एक राजकीय विचारप्रणाली. ह्या मतानुसार समाजधारणेस कोणत्याही प्रकारच्या राज्ययंत्रणेची आवश्यकता नाही. शासनसंस्था लोकशाही स्वरूपाची असो, हुकूमशाही असो की समाजवादी असो, जिथे बळाचा वापर करून पोलिस, सैन्य, तुरुंग, न्यायालये इत्यादींद्वारा व्यक्तीला जखडले जाते, तिथे अन्याय हा येतोच; म्हणूनच शोषणरहित व न्यायपूर्ण आदर्श समाज निर्माण करावयाचा असेल, तर राज्य या संस्थेचा अंत होणे आवश्यक आहे. समाजधारणेसाठी स्वतंत्र व्यक्तींच्या सहकार्याने निर्माण झालेल्या, स्वयंप्रेरित व परस्परावलंबी अशा सामाजिक संस्थांची सुसंगत व्यवस्था ही हवीच; परंतु ती शासनसंस्थेशिवाय निर्माण होऊ शकते, अशी अराज्यवाद्यांची धारणा आहे.
लोकशाही, समाजवाद वा साम्यवाद या ध्येयवादांप्रमाणे अराज्यवादही मानव व समाज यांच्या तात्त्विक मीमांसेवर आधारलेला आहे. ही तात्त्विक मीमांसा अशी : मानव हा जन्मतः व स्वभावतः सत्प्रवृत्त आहे, निदान त्याच्यात सज्जन बनण्याची पात्रता आहे. सत्ताधाऱ्यांच्या संस्था व सवयी यांचा निकटचा संबंध निर्माण झाल्यामुळे माणूस दूषित झाला आहे. धर्मसंस्था, राजकारण, खाजगी संपत्तीवर आधारलेली अर्थव्यवस्था इत्यादिकांनी मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती मलीन केली आहे. विशेषतः राज्य व खाजगी संपत्ती यांच्या योगाने समाजात माणसे माणसांना शोषित व दूषित करतात.
प्रूदाँ या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या मते समाज ही नैसर्गिक संस्था आहे व मानव हा सामाजिक प्राणी आहे. दंडधारी राज्यसंस्था ही मात्र अनैसर्गिक, कृत्रिम व अनावश्यक अशी संस्था आहे. क्रपॉटक्यिनने हाच विचार स्वीकारून व डार्विनच्या जीवविकासवादाची समीक्षा करून जीवविकासवादाच्या मूलभूत सिद्धांतांपर्यंत आपली तात्त्विक मीमांसा पोचविली आहे. डार्विनच्या जीवनार्थ-कलहाच्या मीमांसेतील ‘अत्यंत समर्थ जो, तोच टिकतो’, ह्या तत्त्वाला मुरड घालून तो म्हणतो, की जीवनार्थ-कलहात प्राण्यांना स्वजातीयांच्या मदतीनेच, प्राधान्याने जगता येते; म्हणून मानवपूर्व वा अमानव प्राण्यांमध्ये समाज करून राहण्याची पात्रता वा सहजप्रवृत्ती निर्माण झाली. ही समाजार्हता मानवात पूर्वपरंपरेने आली आहे, हा त्याचा स्वभावधर्म आहे. निर्बल व पीडित सजातीयांना मानवतेवर प्राणीसुद्धा समुदायाच्या द्वारे संरक्षण देतात. तीच प्रवृत्ती मानवात विकसित झाली. एकमेकांच्या निकट व विशेष मदतीनेच जीवन, संरक्षण व प्रगती होते, याचा मानवाला निरंतर प्रत्यय येतो, म्हणूनच विविध प्रकारच्या दंडशक्तिरहित अशा स्वयंप्रेरित व स्वातंत्र्यपूर्ण संस्था मानवांनी प्रथमपासून आजपर्यंत निर्मिल्याचा इतिहास सापडतो. कलह व स्पर्धा या प्रवृत्तींना मानवजीवनात कमी मूल्य व महत्त्व आहे, त्या अपप्रवृत्ती आहेत अशी नैतिक जाणीव कमीजास्त प्रमाणात प्रथमपासून मानवांना आहे, असा नीतिशास्त्राच्या इतिहासाचा एक निष्कर्ष आहे. न्याय व नैतिक विवेक यांची अंतिम ऐतिहासिक परिणती स्पर्धारहित व शोषणमुक्त अराज्यवादी समाजरचनेत होणे इष्ट आहे. अराज्यवादी समाज ही मानव सहजप्रवृत्तीतून निर्माण होऊ शकणारी विकासाची श्रेष्ठ अवस्था आहे.
अराज्यवादाची पाळेमुळे प्राचीन ग्रंथांतूनही हुडकून काढता येतील, तथापि ह्या मताची सुस्पष्ट मांडणी प्रथमतः १७९३ मध्ये विल्यम गॉडविन् ह्या इंग्रज लेखकाने आपल्या पोलिटिकल जस्टिस ह्या ग्रंथामध्ये केली. संपत्तीची विषम वाटणी हेच सर्व अनर्थाचे मूळ आहे आणि त्यातूनच शासनसंस्थेची गरज निर्माण होते, असे प्रतिपादून जमिनीची व इतर मालमत्तेची न्याय्य अशी वाटणी करावी व सर्व कलहांचे मूळच नाहीसे करावे, म्हणजे शासनसंस्थेची आवश्यकता राहणार नाही; योग्य शिक्षणाने सुधारलेले लोक आपण होऊन आवश्यक त्या सामाजिक संघटना उभ्या करतील व त्याद्वारा समाज सुरळीत चालू शकेल, असे मत त्याने मांडले. फ्रान्समध्ये १८४० मध्ये प्रूदाँ ह्याने आपल्या व्हॉट इज प्रॉपर्टी ह्या पुस्तकात ‘खाजगी संपत्ती ही चोरी होय’ असे प्रतिपादून अराज्यवादाचा मोठ्या आवेशाने पुरस्कार केला; तथापि ह्या अराज्यवादाकरिता हिंसक किंवा सशस्त्र क्रांतीचा त्याने पुरस्कार केला नाही. त्याने सत्ताविकेंद्रीकरणाकरिता स्वयंप्रेरित स्वतंत्र सामाजिक संस्थांच्या योजना मांडल्या. अशा संस्थांच्या वाढीने राज्यसंस्थेच्या सत्तेला आळा बसत जाईल, असे त्याचे मत होते.
कार्ल मार्क्सने त्याच्या मतांवर प्रखर टीका केली आहे. प्रिन्स क्रपॉटक्यिनने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस लिहिलेल्या आपल्या म्युच्युअल एड ह्या ग्रंथाद्वारा आपले अराज्यवादी तत्त्वज्ञान सांगितले. आदिमानव राज्यसंस्थेशिवाय जगू शकत होता. मानवाखेरीज इतर प्राण्यांच्या जगात राज्यसंस्थेशिवाय सर्व व्यवहार सुरळीत होऊ शकतात, मग मानवालाच तेवढी शासनसंस्थेची गरज का भासावी, असा त्याचा सवाल आहे. क्रपॉटक्यिनने ‘राज्यसंस्था नष्ट करण्यासाठी सशस्त्र क्रांती करायला कोणतीच हरकत नाही’ असे स्वच्छपणे सांगितले. टॉलस्टॉयसारख्या विचारवंतांनी जो अराज्यवाद सांगितला, त्याची तात्त्विक बैठक व तो प्रत्यक्षात आणण्याची त्याने सांगितलेली साधने ह्यांचे स्वरूप अगदीच निराळे दिसते. टॉलस्टॉयच्या अराज्यवादाला धार्मिक पाया आहे. त्याला कायद्याचे राज्य नको आहे, प्रेमाचे हवे आहे. राज्यसत्ता ही त्याच्या मते ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी अगदी विसंगत अशी गोष्ट आहे. अराज्यवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी टॉलस्टायला हिंसा मान्य नव्हती. अहिंसक प्रतिकाराचा व असहकाराचा मार्ग प्रत्येक व्यक्तीने चोखाळला तर राज्यसंस्था आपोआप कोलमडून पडेल, असे त्याचे गणित होते.
वर सांगितल्याप्रमाणे तत्त्वज्ञांखेरीज मॅक्स स्टर्नर, बकून्यिन, सॉरेल इ. अनेकांनी अराज्यवादाचा विविध प्रकारांनी पुरस्कार केलेला आहे. मार्क्सप्रणीत साम्यवादातही क्रांतीची अखेरची अवस्था संपल्यानंतर राज्यविहीन असाच समाज निर्माण होतो. ह्या सर्व अराज्यवाद्यांच्या विचारसरणींच्या तपशिलांत पुष्कळ फरक आहेत. परंतु राज्यसंस्था अनैसर्गिक व अनावश्यक आहे, एवढे एक सूत्र मात्र समान दिसते.
अराज्यवाद्यांच्या मते माणूस सामाजिक प्राणी आहे, म्हणून माणसे मुळात सत्प्रवृत्त असतात. हर्बर्ट रीडच्या मते बुडत्या जहाजावरील खलाशी किंवा तुरुंगातील कैदी यांच्यात जो एकोपा आणि जी परस्परसाहाय्याची भावना दृष्टीस पडते, त्यावरून माणसे आपापसांतील व्यवहार राज्यसंस्थेवाचून सुरळीतपणे उलगडू शकतील हेच दिसून येते. जिथे संपत्तीचे न्याय्य वाटप झालेले असेल अशा त्या राज्यहीन समाजात परस्परांत फारसे कलह माजण्याचेही प्रसंग येणार नाहीत व आलेच तरी माणसातील नैसर्गिक सत्प्रवृत्तीमुळे अशी भांडणे सहजगत्या मिटतीलही. निवाडे करण्यासाठी न्यायालयांची गरज भासणार नाही. क्रपॉटक्यिनवगैरेंच्या मते जगाच्या सर्वच भागांत खाजगी मालमत्ता नसलेले समाज निर्माण झाले, सर्वांना आवश्यक ते सर्व मिळत राहिले, की माणसे गुन्हेगारीची कृत्ये करतील अथवा कोणताही एक मानवी समूह दुसऱ्या एखाद्या मानवी समूहावर स्वारी करील असा प्रसंगच संभवत नाही. त्यातूनही कदाचित असे घडलेच, तरी कोणतेही परचक्र नागरिकांची सेनाच परतवू शकेल.
अराज्यवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी काही संघटनाही अस्तित्वात आल्या; हिंसक चळवळीही झाल्या. अराज्यवादाचा प्रत्यक्ष कृतीनेच खरा प्रचार होऊ शकतो असे तत्त्व उराशी धरून शासनात सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तींच्या खुनांचे कट रचण्यात आले. रशियाचा झार तिसरा अलेक्झांडर, इटलीचा राजा हंबर्ट, ऑस्ट्रियाची महाराणी एलिझाबेथ, फ्रान्सचा अध्यक्ष कार्नो आणि अमेरिकेचा अध्यक्ष मॅकिन्ली ह्यांचे खून अराज्यवाद्यांनीच पाडले
अराज्यवाद्यांच्या १८७७ मध्ये ब्रूसेल्स येथे व १९०७ मध्ये हेग येथे अशा दोन आंतरराष्ट्रीय परिषदाही भरल्या. तथापि अराज्यवाद्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरची कायम स्वरूपाची संघटना मात्र स्थापन झाली नाही.
काही प्राचीन व अर्वाचीन भारतीयांनीही अराज्यवादाची कल्पना उचलून धरल्याचे दिसते. प्राचीन भारतीय हिंदू, बौद्ध वा जैन यांच्या साहित्यात अराज्यवादी विचारसरणीचे तुरळक उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत. ते असे, की सत्ययुगात सर्व माणसे सदाचारी होती, गैरवर्तणूक कोणीच करीत नसल्यामुळे शास्ता, शासनयंत्रणा किंवा दंडशक्ती यांपैकी कशाचीच जरुरी नव्हती. तथापि मानवी समाज कायम शासनरहित राहू शकेल असे मात्र प्राचीन भारतीय विचारवंतांना वाटले नाही. मोठ्या माशाने लहान माशास गिळावे, हा मात्स्यन्यायच शासनहीन समाजात जारी राहिल असे प्राचीन पुराणे, महाकाव्ये, स्मृती व अर्थशास्त्रादी ग्रंथ ठामपणे प्रतिपादन करतात.
आधुनिक काळात महात्मा गांधी, विनोबा भावे इत्यादिकांच्या विचारांतही अराज्यवादाचा पुरस्कार केलेला आढळून येतो. महात्मा गांधींना जो आदर्श मानवी समाज अभिप्रेत आहे तो सत्य, प्रेम आणि अहिंसा ही तत्त्वे मानणारा व आचरणारा असा असल्यामुळे त्या समाजात राज्याच्या दंडशक्तीची गरज उरणार नाही हे उघड आहे. परंतु अशा समाजातील प्रत्येक व्यक्ती वरील तत्त्वे मानणारी व आचरणारी असावी लागेल ह्याची त्यांना जाणीव आहे. विनोबा भावे असा प्रश्न उपस्थित करतात, की राज्यसंस्थेवाचून माणसाचे अडेल असे मानण्याचे कारणच काय? ते म्हणतात, की शेतीवाचून, उद्योगावाचून किंवा लग्नावाचून माणसाचे अडेल हे मी समजू शकतो, परंतु सरकारवाचून माणसांचे कोणतेही व्यवहार थांबण्याचे कारण नाही. राज्यमुक्त असा समाज निर्माण होणे शक्य आहे आणि तो तसा ताबडतोब निर्माण करण्याचे आपले ध्येय असले पाहिजे, मार्क्सवादी साम्यवाद्यांप्रमाणे कालांतराने नव्हे, असा त्यांचा संदेश आहे. जयप्रकाश नारायण वगैरे सर्वोदयवाद्यांच्या विचारविश्वात जे लोकराज्य आहे त्यात व्यक्तिस्वातंत्र्य, संघटनास्वातंत्र्य अशी लोकशाहीला अभिप्रेत असलेली सर्व मूल्ये आहेत; तथापि लोकसत्ताक स्वरूपाचीसुद्धा शासनसंस्था त्यात बसत नाही.
अराज्यवादी विचारसरणी वर जशी सांगितली तशीच्या तशी स्वीकृत झाली नसली आणि त्याबरहुकूम राजकीय चळवळी फारशा झाल्या नसल्या, तरी अराज्यवाद्यांनी जे अनेक सिद्धांत सांगितले त्यांचा प्रभाव जगाच्या राजकीय विचारांवर व आचारांवरही भरपूर पडलेला आहे. जगभर निर्माण झालेल्या कामगारसंघटना व त्यांनी हाती घेतलेल्या चळवळी ह्यांतून भांडवलशाहीला व तिला संरक्षण देणाऱ्या शासनसंस्थेला आव्हान दिले जात असते. ह्यात राज्यसंस्था कायमची मोडून टाकावयाची असा अगदी आत्यंतिक सैद्धांतिक आग्रह जरी नसला, तरी राज्यसंस्थेचे स्वरूप बदलले पाहिजे व ते आपल्याला पाहिजे तसे करून घेतले पाहिजे आणि असे करणे शक्यही आहे, हा विश्वास मात्र निश्चित असतो. ह्या शतकातील संघसत्तावादाचे तत्त्वज्ञान बऱ्याच अंशी अराज्यवादाच्या विचारसरणीशी मिळतेजुळते असेच आहे. हॅरल्ड लास्कीसारख्या राज्यशास्त्रवेत्त्याने काही काळ ज्या ⇨ बहुसत्तावादाचाहिरीरीने पाठपुरावा केला, त्यातील शासनाची सत्ता सार्वभौम आणि सर्वव्यापी नसावी, लोकांचे अनेकविध व्यवहार लोकांवरच सोपवावे, त्यांनी ते स्वतः निर्माण केलेल्या संस्था-संघटनांमार्फत पाहावेत, राज्यसत्तेला त्या व्यवहारात हात घालण्यास फारसा वावच देऊ नये, वगैरे सर्व प्रतिपादनाच्या मुळाशी अराज्यवादात अंतर्भूत असलेली तत्त्वे स्पष्टपणे दिसण्यासारखी आहेत.
आर्थिक हितसंबंधांचा प्रश्न साम्यवादाच्या स्थापनेमुळे निकालात निघाला असे गृहीत धरले, तरी राज्यसंस्थेशिवाय समाज खरोखरच सुरळीत चालू शकेल काय? माणसामाणसांत किंवा त्यांनी निर्माण केलेल्या संघटना-संघटनांत वैचारिक मतभेद, अधिकाराभिलाषा, अज्ञानजन्य प्रमादांचा निरास करण्यात उत्पन्न होणारी स्पर्धा, गुणोत्कर्षाच्या निमित्तांनी उत्पन्न होणारी अहमहमिका, लैंगिक प्रश्न इ. कारणांनी संघर्ष निर्माण होणार नाहीत काय? आणि असे संघर्ष निर्माण झाल्यावर वरिष्ठ अधिकार असलेली शासनयंत्रणा नसेल तर त्यांची वासलात कशी लावावयाची? अराज्यवादी मानतात त्याप्रमाणे मनुष्यस्वभावात इतका समजूतदारपणा आहे किंवा कसे? अराज्यवादाच्या मूलभूत तत्त्वांच्या अनुरोधाने असे अनेक प्रश्न विचारता येतील. अराज्यवादी ह्या सर्व प्रश्नांना फार थोडक्यात उत्तरे देतील. शासनाच्या सत्तेशिवाय समाजाचे काहीही अडणार नाही, असे स्पष्ट उत्तर ते देतील.
माणसाच्या नैसर्गिक चांगुलपणावर अराज्यवाद्यांचा विश्वास असतो. परंतु इतिहासाचाच दाखला घ्यावयाचा, तर आत्यंतिक सौजन्यापासून आत्यंतिक दुष्टपणापर्यंत, अत्यंत निःस्वार्थतेपासून पराकोटीच्या स्वार्थपरायणतेपर्यंतचे सर्वच गुणावगुण माणसांनी प्रकट केलेले आहेत. तरुंगातले कैदी आपसांत मारामाऱ्या व खून करतात व बुडत्या जहाजावरील खलाशीसुद्धा स्वतःचा जीव वाचविण्याकरिता दुसऱ्यांची पर्वा करीत नाहीत, हे जिवंत राहण्याच्या मूळ प्रवृत्तीला धरूनच होते. माणूस वाईटच आहे असे गृहीत धरण्याचे कारण नसले, तरी तो चांगला आणि फक्त चांगलाच आहे असा निर्वाळाही देता येणार नाही.
संदर्भ : 1. Doctor, A. H. Anarchist Thought in India, Bombay, 1964.
2. Krimerman, L. I.; Perry. L. Ed. Patterns of Anarchy, New York, 1966.
3. Kropotkin, Peter, The Conquest of Bread, New York, 1926.
4. Malatesta, Errico, Anarchy, London, 1949.
5. Read, H. E. Anarchy and Order, London, 1954.
६. गाडगीळ, पां. वा. अराज्यवाद, पुणे, १९३९.
लेखक - सदाशिव आठवले
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/6/2020