অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नरक चतुर्दशी

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

तिथी

आश्विन वद्य चतुर्दशी

इतिहास


‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे - पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी असे म्हणतात. दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे. या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे. नरकासुर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात.

महत्त्व

आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या  हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील  ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.

सण साजरा करण्याची पद्धत

अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल.

माहिती संकलन: प्राची तुंगार

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate