आयोवा: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ १,४६,३५४ चौ. किमी.; लोकसंख्या २८,२५,०४१ (१९७०). हा देश ४०० ३६' उ. ते ४३० ३०' उ. आणि ८९० ५' प. ते ९६० ३१' प. यांदरम्यान आहे. याच्या दक्षिणेस मिसूरी, पश्चिमेस नेब्रॅस्का व द. डकोटा, उत्तरेस मिनेसोटा आणि पूर्वेस विस्कॉन्सिन व इलिनॉय ही राज्ये आहेत.
भूवर्णन : राज्याच्या बहुतेक प्रदेश वायव्येकडून आग्नेयीकडे उतरत गेलेला असून भूमी समुद्रसपाटीपासून २४८ ते ४३४ मी. उंचीची, ऊर्मिल, गवताळ, मधूनमधून टेकड्या व झाडी असलेली आहे. पूर्व व पश्चिम सीमांवरील नद्यांकाठी उत्तरेत थोड्या उंच दरडी आहेत. राज्यात खनिज धातुके सापडत नाहीत. पण कोळशाचा साठा भरपूर असून जिप्समचे उत्पादन देशात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. शिवाय खाणींतून सिमेंटसाठी चुनखडीचा दगड, वाळू व खडीसाठी खडक काढण्यात येतात. येथील माती गहिऱ्या रंगाची, जड आणि अतिसुपीक असून देशातील पहिल्या प्रतीची २५ टक्के जमीन या राज्यात आहे. डे मॉइन व तिच्या पूर्वेकडील आग्नेयवाहिनी नद्या पूर्व सीमेवरील मिसिसिपीला मिळतात; पश्चिम सीमेवरील मिसूरीला बिग सू व लिटल सू आणि इतर नैर्ऋत्यवाहिनी नद्या मिळतात.
राज्याच्या वायव्य भागात काही नैसर्गिक सरोवरे असून अन्यत्र वीजनिर्मिती व कालव्यांसाठी मानवनिर्मित जलाशय आहेत. हवामान महाद्वीपीय, राज्यात सामान्यतः सर्वत्र सारखे, कडक थंडी, जोरदार हिमवृष्टी, तीव्र व आर्द्र उन्हाळे, चक्री वादळे यांनी युक्त असून पाऊस पुरेसा आहे. किमान तपमान ५० से., कमाल २५० से. व सरासरी १०.५० से. असून ४८० से. व -४४० से. इतके कमाल व किमान तपमान नोंदले गेलेले आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य ७७ सेंमी. आहे. राज्याची ७% भूमी वनाच्छादित असून तिच्यात ओक, हिकरी, अॅश, अक्रोड, एल्म, बॉक्स, एल्डर, बाल्सम फर, व्हाइट पाइन या जातींचे वृक्ष आहेत. पूर्वीच्या गवताळ मैदानाचे अवशेष क्वचित आढळतात. उन्हाळ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी प्रदेश फुलून जातो. दरवर्षी देशांतर करणाऱ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे या राज्यात उतरतात. पांढऱ्या शेपटीच्या हरणांखेरीज मोठे प्राणी या राज्यात फारसे नाहीस. ससे, जॅकरॅबिट्स हे लहान प्राणी आहेत. बास, रेनबो, ब्रुक, ब्राउन ट्राउट, बुलहेड्स, कॅटफिश इ. मासे नद्यांतून मिळतात.
लेखक :शा. नि. ओक
स्त्रोत : मराठी विश्वकोश