অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकपक्ष पद्धति

एकपक्ष पद्धति

एकपक्ष पद्धति : ज्या राज्यपद्धतीमध्ये एकाच राजकीय पक्षाचे अस्तित्व असून किंवा एकाच राजकीय पक्षाच्या हाती विरोधी पक्षांचे नियंत्रण करण्याइतकी प्रचंड शक्ती असेल आणि सर्व सत्ता त्याच एका पक्षाच्या प्रतिनिधींच्या हातात केंद्रित झालेली असते, त्या पद्धतीस एकपक्षपद्धती म्हणतात. लोकशाही राज्यपद्धतीत सामान्य जनता आणि शासन संस्था यांच्यामध्ये संबंध राखण्याचे माध्यम अगर साधन म्हणून राजकीय पक्ष निर्माण होतात. राजकारणासंबंधीच्या सर्व-साधारण धोरणांबाबत सहमत असलेल्या व मतदारांच्या बहुमताच्या जोरावर राज्यकारभार आपल्या हाती घेऊ इच्छिणार्‍या व्यक्तींचा संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष. असा पक्ष शासनाला जनतेचा पाठिंबा संघटित करण्याचे कार्य करतो. संसदीय लोकशाही राज्य-पद्धतीत ध्येयवाद, राजकीय धोरण वा कार्यक्रम यांबद्दल जितके महत्त्वाचे मतभेद तितके पक्ष बनतात व त्यांच्यात सत्तेसाठी स्पर्धा चालते. अशी स्पर्धा लोकशाही जीवनासाठी अत्यावश्यक समजण्यात येते. उदा., इंग्लंड अगर अमेरिकेत प्रामुख्याने दोनच प्रबल पक्ष असल्यामुळे त्यांपैकी एकाच्या हाती सत्ता असते. ह्याउलट फ्रान्स, इटली आणि जर्मनीमध्ये अनेक पक्ष असल्यामुळे व कोणत्याही पक्षास निर्विवाद बहुमत मिळत नसल्याने तेथे संमिश्र मंत्रिमंडळे अपरिहार्य ठरतात.

परंतु ज्या राज्यात विशिष्ट तत्त्वज्ञान स्वीकारणारे पक्ष सत्तेवर येतात, तेथे ते इतर पक्षांचे अस्तित्व नाकारतात. सामान्यपणे तोच पक्ष एकमेव वैध पक्ष ठरवून इतर पक्षांना बंदी घालण्यात येते. एकपक्षीय सत्ता ही जनतेसाठी, राष्ट्रासाठी असते, तिला विरोध करणारे जनतेचे शत्रू आहेत, असेही भासविण्यात येते.

साम्यवाद व फॅसिझम हे ध्येयवाद एकपक्षपद्धतीच मान्य करतात. रशियन राज्यक्रांतीनंतर लेनिनने सोव्हिएट युनियनमध्ये व दुसर्‍या महायुद्धात माओ त्से तुंगने चीनमध्ये अशा प्रकारची एकपक्ष-पद्धती प्रस्थापित केली. कम्युनिस्ट हाच एकमेव पक्ष ठरवून विरोध नष्ट केला. हीच पद्धती अजूनही रशिया, चीन व इतर कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये अस्तित्वात आहे. जर्मनीत हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी म्हणजे नॅशनल सोशॅलिस्ट पक्ष अगर इटलीतील मुसोलिनीच्या नेतृत्वाखालील फॅसिस्ट पक्ष, यांनी सत्तेवर आल्यावर ही पद्धती स्वीकारली. ह्या पद्धतीत राज्यातील सर्व महत्त्वाच्या जागांवर पक्षाचे सभासद नेमून ती शासनयंत्रणा ताब्यात घेण्यात येते. तेथे पक्ष, कर्मचारी, प्रशासन आणि सेनाशक्ती यांचे निकटचे सहकार्य निर्माण केलेले असते. पक्षाचे सभासद काळजीपूर्वक निवडले जाऊन त्यांना पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत विशेष शिक्षण देण्यात येते. जनतेच्या पाठिंब्याचा आभास निर्माण करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका होतात; परंतु विरोधी पक्ष नसल्याने त्या नावापुरत्याच राहतात.

ह्या प्रकारच्या एकपक्षपद्धतीत पक्षच सत्ताधारी बनतो. सत्तेसाठी स्पर्धा करणार्‍या संस्था नसतात. प्रत्यक्ष पक्षातही एका व्यक्तीची व तसे शक्य नसल्यास वरिष्ठ नेत्यांची सत्ता सर्वंकष ठरते; इतरांना त्यास पाठिंबा देण्याशिवाय गत्यंतर नसते. अंतर्गत निवडणुकीतदेखील स्पर्धा कमीतकमी राहील, अशी व्यवस्था केली जाते. ह्याठिकाणी एकपक्षपद्धतीच्या नावाखाली हुकूमशाही राबविली जाते.

पण ह्याच संदर्भात आफ्रिकेचे उदाहरण महत्त्वाचे ठरते; गेल्या वीस वर्षांत अनेक आफ्रिकी राष्ट्रे स्वतंत्र झाली. ह्या बहुतेकांनी एकपक्ष-पद्धतीचा स्वीकार केला आहे. पण तिचे स्वरूप वेगळे आहे. ह्या नवीन राष्ट्रांमध्ये विविध विचारसरणींचे पक्ष लगोलग निर्माण होणे शक्यच नव्हते. स्वातंत्र्याची चळवळ करणारा एकच पक्ष आणि एकच नेता यांच्याभोवती जनतेच्या आकांक्षा केंद्रित झाल्या होत्या. स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर तोच पक्ष सत्तारूढ होतो. देशापुढे आर्थिक विकासाचा कार्यक्रम असतो. अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा जेव्हा धोका निर्माण होतो; त्यावेळी अपरिपक्व विरोधामुळे फायदा होण्याऐवजी राष्ट्राची सुरक्षितता संपुष्टात येण्याचा संभव असतो. साहाजिकच ही राष्ट्रे एकपक्षपद्धती स्वीकारतात. ह्या एकपक्षपद्धतीत लोकशाहीचे भवितव्य हे त्या पक्षाच्या वृत्तीवर अवलंबून असते. त्या पक्षाची लोकशाहीवर निष्ठा असेल, त्या पक्षामध्ये अंतर्गत लोकशाहीला वाव असेल, परस्परविरोधी मतांची आणि जनतेच्या आकांक्षांची दखल घेतली जात असेल, तर तो पक्ष निकोप लोकशाहीसाठी आवश्यक असणारे वातावरण निर्माण करतो आणि एकपक्षपद्धतीचे फायदे घेऊन जलद विकासही साधू शकतो. परंतु अशा ठिकाणी स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षेला अतिरेकी महत्त्व दिले गेले, तर हुकूमशाही येते. हा धोका टाळण्यात ह्या नव्या राष्ट्रांना यश आले तर ठीक, अन्यथा एकपक्षपद्धती आणि लोकशाही ही विसंगती ठरते.

 

संदर्भ : 1. Catlin, G. E. G. Systematic Politics, Toronto, 1962.

2. Lipson, Lesli, The Great Issues of Politics, Englewood Cliffs, 1961.

 

लेखक - श्री. प. सोहोनी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate