অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंतरराष्ट्रीयत्ववाद

आंतरराष्ट्रीयत्ववाद

आंतरराष्ट्रीयत्ववाद : जगातील भिन्न भिन्न राष्ट्रांमध्ये सलोख्याचे, सहकाराचे व परस्परसामंजस्याचे संबंध राहावेत, लहानमोठे संघर्ष व युद्धे बंद व्हावीत, मानवजातीस सततची शांतता लाभावी, यांसाठी आवश्यक त्या तत्त्वांचा प्रचार व्हावा आणि ती तत्त्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार्‍या संघटना स्थापन व्हाव्यात, असे प्रतिपादन करणारी विचारप्रणाली म्हणजेच आंतरराष्ट्रीयत्ववाद होय. ह्या विचारात मानवी एकता व जागतिक ऐक्य ही अभिप्रेत असली, तरी विश्वराज्य व आंतरराष्ट्रीयत्व ह्या दोन कल्पनांत फरक आहे. मानवी एकतेच्या आदर्शात वंशभेद, धर्मभेद, संस्कृतिभेद हे सर्व नष्ट झालेले असतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वासारखी प्रादेशिक किंवा सांस्कृतिक मूल्येही नाहीशी झालेली असतात. त्यात मानवी समता गृहीत धरलेली असते. एका विश्वराज्याचे शासनाच्या सोयीसाठी प्रादेशिक विभाग पाडले जातीलही; परंतु ते एकमेकांशी स्पर्धा व संघर्ष करणारे भिन्न भिन्न समाजगट असणार नाहीत.

आंतरराष्ट्रीयत्वाचे तत्वज्ञान वरील विश्वराज्याच्या कल्पनेहून वेगळे आहे. आंतरराष्ट्रीयत्वात भिन्न भिन्न राष्ट्रे किंवा राष्ट्र-राज्ये अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या विविध संस्कृतीही आहेत, हे मान्य केलेले असते. पुढे अशी अनेक राष्ट्र-राज्ये त्यांच्या अनेक जीवनपद्धतींमुळे अस्तित्वात राहिली, तरी त्यांना शांततामय सहजीवन शक्य आहे, असा आंतरराष्ट्रीयत्वावाद्यांचा विश्वास असतो. अर्थात आंतरराष्ट्रीयत्ववादीही अस्तित्वात असलेले राजकीय आणि सांस्कृतिक भेद पुष्कळदा अपरिहार्य म्हणूनच मान्य करीत असतात. त्यांनाही हे भेद वरवरचे, कृत्रिम आणि कालांतराने नाहीसे होणारे आहेत, असा विश्वास वाटत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीयत्व हा मानवी एकतेच्या किंवा विश्वराज्याच्या आदर्शाकडे जाणाऱ्या मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे म्हणता येईल.

राष्ट्र–राज्ये किंवा राजकीय दृष्ट्या स्वायत्त असे वेगवेगळे प्रदेश आणि त्यांच्यातील वेगवेगळ्या संस्कृतींतील समाज हे समान हितासाठी एकत्र येऊ शकतील, हा विचार अगदी नवीनच आहे असे नाही. शोध घेतला, तर अगदी प्राचीन तत्त्वचिंतकांच्या लेखनांतून, तसेच राजकारणी व्यक्तींच्या उक्तींतून आणि कृतींतूनही आंतरराष्ट्रीयत्ववादाचे तत्त्वज्ञान हुडकून काढता येईल. तथापि आंतरराष्ट्रीयत्ववादाचे तत्त्वज्ञान हुडकून काढता येईल. तथापि आंतरराष्ट्रीयत्वाच्या विचाराला फार मोठी चालना मिळाली ती औद्यागिक क्रांतीनंतरच एकोणिसाव्या शतकात, नव्या यंत्रयुगात जगातील निरनिराळ्या लोकसमूहांचे आर्थिक परस्परावलंबित्व फार मोठ्या प्रमाणावर वाढले.

काही विशिष्ट गरजांच्या संदर्भात एका राष्ट्राचे दुसऱ्या राष्ट्रांवाचून चालू शकत नाही, अशी परिस्थिती जवळजवळ जगभर निर्माण झाली. ह्याचबरोबर दळणवळणाच्या नवीन यांत्रिक साधनांमुळे जगाच्या निरनिराळ्या भागांतील माणसे अनेक वेळा अनेक प्रकारे एकमेकांच्या जवळ येऊ लागली. दूरत्वामुळे जे भेद फार खोल व मूलभूत आहेत असे धरले जात असे, ते वरवरचे व कृत्रिम आहेत ह्याची जाणीव होऊ लागली. जीवशास्त्रादी विषयांतील नव्या विज्ञाननिष्ठ संशोधनाने मूलभूत मानवी एकता स्पष्टपणे सांगितली गेली. ह्या सर्वांचा परिणाम म्हणून मानवी एकतेसारखे, आंतरराष्ट्रीयत्वासारखे विचार सर्वसामान्य माणसांच्या मनातही हळूहळू रुजू लागले.

वरील विचारांनुसार प्रत्यक्ष व्यवहार होण्यासाठी काही एका संघटनात्मक यंत्रणेची आवश्यकताही एकोणिसाव्या शतकापासूनच जाणंवू लागलेली होती. युद्धानंतरच्या तहाच्या वाटाघाटींसाठीच एकत्र येणारे निरनिराळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी ह्या दृष्टीने काही प्रयत्‍न करीत व योजना मांडीत. परंतु राष्ट्राराष्ट्रांतील संघर्ष जगभर व विशेषत: यूरोपात इतके तीव्र होते, की अशा संघटना कायम स्वरूपात अस्तित्वात येऊ शकल्या नाहीत. राष्ट्राराष्ट्रांतील सहजीवन चिरस्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेशिवाय अशक्यच आहे. अशा तर्‍हेचा आंतरराष्ट्रीय राजकीय क्षेत्रातील पहिला प्रयत्‍न म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेला राष्ट्रसंघ. हा प्रयत्‍न यशस्वी झाला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे ही दुसरी आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आली. ती आजतागायत कार्यान्वित आहे. अर्थात तीही आंतरराष्ट्रीय सहजीवन निर्माण करण्यात, युद्धे टाळण्यात व शांततेची हमी देण्यात म्हणावी तशी यशस्वी होत नाही, असे अनुभवास येत आहे. मात्र ह्या संघटनांचे यशापयश काहीही असले, तरी मानवजात राष्ट्र-राज्यांमध्ये विभागली आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली आणि वास्तव, व्यवहार्य पद्धतीने होईल तेवढे कार्य करावयाचे ठरविले, तर अशा संघटनांशिवाय गत्यंतरच नाही.

आजची राष्ट्र–राज्ये वांशिक, प्रादेशिक, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा अनेक भेदांवर उभी आहेत. राष्ट्रीयत्व आणि त्याचा आग्रह हीच मानवी एकतेच्या मार्गातील मुख्य अडचण आहे. राष्ट्रीयत्वच नसेल, तर आंतरराष्ट्रीयत्वाचा प्रश्नही उद्भवणार नाही. म्हणूनच मानवी एकतेच्या अंतिम ध्येयाच्या दृष्टीने विचार केला, तर राष्ट्रीयत्वाचे मूल्य आणि त्यातून निर्माण होणारी भेदाची भावना नष्ट करणे हीच पहिली गरज आहे. आंतरराष्ट्रीयत्वात राष्ट्रे गृहीत धरलेली आहेत. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीयत्ववादाच्या तत्त्वज्ञानाच्या मर्यादाही स्पष्ट होतात. तथापि राष्ट्रीयत्व ही लवकर नाहीशी होणारी गोष्ट नसल्यामुळे जोपर्यंत माणसे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला व राष्ट्र ह्या संस्थेला चिकटून आहेत, तोपर्यंत राष्ट्राराष्ट्रांनी एकत्र यावे, परस्परसहकार्याची भावना ठेवावी आणि सर्वांच्याच हिताच्या दृष्टीने एकमेकांतील संघर्ष टाळावेत अशा तऱ्हेच्या विचारप्रणालीचा पाठपुरावा करणे अगत्याचे आहे.


संदर्भ : 1. Sprout, Harold; Sprout, Margaret, Foundations of International Politics, New York, 1962.

2. Vandenbosch, Amry; Hogan, Willard, Towards World Order,New York, 1963.

3. Wright, Quincy, The Study of International Relations, New York, 1965.

लेखक - सदाशिव आठवले

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate