অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वारकरी संप्रदाय

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय. 'वारी करणारा' ह्या अर्थाने 'वारकरी' हा शब्द वापरण्यात आलेला आहे. 'वारी' ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो 'वारकरी' असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे,तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे,तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले.

वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.

हा संप्रदाय भागवत धर्मातच अंतर्भूत होतो. किंबहुना त्यास 'भागवत धर्म' असेही म्हटले जाते. भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल, हे विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे. ह्याच कारणासाठी पंढरपुरास 'दक्षिण द्वारका' असे संबोधण्यात येते.

वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे निर्देश  श्रुतिस्मृतिपुराणांत आलेले नाहीत. विष्णुसहस्रनामांत तसेच विष्णुच्या मानल्या गेलेल्या चोवीस अवतारांत विठ्ठलाचा अंतर्भाव झालेला दिसत नाही. तथापि विठ्ठलाला इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकांपासून असाधारण अशी वैष्णव प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. विष्णूपासून विठ्ठल हे नाव बनले, असे मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे. उदा., विष्णु-विष्टु-विठ्ठल असे विठ्ठल हे नाम तयार झाले, असे अनेक अभ्यासक मानतात. तथापि विठ्ठल हे विष्णूचे अपभ्रष्ट रूप नसून विठ्ठलभक्तीच्या क्षेत्रापुरते विष्णू हे 'विठ्ठल'चे (विठूचे) उद्‍भ्रष्ट रूप होय, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. त्यांच्या मते विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे मूळ हे गोपजनीय परंपरेत आहे, असा विचार दुर्गा भागवत ह्यांनी ह्याहीपूर्वी मांडलेला आहे.

वारकरी संप्रदायाचे एक प्रमुख प्रचारक शं. वा. उर्फ सोनोपंत दांडेकर ह्यांनी वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मांतर्गत एक पंथ असून वैदिक धर्माच्या तत्त्वांशी अतिशय जुळते घेणारा, असा पंथ असल्याचे म्हटले आहे. वारकरी पंथ म्हणजे सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी शाखा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत असल्यामुळे वारकऱ्यांचे मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. विठोबा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे, अशी सर्व संतांची धारणा असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा कृष्णोपासकही आहेच. तथापि तो रामाचाही उपासक आहे. द्वारका, काशी ही क्षेत्रेही वारकरी पवित्र मानतात. तसेच चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही त्यांनी पवित्र मानले आहे. शिवाय सर्व हिंदूंनी पवित्र मानलेल्या गंगा, कृष्णा आदी नद्यांनाही ते पवित्र मानतातच.

गीता,भागवतपुराण,ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, संस्कृतातील भागवतपुराणाच्या एकादश स्कंधावरील संत एकनाथकृत एकनाथी भागवत,भागवतपुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुःश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि तुकारामांची अभंगगाथा, हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत होत. त्यांतही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. ह्या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात.

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. ह्या संप्रदायात फड (प्रत्येक महंताच्या वा वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याच्या शिष्यमंडळींचा समुदाय)असतात. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फडप्रमुखाकडून तुळशीच्या १०८ मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. दीक्षेची पद्धत अशी : ही माळ आणून दीक्षा  देणाऱ्या साधूकडे वा फडप्रमुखाकडे जावयाचे. तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फडप्रमुख देतो. हे नियम असे आहेत : १. सत्य बोलावे. २. परस्त्रीला मातेसमान मानावे. ३. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा. ४. मद्यपान वर्ज्य करावे. ५. रोज हरिपाठ करावा, तसेच 'रामकृष्णहरी' ह्या मंत्राचा जप करावा. ६. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार  पाडावी. हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल' ह्या गजरात गळ्यात घालतो.

दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही.

वारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग, म्हणजे त्याने गो पी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत.

प्रत्येक वारकरी पंढरपूरची वारी वर्षातून किमान एकदा तरी करतोच, तथापि ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर कार्तिक वद्य एकादशीसही वारकरी आळंदीला जाऊ लागले हा उल्लेख वर आलाच आहे. संत नामदेवांच्या (१२७० - १३५०) काळातच ही आळंदीवारी सुरू झाली. सासवड, त्र्यंबकेश्वर, एदलाबाद, पैठण, देहू, पिंपळनेर,आळबेल्हे इ. ठिकाणीही वारकऱ्यांची यात्रा भरते. त्या त्या स्थळी झालेल्या विशिष्ट संतांच्या वास्तव्यामुळे ही ठिकाणे पवित्र मानली गेली आहेत. तथापि विठ्ठलाच्या सर्व वाऱ्या शुद्ध पक्षातल्या असून भक्तांशी संबंधित असलेल्या स्थानी होणाऱ्या वाऱ्या वद्य पक्षातल्या आहेत.

पंढरीची वारी

पंढरीची वारी पायीच करण्याचा प्रघात एके काळी होता व आजही अनेक वारकरी तो पाळतात. वाहनांची सोय झाल्यामुळे बरेचसे लोक मोटारीने वा आगगाडीसारख्या वाहनानेही जातात. एरव्ही ठिकठिकाणी विखुरलेले वारकरी पंढरीच्या वाटेवर एकमेकांना भेटू शकतात.

लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच; परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्रीपांडुरंगाचे व पुंडलिकाचे दर्शन घेतात. पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मग गावप्रदक्षिणा होते. उरलेला वेळ भजन-कीर्तनात जातो. इतर तीर्थांच्या तुलनेत पंढरपूरचे एक वैशिष्ट्य, म्हणजे इथे तीर्थोपवास करीत नाहीत, श्राद्ध, मुंडण हेही नाही. आषाढी आणि कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर भजन-कीर्तनांचा कार्यक्रम असतो. रात्री हरिजागर होतो.  प्रत्येक वारकरी आपापल्या फडावर कीर्तनासाठी जात असला, तरी इतर फडांवरचे कीर्तन वा भजन ऐकायला कोणालाच मज्जाव नसतो.

दशमीपासून चतुर्दशीपर्यंत असे कार्यक्रम चालु असतात. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस, पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे काल्याचा कार्यक्रम असतो. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे. तेथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. सतराव्या शतकात (१६६६) त्याचे बांधकाम सुरू झाले होते. शामजी अनंत नांदिवरेकर व त्यांचे आप्त ह्यांनी हे मंदिर बांधावयास आरंभ केला आणि गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने ते बांधकाम पूर्ण केले. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाला काला दिला जातो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखांत घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते. घरी गेल्यावर कानवल्यांचे (मुरडीव) भोजन करतात. इतके झाले म्हणजे यात्रा संपते.

विठ्ठलाच्या उपासनेत ह्या गोपाळकाल्याचे महत्त्व फार आहे. हा गोपाळकाला आणि वैदिक काळी पूषन् ह्या देवाच्या उपासनेसाठी बनविण्यात येणारा करंभ ह्यांच्यांत काही अभ्यासकांना एक निकटचे नाते जाणवलेले आहे. सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंभ तयार करीत. पंढरपूरचा विठ्ठलही ताकपिठाने संतुष्ट होतो. पंढरपूर येथील विठोबाच्या देवळाच्या पश्चिमेस एका बोळातल्या देवळात असलेला ताकपिठ्या विठोबा प्रसिद्धच आहे. पूषन् ह्या वैदिक देवाची दंतहीनता सोडली, तर त्याचे वर्णन गोपवेषधारी कृष्णाची आठवण करून देते. वृषभमुखाची काठी त्याच्या हातात असते. त्याने कांबळे परिधान केलेले असते. तो गाईगुरांची खिल्लारे राखतो आणि गोपजनांना वाट दाखवतो .

वारीच्या कार्यक्रमात कीर्तने होत असतात, हे वर म्हटलेच आहे. श्रोत्यांच्या मनांत भक्तिरसाचा परिपोष करणे, तसेच संप्रदायाचा प्रसार करणे हे कीर्तनाचे महत्त्वाचे हेतू आहेत. थोर संत आणि वारकरी नामदेव हे आद्य कीर्तनकार मानले जातात. ' नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ' ही नामदेवांची भूमिका होती. भजनकीर्तनांच्या योगे विठ्ठलाची किर्ती त्यांनी भारतात अनेक ठिकाणी हिंडून पोहोचविली. सु.५४ वर्षे ते पंथप्रचारासाठी झटले. पंजाबात तर अनेकांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. नामदेवांनी हिंदी भाषेत रचले ली ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत.

वारकरी कीर्तन हरिदासी कीर्तनापेक्षा वेगळे असते. त्यात गाण्यापेक्षा भजनावर अधिक भर असतो. वारकरी कीर्तनाचीही पुर्वीची पद्धत आणि आजची पद्धत ह्यांत थोडा फरक आहे. राउळात जाऊन विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर देवाला पाठ न दाखविता भजन करीत मागेमागे जाऊन चंद्रभागेच्या वाळवंटात यायचे आणि मग कीर्तनास आरंभ करायचा, ही जुनी पद्धत होती. वारकरी संप्रदायातील विख्यात कीर्तनकार विष्णुबुवा जोग ह्यांनी ही पद्धत बदलली, कारण अशी कीर्तनपद्धती गावोगावी अवलंबिणे शक्य नव्हते. वारकरी कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तर रंग, असे दोन भाग विष्णुबुवा जोगांनीच केले. मुळात वारकरी कीर्तने नदीच्या वाळवंटात होत, ह्याचे पुरावे संतांच्या अभंगांतून मिळतात. कीर्तनात निरूपण असल्यामुळे त्या कीर्तनास कीर्तन म्हणण्याऐवजी निरूपण म्हणण्याची पद्धत वारकरी संप्रदायात आहे.

वारकरी कीर्तन प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी मृदंगाच्या साथीवर टाळकऱ्यांचे भजन चालू असते. हातात वीणा घेतलेला  एक वारकरी  निरनिराळ्या संतांचे अभंग सांगतो आणि इतर ते म्हणतात. कीर्तनकार बुवा आल्यानंतर ते वीणेकऱ्याला व श्रोत्यांना नमस्कार करून वीणा स्वतःच्या गळ्यात घालतात. नंतर 'जयजय रामकृष्ण हरी'  च्या घोषात कीर्तन चालू होते. नमनाला ज्ञानदेवांचा 'रूप पाहतां लोचनी। सुख जालें वो साजणी' हा किंवा संत तुकारामांचा 'सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी' हा अभंग घेतात. त्यानंतर निरूपणाचा अभंग सुरू होतो. ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत झालेल्या संतांचेच अभंग निरूपणासाठी घ्यायचे, असा दंडक आहे. तथापि संत रामदासांचे अभंग निरूपणासाठी कधीही घेतले जात नाहीत. त्याचप्रमाणे जेथे कीर्तन करायचे, तेथे अन्न घ्यायचे नाही, असाही दंडक आहे.

निरूपणाचा अभंग म्हणून झाल्यानंतर एखादा वारकरी बुवांच्या सांगण्यावरून तोच अभंग रागदारीत गातो. हे अभंगगायन चालू असताना कीर्तनकार बुवांनी आरंभी ज्याच्या हातून वीणा घेतलेली असते, तो वीणेकरी बुवांच्या हातून वीणा घेऊन आपल्या गळ्यात घालतो. कीर्तनाच्या गादीचा मान म्हणून वीणा देताघेताना  बुवा व वीणेकरी एकमेकांच्या पाया पडतात. वारकरी कीर्तनात वीणेचे महत्व विशेष आहे. भजन संपल्यानंतर 'पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' असा घोष करतात. शेवटी निरूपणाच्या अभंगाचा भावार्थ बुवा सांगतात. येथे कीर्तनाचा पूर्वरंग संपतो.

उत्तररंगात निरूपणाच्या अभंगाचे सखोल आणि सविस्तर विवेचन केले जाते. नारदीय कीर्तनातील उत्तररंगात  आख्यान लावण्याची पद्धत आहे, तशी ती वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात नाही. सोनोपंत दांडेकर, धुंडामहाराज देगलूरकर आणि बाबामहाराज सातारकर, हे थोर वारकरी कीर्तनकारांपैकी काही होत.

वारकरी संप्रदायातील फडांचा उल्लेख पूर्वी येऊन गेला आहे. एकनाथ व तुकोबा ह्यांच्या पूर्वी फड असावेत; परंतु वारकरी संप्रदायातील एक संत विठोबा पिंपळनेरकर ह्यांच्या शिष्याचे शिष्य, वाशीचे मल्लाप्पा वासकर (१६३१-१७२१) ह्यांनी फडांना प्रथम  संघटित स्वरूप दिले. ह्या फडाला वारकरी पहिला मान देतात. त्यानंतर देहूकरांचा फड निघाला. अझरेकर, बेलापूरकर, ठाकरबुवा, गंगूकाका शिरवळकर, धोंडोपंतदादा कऱ्हाडकर, दादामहाराज सातारकर, बंकटस्वामी इत्यादींचेही फड आहेत. वारकरी संप्रदायात पालख्यांचा सोहळा असतो. एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या हैबतरावबाबा आरफळकर ह्यांनी तो वाढविला. त्यांच्या पूर्वी ज्ञानदेवांच्या पादुका गळ्यात घालून दिंडी पंढरपूरला नेली जाई. आरफळकर हे सातारा जिल्ह्यातले. वारकऱ्यांत प्रसिद्ध असलेली भजनीमालिका ह्यांचीच. हैबतरावबाबांना खंडोजीबाबा नावाच्या एका सज्जनाची खूपच मदत होत असे. त्यांची  समाधी पुण्याला आहे. ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जाणाऱ्या अन्य संतसज्जनांच्या पालख्या अशा (त्या त्या संताची वा सत्पुरुषाची पालखी कोठून निघते हे त्या त्या संताच्या वा सत्पुरुषाच्या नावासमोर कंसात दिलेले आहे) : निवृत्तिनाथ(त्र्यंबकेश्रर), तुकाराम महाराज (देहू),एकनाथ (पैठण),सोपानकाका (सासवड),मुक्ताबाई (एदलाबाद),नामदेव(पंढरपूर),नरहरी सोनार(पंढरपूर), जनार्दनस्वामी (औरंगाबाद), जयरामस्वामी (वडगाव),शेकूबोवा (शिरसावडी),घाडगेबोवा (कोळे), तपकिरीबोवा (चिंचगाव), मच्छिंद्रनाथ (मच्छिंद्रगड), रोहिदास (पंढरपूर), संताबाई (पंढरपूर), चोखोबा (पंढरपूर), चोखोबा बंका (मेहुणपुरा), दामाजी (मंगळवेढे), रुकमाबाई (कोंडणपूर-अमरावती), शंकर महाराज (माहुली-अमरावती), गोरखनाथ(शिराळा) इत्यादी.

वारकरी संप्रदायाचा इतिहास

हा संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही. संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) 'संतकृपा जाली । इमारत फळा आली' ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया

नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार

जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत

तुका जालासे कळस । भजन करा सावकाश

तथापि पंढरपूरची वारी ही ज्ञानदेवांच्या पूर्वीही चालू होती, असे दिसते. ज्ञानदेवांचे वडील बरीच वर्षे पंढरीची वारी करीत असत, असे म्हटले जाते. पंढरपूर येथे विठ्ठलाचे देवस्थान केव्हापासून अस्तित्वात आले ह्याचा निश्चित निर्णय होऊ शकला, तर ती बाब वारकरी सप्रंदायाच्या आरंभाचा काल निश्चित करण्यास साहाय्यभूत होऊ शकेल, आईवडिलांची परमभक्ती करणाऱ्या पुं डलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव पंढरपूरला आला, तेव्हा पुं डलिक आईवडिलांची चरणसेवा करीत होता, ती पुर्ण होईतो देवाने थांबावे, अशी विनंती त्याने केली आणि देवाला उभे राहण्यासाठी एक विट फेकली. ह्याच विटेवर कटी कर ठेवून देव विठ्ठलरूपाने उभा राहिलेला आहे, अशी सर्व संतांची श्रद्धा आहे. श्रीविठ्ठलाच्या कमरेवर हात ठेवण्याचे स्पष्टीकरण असे देतात, की भवसागर हा कमरेइतक्या पाण्यातून तरून जाता येईल इतका सोपा आहे, असे आश्वासन पांडुरंग आपल्या भक्तांना देत आहे.

श्रीविठ्ठल पंढरपुरात कसा प्रकट झाला, ह्यासंबंधीची पुंडलिकाशी संबंधित अशी कथा हेमाद्रीपूर्व स्कांद पांडुरंगमाहात्म्यात आलेली आहे, परंतु अभ्यासकांनी खूप धडपड केल्यानंतरही हा पुं डलिक त्यां ना इतिहासात सापडलेला नाही. त्यामुळे विठ्ठलमंदिराच्या उभारणीचा कालनिर्णय करण्यासाठी पुंडलिकाची कथा उपयोगी पडत नाही . पंढरपूरची तीन संस्कृत स्थळपुराणे आज उपलब्ध आहेत: (१)स्कंद पुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य (स्कांद पांडुरंगमाहात्म्य), (२) पद्मपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य (पाद्म पांडुरंगमाहात्म्य) आणि विष्णुपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारेपांडुरंगमाहात्म्य, ह्या तीन स्थळपुराणांपैकी स्कांद पांडुरंगमाहात्म्य हे निवृत्ति-ज्ञानदेवादी संतांच्या उदयापूर्वी आणि काटेकोरपणे सांगायचे, तर हेमाद्री पंडितापूर्वी रचिले गे लेले आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसंभार प्रथमतः ह्याच ग्रंथामुळे स्थिर पायावर उभा झाला आहे, असे दिसते. देवगिरीचा राजा श्रीरामदेवराव यादव ह्याचा करणाधिप हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत ह्याने रचिलेल्या चतुर्वर्गचिंतामणी (रचनाकाल १२६०ते १२७० च्या दरम्यान) ह्या ग्रंथाच्या 'तीर्थखंडा'त स्कांद पांडुरंगमाहात्म्यातील श्लोक अंतर्भूत होते. चतुर्वर्गचिंतामणीचा तीर्थखंड आज अनुपलब्धच असला, तरी हे श्लोक हेमाद्रीने त्यात उद्‍धृत केले होते, हे दाखविणारा पुरावा मिळतो. त्याचा विचार करून म. म. काणे ह्यांनी आपल्या धर्मशास्त्राच्या इतिहासाच्या चौथ्या खंडात पंढरपूरविषयी चर्चा करताना म्हटले आहे, की १२६० पूर्वी अनेक शतके पंढरपूरचा तीर्थमहिमा गाजत होता आणि भक्त पुंडलिकाची कथा तेव्हाही प्रसिद्ध होती. ह्यावरून हे मंदिर फार पुरातन असले पाहिजे आणि वारकरी पंथही बराच प्राचीन असला पाहिजे, असा निष्कर्ष निघतो. ह्या पार्श्वभूमीवर 'ज्ञानदेवे रचिला पाया' ह्या ओळीचा अर्थ पाहिला, तर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, ह्याचा अर्थ ह्या संप्रदायाला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाचे अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले, तसेच त्यांच्या रूपाने ह्या संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत येऊन मिळाला, असा घेता येईल.

वर्णाश्रमधर्माच्या चिवटपणाचा अत्यंत कटू अनुभव ज्ञानेश्वरांना, त्यांच्या आईवडिलांना आणि भावं डांना आलेला होतो. समाजाने झिडकारणे किती दुःखद असते, ह्याचा अनुभव ह्या सर्वांनी घेतला होता आणि ह्यातूनच समाजातील शुद्रातिशूद्रांबद्दल त्यांच्या मनात अपार करूणा निर्माण झाली. वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत असलेला आणि'ब्रह्यविद्येचा सुकाळू' करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी सर्वांसाठी मराठी भाषेत लिहिला. अध्यात्मविद्या ही काही मूठभरांची मक्तेदारी नसून सामान्यांतला सामान्य माणूसही ती आत्मसात करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी पारंपरिक समाजव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या माणसांतही निर्माण केला. ज्ञानेश्वरांची गुरूपरंपरा नाथपंथीय होती. अद्वयानंदाचे वैभव, अष्टांगयोग, दलितांच्या उद्धाराची प्रेरणा आणि देशी-मराठी-भाषेचा पुरस्कार, हा नाथपंथाचा प्रभावशाली वारसा होय. शांकर वेदान्त आणि काश्मिरी शैवमताचे संस्कारही त्यांच्यावर होते. तथापि ह्या संस्कारांतून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र जीवनाविषयक दृष्टिकोण निर्माण केला. ज्ञानदेवांचेच समकालीन नामदेव हे वारकरी पंथाचे आद्य प्रचारक होत. पंथप्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमंती केली.

महाराष्ट्राबाहेरही त्यांचा शिष्यपरिवार निर्माण झाला. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा भक्कम पाया मिळवून दिला. नामदेवांची भूमिका तत्वचिंतकाची नसली, तरी लडिवाळ लेकराने मातेवर प्रेम करावे, तशी ईश्वरभक्ती करण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ज्ञानदेव-नामदेवांनी बहुजनसमाजा च्या आध्यात्मिक आकांक्षांना जागे केले. त्या समाजातील माणसांना आत्माविष्काराची वाट मोकळी करून दिली. विठ्ठलभक्तिने भारलेले विविध जातींचे लोक विठ्ठलभक्तिने भारा वलेल्या रचना करू लागले. गोरा कुंभार (१२६७-१३१७), सावतामाळी (१२५०-९५),  नरहारी सोनार (मृ.१३१३), चोखामेळा (मृ.१३३८),  सेना न्हावी (तेरावे शतक) इ. संतांची एक मालिकाच उभी राहिली. वेगवेगळ्या व्यवसायांतले हे संत होते आणि त्यांनी आपल्या अभंगरचनेसाठी आपापल्या व्यवसायातली परिभाषा वापरली वा आपापल्या व्यवसायांचे संदर्भ दिले. उदा,

केशवाचे ध्यान धरूनि अंतरी । मृत्तिकेमाझारी नाचतसे

विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ । नेत्री वाहे जळ सद्गदीत

कुलालाचे वंशी जन्मले शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त

(गोराकुंभार)

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी

लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी

मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी

सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा

(सांवता माळी)

देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार

देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने

त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस

 

जीव शीव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी

विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केला चुर्ण

मनबुद्धिची कातरी । रामनाम सोने चोरी

ज्ञान ताजवा घेउन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती

खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी

नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस

(नरहरी सोनार)

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक

विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ

उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू

भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत

(सेना न्हावी)

संतश्रेष्ट चोखामेळा जातीने महार. त्यांचे सारे कुटुंब-पत्नी सोयरा, बहिण निर्मला, मुलगा कर्ममेळा व मेहूणा बंका-विठ्ठलभक्त होते. तथापि चोखामेळा ह्यांच्या अभंगांतून सामाजिक विषमतेमुळे त्यांना बसत असलेले चटके स्पष्टपणे दिसुन येतात. उदा.,

हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ।

मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती ।।

चातुर्वर्ण्य, जातपात, सोवळेओवळे, विटाळ ह्यांतून पदरी येणारी मानहानी सोसत असतानाच त्यांनी त्याबद्दल आपला निषेधही व्यक्त केला. ज्यालात्याला लाभलेला जड देह आणि चैतन्यमय आत्मा हे मुळातच भिन्न आहेत. पंचभूतात्मक देहामुळे विटाळ निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या देहात जन्मापासून मरेपर्यत विटाळच साचून राहिलेला असताना 'सोवळा वोवळा तो कोण?' आणि ‘विटाळापरते आहे कोण ?’ असा मार्मिक प्रश्न त्यांनी एका अभंगात  विचारला आहे.'आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध । देहाचा विटाळ देहीच निर्धारी । म्हणतसे महारी चोखियाची ।।' असे उद्‌गार चोखामेळ्यांच्या पत्नी सोयराबाई ह्यां नीही एका अभंगात काढले आहेत.

वारकरी संतां नी चातुर्वर्ण्याच्या आणि जातिव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही. तथापी आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली . देवाला सर्व भक्त सारखे, हीच शिकवण दिली. 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। ' ह्या तुकोबांच्या उक्तीमध्ये ही अभेदभावाची भूमिकाच स्पष्ट झालेली आहे. चोखोबांच्या समाधी पुढे संत एकनाथ नतमस्तक झाले, तसेच अन्य वारकरीही  होतात. वर्णाश्रमधर्माच्या कठोर चौकटीचा जाच ज्ञानेश्वरांना  आणि त्यांच्या भावंडांनाही सोसावा लागला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना सामाजिक प्रतिष्ठा दिली नाही; ब्राह्मणही मानले नाही . तथापि त्या काळातील परिस्थितीचे भान ठेवून ज्ञानेश्वरांनी केवळ धार्मिक जीवनातच समता आणण्याचा प्रयत्न केला . बौद्ध-जैनांनी चातुर्वर्ण्याविरुद्ध केलेले बंड अयशस्वी झाल्याचेही त्यां ना दिसले होते. समाजरचनेशी निगडीत असलेली तत्कालीन अर्थव्यवस्थाही केवळ विचारांच्या परिवर्तनाने मुळापासुन बदलता येणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त धार्मिक क्षेत्रातील भेदभाव नष्ट करण्याची भूमिका घेऊन बहुजनसमाजाच्या आध्यात्मिक विकासासाठी त्यां नी वारकरी पंथाला वेगळे वळण दिले.

ज्ञानदेव-नामदेवांनंतर मात्र जवळपास अडीचशे वर्षाचा काळ एखाद्या तमोयुगासारखा गेला. देवगिरीच्या यादवांचे राज्य गेले आणि इस्लामी सत्तेचा अंमल सुरू झाला. बहमनी राज्य आणि विजयानगरचे राज्य ह्यांच्यात सतत चाललेल्या लढायांमुळे शांतता आणि स्वास्थ्य मिळेनासे झाले. ह्याचा परिणाम वारकरी संप्रदायावरही झाला. ज्ञानदेव-नामदेवांनी चालविलेल्या कार्याची आध्यात्मिक धुरा समर्थपणे खांद्यावर घेऊन ते पुढे नेईल, असा महान संत ह्या काळात झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे नाव घेण्यासारखा थोर ग्रंथही रचिला गेला नाही, तथापि विजयानगरचे साम्राज्य लयाला गेल्यानंतर आणि बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच वेगवेगळ्या शाह्या निर्माण झाल्यानंतर परिस्थितीत बदल घडून आला. ह्या शाह्यांतील वैमनस्यामुळे मराठे जहागिरदार  आणि मुत्सद्दी  ह्यांचे सहकार्य मिळविण्याची गरज त्यांना वाटू लागली. त्यामुळे मराठ्यांच्या पराक्रमास वाव मिळाला. त्यां चा आत्मविश्वास वाढला. वातावरणात झालेल्या ह्या परिवर्तनामुळे धर्माच्या क्षेत्रातही उत्साहाचे वारे वाहू लागले. एकनाथांच्या कार्याला ह्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती.

श्रीज्ञानदेवांची गुरूपरंपरा जशी नाथपंथाची, तशीच एकनाथांची दत्तसंप्रदायाची होती. त्यांचे गुरू जनार्दनस्वामी हे दत्तोपासक होते, परंतु विठ्ठलभक्त्तीची कौटुंबिक परंपराही त्यांच्या पाठीशी होती. एकनाथांचे पणजे संत भानुदास (१४४५-१५५३) हे विठ्ठलभक्त होते. 'आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ।। ' असे उद्‌गार त्यांनी आपल्या एका अभंगात काढले आहेत. भानुदासांच्या बाबतीत एक आख्यायिका अशी आहे, की विजयानगरचा राजा कृष्णराय ह्याने पंढरपूरची विठ्ठलमूर्ती विजयानगरला नेली होती; परंतु संत भानुदासांनी ती परत आणली. स्वतः एकनाथांनी भानुदासांविषयी जी माहिती दिली आहे, तीत विजयानगरहून विठ्ठलमूर्ती परत आणल्याची हकिकत नाही, पण भानुदासांच्या जवळजवळ समकालीन असा राजा कृष्णराय ह्याची वृत्ती निरनिराळ्या ठिकाणांहून देवमूर्ती आणून त्यांची  विजयानगरात स्थापना करण्याची होती, ह्याबद्दल विपुल पुरावा मिळतो. कदचित भानुदासांना त्याने त्या मूर्तीसारखीच दुसरी मूर्ती  तयार करुन दिली असणे शक्य आहे, असे मत ग. ह. खरे ह्यांच्यासारख्या इतिहास संशोधकानी व्यक्त केले आहे.

विठ्ठलभक्तीची पार्श्वभूमी पाठीशी  असल्यामुळे, एकनाथां च्या हातून वारकरी संप्रदायाच्या संदर्भातही भरीव कामगिरी घडून आली. गीतेचा अर्थ मराठीत सांगून तो सर्वसामान्यांपर्यं त पोहोचविण्याची कामगिरी ज्ञानेश्वरांनी केली. त्याचप्रमाणे नाथांनी भागवतपुराण मराठीत आणण्याचा उद्योग केला. ह्या उद्योगास पैठणच्या तसेच काशीच्या सनातनी विद्वानांचा असलेला विरोध नाहीसा करून नाथांनी एकनाथी भागवत काशीतच पुर्ण केले.

हे देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी ।

हे टीका तरी मराठी । ज्ञानदाने होईल लाठी ।।

असे उद्‌गार नाथांनी एकनाथी भागवतात काढलेले आहेत. त्याचप्रमाणे 'संस्कृत भाषा देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली?' असा सवालही त्यांनी विचारला आहे. तथापि एकनाथांनी संस्कृतचा अनादर कधीच केला नाही. उलट त्या भाषेतील शब्दांचे ऐश्वर्य मराठीला श्रीमंत आणि भारदस्त करण्यासाठी त्यांनी उपयोगात आणले कटुता आणणारा अभिनिवेश न बाळगता नव्याजुन्यांचा मेळ घालण्याची जी शक्ती नाथांच्या ठायी होती, तिच्यामुळेच सनातन्यांना न दुखविता ते त्यांच्या सद्‍भावनेस हात  घालू शकले.

एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीचा जीर्णोद्वार केला, तसेच ज्ञानेश्वर-नामदेवांच्या काळानंतर आलेल्या तमोयुगात अनेक अशुद्धे शिरलेली  ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली. ह्या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे, की ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी असलेल्या अजानवृक्षाची मुळी समाधिस्थ ज्ञानेश्वरांच्या गळ्याशी अडकली आहे, असा दृष्टांत एकनाथांना ते आळंदीस असताना स्वप्नात झाला. जागे होऊन ते समाधीजवळ गेले तेव्हा स्वप्नात जे दिसले, ती वस्तुस्थितीच असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळेच ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्वार करण्याची, तसेच ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध करण्याची प्रेरणा त्यां ना मिळाली. ह्या आख्यायिकेतील अजानवृक्ष म्हणजे एकनाथांच्या काळी ज्ञानेश्वरीबाबत जनतेत पसरलेले अज्ञान होय, असा अर्थ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी लाविला आहे. ज्ञानेश्वरीच्या मूळ संहितेत पुन्हा कोणी बदल करण्यास धजावू नये, म्हणून एकनाथांनी इशारा देऊन ठेविला,की 'ज्ञानेश्वरीपाठी । जो वोवी करील मऱ्हाठी । तेणे रत्नखचिताचिया ताटी । जाण नरोटी ठेविली ।। '

लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे वैशिष्टय होय. एकनाथांच्या जीवनातूनही  ह्याचा प्रत्यय येतो. परमार्थविचाराच्या व्यापक प्रसारासाठी देशी भाषेतून ग्रंथरचना करणे, हा ज्ञानेश्वरांप्रमाणेच एकनाथांच्याही लोकाभिमुखतेचाच आविष्कार होता. तथापि एकनाथ हे केवळ एकनाथी भागवत रचून थांबले नाहीत, तर परमार्थविचार जनसामान्यांपर्यत पोहोचविण्यासाठी त्यांनी कथात्मक रचनाही केली, भारूडासारख्या लोककाव्याचेही पुनरूज्जीवन केले. त्यातून लोकशिक्षण आणि मनोरंजन ह्यांची उत्तम सांगड घातली. विनोदाचाही वापर केला. कोल्हाटी डोंबारी, भुत्या, वाघ्या, चोपदार, कुंटीण, वंजारीण इ. समाजाच्या विविध थरांतील लोकांच्या दैनदीन कर्मांच्या वा व्यवसायांच्या परिभाषेतही त्यांनी आपली रचना केली. स्त्री-शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. सर्वांवर प्रेम करणे आणि दुःखितांची कणव करणे, हे त्यांनी आयुष्यभर केले. महाराच्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचविणे, महाराच्या घरी जेवावयास जाणे, दोनचार भुकेले महार दिसताच वडिलांच्या श्राद्धासाठी केलेला स्वयंपाक त्यांना खाऊ घालणे, काशीहून आणलेली गंगा तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाच्या मुखी घालणे इ. अनेक कथा त्यांच्यासंबंधी प्रचलित आहेत.

परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही, हे एकनाथांनी स्पष्ट केले आहे. ‘प्रपंचपरमार्थी सावधान । उभयता दीसो नेदी न्यून ’ असं त्यांनी म्हटले. समाधीबद्दलचीही त्यांची कल्पना वैशिष्टयपूर्ण आहे. ताटस्थ्य म्हणजे समाधी नसून ती नुसती मूर्च्छा आहे. धकाधकीच्या जीवनात जी भंग पावत नाही, ती खरी समाधी होय, अशी त्यांची धारणा होती.

वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे वर्णन करीत असताना संत बहिणाबाईंनी ‘तुका झालासे कळस ’ असे सार्थ उद्‌गार काढले आहेत. कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात  झालेली होती. अनन्य भक्ती आणि पारमार्थिक समता ह्यांच्या मुशीत भागवत धर्माने ओतलेली सुवर्णमुर्ती म्हणजे तुकाराम, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी म्हटले आहे. तुकारामांच्या जीवनाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे ते हळूहळू, आध्यात्मिक प्रवासाचा एकेक टप्पा पार करीत'अणुरणीया थोकडा । तुका आकाशाएवढा।। ' अशी प्रचीती  घेण्याइतके मोठे झाले. अभंगाच्या द्वारे आपल्या अनुभवांचे खडे बोल ऐकवीत त्यांनी सामान्यांना परमार्थबोध केला. त्यांच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचीच भूमिका व्यक्त झालेली आहे :

भरणी आली मुक्त पेठा । करा लाटा व्यापार ।

उधार घ्यारे उधार घ्यारे। अवघे या रे जातीचे ।

येथे पंक्ति भेद नाही। मोठे काही लहान ।

तुका म्हणे माल घ्यावा । मुद्दल भावा जतन ।।

उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती ह्यांचाच वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव आहे. तुकोबांनी आपल्या अभंगातून तेच संस्कार जनमानसावर केले. तुकोबांच्या अनुयायांत अनेक जातींचे लोक होते आणि त्यांचे शिष्य म्हणविणाऱ्या प्रमुख सोळाजणांत नऊ ब्राह्मण होते, ही बाबही लक्षणीय आहे.

निळोबा पिपंळनेरकर (मृ. सु. १७५३) हे तुकारामांचे परमभक्त होत. ह्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूरचा, परंतु अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर ह्या गावी ते स्थायिक झाल्यामुळे पिं पळनेरकर म्हणून ओळखले जाऊ लागले. तुकारामांना त्यानी प्रत्यक्ष पाहिले नव्हते. परंतु त्यानी तुकोबांची परंपरा पुढे चालविली. त्यानी लिहिलेल्या अभंगां ची संख्या सु. १,३०० भरेल. वारकरी पंथातले शेवटचे अधिकारी संतकवी म्हणून ते मानले जातात.

महीपती बोवा ताहराबादकर ऊर्फ महीपती (१७१५-९०) हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे ग्रंथकार होत. संतांच्या आणि भक्तांच्या चरित्राचे लेखन त्यांनी  केले.

लेखक - अ. र. कुलकर्णी

तत्त्वज्ञान

वारकरी संप्रदाय हा मूलतः भक्तिपंथ आहे; म्हणून त्याला आधारभूत असलेल्या तत्त्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही. भक्तिरसात न्हालेल्या संतांचा अनुभव, हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण होय.

सकृद्‍दर्शनी असे वाटते, की भक्तीचे समर्थन करणारे तत्वज्ञान मध्वाचार्यांच्या मतासारखे द्वैतवादी असावयास हवे. देव हा भक्ताहून वेगळा असल्याशिवाय त्याची भक्ती करावयाची कशी ? केवलाद्वैत वेदान्ताच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्याच केवळ सत्य असले आणि मीच ब्रह्मा असेन, तर भक्ती करावयाची कोणी आणि कुणाची?

ही अडचण वारकरी संतांस वाटली नाही. त्यांना स्वसंवेद्न आत्मतत्वाचे अद्वैत मान्य होते.भक्ती हा केवळ त्या अद्वैताचा अनुभव घेण्याचा मार्ग होता असे नाही, तर त्या अनुभवाच्या मुक्कामाला पोहोचल्यावरसुद्धा भक्तीसुखाचा सोहळा त्यांना हवा होता. 'मोक्ष तुमचा देवा । दुर्लक्ष तो तुम्ही ठेवा । मज भक्तीची आवडी ।' असे तुकारामांनी म्हटले आहे.

भक्ती हा पाचवा पुरषार्थ आहे आणि तो परमपुरषार्थ आहे. 'चहू पुरूषार्थाचे माथा । भक्ती सर्वथा मज पढियंती ' असे नाथांनी म्हटले आहे (एकनाथी भागवत ११.६६७).ज्ञानेश्वरीत (१८.८६७) म्हटले आहे,'चहू पुरूषार्था शिरी । भक्ती जैसी ' तेव्हा ह्या परमपुरूषार्थाचे समर्थन करणे, हे वारकरी तत्त्वज्ञानाचे प्रधान प्रयोजन आहे, अनुभवामृतात ज्ञानेश्वरांनी अशा आशयाची ओवी लिहिली आहे की, एकच डोंगर कोरून त्यातून देव, देऊळ व परिवार निर्माण करतात, त्याच रीतीने एकाच आत्मतत्त्वाच्या विलासातून भक्तिचा व्यवहार होऊ शकतो.

हा चिद्विलासवाद म्हणजेच वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान होय. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकारामांची गाथा हे तीन ग्रंथ म्हणजे, या तत्त्वज्ञानाची प्रस्थानत्रयी होय असे सांप्रदायिक म्हणतात, पण हा उपचार आहे. या ग्रंथांतून ते तत्त्वज्ञान अनुस्यूत आहे, असे म्हणता येईल, पण युक्तिवादपूर्वक, थोडासा पूर्वोत्तरपक्ष करून त्याची पद्धतशीर मांडणी ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतात केलेली आहे. सारांशाने ते तत्त्वज्ञान असे : सर्वत्र केवळ एका आत्मतत्त्वाचे-म्हणजे चैतन्याचे-स्फुरण आहे. ते स्वसंवेद्य आहे.म्हणजे त्याच्या अस्तित्वाला कोणताही बाह्य पुरावा लागत नाही. त्यास ‘असत् ’ असे म्हणताच येणार नाही. कारण जो म्हणणारा तेच आत्मतत्त्व होय. त्याच्या अभावाचे भान होणार नाही. कारण भान (चित्) हेच त्याचे स्वरूप होय. हे चैतन्य आनंदरूप आहे, असा संतांचा अनुभव आहे. पण कापरामध्ये ज्याप्रमाणे शुभ्रता, सुगंध व मृदुता ही एकमेकांहून विलग नसतात, त्याच रीतीने चैतन्य, असतेपणा व आनंद ही आत्मतत्त्वात एकरूप असतात.

हे आत्मतत्त्व एक असले, तरी क्रीडेसाठी देव आणि देवी या स्वरूपात ते आविष्कृत होते. जगताची ही मातापितरे आवडीमुळे एकमेकांत मिळत असतात. त्यांच्यापासून जगाची निर्मिती होते.

शंकराचार्याच्या अद्वैत वेदान्तात मानले आहे, की सच्चिदानंद-स्वरूपी ब्रह्मास अज्ञानाची उपाधी आहे आणि जगत् हे त्या भावरूप अज्ञानाचे कार्य आहे. पण ज्ञानेश्वरांनी या अज्ञानाचा 'धांडोळा' घेऊन त्याचे जगत्कारणत्व नाशाबीत केले आहे. अज्ञानाला कारण मानल्यास त्याचा आश्रय सांगावा लागेल. चैतन्य किंवा ज्ञान हा त्याचा आश्रय आहे, असे म्हणणे म्हणजे प्रकाशाला टेकून अंधार उभा आहे, असे म्हटल्यासारखे होईल. जगत् हे अज्ञानमुलक नसल्याने ते असत्य अथवा मिथ्या नाही. ते चैतन्याचा विलास आहे. स्वप्रीत्यर्थ ते नित्य नव्या रूपाने प्रगट होते. पाणी स्वतःमध्ये कल्लोळ निर्माण करून खेळत असते. तो कल्लोळ मिथ्या नव्हे अथवा पाण्याहून अन्य नव्हे.

पाणी पाण्यास पिऊ शकत नाही. तृष्णेचे समाधान करण्याचे सामर्थ्य अंगी असूनही पाण्यास ते समाधान अनुभवता येत नाही. द्वैताची अपेक्षा आहे. चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुखाचा अथवा प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी जीवरूपाने ते प्रकट होते. जीवाला अहंभाव टाकून तद्रूप झाल्याशिवाय ते प्रेमसुख मिळत नाही. राजा असल्यानेच राजेपण उपभोगता येते. भक्ति हा बाह्य संबंध नाही. सुगंधच घ्राणेद्रिय झाले, असे उत्कट भक्तिचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे.

भक्तीचा हा अनुभव म्हणजे परमपुरूषार्थ होय. या भक्तिची गोडी एकांतात नसून संतांच्या संगतीत आहे.'नलगे मुक्ती, धनसंपदा । संतसंग देई सदा । ' ही तुकारामांची उक्ती सर्वपरिचित आहे. 'झणी मुक्तीपद देशी पांडूरंगा । मग या संतसंगा कोठे पाहू । ' असे नामदेवांनी म्हटले आहे.

लेखक - श्री. ह. दीक्षित

लोकप्रियता

वारकरी संप्रदायाला जी अमाप लोकप्रियता मिळाली, तिची काही स्पष्ट कारणे आहेत.  सर्वसामान्यांशी ह्या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले उत्कट  भक्ति, सदाचार, नीती ह्यांवर  आधारलेला सरळमार्गी आचारधर्म  ह्या संप्रदायाने सांगितला. कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश ह्या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. कर्मबंधनाची यातायात टाळण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा त्याग केला पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांचीही भूमिका नव्हती. नैष्कर्म्य आणि निष्क्रियता ह्यांत त्यांनी भेद केला. 'जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्यालागी ।।' असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे (ज्ञानेश्वरी १८.१५३). वाटसरूने चालताना जलद पाऊल ऊचलले, तर त्यामुळेच तो मुक्कामी लवकर पोहोचतो आणि त्याला विश्रांती मिळू शकते. त्याचप्रमाणे कर्माचे भरपूर आचरण नैष्कर्म्याच्या कामी येते. असा ह्या ओवीचा अर्थ आहे. जनाबाईच्या दळणकांडणादी नित्यकर्मात प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन त्यांना मदत करावी किंवा एकनाथांच्या दारी पांडूरंगाने श्रीखंड्या होऊन राहावे, ह्या आख्यायिका ह्या संदर्भात बोलक्या आहेत. वारकरी  संप्रदायाने ज्ञानाचे महत्व कमी आहे, असे कधीच मानले नाही, परंतु भक्तीला अग्रस्थान दिले. केवळ नामसंकीर्तनानेही ईश्वराच्या जवळ जाता येते, हे आत्मविश्वासाने प्रतिपादिले. 'नलगे सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।' असे तुकोवांनी म्हटले आहे. वारकरी संप्रदायाने अग्रस्थान दिलेल्या भक्तिभावनेचा अत्यंत उत्कट आविष्कार संत नामदेवांच्या रूपाने पहावयास मिळतो. एखाद्या लडिवाळ लेकरासारखे ते ईश्वराजवळ जाऊ पाहतात. देवावर रुसणे, त्याच्याकडे हट्ट धरणे, पुन्हा त्याची करुणा भाकणे, अशा अनेक भावावस्था त्यांच्या अभंगांतून आपल्याला दिसतात. एकनाथांनी प्रपंच आणि परमार्थ ह्यांचा समन्वय साधण्यावर भर दिला.

वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्वसंग्राहक वृत्ती जोपासली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे विठ्ठल, तेच एका महासमन्वयाचे प्रतीक आहे आणि संतांनी शैव, वैष्णव, बौद्ध, जैन इ. विविध धर्मधारांचा विठ्ठलाच्या ठायी संगम साधलाआहे. असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा नाथपंथीयांची होती, पण लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नाथपंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ निवडला नाही, तर गीतेची निवड केली.

वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांमध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. तुकोबांचाही अनेक प्रकारे छळ झाला होता. पण त्यामुळे समाजापासून फटकून राहण्याची वृत्ती त्यांनी कधीही धारण केली नाही. ' तुका म्हणे तोचि संत।  सोशी जगाचे आघात ' ही तुकारामांची उक्ती प्रसिद्ध आहे. तुकारामांच्या आधी होऊन गेलेल्या एकनाथांनीही सनातन्यांना न दुखावता त्यांच्या सद्‍भावनेला हात घालण्याची धडपड केली.

वारकरी संतांनी राजाश्रयाची आस कधीही धरली नाही. शिवाजी महाराजांचे आमंत्रण येताच ' दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यात न पडे' आणि 'राजगृहा यावे मानाचिये आसे । तेथे काय वसे समाधान? अशी प्रतिक्रिया तुकारामांनी अभंगां तून दिली. सामान्य माणूस हाच ह्या पंथाचा कायम आधार राहिला. लोकसंग्रह हे ह्या पंथाचे वैशिष्ट्य राहिले. प्रत्येक वारकरी आपापली कामे करूनच उदरनिर्वाह करीत असल्यामुळे भिक्षावृत्तीला ह्या पंथात थारा नाही. ह्या पंथाने तत्त्वचर्चेकडे पाठ फिरवली नाही आणि अंधश्रद्धेवरही आघात केले. अज्ञानावर आधारलेल्या उपासनेचा त्यांनी निषेध केला.

वारकरी पंथाने देशी भाषेला जे महत्त्व दिले, ते महानुभाव पंथीयांनीही दिले होते. बौद्ध, जैन, लिंगायत ह्यांनीही देशी भाषेचा पुरस्कार केला होता. तथापि आपल्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वारकरी पंथीयांनी मराठी भाषेच्या जोडीला स्वतःचे असे एक तंत्र उपयोगात आणले. श्रोत्यांबद्दलचा आदरभाव त्यांनी कायम मनात बाळगला.ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य असले, तरी तो एक श्रोतृसंवादही आहे. श्रोत्यांमुळे आपले वक्तृत्व फुलते, हीच भूमिका ज्ञानेश्वर घेऊन आहेत. ' प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती ' असे त्यांनी एके ठिकाणी श्रोत्यांना उद्देशून म्हटले आहे. अन्य वारकरी संतांनीही श्रोत्यांशी समरस होण्यात धन्यता मानली. त्यामुळे इतर पंथीयांच्या तुलनेत वारकरी संतसाहित्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचले. ज्ञानेश्वरीत अपपाठ शिरले होते, ह्याचाच एक अर्थ असा, की ज्ञानेश्वरी गावोगावी अनेकांपर्यंत पोहोचली होती. वारकरी पंथाची ही सारी वैशिष्ट्ये त्या पंथाला जे सर्व थरांतील संतांचे असमान्य आध्यात्मिक नेतृत्व वेळोवेळी लाभत गेले त्यातून निर्माण झाली.

ह्या संप्रदायाच्या अलीकडच्या काळातील थोर सेवेकऱ्यांमध्ये नानामहाराज साखरे, शं. वा. दांडेकर ऊर्फ सोनोपंत दांडेकर, भाऊसाहेब काटकर, विष्णुबुवा जोग, केशवराव देशमुख, बंकटस्वामी, धुंडामहाराज देगलूरकर, बाबामहाराज सातारकर अशा अनेकांचा समावेश होतो. प्रवचने, कीर्तने, ग्रंथप्रकाशन अशा विविध मार्गांनी त्यांनी ह्या संप्रदायाची सेवा केली. नानामहाराजांनी सार्थ ज्ञानेश्वरी प्रसिद्ध केली, तर विष्णुबुवा जोगांनी तुकारामबोवांच्या अभंगांची सार्थ आवृत्ती काढली. विष्णुबुवांनी आळंदी येथे वारकरी शिक्षणसंस्थाही काढली (१९१७).

 

संदर्भ : १. खरे, ग. ह. श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, आवृ. ३ री, पुणे, १९६३.

२. ढेरे, रा. चिं. श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पुणे, १९८४.

३. दांडेकर, शं. वा. वारकरी संप्रदायाचा इतिहास, १९२७.

४. नेमाडे, भालचंद्र, ' वारकरी चळवळीची आविष्कारशैली', टीकास्वयंवर, औरंगाबाद, १९९०.

५. पाठक, यशवंत, नाचू कीर्तनाचे रंगी, पुणे, १९८०.

६. सरदार, गं. बा. मराठी संतसाहित्याची सामाजिक फलश्रुती, आवृ. ४ थी, पुणे, १९५२.

लेखक - अ. र. कुलकर्णी

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate