অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आफ्रिका

आफ्रिका

क्षेत्रफळाने आशियाच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड. बेटांसह क्षेत्रफळ ३,०२,७७,१३५ चौ. किमी. उत्तरेस केप ब्‍लँक (३७०२१'उ.) ते दक्षिणेस केप अगुल्हास (३४०५१' द.) दक्षिणोत्तर लांबी सु. ८,००० किमी.; पश्चिमेस केप व्हर्द (१७०३२' प.) ते पूर्वेस केप गार्डाफुई (५१०२५'). पूर्वपश्चिम विस्तार सु. ७,४०० किमी. किनारा सु. ३६,८८८ किमी. या खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त ही तीनही वृत्ते जातात. विषुववृत्त हे जवळजवळ मध्यातून जात असले, तरी या खंडाचा सु. दोन तृतीयांश भाग त्याच्या उत्तरेस आहे व सु. पाच षष्ठांश भाग उष्णकटिबंधात आहे. उत्तरेस जिब्राल्टरच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीने ते यूरोप खंडापासून अलग झालेले असून ईशान्येस सिनाईच्या द्वीपकल्पाने ते आशियाशी जोडले गेले आहे. याच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस अटलांटिक महासागर व पूर्वेस तांबडा समुद्र व अरबी समुद्र यांसह हिंदी महासागर असून, दक्षिणेस २०० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागर यांमधील सीमा मानली जाते.

या खंडात मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबिया, ईजिप्त, मॉरिटेनिया, माली, नायजर, चॅड, सूदान, इथिओपिया, सोमालिया, सेनेगल, गँबिया, गिनी, सिएरा लेओन, लायबीरिया, आयव्हरी कोस्ट, अपर व्होल्टा, घाना, टोगो, दाहोमी, नायजेरिया, कॅमेरून, मध्य आफ्रिका संघराज्य, विषुववृत्तीय गिनी, गाबाँ, झाईरे, काँगो प्रजासत्ताक, युगांडा, केन्या, रूआंडा, बुरूंडी, टांझानिया, झँबिया, मालावी, बोट्‍स्वाना, र्‍होडेशिया, दक्षिण आफ्रिका संघराज्य, स्वाझीलँड, लेसोथो हे स्वतंत्र देश; स्पॅनिश सहारा हा स्पेनच्या व पोर्तुगीज गिनी, अंगोला, मोझँबीक हे पोर्तुगालच्या आणि नैर्ऋत्य आफ्रिका हा दक्षिण आफ्रिकेच्या अमलाखालील प्रदेश; मादागास्कर (मॅलॅगॅसी) व मॉरिशस ही स्वतंत्र बेटे, सेशेल, रॉड्रिगेस व सोकोत्रा ही ब्रिटनची, कॉमोरो व रीयून्यन ही फ्रान्सची, फर्नांदो पो, अन्नाबॉन व कानेरी  ही स्पेनची आणि साऊं टोमे, प्रिन्सिपे, मादीरा व केप व्हर्द ही पोर्तुगालची बेटे यांचा समावेश होतो. अ‍ॅसेन्शन, सेंट हेलीना व ट्रिस्टन द कुना ही ब्रिटनची बेटेही दक्षिण अमेरिकेपेक्षा आफ्रिकेला अधिक जवळ आहेत.

 

आफ्रिकेच्या उत्तरेचा भूमध्यसागरतटावरील प्रदेश यूरोपीयांना दीर्घकाळपर्यंत माहीत होता; परंतु बाकीच्या बऱ्याच भागाशी पाश्चात्त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. येथील हिरे, सोने, तांबे, कोबाल्ट वगैरे मौल्यवान खनिजे व कापूस, कोको, पामबिया, पामतेल, शिसल, भुईमूग इ. कच्चा माल, येथील अरण्यांत मिळणारे लाकूड, येथील विविध प्राण्यांची शिकार व त्यांपासून मिळणारे हस्तिदंत, कातडी वगैरे किंमती पदार्थ यांमुळे या खंडातील शक्य तेवढा प्रदेश आपल्या अमलाखाली आणण्याची यूरोपीय राष्ट्रांची एकोणिसाव्या शतकात मोठीच स्पर्धा लागली. मुळचे लोक मागासलेले असल्यामुळे त्यांना बाजूला सारून आपले वर्चस्व स्थापणे यूरोपीयांना सुलभ झाले.दुसऱ्या महायुद्धानंतर पुष्कळशी स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रे अस्तित्वात आली. या नवोदित राष्ट्रांचे स्थिरपद होण्याचे व विकासाचे प्रयत्‍न व त्यांच्यापुढील समस्या, त्यांच्याकडून शक्य तेवढ्या सवलती व लाभ मिळविण्याचे पुढारलेल्या राष्ट्रांचे प्रयत्‍न, तेथे आपलीच हुकमत कायम ठेवण्याचा पोर्तुगालसारख्या देशांचा अट्टाहास आणि वर्णभेदावर आधारलेले दक्षिण आफ्रिका वा र्‍होडेशिया यांचे शासकीय धोरण यांमुळे या खंडाकडे लक्ष वेधले जात आहे. संयुक्त राष्ट्रांत आफ्रिकी राष्ट्रांच्या गटाचे सामर्थ्य जाणवू लागले आहे.

भूवर्णन

हे खंड बहुतांशी प्राचीन खडकांच्या विस्तीर्ण, ताठर गटाचे बनलेले असून, त्याच्या उत्तरभागी अ‍ॅटलास पर्वत व दक्षिणभागी केप पर्वत रांगा हे भूवैज्ञानिकदृष्ट्या अलीकडील पर्वत आहेत. त्यांच्या दरम्यान पठारांची मालिका असून ही पठारे म्हणजे सपाट किंवा किंचित ऊर्मिल असे विस्तृत भूप्रदेश आहेत. त्यांवर क्वचित काही ठिकाणी अधिक कठीण व प्रतिकारक्षम खडक उभे आहेत. या प्रदेशांभोवती पठारे उतरती होत गेलेली असून उतारांच्या शेवटी अरुंद किनारपट्ट्या आहेत. या पट्ट्या भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर,  टांगानिका व मोझँबीक किनार्‍यांवर, कुनेने व नायजर नद्यांमधील लहान प्रदेशात आणि गँबिया व सेनेगल नद्यांच्या उत्तरेकडील भागात रुंद होत गेलेल्या आहेत.विस्ताराच्या मानाने आफ्रिकेत उंच पर्वत व सखल मैदाने कमी आहेत. २,५०० मी. पेक्षा उंच प्रदेश मर्यादित असून, ते एक तर प्रतिकारक्षम गिरिपिंड तरी आहेत नाही तर ज्वालामुखी शिखरे आहेत. १५० मी. पेक्षा कमी उंचीची सर्व भूमी किनाऱ्यापासून ८०० किमी. च्या आत आहे. फक्त सहारामधील दोन द्रोणीच याला अपवाद आहेत. आफ्रिकेचा दक्षिण व पूर्व भाग अधिक उंच असून उत्तर व पश्चिम भाग कमी उंच आहे. काँगो नदीच्या मुखापासून एडनच्या आखातापर्यंत एक रेषा मानली, तर तिच्या दक्षिणेस सर्व प्रदेश ३०० मी. हून अधिक उंच आहे. यापैकी बराच भाग ९०० मी. पेक्षाही अधिक उंच आहे. या भागात पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्याचा सखल प्रदेश कमी रुंद आहे. या रेषेच्या उत्तरेस बहुतेक प्रदेश १५० मी. ते ३०० मी. उंचीचा आहे. त्यात थोडासाच भाग ९०० मी. पेक्षा अधिक उंचीचा आढळतो. येथे वायव्य भाग व नाईल नदीच्या पलीकडील पूर्वेचा भाग सोडून बराचसा किनारी प्रदेश सखल व रुंद आहे. सर्वांत उंच व विस्तीर्ण प्रदेश इथिओपियात आहे. त्यापैकी काही १,५०० मी. पेक्षाही अधिक उंच आहे. दक्षिणेत पूर्व आफ्रिकेचे पठार केन्यामध्ये सर्वांत उंच आहे. ते २,५०० मी. किंवा अधिकही उंच आहे. क्वचित काही ज्वालामुखी शिखरे त्याहूनही उंच आहेत. उदा., किलिमांजारो (५,८९५ मी.), केन्या (५,१९९ मी.), म्वेरू (४,५६६ मी.), एल्गन (४,३८१ मी.); रूवेनझोरी (५,११९ मी.) हा मात्र ज्वालामुखी नाही.

पूर्व आफ्रिकेपासून दक्षिणेकडे पसरलेल्या पठारावर कित्येक ठिकाणी विशेषतः ड्रेकन्सबर्ग पर्वतात पठाराच्या कडेपाशी उभे उतार आहेत. थाडेंटसोन्याने (सु. ३,५०० मी.) व माँटोसूर्स (३,२७६ मी.) येथे पठाराची कड विशेष उठून दिसते, कारण तेथील खडक कठीण असून त्यांचे थर आडवे क्षितिजसमांतर आहेत. इथिओपियातही पठारांच्या कडा व त्यांचे उतार नजरेत भरतात. सापेक्षतः मऊ व कमी प्रतिकारी खडकांच्या भागात पठारांचे उतार कमी स्पष्ट दिसतात. भूमिस्वरूपांचा एकसारखेपणा आणि तोचतोपणा हे आफ्रिकेतील मोठमोठ्या प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. सपाट व किंचित ऊर्मिल प्रदेश पुष्कळ टिकाणी आढळतात आणि ते पुष्कळ उंचावर असूनही कित्येकदा सखल मैदानी प्रदेशांसारखे वाटतात.उत्तरेकडे व पश्चिमेकडे काँगो, नायजर व नाईल यांच्या खोर्‍यांकडे आफ्रिकेच्या पठाराची उंची कमी होत जाते. ९०० मी. पेक्षा अधिक उंचीचे प्रदेश फक्त उत्तरेकडे अ‍ॅटलास पर्वतात व मध्य सहारातील अहॅग्गर व तिबेस्ती यांच्या ग्रॅनाइटी गिरिपिंडात आढळतात. पश्चिम आफ्रिकेच्या व कॅमेरूनच्या अंतर्भागातील उंच प्रदेश हे प्राचीन स्फटिकी खडकांचे असून, गिनीमधील फूटा जालन पठार, सिएरा लेओन व लायबीरिया यांची सरहद्द, नायजेरियातील जॉस पठार  व अ‍ॅडामावा आणि कॅमेरून पठार येथेच फक्त त्यांची उंची अधिक आढळते. या बाजूस किनाऱ्याजवळ विस्तीर्ण सखल प्रदेश असून ते सेनेगल, गँबिया, व्होल्टा व नायजर-बेन्वे या नद्यांच्या खोर्‍यांतही आहेत. सूदानमधील ३,०५० मी. उंचीचा दारफुर प्रदेश व ४,०६९ मी. उंचीचा माँट कॅमेरून हे ज्वालामुखीजन्य असून, त्यांच्या निर्मितीस कारण झालेले भूपृष्ठातील ताण व पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या व ज्वालामुखीक्रिया यांच्या निर्मितीस कारण झालेले ताण एकच होत.

या खंडात सु. ३३% भागावर प्राचीन स्फटिकी तळखडक उघडे पडलेले दिसतात. काही ठिकाणी ग्रॅनाइट, शिस्ट व नाइस पृष्ठभागावर दिसतात. र्‍होडेशिया, झँबिया वा टांगानिका आणि काही कोरड्या हवेचे प्रदेश येथे द्वीपगिरींची वैशिष्ट्यपूर्ण भूरचना दिसून येते. वलीकरण व क्षरण अधिक झालेल्या भागात प्रदेश फारच उंचसखल झालेला आढळतो. तळखडकांच्या काही भागात, आफ्रिकेच्या दक्षिण भागात, काँगो-झँबीझी जलविभाजक क्षेत्रात आणि पश्चिम आफ्रिकेत महत्त्वाचे खनिज-उत्पादक प्रदेश आहेत.विस्ताराच्या मानाने आफ्रिकेच्या किनाऱ्याची लांबी फार कमी आहे. किनारा दंतुर नाही आणि आखाते, भूशिरे, उपसागर हेसुद्धा फार थोडे आहेत. उत्तर किनाऱ्यावरील गॅबेस व सिद्रा आखाते आणि पश्चिम किनाऱ्यावरील विस्तीर्ण गिनीचे आखात हीच काय ती नाव घेण्याजोगी मोठी आखाते आहेत. इतर खंडांच्या तुलनेने या खंडाजवळपास बेटेही थोडीच आहेत. किनाऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सागरमग्न खंडभूमी फारच कमी रुंदीची असून काही  ठिकाणी तर किनाऱ्याला लागून एकदम खोल समुद्र आहे. नाईलखेरीज इतर नद्यांच्या मुखांशी मोठाले त्रिभुज प्रदेश बनलेल नाहीत. किनाऱ्याच्या या रचनेमुळे चांगली नैसर्गिक बंदरेही फरा थोडी आहेत.

पूर्व आफ्रिकेतील मोठमोठ्या खचदऱ्या हे आफ्रिका खंडाचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्या क्रिटेशस किंवा उत्तर तृतीयक कालात अस्तित्वात आल्या असाव्या आणि मादागास्कर बेट मुख्य भूमीपासून वेगळे झाले, त्या घटनेच्या समकालीन असाव्या. त्या ज्या ज्वालामुखी क्रियेमुळे निर्माण झाल्या, तिच्याशी संबंधित क्रियेमुळेच पूर्व आफ्रिकेतील बहुतेक उंच शिखरे तयार झाली. या खचदर्‍यांच्या पश्चिमेकडे अजूनही ज्वालामुखी व भूकंपीय हालचाल होत आहे. किवू सरोवर एका खचदरीला शिलारसाचा बांध पडून तयार झालेले आहे. त्या भागातून पूर्वी नाईलची एक उपनदी वाहात होती. या सरोवराच्या ईशान्येकडील विरूंगा पर्वतात दर दहाबारा वर्षांनी उद्रेक होऊन जे शिलारसप्रवाह वाहिलेले आहेत, त्यांची तारीखवार नोंद आहे.आफ्रिकेतील मुख्य खचदरी सु. ६,४०० किमी. लांबीची आहे. पूर्व आफ्रिकेच्या पुष्कळशा सरोवरांनी व जवळपासच्या ज्वालामुखी शिखरांनी तिचा मार्ग रेखाटलेला आहे. आशिया मायनरमधील मृतसमुद्रापासून सुरू होऊन अकाबाच्या आखातापासून ती तांबड्या समुद्राच्या अनुरोधाने इथिओपियाच्या गिरिपिंडातून जाते; तेथून रूडॉल्फ, नैवाशा व मगाडी सरोवरांपर्यंत आल्यावर मग दक्षिणेकडे ती टांझानियात जाते. तेथे तिचा मार्ग अगदी सहज दिसणारा नाही. पूर्वेकडच्या भिंती अधिक क्षरण झालेल्या असून सरोवरे लहान आहेत व ती एका ओळीत नाहीत. काही सरोवरे तर वाळून गेलेल्या क्षारांचे थरच आहेत. त्यातल्या त्यात मोठी सरोवरे नेट्रॉन व मॉन्यारा ही असून इयासी हे मुख्य खचदरीच्या एका फाट्यात आहे. तेथून दक्षिणेस मालावीमध्ये खचदरीच्या बाजू अधिक स्पष्ट असून तेथे खडकांचा एक प्रचंड गट समांतर विभागांच्या बाजूने कोसळलेला दिसतो. यानंतर खचदरीच्या बाजू म्हणजे न्यासा सरोवराचे सरळ उभे उतार होत.

हे सरोवर सु. ५८० किमी. लांब असून ते कोठेही ८० किमी. हून अधिक रुंद नाही. त्याची कमाल खोली सु. ३७५ मी. आहे. नंतर ही खचदरी शिरे खोऱ्याच्या दिशेने जाऊन मोझँबीकमध्ये हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर बेइरापर्यंत पोचते. मुख्य खचदरीची पश्चिम शाखा न्यासा सरोवराच्या उत्तर टोकापासून एका मोठ्या चंद्रकोरीच्या आकाराने जाते. तिच्यात रूक्का, टांगानिका, किवू, एडवर्ड व अ‍ॅल्बर्ट ही सरोवरे आहेत. टांगानिका हे सरोवर सायबीरियातील बैकल सरोवराच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खोल (१,७४२ मी.) सरोवर आहे. या खचदरीच्या उपशाखांमध्ये  म्वेरू व उपेम्बा ही सरोवरे आहेत. खचदर्‍यांमधील बहुतेक सरोवरांची उंची पठाराच्या सामान्य उंचीपेक्षा कमी, ४०० मी. ते ९०० मी. असून ती बहुधा अतिशय खोल व फ्योर्डसारखी आहेत. काहींचा पृष्ठभाग समुद्रसपाटीपेक्षा शेकडो मीटर उंच असला तरी त्यांचे तळ समुद्रसपाटीपासून चांगलेच खाली आहेत. व्हिक्टोरिया सरोवर हे पूर्व आफ्रिकेतील सर्वांत मोठे सरोवर खचदरीच्या प्रमुख शाखांच्या दरम्यानच्या १,१३४ मी. उंच पठारावर, त्याच्या उथळ, खोलगट भागात आहे. त्याची कमाल खोली फक्त ८२ मी. असून क्षेत्रफळ मात्र ६९,४०५ चौ. किमी. आहे. कॅस्पियन व सुपीरियर यांच्या खालोखाल ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे.


© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate