गटात संथाळी (३१,३०,८२९), मुंडारी (७,३६,५२४), हो (८६,४८,०६६), कोरकू (२,०८,१६५), सावार (२,६५,७२१), गदाबा (४०,१९३) इ. भाषांचा समावेश होतो. खासी ही आसामातील भाषा असून ती ३,६४,०६३ लोकांकडून बोलली जाते. बंगालच्या उपसागरातील निकोबार बेटांच्या रहिवाशांची निकोबारी भाषा १३,९३६ लोक बोलतात.

भारताबाहेर उत्तर ब्रह्मदेशात पालोङ् आणि वा या भाषा असून माँङ् ही दक्षिण ब्रह्मदेशात बोलली जाते. इंडोचायनामधील ख्मेर व व्हिएटनामी भाषांना इतरांच्या मानाने बरीच प्रतिष्ठा आहे.

ऑस्ट्रिक भाषिक लोक ब्रह्मदेशमार्गे (काहींच्या मते मेसोपोटेमियातून)फार प्राचीन काळी भारतात आले. हा काळ द्राविड आगमनाच्याही पूर्वीचा असणे शक्य आहे. ते सर्व उत्तर भारतभर पसरले; पण ख्रि.पू. १५०० च्या सुमारापासून सुरु झालेल्या आर्यभाषिक लोकांच्या आक्रमणापुढे त्यांना माघार घ्यावी लागली आणि बहुसंख्य ऑस्ट्रिक भाषीय लोक आर्यभाषिक बनले. अनेकांनी रानावनांचा आश्रय घेतला. नव्याने आर्य भाषा बोलू लागलेल्या ऑस्ट्रिक लोकांच्या भाषेत मूळ भाषेतील काही गोष्टी कायम राहिल्या आणि आजही भारतीय आर्य भाषा व ऑस्ट्रिक भाषा यांत आढळून येणारी साम्यस्थळे या सांस्कृतिक परिवर्तनातून आलेली आहेत. आग्र, मयूर, नारिकेल, कदल, ताम्बूल, हरिद्रा, वातिङ्गण, अलाबु इ. शब्द मुळात ऑस्ट्रिक असावेत, असे मानले जाते. या शब्दांतून काही अंशी ऑस्ट्रिक लोकांच्या जीवनाचे दर्शन घडते. उत्तर भारतात काही ठिकाणी वीस या संख्येवर आधारलेली मोजण्याची पद्धत मुळात ऑस्ट्रिक आहे (हिं. कोडी, बं. कुडी इ. ) चांद्रमासानुसार तिथीवरुन दिवस मोजण्याची हिंदूंची पद्धतही ऑस्ट्रिकच असावी. गङ्गा हे मूळ नदीवाचक ऑस्ट्रिक शब्दाचे संस्कृतीकरण आहे असे दिसते. हा शब्द थाई भाषेत खाँङ्, चिनी भाषेत किआङ् असा आढळतो. पुनर्जन्माची कल्पनाही हिंदू तत्त्वज्ञानात ऑस्ट्रिक लोकांच्या मरणोत्तर जीवनाबद्दलच्या कल्पनांतून आलेली दिसते.

शब्दसंग्रहाप्रमाणेच आर्यभाषांची ध्वनिपद्धती, रुपपद्धती, वाक्यरचना, वाक्‌प्रयोग यांच्यावरही ऑस्ट्रिक भाषांचा प्रभाव पडला असला पाहिजे.

ऑस्ट्रिक भाषांचे तुलनात्मक व्याकरण अजून व्हावयाचे आहे. इंडोनेशियन भाषा अनेकावयवी व विकाररहित आहेत, पण त्या उपसर्ग, प्रत्यय व अंतःप्रत्यय यांचा उपयोग करतात; तर माँङ्, ख्मेर व खासी यांसारख्या भाषांची प्रवृत्ती एकावयवित्वाकडे आहे. याउलट कोल गटातील भाषांत प्रत्ययपद्धती आढळते. काही असले तरी प्रत्ययनिष्ठ आर्यभारतीय भाषांहून उपसर्ग व अंतःप्रत्ययनिष्ठ असे या भाषांचे वेगळेपण चटकन जाणवते.

या भाषांची ध्वनिपद्धती साधी आहे. संयुक्त स्वर किंवा संयुक्त व्यंजने नाहीत. संधी झाल्यासच अशी व्यंजने मिळतात. स्वरांचा परस्परांवर प्रभाव पडतो. शब्दातील स्वर प्रत्ययातील स्वरात परिवर्तन घडवितो किंवा याउलटही क्रिया होऊ शकते. व्यंजनवर्गात सर्व प्रकारचे स्फोटक मिळतात, उदा., ओष्ठ्य, दंत्य, मूर्धन्य, पूर्वतालव्य, अंततालव्य, सघोष व अघोष, महाप्राणरहित व महाप्राणयुक्त, तथापि घर्षक व अर्धस्फोटक मात्र कमी आढळतात. एकंदर पद्धतीचे संस्कृतच्या ध्वनिपद्धतीशी विलक्षण साम्य आहे. असे असूनही सौर ही एकच भारतीय बोली अशी आहे, की जिच्यात मूर्धन्य वर्ग नाही.

शब्दांचे वर्गीकरण

शब्दांचे वर्गीकरण स्पष्ट नाही. कोणत्याही शब्दाला नामदर्शक वा क्रियादर्शक प्रत्यय इ. लागून तो नामाप्रमाणे वा क्रियापदाप्रमाणे वापरता येतो. हीच गोष्ट विशेषणाची.

नामवाचक शब्दांत सचेतन व अचेतन ही दोन लिंगे आहेत. हा भेद पुढील गोष्टींनी दिसून येतो : (१) द्विवचनाचे व बहुवचनाचे प्रत्यय फक्त सचेतन नामांना लागणे. (२) दर्शक सर्वनामांची दोन रुपे. (३) भिन्न प्रत्यय. वचने तीन आहेत, पण अचेतन नामांत वचनभेद नाही.

अंतःप्रत्ययाने शब्दसिद्धी करण्याच्या प्रक्रिया आहेत, पण उपसर्ग लागून नाहीत: मुंडारी भाषेत मरङ् (मोठा), मनरड् (मोठेपणा), संथाळी भाषेत राज् (राजा), रापाज् (राजकुटुंब) इ. शब्दान्ती लागणारे प्रत्यय शब्दांचे परस्परसंबंध निश्चित करावयाला उपयोगी पडतात. धातुरुपावली प्रत्यय लावून सिद्ध होते. आर्यभाषांच्या संपर्कामुळे सहायक क्रियापदांचा उपयोग करुन कालनिश्चिती करण्याचा प्रकार या भाषांनी उचलला आहे.

वाक्यरचनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे सकर्मक क्रियापदात कर्ता व कर्म दाखविलेले असले, तरीही क्रियापदाला सर्वनाम जोडून ते पुन्हा दर्शवावे लागतात. या प्रकाराला सर्वनामीकरण अशी संज्ञा आहे हे सर्वनाम-प्रत्यय कर्ता, कर्म व स्वामित्व दाखविणारे असतात; म्हणजे क्रियापदाचे रुप पुरुषवाचक असते.

संथाळी संख्यावाचक शब्द : १ मित, २ बार, ३ पे, ४ पोन, ५ मोरे, ६ तुरुइ, ७ एआए, ८ इराल, ९ आरे, १० गल, १५ गलमोरे, २५ मित-इसि-मोरे, ५० बार-इसि-गल, १०० मोरे-इसि, १,००० हजार, १०,००० ओजुत.

लेखक : ना. गो. कालेलकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate