অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अभ्यास कसा करावा ?

अभ्यास कसा करावा ?

कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या-साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.

मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्याय नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती, आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.

स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते.

योगीजन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.

१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे.

२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.

३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.

४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना-ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.

५. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही.

६. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. अर्थात इच्छा तीव्र असेल तर गोंधळातदेखील एकाग्रता साधता येते. इंद्रियांवरचे असे नियंत्रण अभ्यासाने साधता येते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नये किंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये.

७. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे.

मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत :

अ. अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते.

आ. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल.

इ. अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने (वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही) व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे.

ई. घाणेरड्या व अश्‍लील विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे.

उ. लहान-लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल.

८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही, ज्या विषयाशी संबंधित कोणतीही कृती आपण करणार नाही त्या विषयाबद्दल बडबड करुन आपल्या तोंडाची वाफ दवडू नये. अशा निरर्थक बडबडीमुळे मनाची घडी व शिस्त बिघडते. मन दुबळे व गैरशिस्त होत जाते.

९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो.

१०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळेच. "काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच" अशा निर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही.

११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणर‍हित व संघर्षरहित असते.

प्रस्तुत लेख "विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य" या रामकृष्ण मठाने प्रसिध्द केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.


अंतिम सुधारित : 8/14/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate