অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाषिक म्हणींचे सौंदर्य

भाषिक म्हणींचे सौंदर्य

म्हणी हा कोणत्याही भाषेचा महत्त्वाचा खजिना असतो. मराठी भाषेतही असा अनमोल खजिना आहे. त्यातील काही म्हणींचा शोध घेतला आहे. म्हणींचा वापर बहुतांशवेळा स्त्रियांकडून होतो म्हणून याला स्त्रीधन म्हणायला हरकत नाही. म्हणींमधून एकच एक अर्थ व्यक्त होत नसला तरी वर्गीकरणासाठी म्हणींमागचा आशय लक्षात घेतला आहे. त्यामुळे पुढे जे वर्गीकरण केले आहे ते तारतम्यानेच घ्यावे लागेल. विश्लेषणाची सोय म्हणून वर्गीकरण करणे आवश्यक आहे.

संसारातील अपूर्णता

आपल्या परंपरेमध्ये स्त्रियांना दुय्यमच वागणूक दिली जाते. गावपातळीवर तर तिला वस्तूवत दर्जा असतो. तिची ही अपेक्षा, अवहेलना पुढील म्हणींमधून व्यक्त होते. 'दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी, घटकंची फुरसत नाय न् दमडीची मिळकत नाय, आवडीने केला नवरा त्याच्या पायाला भवरा, नामटिळे नायकाचे घरी हाल बायकोचे, सासरी शिवरात्र माहेरी नवरात्र, घरच्या भयानं घेतलं रान वाटंत भेटला मुसलमान त्यानं घेतलं नाक-कान, लाखाची मत्ता काडीची सत्ता, हारबऱ्याच्या भाजीला हटावं किती म्हाताऱ्या नवऱ्याला नटावं किती, जन्मा आला हेला पाणी वाहता वाहता मेला, उतरंडीला नसेना का दाणा पण दादला असावा पाटील राणा, चाळीशी लोटली आशा खुटली, नगाऱ्याची घाई तिथे टिमकी तुझे काई? बायको दुसरी फजिती तिसरी.'
या म्हणींमधून स्त्रियांचे दुय्यमत्व, एकटेपण, अदखलपात्रता, नवरेशाही, केवळ कष्ट करणंच आपल्या हाती आहे, लाखाची मत्ता असूनही सत्ता मात्र नाही हे वास्तव प्रभावीपणे ती मांडताना दिसते. सगळीकडून तिची अवहेलनाच होते, म्हणून किमान आपला नवरा पाटील राणा असावा असे तिला वाटते. यातही पुन्हा तिचे वस्तूपण अधोरेखित होते. सासर आलं की माहेरही तुटतं. मग कष्ट उपसण्यातच तिला जन्म घालावा लागतो. नवरा शेजेला असून त्याची खरी भेट कधी होत नाही, याचेही नेमके तत्त्वज्ञान म्हणींमधून व्यक्त होते.

जगण्यातील विरोधाभास :-

'करायला गेली नवस आज निगाली आवस, बोलणारनीचा बोभाटा गब्बसीचा झपाटा, अंगी नाही करणी न् मला म्हणा तरणी, यायना येबाव जायना सोभाव, बायको काळी म्हणून हिंडतय आळी, झाडाला झटं घेती तोडाला पैसा मागती, गरीब गाय बांडाळ टाकून धांडाळ खाय, सक्क्या संगं उभा दावा साळणी माळणी केल्या जावा, येळ ना वकत गाढवीन गेली भोकत, कसायाला गाय धार्जीन, करणी कसाबाची बोलणी मानभावाची, आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली, केसावर रूसली फणी एकदा तरी घाल माझी वेणी .' या म्हणींची भाषिक रचनासुद्धा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला बोलावे अशा स्वरूपाचीच असल्याने त्यामागचे स्त्री निर्मितीचे तत्त्व स्पष्ट होते. गायीच्या प्रतिमेत स्वत:ला पाहून व्यवस्थेला कसायाच्या रूपात पाहिले जाते. जीवनातील हा विरोधाभास, करायला जावे एक आणि हाती दुसरेच यावे या पद्धतीचा आहे. या म्हणींमधून व्यक्त होणारे अनुभवविश्व आणि भावविश्व खास स्त्रीचे असेच आहे. तिच्या वाट्याला येणाऱ्या सातत्यपूर्ण कामाचेच संदर्भ म्हणींमधूनही व्यक्त होत जातात. यावरून म्हणींचे वास्तवाशी असलेले नाते स्पष्ट होत जाते. आपली अभिव्यक्ती आपल्या अनुभवांनी सीमित झालेली असत, याचा प्रत्यय येथे राहतो.

अनुभवातून आलेले समंजसपण

'नुसतीच वरवरची मया न् उपाशी निज गं बया, काखंत बोळा गाव केला गोळा, मानानी नगं उकंड्यावरून बघं, बोलण्यापेक्षा आबूला बरा, लाभ ना नफा कुबडीला करी खोपा, खाणे थोडे मचमच फार, एकादशीच्या घरी शिवरात्र, भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे, उधारीचे पोते सव्वाहात रिते, खटपट करी तोच पोट भरी, आमंत्रण दिलं सगळ्या गावा वादळ सुटलं घरी जेवा, गायक्याची गाय गुरात नसावी बायकोची आई घरात नसावी, आपलं ते गोजीरवाणं दुसऱ्याचं ते लाजीरवाणं, कोणाच्या म्हशी न् कोणाला उठाबशी, चोराला डसला विंचू तो करीना हूं की चूं, कोडग्या कोडग्या लाज नाही न् कालचं बोलणं आज नाही, सरली सुगी बसली उगी, शिंके तुटले बोक्याचे साधले ?
मानवी स्वभावाच्या बारीक-सारीक पैलूंवर प्रकाश टाकून अनुभवाला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न येथे केलेला दिसतो. दिखाऊ प्रेम, उतावीळपणा, उधारीच्या व्यवहारातील तोटा, स्वभावातील चिवट स्वार्थी वृत्ती, आपमतलबीपणा, मत्सर, फुकट हमाल्या, कोडगेपणा, एकाचे कष्ट दुसऱ्याला फायदा अशा भावनिक व अनुभवाधारित घटनांचा प्रत्यय या म्हणींमधून येतो.

काटकसरीचं तत्त्व

'हिताची कुडी निवदाचा कड मोडी, कामाची कसू उंदराची सासू, आन मेल्या पायली करते मी वायली, एकाला अंगाशी आन् एकाला बोंगाशी, कानी न् केसी चोळी काकणाला फसं नासी, हिताची ठेवली घरी शेजारीचं भोकस भरी, साधू सांगतो म्हादूची हराळ चालली कुंद्याच्या वरी, खायचं कणकीचं न् जायचं इरल्याला, उंडगं उठलं न् पिटलं हाटलं. मांजर झालं रॉड उंदराचा उटला सुळसुळाट.'
संसारातील काटकसर पुरूषांपेक्षा स्त्रियांना अधिक परिचयाची असते. तिच्या या अनुभवविश्वाचे दर्शन वरील म्हणींमधून घडते. सतत काम, टोकाची काटकसर, मग त्यासाठी आवश्यक वस्तूंवरही खर्च करायला नाही. करणारणीला नावे ठेवायची. उंडग्या, आळशी, दुसऱ्यांचंच भलं बघणाऱ्या स्त्रियांना म्हणींमधून टोमणे मारण्याची वृत्ती येथे दिसून येते. या सगळ्यामागे तिची जीवनावरील निष्ठा व मूल्यात्मकता सातत्याने व्यक्त होत जाते. या वृत्तीतूनच दिखाऊ पणाचा उपहास केला जातो.

दिखाऊ पणाचा उपहास

'इळाची इळ घरी आन् दिव्या न दळाण करी, कवतिक किराळ कानात गेलं झुराळ, आधी घेतलं उक्तं आता का गं दुकतं, मी नाय त्यातली कडी लावा आतली, नाजूक जिबली सहज हागली तर डोबड जगली, दळताना झोपी जायची न् हागताना गाणं गायची, कधीच नव्हतं न् घुबडाच्या गळ्यात घातलंय पवतं, चतकोर भाकर खाती शिवंला संडासला जाती, कुणाला कशाचं तर बोडकीला केसाचं, नादाला पाद तीन वर्षे वाद, निर्मळ किती बघताच वकारी येती, निर्मळ चांगुणा तिला कुत्रं हुंगणा, कानात नाही कुडूक कुठं चालली धुडूक धुडूक, आत घाण बाहीर घाण बाई माझी गोरीपान.'

जी व्यवस्था आपला उपहास करते त्या व्यवस्थेच्या विरोधात बोलता येत नाही म्हटल्यावर आपल्याच व्यवस्थेत राहून पुरूष व्यवस्थेचे चटके स्त्रीला सहन करावे लागतात. अशावेळी तो त्रागा मग ती आपल्याच स्त्रियांवर काढायला लागते. त्यातच अनेकदा दारिद्र्यामुळे तिला सातत्याने तडजोडी कराव्या लागतात. कामात राबता येत नाही. अशावेळी कधी खिलाडूपणाने, कधी मत्सराने, कधी एखादीचा नटवेपणा, नाजूकपणा, बेजबाबदारपणा त्यांच्या चर्चेचा विषय बनतो. या विषयीच्या म्हणींमधूनही स्त्रियांचे भावविश्व लक्षात येते.

स्त्रीसुलभ द्वेषभाव

'येसवा खवळा अन् आब्रू मळवा, शिंदळ चालली तडुफडा पतीवर्ता पाय खोडा, निनांदीला बारा बुद्या फोडलं कपाळ बांधल्या चिंध्या, पाचात पडलीय रेणुका खायला मागती मनुका, साँग आलं सजून दिवटं गेलं विझून, पाण्याला गेली नार वांझंला झालं पॉर, का गं बाई उताणी गाडगं भरलंय मुतानी, मनचंद कवडी न् शेजार दवडी, बारा गाव सासर तवर मधीच भोकाड वासंल, शिंदळ आली चढून गर्तीनं बसावं दडून, गरीब गाय शेलक्याशिवाय खात नाय, माहेराला गेली शिंदळ होऊ न आली, बोलायला राघू कामाला आग लागू, पाचात पडलीय बेंडकुळी खायला मागती पुरणपोळी.'
या म्हणींमधून स्त्रियांच्या स्वभावातील तिखटपणा प्रत्ययास येतो. आपले चारित्र्य ही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटते. पण समाज शिंदळेलाच किंमत देतो याचे दु:ख तिला आहे. म्हणून तिची धार अधिकच तीव्र बनत जाते. मर्यादित भावविश्वात आपण आपला वकुब ओळखून आचरण करावे यावर तिची श्रद्धा दिसून येते. संसाराव्यतिरिक्तच्या चर्चेत तिला कोणी गृहीत धरीत नाही. त्यामुळे आहे त्या विश्वात ती रमण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यय या म्हणींमधून येतो. आपल्यापेक्षा इतर कनिष्ठ, इतरांना काय कळत नाही, व्यवस्थेने लादलेले म्हणा किंवा तिच्या अभिव्यक्तीमध्ये इतर स्त्रियांविषयीचा प्रभावी द्वेषभाव दिसून येतो. अर्थात हा मत्सर पुन्हा केवळ त्या-त्या स्त्रियांपुढे बोलण्याऐवजी इतरींजवळ बोलावयाचा असल्याने एक प्रकारची मुक्तताही त्या अनुभवताना दिसतात.
उपरोक्त वर्गीकरणाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर काही निरीक्षणे नोंदवता येतात. भाषिक अंगाने म्हणींचे निरीक्षण केले तर सर्वसाधारणपणे म्हण दोन वाक्यांशांची असलेली आढळते. वाक्यांशांच्या शेवटी यमक साधलेले असते. हे दोन वाक्यांश म्हणजे ओवी आणि अभंगाची विस्तारीत रूपेच आहेत. कारण बहुतेकवेळा म्हणीतील दोन्ही वाक्ये गेयपूर्ण आणि विशिष्ट ठेक्यात म्हणावी लागतात. म्हणींचे हे ठसकेबाज भाषिक सादरीकरण ओवी आणि अभंगाची आठवण करून देणारे आहे. बऱ्याचदा जात्यावरील ओवी जात्याच्या वेगाप्रमाणे कमी-जास्त होते. मूळ भाषिक रूपांची तेथे मोडतोड होते. अगदी त्या पद्धतीने म्हणींची मोडणी दिसून येते. उदा. इळानी इळ धरी दिवानी दळाण करी, निनांदीला बारा बुद्या फोडलं कपाळ बांधल्या चिंद्या. या उदाहरणांमध्ये दिवसभर ऐवजी 'इळानी इळ' अशी अनुप्रासात्मक रचना येते तर दिव्याने ऐवजी 'दिव्यानी' अशी लयीसाठी मोडणी केली जाते. हेच तडफड ऐवजी 'तडुफडा' न नांदणारीण ऐवजी 'निनांदी' याबाबत सांगता येते. तसेच लयीसाठी कधी- कधी ओवीमध्ये संदर्भहीन व निरर्थक रचना येतात तशीच रचना 'कानी न् केसी' मध्ये दिसून येते. त्यामुळे गेय ओवीचेच थेाडेसे गद्याकडे झुकलेले रूप म्हणून म्हणींचा निर्देश करायला पुष्कळ वाव आहे. लेखक : प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदमविठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी, जि.सोलापूर

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate