অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपण किती जीवांना पोसतो ?

आपण किती जीवांना पोसतो ?

आपण किती जिवांना पोसतो?या प्रश्नाचं उत्तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे.
एक आई आपल्या बाळांना जन्म देते, बाळाचे पालनपोषण करते. एका आईला एकंदर आयुष्यात अनेक बाळे होऊ शकतात, त्यामुळे तितक्या जीवांचे पालनपोषण ती करते असे आपण सहजपणे म्हणू शकतो. त्याशिवाय बहुतेक घरांमध्ये फक्त आईच रांधण्या-वाढण्याचे काम करते, त्यामुळे ती कुटुंबाची पोषणकर्ती आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

अनेक समाजांमध्ये घरातल्या प्रौढ पुरुषाला कुटुंबप्रमुख मानले जाते. पुरुष कुटुंबप्रमुख शेती, व्यवसाय, व्यापार, नोकरी, काम, धंदा असे काही ना काही करून अर्थार्जन करतो, घरात पैसा मिळवून आणतो. त्या पैशावर घरातल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्‍या वस्तू, धान्य वगैरे विकत आणले जाते. त्या अर्थाने तो प्रौढ पुरुष कुटुंबप्रमुख घरातल्या सर्व जीवांना पोसतो. घरात कर्ता पुरूष नसेल किंवा घरात असलेला पुरूष कर्ता नसेल तर घरातील जी कोणी किंवा ज्या कोणी व्यक्ती ‘घर चालवतील’ त्यांही कुटुंबाला पोसतात असेच म्हणावे लागेल आणि ते बरोबरही ठरेल. एकंदरीत अर्थार्जन करणार्‍या व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या सर्व कुटुंबियांना पोसतात.

काही घरांमध्ये मांजर, कुत्रा, पोपट, लव्ह बर्डस्, मासे, कबुतरे, गाई, म्हशी वगैरे प्राणी – पक्षी पाळलेले असतात. त्यांनाही कुटुंबाकडून किंवा आपल्याकडून आपण पोसतो. असे सजीव आपण स्वेच्छेने पाळतो – पोसतो. पण आपलं घर म्हटलं तर त्यामध्ये आपण न पाळलेले; पण घरात वस्ती करून राहिलेले उंदीर, घुशी वगैरे जीव असतात. त्यांना पोसण्यासाठी एकप्रकारे आपणच कारणीभूत असतो. आपली जेवणं झाली की अन्नाचे कण, खरकटे-मरकटे इत्यादी घरात असल्यामुळे त्यावर मुंग्या, झुरळं वगैरे कीटक यथेच्छ गुजराण करतात म्हणजे त्यांनाही आपण पोसतो. शिवाय आपण पोसलेल्या या मुंग्या, झुरळं वगैरे कीटकांना खाऊन पाली वगैरेंसारखी प्राणी जगतात, म्हणजे पालींनाही आपणच पोसतो. पाली अनेक प्रकारचे किडे खातात. यातले बरेचसे किडे आपण घरात धान्य-धुन्य भरून ठेवतो त्यावर गुजराण करत असतात म्हणजे त्यांनाही आपणच पोसतो.

आपल्याला नको असलेले हे जीव आपल्या अन्नावर, धान्यावरच तर जगतात. किडे-मुंग्या,झुरळं-पाली असे नकोसे जीव घरात असतील तर काही उपाय करता येतील. धान्य-खाद्यपदार्थ साठवताना पक्के वाळवून आणि घट्ट झाकणाच्या डब्यात वगैरे ठेवले तर त्यात शिरायला किडा-मुंगीला जागा राहणार नाही. आपलं खरकटं, शिळंपाकं यांची योग्य विल्हेवाट लावली,साफसफाई राखली तर असले नको असलेले जीव आपल्या घरात रेंगाळणार नाहीत. त्यांना खायला काही मिळालं नाही तर ते घरात आले तरी थांबणार नाहीत.

तर आपल्याला हवे असलेले आणि नको असलेले पण आपण पोसत असलेले सगळे मिळून किती जीव असतील याचा हिशोब केला तर तो आकडा किती येईल? दहा-बारा? शंभर-दोनशे? हजार? लाख? यातला कुठलाही आकडा तुम्ही सांगितलात तरी तो थिटा पडेल. अगदी कोटी, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म हे आकडेही अपुरे पडतील इतक्या जीवांना तुम्ही पोसत आहात.
शरीरशास्त्राचा अभ्यास करणार्‍या वैज्ञानिकांनी हा तर आकडा ९० लाख कोटी इतका असल्याचा अंदाज केला आहे. ९० लाख कोटी म्हणजे ९ वर १४ शून्ये. एखाद्या शून्याने अंदाज चुकला तरी फारसा पडणार नाही. 

“लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो” असे म्हणतात. आपण लाखोंचे पोशिंदे आहोत. लाखोंचे नाही तर लाखो-कोट्यवधींचे पोशिंदे आहोत. लाख-कोटी जिवांना आपण एकटे कुठून पोसणार? त्यांना पोसण्यासाठी अन्नधान्य, पैसा, कपडालत्ता कुठून आणणार? प्रश्न बरोबर आहे. मनुष्यप्राणी सोडून अन्य कुठल्याही प्राण्याला, वनस्पतीला, किड्याला, जंतूला सजीवाला अन्न लागतं पण पैसा, कपडालत्ता काहीही लागत नाही. एक मनुष्यप्राणी वगळला तर सर्व जीव उघड्या अंगानेच वावरतात. देवाणघेवाण करण्यासाठी त्यांना पैशाचीही आवश्यकता लागत नाही. त्यामुळे पैसा, कपडालत्ता पुरवला नाहीत तरी तुम्ही त्यांचे पोषणकर्ते असता. तुमच्या घासातला घास तुम्ही त्यांना पुरवत असता.त्यांच्यापैकी बहुतेकांचा आकार खूपच लहान असतो. त्यांना तुम्ही सूक्ष्मदर्शकातूनच बघू शकता. ते तुमच्या शरीराच्या आत असतात, शरीराच्या बाहेरही असतात. त्यांचे प्रकारही असंख्य आहेत. त्यांच्यापैकी अनेकांची ओळख आपल्याला झालेली नाही; पण लक्षावधी वर्षांपासून ते आपल्याबरोबरच जगत आले आहेत.

सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध लागल्यावर या सूक्ष्म जीवाणूंचा शोध आपल्याला लागला. विशेषत: काही संशोधकांनी आजाराची कारणे सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधायला सुरूवात केली तेव्हा त्यांचा शोध लागला. गॅलिलिओने दुर्बिण आकाशाकडे रोखली आणि अगणित चांदण्यांचा पट माणसाला दिसायला लागला. ल्युएन हॉकने सूक्ष्मदर्शक तयार केला आणि त्याखाली दिसणार्‍या जीवजंतूंमुळं त्याला आधी आश्चर्याचा धक्का बसला आणि मग एकंदरीतच माणसाला हे जग सूक्ष्मजीवांचे आहे हे लक्षात आलं.

आपल्याला होणार्‍या रोगांचे आणि त्यामुळे मरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव आहेत हे डॉक्टरांनी केलेल्या संशोधनामुळे माणसाला समजलं. पटकीचे जंतू असतात. हगवण जंतूमुळे होते. विषमज्वराचे जंतू असतात; घटसर्प जंतूमुळे होतो. एकेक रोग एकेक प्रकारच्या जिवाणूमुळे होतो - त्याची यादी हळुहळू वाढत गेली. एकदा एखादं कारण सापडलं की ते दूर करण्यासाठी काय काय कृती करता येतील – याचा विचार करणं, त्याची आखणी करणं, ती अंमलात आणणं हे काम मनुष्य प्राण्यालाच शक्य झालेलं आहे.

पूर्वी प्लेग नावाच्या रोगाची मोठी साथ येत असे. त्यावेळी साथ येण्याआधी माणसांच्या घरांमधून अचानक उंदीर मरून पडलेले आढळायचे. मग माणसाने या उंदरांना नष्ट करायचा सपाटा लावला. पुणे शहरात १८९७ साली प्लेगची साथ आली होती. तेव्हा पोलिस घराघरात घुसून उंदरांना मारून प्लेगवर नियंत्रण ठेवण्याच्या कामाला लागले होते. अपाय परवडला पण उपाय नको असे म्हणण्याची पाळी पुणेकरांवर आली. घरात उंदीर असल्याचा संशयावरून पोलिस लोकांच्या घराच्या आतल्या भागात केव्हाही, कुठपर्यंतही घुसायचे. उंदरांना मारायला ह्यांची घूस-खोरी व्हायची. पोलिसांच्या काठ्यांनी जितके उंदीर मेले त्यापेक्षा जास्त भांडीकुंडी मोडली, चुली फुटल्या, भिंतींना भगदाडे पडली आणि लोकांनाही लाठ्यांचा प्रसाद मिळाला. गेल्या काही वर्षांपूर्वी सूरत शहरात प्लेगची साथ आली होती. तेव्हा तिथल्या पोलिसांनी – अधिकार्‍यांनी असे काही केले नाही. त्यांनी उंदरांना मिळणारी रसद तोडली, म्हणजे त्यांना आयते खाद्यपदार्थ मिळण्याच्या वाटा रोखल्या. घरातले, हॉटेलातले, रस्त्यावरचे, टपर्‍यांमधले, धान्याच्या गोदामातले खाद्यपदार्थ बेवारसपणे इतस्तत: पसरणार नाहीत याबद्दल लोकांना जाणीव करून दिली. शहराचा कोपरान् कोपरा चकाचक केला. उंदीर-घुशींची बिळे लिंपून बंद केली. त्यांना माणसाच्या संपर्कापासून दूर ठेवले. आपण माणसेच तर त्यांना पोसत असतो. आपल्याही घरात, गल्लीत, मोहल्ल्यात, भागात, गावात कितीतरी अन्न विनाकारण इकडेतिकडे कचर्‍यात पसरलेले असते. त्याची योग्य ती काळजी न घेतल्यास केव्हाही प्लेगची साथ येऊन आधी उंदीर आणि मग माणसे पटापट मरून पडू शकतील. ते नको असेल तर आपला परिसर चकाचक ठेवायला हवा. तुम्हाला पटले, तुम्हाला जमले तर इतरांनाही सांगून, त्यांना प्रेरीत करून आपल्या “चकाचक”मोहीमेत त्यांचाही सहभाग मिळवायला हवा.

स्वच्छता राहिली तर उंदीर जातील, घुशी जातील, डुकरं जातील, डास जातील, कचर्‍यातले वळवळणारे कृमी-कीटकही जातील. आपल्या कचरा करण्यातूनच तर आपण त्यांना पोसत असतो.

या, डोळ्यांना दिसू शकणार्‍या; पण माणसाच्या आयुष्यावर उठलेल्या प्राण्यांमध्ये आपल्याला हानिकारक असणारे रोगजंतू प्रचंड असतात. त्यांचाही बंदोबस्त स्वच्छता केल्यानं होतो. नियमितपणे डोक्यावरचे केस धुवून, विंचरून घेतले तर डोक्यात उवा होत नाहीत. त्यामुळे डोकं खाजवावं लागत नाही. खाजवलं गेल्यानं डोक्याला जखम होऊ शकते त्यातून रक्त येऊ शकतं. केसांखाली ते असल्यामुळे ते आपल्याला दिसले नाही तरी केसापेक्षाही हजारपट बारीक असणार्‍या जीवजंतूंना ते दिसते. ते रक्तातले अन्नघटक वापरतात आणि धष्टपुष्ट होतात. डोक्यावरच्या केसांच्या मुळाशी असलेल्या त्या इवल्याशा जखमेतून शरीरात शिरण्याची वाट बंद झालेली नसली तर थेट तुमच्या शरीरात घुसतात. मग काय त्यांना चरायला रानच मोकळं मिळतं. ते गुणाकाराच्या पटीत वाढत जातात.

एका सूक्ष्मजीवापासून दोन सूक्ष्मजीव तयार होण्यासाठी अगदी वीस मिनिटंसुद्धा पुरतात. माझ्या हिशोबाप्रमाणे एका सूक्ष्मजीवापासून ९० लाख कोटी सूक्ष्मजीव तयार होण्यासाठी बारा ताससुद्धा खूप झाले.

शरीरात अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. सर्वच सूक्ष्मजीव रोगकारक असतात असं नाही. उलट अनेक सूक्ष्मजीव आपल्याला मदतगार असतात. आपल्या शरीरात असणारे काही सूक्ष्मजीव त्रासदायकही नसतात आणि मदतगारही नसतात. आजपर्यंत रोगांचं संशोधन करणार्‍यांनी रोगकारक जंतूंचा अभ्यास बराच जास्त केली. त्यामानानं मदतगार जंतूंचा अभ्यास कमी प्रमाणात झाला आहे. तरीही जी पाहणी, जे अभ्यास झाले, त्यांच्यावरून आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल की, आपल्या पचनसंस्थेत जीवजंतू आहेत म्हणून आपण अन्न पचवू शकतो. हे जिवाणू शरीराला तरतरी देणारी ब गटातील जीवनसत्त्वं आपल्या शरीरात तयार करतात. इतर घातक जीवजंतूंचा सामना करतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आपण चावून चावून बारीक केलेलं अन्न तोंडावाटे, अन्ननलिकेवाटे जठरात येते. जठरात त्याच्यावर अन्नाची प्रक्रिया होते. अन्न आणखी बारीक बारीक कणात रूपांतरित होते. त्या कणांना रेणूरूप देण्याचं काम आपल्या पचनसंस्थेतील काही जिवाणू करतात. ते आपल्याला आपण मरेपर्यंत साथ देतात.

आपल्या शरीरात हे मित्र-जीवाणू प्रथम प्रवेश करतात, ते आपण आईचं दूध पितो त्यातून. आईच्या दुधात अशी काही रसायनं आहेत की,बाळाची पचनसंस्था त्या रसायनाचं पचन करूच शकत नाही. मग अशी रसायनं आई आपल्या दुधातून बाळाला पाजते तरी कशासाठी?वैज्ञानिकांना त्यांच्या संशोधनात असं आढळलं आहे की, आईच्या दुधातून बाळाला मिळालेल्या या रसायनामुळे माणसाला उपयोगी असणार्‍या जीवाणूंचं पोषण अर्भक अवस्थेपासूनच होते. त्यातून शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, जी बाळाच्या शरीरात आयुष्यभर टिकून राहते. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला मिळालेली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या आईनं आपल्याला तिचं दूध पाजल्यामुळे मिळालेली आहे. रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती आतून आली की, ती प्रभावी ठरते.

रोगाचा प्रतिकार करण्यासाठी अनेकदा जंतुनाशक औषधांचा वापर केला जातो. जंतुनाशक औषधं म्हणजे विशिष्ट प्रकारची रसायनंच असतात. यारसायनामुळे त्यांच्या सान्निध्यात येणार्‍या जीवजंतूंचा खातमा होते. या रसायनांना हानिकारक, उपकारक, किंवा निरुपद्रवी- निरुपयोगी अशा विविध प्रकारच्या जीवजंतूंमध्ये फरक करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या जंतूंचा खातमा होतो. मग शरीराला ब जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. अशा वेळी शहाणपण म्हणून बी-कॉम्प्लेक्सच्या गोळ्या जीवाणूविरोधी म्हणजे अँटिबायोटिक औषधांच्या सोबतीनंच घेण्याची शिफारस डॉक्टर करतात. हे बी कॉम्प्लेक्स शरीराला आवश्यक असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात दिलेलं असतं. त्यामुळे नको असलेले बी कॉम्प्लेक्स लघवीवाटे बाहेर टाकलं जातं. अँटिबायोटिक्स औषधांचा कोर्स घेताना त्याबरोबर बी कॉम्प्लेक्स घेण्याची वेळ तुमच्यावर किंवा तुमच्या घरच्यांवर कधी आली असेल तेव्हा पिवळी जर्द लघवी होत असल्याचं तुम्हाला आढळलं असेल. अशावेळी मूत्रसंस्थेवरही अतिरिक्त ताण पडतो. अँटिबायोटिक औषधं म्हणूनच पुरेशा मात्रेत आणि योग्य डॉक्टरी सल्ल्यानं घेणंच हितावह असतं.

अँटिबायोटिक औषधांप्रमाणेच आपल्या शरीराला उपयोगी असणारे जिवाणू इतर काही गोष्टी खाण्यात आल्यामुळेही नष्ट होतात. उदाहरणार्थ, मैदा आणि मैदायुक्त पदार्थ, तेल-तूप, साखर, गूळ, मेवामिठाई अतिप्रमाणात खाल्ल्यास, बाटलीबंद असलेली, फसफसणारी शीतपेयं, दारू, सोडा इ. बाबींचे वारंवार सेवन केल्यानं आपल्या पचनसंस्थेतील मित्र जिवाणूंना आपणच नष्ट करतो. बाटलीबंद पाणी किंवा यंत्रानं शुद्ध केलेलं पाणी पिणार्‍यांमध्येही ब जीवनसत्त्वांचा अभाव निर्माण होत असल्याचं आढळून येत आहे. बाटलीबंद किंवा मशीननं शुद्ध केलेलं पाणी पिणार्‍यांमध्ये पोटाचे विकार होण्याचं प्रमाण तसं शुद्ध केलेलं पाणी न पिणार्‍यांपेक्षा अधिक प्रमाणात होत असल्याचं संशोधकांना आढळलं आहे.

आपण आपल्या पचनसंस्थेत पोसलेले अनेक जीवजंतू बाहेरून आपल्या शरीरात शिरणार्‍यां रोगकारक जंतूंशी सामना करत करत स्वतः पुष्ट होतात आणि आपल्याला निरोगी ठेवतात. शुद्ध - बाटलीबंद किंवा मशिनच्या - पाण्याचा अतिरेक करणार्‍यांचे पचनसंस्थेतील मित्र जिवाणू काहीच काम न मिळाल्यानं प्रभावहीन होतात.

असे कितीतरी उपकारक जीवाणू आपण आपल्या शरीरात पोसणे खरे तर शहाणपणाचे आहे.

लेखक - विनय र. र.

स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate