कुंभमेळा म्हणजे काय ?

‘कुंभपर्व’ नावाच्या पुण्यकारक ग्रहयोगाच्या निमित्ताने दर बारा वर्षांनी चार तीर्थक्षेत्रांच्या स्थानी हिंदू भाविकांचा जो मेळावा जमतो, त्यास कुंभमेळा म्हणतात.

कुंभमेळा कोठे भरतो

हा मेळावा प्रयाग (अलाहाबाद ), हरद्वार, नासिक व उज्जयिनी (उज्जैन) या ठिकाणी भरतो. प्रत्येक ठिकाणचा कुंभयोग निरनिराळा असून तो पुढीलप्रमाणे येतो : (१) प्रयाग—मकर राशीत चंद्र-सूर्य, वृषभ राशीत गुरू आणि अमावास्या तिथी असता; (२) हरद्वार – गुरू कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असता; (३) नासिक—गुरू सिंह राशीत आणि चंद्र-सूर्य कर्क राशीत असता; (४) उज्जयिनी—सूर्य आणि गुरू अनुक्रमे तुला आणि वृश्चिक राशीत असता. प्रयागमधील कुंभपर्वात मकर संक्रांती, अमावास्या आणि वसंतपंचमी ही तीन उपपर्वे आहेत. त्यांपैकी अमावास्या हे प्रमुख पर्व असून त्याला‘पूर्णकुंभ’ हे नाव आहे गुरूला राशिचक्र भोगण्यास बारा वर्षे लागत असल्यामुळे, दर बारा वर्षांनी कुंभयोग येतो. कुंभपर्वाच्या वेळी प्रयागादी क्षेत्रांत स्नान केले असता, अनंत पुण्यलाभ होतो, ह्या भावनेने लाखो भाविक लोक तसेच शेकडो मठाधिपती व साधुसंत, आपापल्या घोडे, उंट, हत्ती इ. सरंजामासह त्या त्या ठिकाणी जमतात.

पौराणिक आख्यायिका

कुंभपर्वाबाबत पौराणिक आख्यायिका आहे, ती अशी : समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभ हातात घेऊन धन्वंतरी वर आला, तेव्हा दैत्यांना अमृत मिळू नये म्हणून, देवांनी इंद्रपुत्र जयंताकरवी अमृतकुंभ पळविला. त्यावेळी देवदैत्यांचे युद्ध झाले. त्यात बारा ठिकाणी अमृतकुंभ खाली पडला. त्यांपैकी वरील चार स्थाने भूलोकात व अन्य स्थाने इतर लोकांत आहेत.

संदर्भ: Roy, Dilip Kumar; Indira Devi, Kumbha, Bombay, 1955.

केळकर, गोविंदशास्त्री.

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)