অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंतरराष्ट्रीय वाररेषा

आंतरराष्ट्रीय वाररेषा

१८०० रेखावृत्तावरील एक काल्पनिक रेषा. १८०० रेखावृत्त पॅसिफिक महासागरातून जाते; ते ज्या ज्या ठिकाणी जमिनीवरून जाते ती ठिकाणे टाळून, सर्वस्वी समुद्रावरून आणि होता होई तो १८०० रेखावृत्ताच्या अनुरोधाने जाणारी, अशी ही रेषा मानलेली आहे. तिच्या पूर्वेला उत्तर व दक्षिण अमेरिका तर पश्चिमेला आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे प्रदेश येतात. ही रेषा ओलांडून जाताना वाराचा बदल करण्याची प्रथा आहे.

पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जाताना ही रेषा ओलांडली, तर चालू असेल त्याच्या मागचा वार धरतात आणि पश्चिमेकडे, अमेरिकेकडून आशियाकडे किंवा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडकडे जाताना पुढचा वार धरतात. जहाजातून किंवा विमानातून एका बाजूच्या देशाकडून दुसऱ्या बाजूच्या देशाकडे जाताना वाराचा हा बदल करतात. या रेषेला ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ असे म्हणतात.

मॅगेलन हा पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला खलाशी. तो १५१९ मध्ये आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून निघून पृथ्वीभोवती पश्चिम दिशेनेच जात राहिला. वाटेत तो मृत्यू पावला. त्याचे काही खलाशी व दोन जहाजेही नष्ट झाली. उरलेले एक जहाज व काही खलाशी सु. तीन वर्षानी पुन: स्वदेशी पोचले; तेव्हा स्पेनमध्ये गुरुवार तारीख ७ सप्टेंबर होती. परंतु जहाजावरील खलाशांच्या हिशेबाने तो दिवस बुधवार ता. ६ सप्टेंबरचा होता. त्यांनी पश्चिमेकडे जाताना सूर्यावरून कालमापन केले होते आणि एकंदरीत ३६०० पश्चिमेकडे गेल्यानंतर त्यांच्या कालगणनेत एका दिवसाचा फरक पडला होता. ती एक दिवस मागे पडली होती. त्यांना मग स्पेनमधील कालगणनेशी आपली कालगणना जुळती करून घेण्यासाठी बुधवार ६ सप्टेंबरऐवजी गुरुवार ७ सप्टेंबर ही तारीख व वार धरावा लागला.

कोणत्याही एका ठिकाणाहून पाहता पूर्वेकडील ठिकाणांची स्थानिक वेळ पुढे, तर पश्चिमेकडील ठिकाणांची स्थानिक वेळ मागे असते. ज्या ठिकाणाच्या रेखांशात १५० फरक असेल त्यांच्या स्थानिक वेळांत एक तास फरक पडतो. समजा, एका मूळ ठिकाणाहून पूर्वेकडील ठिकाणे लक्षात घेतली आणि दर १५०रेखांशावर घड्याळ एक एक तास पुढे असते हे मनात आणले, तर कोणत्या तरी एका ठिकाणी त्यावेळी रात्रीचे बारा वाजलेले असणार. त्याच्याही पूर्वेकडील ठिकाणी रात्री बारानंतरची वेळ असणार. पण ती कोणत्या बाराची? आता पश्चिमेकडील ठिकाणे लक्षात घेतली तर दर १५० रेखांशास घड्याळे एक एक तास मागे असणार.

या कल्पनेप्रमाणेही रात्री १२ ची वेळ वर पाहिले त्याच ठिकाणी येईल, पण त्या वेळी तेथे व त्याच्याही पश्चिमेकडील ठिकाण वार कोणता असेल? वरील विचारासाठी आपण सुरुवात करतो तेथे सोमवार ता. ५ असेल, तर जेथे रात्रीचे १२ वाजले असतील तेथे पूर्वेकडे जात जात पोचलो असा विचार करता सोमवारी ता. ५ ला रात्रीचे १२ वाजले असणार आणि पश्चिमेकडून जात जात पोचले असा विचार करता त्याच ठिकाणी रविवार ता. ४ चे रात्रीचे १२ वाजलेले असणार. पुढच्याच क्षणी त्या ठिकाणाच्या पूर्वेकडील भागात रविवार ता. ४ संपून सोमवार ता. ५ सुरू होईल, म्हणून तेथून पूर्वेकडे जाताना सोमवारी ता. ५ ला रात्री १२ नंतर पुन: सोमवार ता. ५ च सुरू झाली, असे मानावे लागेल; तसेच त्या ठिकाणच्या पश्चिमेकडील भागास सोमवार ता. ५ संपून मंगळवार ता. ६ सुरू होईल.

म्हणून तेथून पश्चिमेकडे जाताना रविवारी ता. ४ ला रात्री १२ नंतर एकदम मंगळवार ता. ६ सुरू झाली, असे मानावे लागेल. मूळ ठिकाण वेगवेगळे असेल त्या मानाने वरीलप्रमाणे वाराचा व तारखेचाही बदल करण्याची ठिकाणे वेगवेगळी येतील व त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणी तारीख व वार यांचा मोठा घोटाळा होईल.

यांसाठी सर्वांत आधीची वेळ कोणत्या ठिकाणची असावी हे ठरविणे अवश्य झाले. १८८४ मध्ये अमेरिकेत झालेल्या ‘इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स’मध्ये कोणताही वार १८०० रेखावृत्तावर प्रथम सुरू होतो असे मानावयाचे ठरले. म्हणजे वर वर्णिल्याप्रमाणे १८०० रेखावृत्तावर रात्रीचे १२ वाजलेले असताना तेथून पूर्वेकडे गेल्यास तोच वार पुन: धरावा आणि पश्चिमेस गेल्यास मधला एक वार सोडून पुढचा वार धरावा असे ठरले. खुद्द १८०० रेखावृत्तावर बरोबर रात्री १२ वाजण्याच्या क्षणी एकच वार असतो.

तेथून पूर्वेकडील म्हणजे अमेरिका वगैरे देशांच्या दृष्टीने तो वार संपण्याचा क्षण असतो, तर तेथून पश्चिमेकडील म्हणजे आशिया, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांच्या दृष्टीने तो वार सुरू होत असतो. १८०० रेखावृत्त रात्री १२ ऐवजी इतर कोणत्याही वेळी ओलांडले तरी त्यानंतरच्या रात्री १२ वाजता वाराचा हा बदल करावा, अशी जहाजांवरील प्रथा आहे. तोच वार पुन्हा धरतात तेव्हा त्याला ‘मेरिडियन डे’ म्हणतात.

रशियाच्या अगदी पूर्वेकडील प्रदेशातून व पॅसिफिक महासागरातील काही द्वीपसमूहांवरून १८००रेखावृत्त जाते. तेथे शेजारशेजारच्या ठिकाणी याप्रमाणे वेगवेगळे वार धरले तर व्यवहारात घोटाळा होईल; म्हणून अशा जमिनीवरील जागा व द्वीपसमूह सोडून, परंतु शक्यतो १८०० रेखावृत्ताला धरून, संपूर्णत: समुद्रातून गेलेली अशी एक रेषा कल्पिलेली आहे. ती नकाशावर निश्चित करून सर्व राष्ट्रांनी तिला मान्यता दिली आहे. हीच आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. ती ओलांडताना वरीलप्रमाणे वाराचा बदल करतात. या रेषेप्रमाणे न्यूझीलंड, फिजी वगैरे बेटांचे वार आशिया, ऑस्ट्रेलिया यांच्या वारांशी जुळते असतात; तर अल्यूशन, सामोआ वगैरे बेटांचे वार अमेरिकेच्या वारांशी जुळते असतात.

सायबीरिया व अलास्का यांच्या दरम्यान मोठे डायोमीड व छोटे डायोमीड अशी दोन बेटे आहेत. त्यांमधील अंतर फक्त सु. ३·२ किमी. आहे. परंतु मोठ्या डायोमीडवर मंगळवार असतो तेव्हा छोट्या डायोमीडवर सोमवार असतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा त्या दोहोंमधून गेलेली आहे.

 

लेखक : ज. व. कुमठेकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate