समाजकार्य : रंजलेले-गांजलेले दु:खी-कष्टी दुबळे लोक अथवा जनसमूह यांना खासगी अथवा सार्वजनिक रीत्या मदतीप्रीत्यर्थ पुरविलेली सेवा. विसाव्या शतकात सामाजिक बांधीलकीच्या कल्पना प्रसृत व विकसित झाल्यानंतर, ही संकल्पना प्रामुख्याने भरभराटीस आली व विकसित झाली; तथापि यूरोपमध्ये खासगी औदार्याला संघटित आणि संस्थात्मक स्वरूप देण्याचे प्रयत्न इंग्लिश पुअर लॉव्दारे इ. स.१६०१ मध्ये करण्यात आले. ही कृती रास्त आणि न्याय असली, तरी तिचा प्रत्यक्षात विकास गेट बिटन, जर्मनी आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांत एकोणिसाव्या शतकात झाला. समाजाच्या हितासाठी व विकासार्थ असलेली ही संकल्पना मोठी व व्यापक आहे.
तीत समाजातील दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ केलेले कार्य अभिप्रेत असून विविध प्रकारे हे सेवाकार्य करण्यात येते. केवळ स्वत:ला पुण्य मिळावे, म्हणून समाजातील वंचित गटांना साहाय्य करणे किंवा भूतदयेपोटी दीनदुबळ्यांची सेवा करणे, म्हणजे समाजकार्य नव्हे. विसाव्या शतकात समाजकार्य ह्या संकल्पनेवर साधकबाधक विचारविनिमय झालेला आहे आणि अनेक समाजशास्त्रज्ञांनी या संकल्पनेची व्याख्या केली असून तिचा ऊहापोहही केला आहे. या व्याख्यांपैकी फीडलँडर पुढील शब्दांत समाजकार्य वा सेवा या संज्ञेची व्याख्या करतात. ‘ समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे. हा व्यवसाय शास्त्रीय ज्ञानावर व मानवी संबंधांच्या कौशल्यांवर आधारित आहे. एखादया व्यक्तीला किंवा गटाला अशी मदत केली जाते, जेणेकरून सामाजिक व वैयक्तिक समाधान निर्माण होऊन स्वावलंबनाची प्रकिया सुरू होईल.
समाजकार्य हे एखादया संस्थेमार्फत किंवा संघटनेमार्फत केले जाते ’; तर स्ट्नाऊपच्या मते (१९६०) ‘ समाजकार्य हे जसे शास्त्र आहे, तशीच ती एक कलाही आहे ’. त्याच्या मते व्यक्ती, गट किंवा समुदायाच्या गरजांच्या पूर्तीसाठी सर्व प्रकारच्या साधनांचा एकत्रित वापर करून लोकांना स्वत:चे प्रश्न स्वत: सोडविण्यास सक्षम करणे, म्हणजे समाजकार्य होय. सामाजिक कार्य करणाऱ्या भारतीय परिषदेने देखील समाजकार्याची केलेली १९५७ मधील व्याख्या आजही समाजकार्य क्षेत्रात मान्य आहे. समाजकार्य ही कल्याणकारी कृती आहे. समाजकार्य हे मानवतावाद, शास्त्रीय ज्ञान व तांत्रिक कौशल्ये ह्यांवर आधारित आहे. व्यक्ती, गट किंवा समुदायाचे आयुष्य अधिक परिपूर्ण करण्याचा त्यात प्रयत्न आहे. ह्या सर्व व्याख्यांचा साकल्याने विचार केल्यास त्यांतील काही प्रमुख उद्देशांची तसेच कार्यपद्धतीची कल्पना येते.
समाजकार्याचे मुख्य ध्येय, सामाजिक कार्यक्षमता वाढविणे हे होय. समाजकार्यांची तत्त्वप्रणाली ही लोकशाही तत्त्वांवर आधारित असून सामाजिक न्याय, समता, समानता व विकास ही तत्त्वे महत्त्वाची मानली आहेत. समाजकार्य तीन घटकांनी बनले आहे:
समाजकार्य करण्याच्या विशिष्ट पद्धती विकसित झालेल्या आहेत. व्यक्तिसहाय्य कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाजकल्याण प्रशासन, समाजकार्य संशोधन व सामाजिक कृती ह्या समाजकार्याच्या पद्धती आहेत.
संदर्भ : 1. Cooper, Joan, Social Workers : Their Role and Tasks, 1982.
2. Misra, P. D. Philosophy and Methods, 1936.
3. Mukharjee, Radhakamal, Social Work in India, 1971.
4. Wadia, A. R. History and Philosophy of Social Work in India, New Delhi, 1961.
लेखक - रूमा बावीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/6/2020
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विक...
ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आह...
यात पूरक आहार,वजनवाढ-नोंदी, 'अ'जीवनसत्त्व वाटप आणि...