न्यिक्यित ग्व्रुश्चॉव्ह : (१७ एप्रिल १८९४ – १६ सप्टेंबर (१९७१). सहजीवनाचा पुरस्कार करणारा पहिला रशियन साम्यवादी नेता. कुर्स्क प्रांतातील कल्यीनव्हक या खेड्यात त्याचा एका श्रमजीवी कुटुंबात जन्म झाला. त्याने प्रथम मेंढपाळाचे व पुढे कामगार म्हणून औद्योगिक क्षेत्रात काम केले.
तो कम्युनिस्ट पक्षाचा १९१८ साली सभासद झाला आणि त्याने रेड आर्मीत नाव नोंदविले. १९२५ साली तो पदवीधर होऊन बाहेर पडल्यावर त्याने स्टालिनच्या विविध योजनांस सक्रिय पाठिंबा दिला. कम्युनिस्ट पक्षाची निरनिराळ्या पदांवरून निष्ठेने सेवा केल्यामुळे त्यास १९३८ साली युक्रेनियन कम्युनिस्ट पक्षाचे पहिले चिटणीसपद आणि १९३९ साली पॉलिटब्यूरोचे सभासदत्व मिळाले. दुसऱ्या महायुद्धात निरनिराळ्या आघाड्यांवरील लष्करी समित्यांत त्याने केलेले कार्य व पोलंड हस्तगत करण्यात दाखविलेले चापल्य प्रशंसनीय आहे.
न्यिकित ख्रुश्चॉव्ह
स्टालिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चॉव्हने सत्तास्पर्धेत अत्यंत व्यवहार्य धोरण स्वीकारून कम्युनिस्ट पक्षाचे पहिले चिटणीसपद मिळविले व माल्येनकॉव्हच्या जागी बुल्गान्यिनला पंतप्रधान केले. पडीक जमीन लागवडीखाली आणण्याच्या त्याच्या योजनेमुळे त्याचे नाव प्रसिद्धीस आले. त्याने इतर सहकारी नेत्यांसह केलेल्या चीन, भारत व इतर देशांच्या दौऱ्यांमुळे त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाही वाढली. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याची घोषणा करून त्याने भारतीयांच्या मनात रशियाबद्दल आपुलकी निर्माण केली. त्याने स्टालिनच्या रोषास बळी पडणाऱ्यांचे पुनर्वसन तर केलेच; पण १४ फेब्रुवारी १९५६ रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत स्टालिनच्या धोरणावर व विभूतिमत्त्वावर कडक टीका केली. परिणामतः बंधनागारे व वेठबिगार बंद करण्यात येऊन गुप्तचरांची भीती नाहीशी करण्यात आली व जाहीररीत्या टीका प्रतिटीकांस काही अंशी मोकळीक देण्यात आली. यूगोस्लाव्हियाला भेट देऊन त्याने टिटोशी मैत्री संपादली. पोलंड आणि हंगेरीतील उठावांमुळे त्याला स्टालिन विरोधास आळा घालावा लागला.
माल्येनकॉव्ह, माल्युटॉव्ह वगैरे विरोधी नेत्यांनी त्याने प्रिसिडियममधून १९५७ साली काढले. नंतर २८ मार्च १९५८ रोजी बुल्गन्यिनऐवजी तोच पंतप्रधान झाला. तथापि पक्षाचे चिटणीसपद त्याच्याकडेच होते. सत्ता मिळताच त्याने सप्तवार्षिक योजना आखली, शैक्षणिक व न्यायदान पद्धतींत सुधारणा केल्या, शारीरिक श्रमाचे महत्त्व वाढविले, स्टालिन-काळातील भीतीचे वातावरण कमी केले, रशियन साहित्यास वेगळे स्वरूप देऊन लेखकांना साम्यवादास महत्त्व द्यावयास लावले आणि पक्षांतर्गत लोकशाही स्थापन केली.
ख्रुश्रॉव्हचे परराष्ट्रीय धोरण सामान्यतः शांततामय सहजीवनाचे होते. बर्लिन घेणे, हामारशल्डला खाली ओढणे आणि नाटो आदी संघटनांना सुरुंग लावणे, ही त्याची उद्दिष्टे होती. त्याने संयुक्त राष्ट्रे या संस्थेच्या कार्यपद्धतीवर टीका केली व एकाऐवजी तीन चिटणीस नेमण्याची सूचना केली.
अध्यक्ष आयझनहौअरची अमेरिकेस जाऊन १९५९ मध्ये त्याने भेट घेतली. अमेरिकेची हेरगिरी त्याने उघडकीस आणून १९६० मध्ये पॅरिस शिखर परिषद उधळून लावली. त्याने १९५९ व १९६० च्या दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करून विश्वशांतीवर भर दिला व सोव्हिएट राष्ट्राची परराष्ट्रनीती विशद केली. जून १९६१ मध्ये तो अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांना व्हिएन्ना येथे भेटला; परंतु जर्मन शांतता तहाबद्दल एकमत होऊ शकले नाही. परिणामतः त्याने बर्लिन भिंत बांधली. अमेरिकेने कडवा विरोध केल्यामुळे ऑक्टोबर १९६२ मध्ये ख्रुश्चॉव्हला क्यूबामधून आपली प्रक्षेपणशास्त्रे काढून घ्यावी लागली. इंग्लंड – अमेरिकेशी न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रिटी करण्यात त्यास यश मिळाले. त्याच्या धोरणामुळे चीन व रशिया यांत संघर्ष निर्माण झाला. आर्थिक अडचणी व पक्षांतर्गत संघर्ष यांमुळे ऑक्टोबर १९६४ मध्ये त्यास पंतप्रधानपद सोडावे लागले. एवढेच नव्हे, तर त्याचे राजकीय जीवनही प्रायः संपुष्टात आले.
समाजवादी श्रमवीर हा किताब व आंतरराष्ट्रीय लेनिन पारितोषिक यांचा तो मानकरी होता. रशियाचा पोलादी पडदा सैल करून परराष्ट्रीय धोरणात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे महत्त्वाचे कार्य त्याने केले. राजकारण – निवृत्तीनंतर तो आपल्या खासगी मिळकतीची देखभाल करीत असे. या काळात त्याने आपल्या आठवणी लिहिल्या. त्या ख्रुश्चॉव्ह रिमेम्बर्स या इंग्रजी शीर्षकाने पुढे प्रसिद्ध झाल्या (१९७०). हृदयविकाराच्या झटक्याने तो मॉस्को येथे मरण पावला.
संदर्भ : 1. Crankshaw, Edward, Khurshchev : A Career, New York, 1967. 2. Kellen, Konrad, Khrushchev : A Political Portrait, New York, 1961. 3. Werth, Alexander, Russia Under Khrushchev, New York, 1962.
लेखक - अच्युत खोडवे
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
केन्या प्रजासत्ताकातील राष्ट्रीय चळवळीतील एक अग्रग...
इंग्लंडमधील स्त्रीमताधिकार (सफ्रजेट) चळवळीतील एक ...
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिके...
आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्...