অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपर व्होल्टा - भूगोल, हवामान

अपर व्होल्टा - भूगोल, हवामान

अपर व्होल्टा

आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ५० पश्चिम ते २० पू. रेखांश यांदरम्यान वसलेला देश. क्षेत्रफळ २,७४,२०० चौ. किमी. व लोकसंख्या ५४,८५,९८१ (१९७०). त्याच्या पश्चिमेस, वायव्येस व उत्तरेस माली, ईशान्येस व पूर्वेस नायजर, दक्षिणेस आयव्हरी कोस्ट, घाना आणि टोगो व आग्नेयीस दाहोमी हे देश आहेत.

भूवर्णन

ह्या देशाची भृपृष्ठरचना पठारी असून प्रदेशाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे थोडीशी वाढत गेली आहे. झिजेमुळे उंचसखल झालेले हे पठार स्फटिकमय खडकांचे तयार झाले आहे. पश्चिमेकडे त्यावर वालुकाश्माचे थर असून उत्तरेकडे व ईशान्येस ग्रॅनाइटचे घुमटाकृती भाग आहेत. जमिनीवर लोहयुक्त तांबड्या घट्ट खडकांचा खर आहे. मध्यवर्ती प्रदेशाची उंची जास्त असल्यामुळे तेथे दोन जलविभाजक प्रदेश निर्माण झाले आहेत. ईशान्य व पूर्व क्षेत्रांतील पाणी नायजर नदीला मिळते. पश्चिम क्षेत्रातील कोम्वे, श्वेत व्होल्टा, तांबडी व्होल्टा व काळी व्होल्टा इ. नद्यांचे पाणी दक्षिणेकडे घानामध्ये वाहत जाऊन व्होल्टा नदीला मिळते. या नद्या जलमार्गास निरूपयोगी आहेत. त्या कधी कोरड्या पडतात तर कधी पुराने दुथडी भरून वाहतात. पर्जन्याचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमीकमी होत जाते.दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्य ११५ सेंमी. तर उत्तरेकडे २५ सेंमी. आहे. मान्सून प्रदेशांप्रमाणे पाऊस उन्हाळ्यातच पडतो; हिवाळा बिनपावसाचा असतो. वार्षिक सरासरी तापमान ३७ ·७० से. असते. जुलै-ऑगस्ट महिन्यांत पाऊस पडल्यामुळे तपमान थोडे कमी होते. हिवाळ्यात सहारातून कोरडे वारे येतात. या वाऱ्‍यांना ‘हरमॅटन’ म्हणतात. त्यांच्या कोरडेपणामुळे आद्रतेचे प्रमाण कमी होते. या प्रदेशात तृणभक्षक व मांसभक्षक प्राणी विपुलतेने आढळतात. गायीगुरे, गाढवे, घोडे, शेळ्यामेंढ्या इ. पाळीव तसेच गॅझेल व इतर जातींची हरिणे, माकडे, हत्ती व हिप्पोपोटॅमस इ. तृणभक्षक प्राणी आणि या प्राण्यांवर उपजीविका करणारे मांसभक्षक प्राणी आहेत. पूर्वी या प्राण्यांची अनिर्बंध शिकार होत असे; आता परवाना लागतो.

येथे अनेक  प्रकारचे पक्षी आहेत. डास, त्से त्से माशी, टोळ, वाळवी इत्यादिकांमुळे बरीच हानी होते. नद्यांत सुसरी व भरपूर मासे सापडतात. पूर्व भागात वाळवंटी व गवताळ प्रदेश असून अन्य भागांत सॅव्हानासारखी गवताळ वनस्पती आहे. अधूनमधून गोरखचिंच (बाओबाब), तेल्याताड व बाभूळ हे प्रमुख वृक्ष दिसून येतात. बाभळीपासून डिंक मिळतो. कमी पर्ज न्याच्या प्रदेशात काटेरी झाडेझुडपे व गवत हीच वनस्पती उगवते. दक्षिणेकडील भागात गवत व विरळ अरण्ये असून जसेजसे उत्तरेकडे जावे तसतशी ही अरण्ये अधिक विरळ होऊ लागतात. सोसाट्याच्या वाऱ्‍यामुळे झाडांना छत्रीसारखा आकार आलेला असतो. येथे जांभ्या दगडाची, पिवळसर, वाळूमिश्रित व मळईची—अशी विविध प्रकारची जमीन आहे. मँगॅनीज, सोने, बॉक्साइट, तांबे, लोखंड, हिरे वगैरे खनिजे या देशात सापडतात. तथापि खाणी मोठ्या प्रमाणात चालविल्या जात नाहीत.


स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate