অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कम्युनिस्ट पक्ष

कम्युनिस्ट पक्ष : ऐतिहासिक पार्श्वभूमी :मार्क्स आणि एंगेल्स यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणे, क्रांतीच्या मार्गाने कामगारवर्गाची राजकीय सत्ता स्थापन करणे आणि मार्क्सवादी तत्त्वांवरच समाजरचना करण्यासाठी त्या सत्तेचा वापर करणे, अशा ध्येयधोरणाने संघटित झालेला गट, कम्युनिस्ट पक्ष या नावाने ओळखला जातो. रशियात १९१७ साली जी राजकीय क्रांती झाली, तिचे नेतृत्व  लेनिनकडे होते. तो रशियातील कम्युनिस्ट पक्षाचा आग्रही पुरस्कर्ता आणि एक संस्थापक मानला जातो. त्याने कम्युनिस्ट पक्ष म्हणजे ‘कामगारवर्गाचे संघटित अग्रदल’ असे वर्णन केले आहे. या पक्षाने कामगारवर्गाला संघटित करावे, त्या संघटनेच्या बळावर समाजातील भांडवलदारवर्ग आणि पक्ष यांच्याकडून सत्ता हस्तगत करावी, त्यानंतर समाजातील सर्व उत्पादन साधने राज्याच्या मालकीची करावी व त्यातून शेवटी वर्गविरहित समाजरचनेचे ध्येय साकार करावे, अशी या पक्षाच्या ध्येयधोरणाची रूपरेषा लेनिनने स्पष्ट केली. स्टालिनने आपल्या भाष्याप्रमाणे ते ध्येयधोरण व्यवहारात आणले व रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व संपूर्णपणे आपल्या हाती केंद्रित केले.

रशियात झालेल्या क्रांतीच्या प्रेरणेने जगातील इतर अनेक देशांतही कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले आणि रशियाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपापल्या देशांत राजकीय क्षेत्रात कार्य केले. १९६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकड्यांप्रमाणे जगातील ८३ देशांमध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाले असून त्यांची सभासदसंख्या एकूण तीन कोटींच्या जवळपास होती. त्यांपैकी सु. ८५ टक्के सभासदसंख्या रशिया आणि चीन या दोन देशांतील कम्युनिस्ट पक्षांची असून बाकीची १५ टक्के सभासदसंख्या ८१ देशांतील पक्षसदस्यांची आहे.

कम्युनिस्ट पक्ष पश्चिम यूरोपातील औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या देशांत वाढेल आणि कामगार-संघटनांच्या साहाय्याने तो त्या देशात क्रांती करील, अशी मार्क्सवाद्यांची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात कम्युनिस्ट पक्षाचे बळ प्रामुख्याने अर्धविकसित किंवा अविकसित देशांत वाढले. त्यातून पहिल्या महायुद्धाच्या काळात रशियात क्रांती झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने सत्ता हस्तगत केली. दुसरे महायुद्ध संपत असतानाच रशियाने पूर्व यूरोपीय देशांत कम्युनिस्ट पक्षाला आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर सत्तास्थानी बसविले. चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रूमानिया, बल्गेरिया, पूर्व जर्मनी या देशांत कम्युनिस्ट पक्षाचे सामर्थ्य दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अतिशय मर्यादित होते. पण रशियाच्या मदतीने ते पक्ष अधिकारारूढ झाले. पूर्वेकडे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने आपल्या प्रभावाचे क्षेत्र कोरिया, व्हिएटनाम, इंडोनेशिया, ख्मेर प्रजासत्ताक, मलेशिया, ब्रह्मदेश, श्रीलंका आणि काही प्रमाणात भारत या देशांत वाढविले. वरील दोन्ही घटनांचा अर्थ असा होतो की, कम्युनिस्ट पक्ष प्रामुख्याने शेतीप्रधान, औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या अशा अर्धविकसित देशांत संघटित होऊ शकला. आफ्रिका आणि द. अमेरिका या खंडांतील काही देशांत कम्युनिस्ट संघटनेची मुळे रुजू पहात आहेत.

कम्युनिस्ट पक्षाचे श्रद्धास्थान

रशियाच्या बाहेरील देशांतील कम्युनिस्ट पक्ष जवळजवळ १९५० पर्यंत रशियातील कम्युनिस्ट पक्षाच्या आज्ञेनुसार कार्य करीत होते, ही वस्तुस्थिती तात्त्विक दृष्ट्या कोणी अमान्य केली, तरी व्यवहारात ती नाकारता येण्यासारखी नाही. रशियातील क्रांतीनंतर सतत तीस वर्षे रशियाचेच नेतृत्व जगातील सर्व कम्युनिस्ट पक्षांनी अविरोध मान्य केले. पण १९४८ साली यूगोस्लाव्हियाने प्रथम या अद्वितीय नेतृत्वाला आव्हान दिले आणि आपल्या देशातील कम्युनिस्ट पक्षाचे धोरण स्वतंत्र असावे, असा आग्रह धरला. त्यानंतर चीनने आपल्या देशाचा कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्र रीत्या धोरण आखेल असे जाहीर केले. स्टालिनच्या मृत्यूनंतर हंगेरी,पोलंड, चेकोस्लोव्हाकिया या देशांतील कम्युनिस्ट पक्षाने रशियन नेतृत्वाविरुद्ध अयशस्वी उठाव केले. या सर्व घटनांचा परिणाम, विशेषतः रशिया आणि चीन यांच्या वैमनस्याचा परिणाम, आशियातील, दक्षिण अमेरिकेतील व आफ्रिकेतील जवळजवळ सर्वच कम्युनिस्ट पक्षांच्या धोरणावर झालेला दिसून येतो. रशियावादी आणि चीनवादी असे कम्युनिस्ट पक्षांचे दोन गट या देशांत पडलेले दिसून येतात.

ध्येय आणि धोरण

सर्व कम्युनिस्ट पक्षांचे श्रद्धास्थान मार्क्स व एंगेल्स यांचे ग्रंथ मानले जातात. त्यांत नंतर लेनिन आणि स्टालिन यांनी केलेल्या मार्क्सवादाच्या स्पष्टीकरणाची भर पडली. स्टालिनच्या मृत्यूनंतर या भाष्यकारांतून त्याचे नाव वगळण्यात आले. चीन व चीनवादी कम्युनिस्ट पक्ष माओ-त्से-तुंग यांचे भाष्य अधिकृत मानतात.

कम्युनिस्ट पक्षांच्या सूत्रांवरून त्या पक्षांचे उद्दिष्ट फक्त लक्षात येऊ शकेल :

  1. देशातील सर्व उत्पादनसाधने समाजाच्या मालकीची करणे, त्यात उद्योगधंदे आणि शेती यांचाही समावेश आहे.
  2. कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाने क्रांती करून सत्ता हस्तगत करणे.
  3. सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणे.
  4. राज्यक्रांतीनंतर इतर पक्ष आणि संघटना बरखास्त करणे.
  5. शिस्तबद्ध आणि कृतिशील अशा पक्षनेतृत्वाकडे समाजाने राजकीय शासन आणि आर्थिक साधने यांची जबाबदारी सोपविणे.

सत्ता हस्तगत करण्यापूर्वी आणि नंतरही काही दिवस कम्युनिस्ट पक्ष देशातील अल्पसंख्य जाती-जमाती, असंतुष्ट वर्ग, धार्मिक अल्पसंख्याक, वांशिक छोटे गट आणि अत्यंत दरिद्री लोक यांना विकासाची आश्वासने देऊन पक्षाविषयी सहानुभूती आणि आपुलकी निर्माण करतो. पक्षाच्या राजकीय डावपेचांचाच हा एक भाग मानला जातो. त्याबरोबरच धनिक वर्ग, उत्पादनसाधनांचे मालक, अधिकारावर उच्चस्थानी असलेल्या व्यक्ती आणि विरोधी राष्ट्रे यांचा, भांडवलदारांचे हस्तक, शोषक, साम्राज्यवादी इ. विशेषणांनी समाजात प्रचार केला जातो. वरील डावपेचाचीच ही दुसरी बाजू. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याच अनुषंगाने प्रचार करण्यात येतो. कम्युनिस्ट देश शांततावादी आणि कम्युनिष्टेतर देश युद्धखोर असे समीकरण बनविण्यात येते आणि मग अविकसित राष्ट्रांनी शांततावादी धोरणास, म्हणजेच कम्युनिस्ट देशांच्या धोरणास, पाठिंबा द्यावा असे आवाहन केले जाते. यालाच जागतिक राजकारणाच्या पातळीवरील वर्गसंघर्ष मानण्यात येतो. या प्रचाराचा मागासलेल्या देशांतील कम्युनिस्ट पक्षांवर अधिक प्रभाव पडू लागला, म्हणजे त्याला सक्रिय उत्तेजन देऊन शक्य तर निवडणुकीच्या मार्गाने आणि न जमल्यास लष्करी बळाच्या मार्गाने सत्तेवर आणणे, हेही त्या डावपेचाचे एक अंग होय. त्यासाठी राजकीय धोरणाबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना, साहित्यविषयक चळवळी, कलेच्या क्षेत्रांतील प्रयोग इ. विविध साधनांचाही उपयोग करण्यात येतो. सरकारी यंत्रणा आतून पोखरून टाकणे, पोलीस आणि न्यायखाते यांना निष्क्रिय बनविणे आणि जमल्यास लष्करातील तरुण अधिकाऱ्यांवर छाप पाडणे, यांचाही समावेश कम्युनिस्ट पक्षाच्या डावपेचांत करण्यात येतो आणि हे सारे क्रांतीसाठी आवश्यक आणि अपरिहार्य मानल्यामुळे त्यात अयोग्य किंवा वावगे समजले जात नाही.

रशियन कम्युनिस्ट पक्ष

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी औद्योगिक क्षेत्रातील असंतोषातून रशियात मार्क्सवादी चळवळीला आरंभ झाला. प्ल्येखनॉव्ह या क्रांतिकारकाने मार्क्सवादी साहित्य परदेशांतून रशियात गुप्तपणे नेऊन रशियन भाषेत त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. आरंभी मार्क्सवादी गटाचे क्षेत्र फार छोट होते. लेनिन आणि त्याचे सहकारी हेही त्या गटात सामील झाले. १८९० मध्ये रशियात चोवीस लक्ष कामगार होते. आरंभी त्यांची संघटना करणे अत्यंत अवघड होते. १८९८ मध्ये मिन्स्क येथे रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टीची स्थापना झाली. रशियन कम्युनिस्ट पक्ष अधिकृत रीत्या स्थापन झाल्याचे तेव्हापासून मानले जाते. १९०३ मध्ये या पक्षात फाटाफूट झाली आणि बोल्शेव्हिक आणि मेन्शेव्हिक असे दोन गट त्यातून वेगळे झाले. लेनिन आणि त्याचे सहकारी यांचा बोल्शेव्हिक गट अधिक प्रभावी होता. रशियन क्रांतीच्या वेळी हा गट प्रामुख्याने आघाडीवर होता. मार्च १९१८ मध्ये या गटाने रशियन कम्युनिस्ट पार्टी (बोल्शेव्हिक) हे नाव स्वीकारले. १९२५ मध्ये ऑल युनियन कम्युनिस्ट पार्टी (बोल्शेव्हिक) असे नाव बदलण्यात आले. त्यानंतर १९५२ मध्ये बोल्शेव्हिक हा शब्द गाळण्यात आला आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ दी सोव्हिएट युनियन असे नाव त्यास देण्यात  आले

कम्युनिस्ट पक्षाची रचना

कम्युनिस्ट पक्षाची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आलेली आहे. रशियातील कम्युनिस्ट पक्षाच्या धर्तीवरच इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांच्या घटना आणि नियम बनविण्यात आलेले असतात. कम्युनिस्ट पक्ष ज्या ज्या देशांत अधिकारावर आहेत, तेथे सर्व राज्यासाठी एकच एक संघटना अस्तित्वात असते. इतर देशांमध्ये गेल्या काही वर्षांत रशिया आणि चीन या देशांतील कम्युनिस्ट पक्षांशी निष्ठा असलेले दोन वेगवेगळे गट स्थापन झालेले आहेत.

कम्युनिस्ट पक्षाच्या रचनेत अगदी तळाशी प्राथमिक संघ आणि त्यानंतर जिल्हा, प्रदेश, राज्य अशा क्रमाने वरची पक्षकेंद्रे स्थापन केली जातात. प्रत्येक खालच्या पातळीवरून वरच्या पातळीवर प्रतिनिधी पाठविले जातात. प्रदेशाप्रमाणेच व्यवसाय केंद्रांतूनही प्राथमिक पक्षसंघ स्थापन केला जातो. कारखाने, सामुदायिक शेती, खाणी, वीजनिर्मितीची केंद्रे, विद्यापीठे, रेल्वे आणि इतर वाहतुकीची केंद्रे अशा सर्व ठिकाणी पक्षसंघ कार्य करीत असतात. अशा सर्व पक्षसंघांतून मनोऱ्याप्रमाणे पक्षाची संघटना तयार होते. त्यात पक्षमहासभेला सर्वश्रेष्ठ स्थान असते. पण प्रत्यक्ष व्यवहारात सर्वोच्च मध्यवर्ती समिती सर्वांत अधिक सामर्थ्यशाली आणि महत्त्वाचे निर्णय घेणारी संघटना असते.

पार्टी काँग्रेसच्या दोन अधिवेशनांच्या दरम्यान पक्षाच्या ध्ये यधोरणाचे मार्गदर्शन सेंट्रल कमिटी करते. पार्टी काँग्रेसचे अधिवेशन दर चार वर्षांनी व्हावे, असा नियम असला, तरी तो काटेकोरपणे पाळला जातोच असे नाही. पार्टी काँग्रेसच्या अधिवेशनात सेंट्रल कमिटी आणि सेंट्रल ऑडिटिंग कमिशन यांची निवड केली जाते. सेंट्रल ऑडिटिंग कमिशन पक्षाच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सांभाळते आणि सेंट्रल कमिटीकडे पक्षाच्या राजकीय व इतर सर्व धोरणांची जबाबदारी असते. दर सहा महिन्यांनी सेंट्रल कमिटीची बैठक व्हावी,असा नियम आहे.

पक्षाची कार्यपद्धती

सेंट्रल कमिटीच्या सभासदांची तीन विभागांत वाटणी करून त्यांच्याकडे निरनिराळी कामे सोपविली जातात :

  1. अध्यक्ष मंडळ (प्रिसिडीयम) : याने सेंट्रल कमिटीच्या कामाची आणि निर्णयाची अंमलबजावणी करावयाची असते. सेंट्रल कमिटीच्या दोन अधिवेशनांच्या दरम्यानच्या काळात प्रिसिडीयमने सर्व धोरण ठरवावयाचे असते. पक्ष आणि सरकार यांच्या संबंधीचे निर्णय घेणारे सर्वश्रेष्ठ संघटन म्हणून प्रिसिडीयमचा उल्लेख होतो. प्रिसिडीयमला १९५२ पर्यंत पॉलिट ब्यूरो म्हटले जाते असे.
  2. चिटणीस मंडळ (सेक्रेटरिएट) : पक्षाचे निर्णय अंमलात आणणे, पक्ष कार्यकर्त्यांची निवड, त्यांच्या कामावर देखरेख, त्यांचे शिक्षण इ. कामे सेक्रेटरिएटमार्फत केली जातात. तसेच उद्योगधंदे, शेती, व्यापार, शिक्षण यांच्यासंबंधी पक्षाने ठरविलेल्या धोरणाचा प्रचार आणि प्रसार करणे, परदेशांत पक्ष आणि सरकार यांची धोरणे प्रसृत करणे, मोक्याच्या ठिकाणी पक्षनियंत्रण, मार्गदर्शन, कामाची विभागणी, शिस्तपालनाकडे लक्ष इ. अनेक जबाबदाऱ्या सेक्रेटरिएटला पार पाडाव्या लागतात. ‘कम्युनिस्ट पक्षाचा कणा ’ असे या विभागाचे वर्णन केले जाते. मुख्य चिटणीस (फर्स्ट सेक्रेटरी) याचे स्थान पक्ष आणि सरकार यांच्यावर नियंत्रण ठेवण्याइतके सर्वोच्च आणि प्रभावी मानले जाते.
  3. नियंत्रण मंडळ (कंट्रोल कमिशन) : पक्षाच्या अंतर्गत शिस्तीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी कंट्रोल कमिशनवर असते. खालच्या पक्ष केंद्रांतील सदस्याचे मतभेद, वाद यांचा निवाडा हे कमिशन करते. पक्षातून एखाद्या सदस्याला काढून टाकले असेल, तर त्यासंबंधी फेरविचार करण्याचा अधिकार याच मंडळाकडे असतो. पक्षसदस्यांच्या तक्रारी ऐकून घेणे आणि पक्षाच्या नियमांप्रमाणे त्यांचे निवाडे देणे तसेच सदस्यांचे वर्तन आणि पक्षाविषयी त्यांची दृष्टी, हेतू, अपेक्षा यांच्यावरही याच कमिशनची सक्त नजर असते.

पक्षाने घेतलेला निर्णय सर्व सभासदांवर संपूर्णपणे बंधनकारक मानला जातो. या निर्णयाविरुद्ध चर्चा करणे, जाहीरपणे वा गुप्तपणे त्यासंबंधी बोलणे निषेधार्ह मानले जाते आणि त्याबद्दल सभासद शिक्षेला पात्र ठरतो. एखाद्या निर्णयाची चर्चा करणे सभासदाला आवश्यक वाटत असेल, तर त्याने तो प्रश्न पक्षाच्या बैठकीत जेव्हा चर्चेला येईल तेव्हाच त्यासंबंधी आपले मत व्यक्त करावे. त्याविरुद्ध वर्तन करणाऱ्याला शिस्तभंगासाठी निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा ठेवलेल्या आहेत. लोकांसमोर अपमानित करणे, सरकारी यंत्रणेतून काढून टाकणे आणि अशाच इतर मार्गांनी त्याची पक्षातून हकालपट्टी करणे इ. शिक्षा करण्यात येतात. सभासदाची पक्षातून हकालपट्टी करण्यापेक्षा पक्षनेत्याला अधिक काही करता येत नाही. म्हणून स्टालिन आपल्या विरोधकांना नष्ट करण्यासाठी पक्षशिस्तीचे कारण न सांगता त्यांच्यावर राज्य उलथून पाडण्याच्या गुन्ह्यांचा आरोप ठेवीत असे. अर्थात अशा गुन्ह्याला शिक्षा करणे कायद्याच्या कक्षेत येत असल्यामुळे स्टालिन आपल्या विरोधकांची सहजगत्या वाट लावू शकत असे. त्यामुळे पक्षाचे शुद्धीकरण झाले असेही मानण्यात येत असे.

पक्षाचे सभासदत्व

पक्षाचे सभासदत्व मिळणे कोणालाही सहज शक्य नसते. त्यासाठी तीन पक्षसदस्यांच्या शिफारशींसह अर्ज करावा लागतो. शिफारस करणारे सभासदही किमान तीन वर्षे पक्षाचे कार्यकर्ते असावे लागतात. शिफारशीसाठी केवळ परिचय पुरेसा नाही. ज्या ठिकाणी उमेदवार काम करीत असेल, तेथील पक्षसदस्यांनाच त्याच्यासंबंधी शिफारस करता येते. उमेदवाराच्या वर्तनासंबंधी शिफारस करणाऱ्यांना चांगली माहिती असावी लागते.

पक्षाचे संपूर्ण सभासदत्व मिळण्यापूर्वी एक वर्ष उमेदवाराला कच्चा सभासद म्हणून काम करावे लागते. या उमेदवारीच्या काळात त्याच्याकडे पक्षाच्या कामासंबंधी काही ठराविक जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. उमेदवार सभासद पदाधिकाऱ्यांची आज्ञा किती बिनचूक पाळतो, शिस्तीचे पालन करतो किंवा काही त्याग करण्याची त्याची किती प्रमाणात तयारी आहे, पक्षाच्या ध्येयधोरणाची त्याला निष्ठा वाटते किंवा नाही, अशा सर्व प्रकारच्या कसोट्यांतून त्याला पार पडावे लागते. उमेदवारीच्या काळात सभासदाने कोठेही आणि कोणत्याही कामासाठी जाण्याची तयारी ठेवली पाहिजे; उमेदवाराचे वय किमान १८ वर्षांचे हवे. रशियाबाहेरही कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व मिळणे असेच काहीसे गुंतागुंतीचे असते. पक्षाच्या ध्येयासाठी त्यागपूर्वक कष्ट करण्याची तयारी, शिस्त आणि आज्ञापालन या तीन महत्त्वाच्या कसोट्या मानण्यात येतात. पक्षाच्या अगदी तळाशी असलेल्या प्राथमिक पक्ष केंद्राचा सभासद आपल्या कार्याने वरच्या पक्षसंघटनांत प्रवेश करून आपले कर्तृत्व अधिक व्यापक करू शकतो, अशी पक्षाच्या नियमांत तरतूद आहे. क्रांतीच्या पूर्वी पक्षसदस्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागत असे. क्रांतीनंतर ती परिस्थिती बदलली, पण नवी परिस्थितीही सर्व सभासदांना सारखीच अनुकूल ठरली, असे मात्र म्हणता येणार नाही.

पक्षाचे सभासद होणे जेवढे अवघड आहे, तेवढेच पक्षातून बाहेर पडणेही अवघड असते. एखाद्या सभासदाने राजीनामा द्यावयाचे ठरविले, तर त्याचा अर्थ त्या सभासदाचा पक्षाच्या ध्येयधोरणाशी, कार्यक्रमाशी किंवा पक्षनेत्यांनी केलेल्या आज्ञांशी विरोध आहे, असे मानले जाते आणि मग त्याला आपला विरोध स्पष्ट करता येत नाही किंवा पक्षातून सरळ राजीनामा देऊन बाहेरही पडता येत नाही. एक प्रकारे त्याच्या मनाचा कोंडमारा होत राहतो. म्हणून पक्षातून राजीनामा दिलेले सभासद सापडत नाहीत. नेतृत्वाच्या विरोधामुळे सभासदांना पक्षातून काढले जाते. सभासदाला मतभेद व्यक्त करणेही अशक्य असते. कारण असा मतभेद म्हणजे पक्षाने ठरविलेल्या कार्यक्रमांशी द्रोह करण्यासारखे मानले जाते. त्यासाठी नेत्यांचा विरोध पतकरावा लागतो. त्यातून अनेकदा पक्षशुद्धीकरणाच्या मोहिमा निघतात. एकाच वेळी हजारो सभासदांना पक्षातून काढून टाकल्याची उदाहरणे रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या इतिहासात अनेकदा घडली आहेत. काढून टाकलेल्या सभासदांपैकी ज्यांचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा मानला जातो, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून शिक्षाही केल्या जातात. अनेकांना हद्दपार व्हावे लागते. रशियात पक्षशुद्धीकरणाचे असे प्रकार १९२४ पासून १९३४ पर्यंत पाच वेळा घडले. त्यांपैकी १९२९ साली सामुदायिक शेतीच्या प्रयोगाला विरोध करण्याच्या आरोपावरून फार मोठ्या प्रमाणात पक्षाचे शुद्धीकरण करण्यात आले. १९३३ सालीही घटनात्मक सुधारणांच्या संदर्भात असेच मोठे शुद्धीकरण झाले. ज्या सभासदांना पक्षाचे ध्येयधोरण पूर्णपणे आकलन होत नाही आणि आकलन झाले तरी ते लोकांना समजावून सांगता येत नाही, पण कार्य करण्याचा उत्साह तर असतो, अशा सभासदांसाठी १९३३ साली ‘सहानुभूतीचा सभासद’ असा एक नवा वर्ग तयार करण्यात आला. पक्षसभासदांची अशीच फार मोठी शुद्धीकरणाची मोहीम दुसऱ्या महायुद्धानंतर रशियात सुरू झाली, तशीच रशियाच्या वर्चस्वाखाली असलेल्या पूर्व यूरोपीय देशांतील कम्युनिस्ट पक्षांतही घडून  आली.

पक्ष सभासदाने पक्षाच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वाविषयी शंका व्यक्त करता कामा नये. मार्क्सवाद आणि त्यात लेनिनने घातलेली वैचारिक भर यांच्याविषयी मतभेद व्यक्त करता कामा नये, असा दंडकच घालून दिलेला आहे. मध्यवर्ती पक्ष नेतृत्वाच्या आज्ञा अंमलात आणणे, खालच्या पक्षसंघाच्या कामावर देखरेख ठेवणे, पंचवार्षिक योजनांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्ठा करणे,त्यासाठी भरपूर प्रचारसंघटना उभारणे, पक्षसदस्य नसलेल्या जनतेवर पक्षाच्या विचारांचा प्रभाव पाडणे इ. सर्व कामे पक्षसभासदांनी संबंधित संघटनेच्या साहाय्याने आपापल्या क्षेत्रात केली पाहिजेत. त्यावरूनच सभासदाचे कर्तृत्व प्रामुख्याने जोखले जाते. लोकशाही केंद्रित सत्ता हे पक्षाचे संघटनात्मक मार्गदर्शक तत्त्व मानले जाते. पण प्रत्यक्ष व्यवहारात ही लोकशाही फक्त खालच्या पातळीवरील पक्षसंघटनांच्या सभांत टीका करण्यापर्यंतच मर्यादित असते. पक्षाच्या ध्येयधोरणाचे सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या पक्षनेतृत्वावर या मार्गदर्शक तत्त्वाचे आक्रमण होता कामा नये, याची प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने तरतूद करून ठेवलेली असते.

पक्ष आणि शासनसंस्था : पक्षाची यंत्रणा आणि सरकारी कारभाराची यंत्रणा या दोन्ही एकमेकींशी केवळ पूरकच नव्हेत, तर संपूर्ण अर्थाने पोषक ठरल्या पाहिजेत. त्यांतही पक्षयंत्रणेचे कारभारयंत्रणेवर वर्चस्व असते. सरकारी खात्यांच्या सर्व शाखोपशाखांवर त्या त्या पातळीवरील पक्षसदस्यांची देखरेख असते. त्यांनी कारभारातील गुणदोषांसंबंधी आपला अहवाल नियमितपणे वरच्या पक्ष संघटनेकडे पाठवावयाचा असतो. ही माहिती गुप्त स्वरूपाची असावी अशी अपेक्षा केली जाते. पक्षाच्या अंतर्गत होणाऱ्या सभा आणि बैठकी यांच्या कामासंबंधीही वरिष्ठ पक्षनेत्यांकडे मासिक अहवाल पाठवावे लागतात. त्या अहवालांना अनुसरून खालच्या पक्षसंघटनांच्या कामाची चौकशी करण्यात येते आणि अशा प्रकारे पक्षाच्या सर्व अंगोपांगांत शिस्तीचे व आज्ञापालनाचे अभिसरण चालू ठेवले जाते.

पूरक संघटना

कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येयधोरणाला आणि संघटनेला पूरक ठरणाऱ्या आणखी तीन संघटना आहेत : (१) युवकसंघ (कॉम्समॉल), (२) कुमारसंघ (पायोनियर्स) आणि (३) बालसंघ (लिटल ऑक्टोबरिस्ट). या संघटनांचे सभासदत्व वयपरत्वे मिळते.

युवकसंघाच्या सभासदांसाठी १४ ते २६ वर्षांच्या तरुणांना अर्ज करता येतो. रशियात कम्युनिस्ट पक्षाच्या खालोखाल युवकसंघाला महत्त्वाचे स्थान आहे. लेनिनने १९०३ सालीच तरुण स्त्रीपुरुषांसाठी एक निराळी संस्था उभारण्याची सूचना त्यावेळच्या सोशल डेमोक्रॅटिक पक्षात मंजूर करून घेतली. मार्क्सवादी विचाराची दीक्षा त्यांना याच काळात मिळाली होती. त्यामुळे युवक संघटनेतील जे तरुण क्रांतीनंतर कारखाने, सैन्य, सांस्कृतिक चळवळी यांत गेले,तेव्हा त्यांनी तेथे कम्युनिस्ट पक्षाला पोषक असे वातावरण निर्माण करून ठेवले. या संघटनेची औपचारिक स्थापना १९१८ च्या ऑक्टोबर महिन्यात झाली.

कुमारसंघातील सभासदत्वासाठी दहा ते पंधरा वर्षे वयाच्या दरम्यानची मुले अर्ज करतात. शालेय जीवनापासूनच मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांचा परिचय व्हावा,समाजकार्याची आवड उत्पन्न व्हावी आणि विद्याऱ्थी चारित्र्यसंपन्न बनावा, असा कुमार संघाच्या उभारणीमागील मुख्य हेतू. या संघातील अनेकजण पुढे युवकसंघात प्रवेश मिळवितात आणि त्यातूनच नंतर कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होण्याचा मार्ग सुलभ होतो.

पाच ते बारा वर्षे वयाच्या दरम्यानची मुले बालसंघाचे सभासद होऊ शकतात. आपल्या देशाच्या नेत्याविषयी आदर आणि श्रद्धा उत्पन्न करणे, त्यांच्या जीवनातील आणि क्रांतिकाळातील अनेक प्रसंग, कथा आणि काव्यातून समजून घेणे आणि भावी जीवनात आपल्यालाही असेच काहीतरी महान कार्य करावयाचे आहे,अशी महत्त्वाकांक्षा मनात निर्माण करणे हे या संघाचे महत्त्वाचे उद्देश. याच वयात ध्येयवादी नेतृत्वाचे बीजारोपण करण्यात येते; त्याचा विकास नंतर कुमारसंघटनेच्या साह्याने आणि त्यापुढे युवकसंघाच्या कार्यात होतो आणि शेवटी कम्युनिस्ट पक्षाचे शीलसंपन्न, मार्क्सवादी विचारावर श्रद्धा असणारे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येयधोरणाचा पाठपुरावा करणारे नेतृत्व निर्माण होते, अशी या विविध संघांच्या कार्यामागील मुख्य भूमिका आहे.

पक्ष संघटनेच्या रचनेतील सर्वोच्च महत्त्वाच्या शाखा : (१) मध्यवर्ती पक्ष महासभा (ऑल युनियन पार्टी काँग्रेस); (२) मध्यवर्ती लेखापरीक्षण मंडळ (सेंट्रल ऑडिटिंग कमिशन); (३) मध्यवर्ती समिती (सेंट्रल कमिटी); (४) अध्यक्ष मंडळ (प्रिसिडीयम); (५) चिटणीस मंडळ(सेक्रेटरिएट); (६) नियंत्रण मंडळ (सेंट्रल कमिशन).

 

संदर्भ : 1. Hazard, J. N. The Soviet System of Government, Chicago, 1962.

2. Neumann, S. Modern Political Parties, Chicago, 1956.

3. Schapiro, L. B. Communist Party of the Soviet Union, Toronto, 1960.

४. सुंठणकर, स.र.मार्क्सवादाचाप्रयोग-सोव्हिएटरशिया, धारवाड, १९३८.

 

लेखक - स. मा. गर्गे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate