অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शारीरिक शिक्षण

मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही; तर शरीराबरेबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत.

विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण, अशी व्याख्या डी. ओबर्ट्युफर यांनी केली आहे. शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे. अशी व्याख्या डॉ. जे. बी. नॅश यांनी केली आहे. 'महत्त्वाच्या स्नायु-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया -समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात', अशी कल्पना ब्राउनेल यांनी मांडलेली आहे. 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण होय', अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली आहे.

शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे

शारीरिक शिक्षण व मनोरंजनाच्या आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणाची पुढील उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत :

(१) कार्यक्षमतेचा विकास : इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे, हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट.

(२) मज्जासंस्था व स्नायुसंस्था यांतील सहकार्यात्मक विकास : शारीरिक क्रियांचे कौशल्य वाढवणे, हे शारीरिक शिक्षणाचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळुहळू सफाईदार होत जातात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते. लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या स्नायू व मज्जासंस्था यांतील सहसंबंध सुधारून वरील मूलभूत क्रिया कौशल्यपूर्ण होऊ शकतात.

(३) व्यक्तिमत्त्वाचा विकास : व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास साधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करणे. हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक ठेवण, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कर्तृत्व आणि कला-गुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. यांतील अनेक घटकांचा विकास शारीरिक शिक्षणाने साधला जातो. त्यांतील काही प्रमुख उपघटक पुढीलप्रमाणे :

शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात. मानवी मनावरदेखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार होतात. शारीरिक शिक्षणातील योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते. व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य समाजाशी निगडित आहे. म्हणूनच शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक, मानसिक, सामाजिक सुस्थिती साधणे, हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.

शारीरिक शिक्षणामुळे निर्णयशक्तीचा विकासही साधला जातो. शारीरिक शिणातील विविध क्रीडांमध्ये अनेक वेळा तत्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. उदा., कबड्डीमध्ये घोटापकड केव्हा करावी, चढाई वा बचाव केव्हा करावा, या संदर्भात तत्क्षणी चटकन व योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते.

भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांना आवर घालणे, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह असते. शारीरिक शिक्षणामधील विविध स्पर्धांमधून जयपराजयामुळे व्यक्ती आनंद किंवा दु:ख या भावनांचा अनुभव घेते. सुरुवातीस जरी त्या अधिक जोरदार स्वरूपात व्यक्त झाल्या, तरी हळूहळू खेळाडूंमध्ये त्यांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त होते. संघ किंवा देशासाठी खेळत असताना त्यातून संघनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा इ. भावना वाढीस लागतात. भावनांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती समाजात योग्य समायोजन साधून आनंदी जीवन जगण्यास लायक बनते

आत्मविश्वास, सदाचार, धैर्य, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, दया, न्याय, तत्परता, निष्ठा इ. वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो. तसेच सहकार्य, बंधुभाव, आदरभाव, सहानुभूती, परोपकारबुद्धी, संघभावना, निष्ठा, खिलाडूवृत्ती, नेतृत्व, आज्ञाधारकपणा, सेवावृत्ती, सत्यप्रियता, शिस्त इ. सामाजिक गुणांच्या विकासाचे धडे ह्या माध्यमातून व्यक्तीस मिळतात.

शारीरिक शिक्षणातील अनेक क्रीडाविषयक बाबी सदाचाराचे तसेच नैतिक मूल्यांचे शिक्षण देतात. क्रीडांगणे ही बालकास सदाचारास प्रवृत्त करून चारित्र्य-घडणीचे काम करतात.

(४) मनोरंजन : व्यक्तीला आनंद, समाधान व स्वास्थ प्राप्त करून देणारी क्रिया म्हणजे मनोरंजन होय. म्हणूनच मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग होय.

वरील सर्व उद्दिष्टांबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास, सहजप्रवृत्तींचा विकास व उदात्तीकरण, व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकास हीदेखील शारीरिक शिक्षणाची इतर महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.

शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम

प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण व आरोग्य ह्या विषयांतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त गाणी, गोष्टी नाट्यीकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीचे व्यायाम इत्यादी उपक्रमांवर विशेष भर देण्यात येतो. प्राथस्तरामधील विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या शरीरावर व विविध अवयवांवर योग्य तो ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने धावणे, फेकणे, उड्या मारणे, साध्या कसरती यांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. तसेच देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारख्या विदेशी खेळांचा परिचय व्हावा या उद्देशाने या खेळांना स्थान दिलेले आहे. आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांना आरोग्यविषयक मूल्यांची सर्वसाधारण कल्पना देऊन आरोग्यविषयक सवयी व कृती अंगी बाणवण्याची सवय वाढीस लावणे व त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे आहे. शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी एकूण वेळेच्या /१० भारांश देण्यात आलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त व खेळातील प्रावीण्य संपादन केलेले शिक्षक हा विषय शिकविण्यास पात्र असतात.

उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायामप्रकार, मैदानी उपक्रम, मोठे खेळ, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायत, द्वंद्वात्मक व्यायामप्रकार यांचा समावेश केलेला आहे. देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ, तसेच बीम वर्क, व्हॉल्टींग हॉर्स, जांबिया, लाठी, धनुर्विद्या व जूदो यांचा समावेश इयत्ता ७ वी व ८ वी साठी केला आहे. आरोग्यशिक्षणाचाही त्यात समावेश आहे. एकूण वेळेच्या /१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करावे लागते.

माध्यमिक स्तरावरील इयत्ता ९ वी व १० वी मधील मुलामुलींची उंची झपाट्याने वाढत असते. तसेच समाजमान्यता प्राप्त करणे, नायकत्व करणे, सहकार्याच्या अवधानाचे केंद्र बनणे, अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात. काहीतरी धाडसी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये दंड, बैठका, पुलअप्स, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, टेबल-टेनिस, पोहणे, व्यायामी खेळ, मल्लखांब, योगासने, कुस्ती किंवा जूदो ई. प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण वेळेच्या /१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करणे आवश्यक असते.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate