অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्कीयन

भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका मोठ्या कालविभागाला आर्कियन महाकल्प व त्या महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला आर्कीयन गट म्हणतात. आर्कीयन म्हणजे प्राचीन किंवा आर्ष, ही संज्ञा प्रथम १८७२ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील जे. डी. डेना यांनी कँब्रियन कालीन खडकांपेक्षा जुन्या अशा सर्व खडकांस उद्देशून वापरली होती व बरेच दिवस ती त्या अर्थाने वापरली जात असे. पण आता ती सामान्यतः व उत्तर अमेरिकेतही मर्यादित अर्थाने वापरली जाते. कँब्रियनच्या पूर्वीच्या सर्वच खडकांचा समावेश तिच्यात न करता त्यांच्यापैकी सर्वांत जुन्या अशा रूपांतरित खडकांचा (पट्टिताश्म व सुभाजा यांचा) मात्र समावेश तिच्यात केला जातो.

समुद्राच्या तळावर साचलेले गाळांचे व लाव्ह्यांचे थर व त्यांच्यात घुसलेल्या अग्‍निज खडकांच्या, मुख्यतः ग्रॅनाइटांच्या, राशी यांच्यावर पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींचा परिणाम होऊन व त्यांचे रूपांतरण होऊन हे पट्टिताश्म व सुभाजा तयार झालेले आहेत. ते स्फटिकमय असल्यामुळे त्यांना 'स्फटिकमय शैल' आणि त्यांच्या संरचना व त्यांचे परस्पर संबंध गुंतागुंतीचे असल्यामुळे त्यांना 'स्फटिकमय जटिल राशी' अशी नावेही कधीकधी दिली जातात. सर्व खंडांतील विस्तीर्ण क्षेत्रात आर्कीयन खडक उघडे पडलेले दिसतात. सर्व खंडांचे पाये आर्कीयन खडकांचेच आहेत. म्हणून त्यांना आद्य किंवा पायाभूत खडक व त्यांचे स्वरूप जटिल असल्यामुळे त्यांना 'आद्य जटिल राशी' अशीही नावे दिली जातात.

कोणत्याही प्रदेशातल्या कँब्रियन कालाच्या आधीच्या खडकांपैकी सर्वांत जुन्या अशा खडकांस आर्कीयन खडक म्हणतात. पण निरनिराळ्या क्षेत्रांतले आर्कीयन खडक समकालीन असतातच असे नाही. आर्कीयन खडकांची वये ठरविणे, त्यांचे वर्गीकरण करणे किंवा निरनिराळ्या क्षेत्रांतल्या आर्कीयन खडकांचे सहसंबंध ठरविणे अद्यापि शक्य झालेले नाही.

भारतातही आर्कीयन ही संज्ञा मर्यादित अर्थाने व टी. एच्. हॉलंड यांनी सुचविल्याप्रमाणे वापरली जाते. त्यानुसार कडप्पा संघाच्या किंवा कडप्पाशी तुल्य अशा संघाच्या बुडाखाली जी महान विसंगती आहे तिच्यापेक्षा जुन्या म्हणजे आर्कीयन-कालोत्तर मध्यंतराच्या आधीच्या शैलसमूहांचाच समावेश त्या संज्ञेत केला जातो. भारताच्या द्वीपकल्पाच्या पुष्कळशा भागांत आर्कीयन खडक आढळतात. सिंधु-गंगा-मैदानाच्या दक्षिणेस द्वीपकल्पाचा जो भाग आहे त्याचा अर्ध्याहून किंचित अधिक भाग आर्कीयन खडकांनी खडकांनी व्यापिलेला आहे. हिमालयात व ब्रह्मदेशात आर्कीयन खडक आहेत असे निश्चित म्हणता येत नाही. भारतातील आर्कीयन खडकांचे पुढील दोन विभाग केले जातात.

  1. सुभाज (शिस्टोज) गट : हा गट गाळांचे अनुक्रमाने साचलेले थर, अंतःस्तरित लाव्ह्यांचे व टफांचे (एक प्रकारच्या खडकांचे) थर व त्या सर्वांत घुसलेली अग्‍निज व सामान्यतः अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्‍निज खडकांचे शिलापट्ट यांचे रूपांतरण होऊन तयार झालेल्या खडकांचा म्हणजे सुभाजांचा बनलेला आहे. कर्नाटकात व तमिळनाडूत आढळणाऱ्या सुभाज खडकांच्या गटास धारवाडी संघ म्हणतात. त्याच्यांशी तुल्य अशा गुजरातेतील खडकांस चंपानेर माला, राजस्थानातील खडकांस ð अरवली संघ, मध्य प्रदेशातील खडकांच्या गटांस सौसर माला, साकोली माला व चिल्पी घाट माला, छोटा नागपुरातील गटांस गंगपूर माला व आयर्न ओअर (लोह धातुक) माला अशी नावे आहेत व त्या सर्वांचा समावेश धारवाडी संघात केला जातो. पूर्व घाटातील खोंडालाइट, कोडुराइट व कॅल्क नाइस हेही धारवाडी संघातीलच आहेत. शिलाँगच्या पठारातही धारवाडी खडकांसारखे व पट्टिताश्मी गटातल्या खडकांसारखे खडक आहेत पण त्यांचे सविस्तर अध्ययन झालेले नाही.
  2. पट्टिताश्मी (नाइसोज) गट : हा मुख्यतः पातालिक (अगदी खोल) अंतर्वेशनांच्या (घुसलेल्या) खडकांचे कमीअधिक रूपांतरण होऊन तयार झालेल्या खडकांचा बनलेला आहे. ग्रॅनाइटी पट्टिताश्म (ग्रॅनाइट नाइस) किंवा पट्टित ग्रॅनाइट (नाइसोज ग्रॅनाइट) हे या गटातले मुख्य खडक होत. क्वचित मध्यम किंवा अल्पसिकत पातालिक खडकांपासून तयार झालेले पट्टिताश्मही या गटात आढळतात. पट्टीताश्मी गटाचे खडक हे सामान्यतः एखाद्या जातीच्या ग्रॅनाइटाचे कमीअधिक रूपांतरण होऊन तयार झालेले असतात. त्यांच्यापैकी असामान्य प्रकार म्हणजे चार्नोकाइट होत. ते पट्टित ग्रॅनाइटासारखे किंवा ग्रॅनाइटासारखे असतात पण त्यांच्यात नेहमी हायपर्स्थीन हे खनिज असते. चर्नोकाइटाच्या मुख्य प्रकारास हायपर्स्थीनग्रॅनाइट असेही नाव दिले जाते. शिवाय चार्नोकाइटाचे मध्यम, अल्प व अत्यल्प सिकत प्रकारही आढळतात.

भौगोलिक वाटणी

आर्कीयन खडकांनी व्यापलेल्या भारताच्या द्वीपकल्पाच्या एकूण क्षेत्रापैकी बहुतेक क्षेत्र पट्टिताश्मी गटाने व्याप-लेले आहे. सुभाज गटाचे खडक क्षरणामुळे (झिजल्यामुळे) बव्हंशी नाहीसे झालेले आहेत व त्यांचे लहानसहान असे ठिगळांसारखे किंवा पट्ट्यांसारखे अवशेष मात्र उरलेले आहेत.

सापेक्ष वये

पट्टिताश्मी खडकांच्या झिजलेल्या पृष्ठावर गाळांचे व लाव्ह्यांचे थर साचून व त्यांचे रूपांतरण होऊन सुभाज गटाचे खडक तयार झालेले आहेत म्हणजे ते अधिक नवे आहेत अशी कल्पना पूर्वी सु. १९१५ पर्यंत होती. पण नंतर कर्नाटकातील पट्टिताश्मी खडक हे सुभाजात घुसलेल्या पातालिक खडकांपासून तयार झालेले आहेत. म्हणजे ते सुभाजांपेक्षा नवे आहेत असे तेथल्या भूवैज्ञानिकांस दिसून आले व द्वीपकल्पाच्या इतर बहुतेक भागांतल्या आर्कीयन खडकांच्या बाबतीत तसाच अनुभव आला. एका राजस्थानाचा अपवाद वगळला तर द्वीपकल्पाच्या इतर सर्व भागांतील पट्टिताश्म हे त्यांच्याशी संलग्न असलेल्या सुभाजात अंतर्वेशित असून सुभाजांपेक्षा नवे आहे असे आता कळून आलेले आहे. राजस्थानातील ðबुंदेल-खंडी पट्टिताश्म व ð जटिल पट्टिताश्म समूह हे धारवाडी संघाशी तुल्य अशा अरवली संघापेक्षा जुने आहेत असे ए. एम्. हेरन यांचे मत आहे, पण त्याविषयी मतभेद आहेत.

द्वीपकल्पात आढळणारे सर्व सुभाज किंवा पट्टिताश्मी गटांचे खडक एकाच कालातले आहेत असे नाही, तर काही आधी व काही मागाहून तयार झालेले आहेत. निरनिराळ्या क्षेत्रांतल्या गटांच्या रचना, त्यांचे रासायनिक व खनिज संघटन, त्यांच्या रूपांतरणाची तीव्रता, त्यांच्यात घुसलेल्या अग्‍निज खडकांचे प्रकार इ. गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्यापैकी मुख्य अशा गटांच्या सहसंबंधाविषयी अनुमाने करण्यात आलेली आहेत. ती कोष्टक क्र. १ मध्ये दाखविली आहेत. किरणोत्सर्ग मापन पद्धती वापरून वये काढल्याशिवाय त्या गटांची वये निश्चित कळणार नाहीत. तशा मापनास बराच वेळ लागेल. ती झाल्यावर कोष्टकात फेरफार होण्याचा संभव आहे.

भारतातील व इतर देशांतील आर्कीयन खडकांचे सहसंबंध : सर्व खंडांत आर्कीयन खडक असलेली विस्तीर्ण क्षेत्रे आहेत. त्यांपैकी कॅनडातील खडकांचे विशेष अध्ययन झालेले आहे. भारतातील व कॅनडातील आर्कीयन खडकांचे सहसंबंध पॅस्को यांच्या मते कोष्टक क्र. २ मध्ये दिल्याप्रमाणे आहेत. पण किरणोत्सर्गी मापनानंतर त्यांच्यात बदल होण्याचा संभव आहे.

नडातील शैलसमूहभारतातील शैलसमूह

 

भारतातील शैलसमूह बळ्‌ळारी किंवा क्लोजपेट ग्रॅनाइट

हयूरोनियन टिमस्कोमेंग

}

 

{

चार्नोकाइट माला

द्वीपकल्पी पट्टिताश्म

? चँपियन पट्टिताश्म

आँटॅरियन

{

कीवाटिन

उत्तर धारवाडी गट

ग्रेतव्हिल कौंट-

विचिंगसह

पूर्व धारवाडी गट

भारतातील व दक्षिण आफ्रिका, पश्चिम ऑस्ट्रेलिया व पूर्व ब्राझील यांच्यातील आर्कीयन खडकांच्या स्वरूपात व इतिहासात विलक्षण साम्ये आहेत.

 

लेखक: क. वा. केळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate