অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आकाशगंगा

आकाशगंगा म्‍हणजे काय ?

निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात. आकाशगंगेला ‘दूधगंगा’असेही म्हणतात. स्वर्गावर चढण्याची शिडी, वामनावतारी विष्णू तिसरे पाऊल टाकीत असता ते एका अंड्याला लागले व ते फुटून आकाशगंगेचा प्रवाह निघाला इ. कल्पना प्रचलित आहेत. स्वर्गातील अमरावतीला आकाशगंगेने वेढलेले आहे, असाही उल्लेख भागवतात आढळतो.

काशगंगेचा पट्टा कसा दिसतो व त्‍यात काय आहे ?

काशगंगेचा पट्टा उत्तर ध्रुवाच्या ३० जवळून जातो. याची जास्तीत जास्त रुंदी अंदाजे ४५ तर कमीत कमी रुंदी अंदाजे ५ आहे. साधारणपणे खगोलाच्या उत्तर गोलार्धात हा पट्टा शृंगाश्व (मोनोसेरॉस), मिथुन (जेमिनी), वृषभ (टॉरस), सारथी (ऑरिगा), ययाती (पर्सियस), शर्मिष्ठा (कॅसिओपिया), सरठ (लॅसर्टा), हंस (सिग्नस), जंबुक (व्हल्पेक्युला), शर (सॅजिट्टा) व गरूड (अ‍ॅक्विला) या तारकासमूहांतून जातो आणि दक्षिण गोलार्धात धनू (सॅजिटॅरियस), रेखाटणी (नॉर्मा), पीठ (ऑरा), नरतुरंग (सेंटॉरस), त्रिशंकू (क्रक्स), नौका (कॅरिना) व नौकाशीर्ष (व्हेला) या तारकासमूहांतून जातो. आर्द्रा व ब्रह्महृदय हे मोठे तारे आकाशगंगेच्या काठावर असून हंस, श्रवण, मित्र व मित्रक हे मोठे तारे व त्रिशंकू हा तारकासमूह आकाशगंगेच्या पट्ट्यात दिसतात.

काशगंगा धनू व वृषभ या समूहांत क्रातिवृत्ताला (सूर्याच्या वार्षिक भासमान गतीच्या मार्गाला) ६० त छेदते आणि खगोलीय विषुववृत्ताला गरूड आणि शृंगाश्व या समूहांत सु. ६२ त छेदते. आकाशगंगेच्या दक्षिण भागात जास्त तारे आहेत. हंस या समूहापाशी ती दुभंगते. शौरी, सारंगी व भुजंगधारी यांना स्पर्श करून उत्तर फाटा जातो व दक्षिण फाटा जंबुक व श्रवण यांच्यामधून जातो. पुन्हा दोन्ही फाटे एकत्र होतात.

पृथ्वी ही सूर्यकुलाचा एक घटक आहे. अनेक ग्रह-उपग्रह मिळून सूर्यकुल बनलेले आहे. सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजेच आकाशगंगा होय. असे अनेक समूह अवकाशात आहेत. त्यांना ⇨दीर्घिका म्हणतात आणि सूर्यकुल ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपण आकाशगंगेत असल्याने आपल्याभोवती जेवढे म्हणून लहानमोठे तारे नुसत्या डोळ्यांनी रात्री दिसतात, ते सर्व आकाशगंगेतच आहेत. परंतु पट्टा ज्या ज्या ठिकाणी दिसतो त्या त्या बाजूस ताऱ्यांची दाटी असल्याने पट्टा हे तिचे आपल्या दृष्टीने दृश्य स्वरूप आहे. नुसत्या डोळ्यांनी सु. ५,००० तारे दिसू शकतात. परंतु त्यांच्याशिवाय दुर्बिणीतून दिसणारे व न दिसणारे, सूर्यापेक्षा लहान तसेच सूर्यापेक्षा अतिशय मोठे, तेजस्वी असे कोट्यवधी तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. आकाशगंगेत सु. १०० अब्ज तारे असावेत असे शास्त्रज्ञ म्हणतात. या ताऱ्यांखेरीज आकाशगंगेत अभ्रिका, रूपविकारी तारे, तारकायुग्मे, तारकागुच्छ वगैरे निरनिराळ्या प्रकारचे घटक आहेत. आंतरतारकीय द्रव्य, उष्ण वायू, धूलिकण वगैरे इतस्ततः पसरलेले आहेत, ते वेगळेच. आकाशगंगेच्या पट्ट्यात या सर्वांची फार दाटी असल्याने त्या सर्वाच्या प्रकाशामुळे एक दुधाळ रंगाचा पट्टा दिसतो. मोठ्या दुर्बिणीतून यातील ताऱ्यांचा अलगपणा दृष्टोत्पत्तीस येतो. आकाशगंगेतील ११८ गोलाकार तारकागुच्छांपैकी ३० धनू राशीच्या बाजूला म्हणजे गंगेच्या मध्याकडे आहेत आणि तिकडेच पट्टा जास्त दाट दिसतो.

गॅलिलीओ यांनी १६१० मध्ये प्रथम दुर्बिणीतून आकाशगंगेचे निरीक्षण केले व त्यावरून आकाशगंगेचा दुधाळ रंग तिच्यातील जवळजवळ असलेल्या असंख्य ताऱ्यांमुळे दिसतो असे त्यांना आढळून आले. विल्यम हर्शेल यांनी १८ व्या शतकाच्या शेवटी व त्यानंतर त्यांचे पुत्र जॉन हर्शेल यांनी १८३४-३८ या काळात आकाशगंगेच्या विविध भागांतील ताऱ्यांच्या संख्यांची नोंद केली. १९००-२० या काळात कापटाइन व त्यांच्या सहकाऱ्यांनी छायाचित्रण करणाऱ्या दुर्बिणीच्या साहाय्याने काही विशिष्ठ भागातील ताऱ्यांच्या संख्यांची नोंद केली. त्यानंतर १९१६-१९ या काळात शॅप्ली यांनी आकाशगंगेच्या मध्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या अनेक गोलाकार तारकागुच्छांचे अंतर काढले व आकाशगंगेचे स्वरूप अधिक स्पष्टपणे मांडले. आकाशगंगेच्या बाहेरून तिच्या पातळीतील एखाद्या बिंदूतून तिच्या कडेच्या बाजूने पाहिल्यास ती मध्ये जाड व कडेला चपटी अशी साधारणपणे बहिर्गोल भिंगाकार दिसेल. यातील सर्वांत तेजस्वी भागात अति उष्ण व अति-तेजस्वी तारे आणि आंतरतारकीय वायूंचे मेघ व धूळ असून हा भाग अतिशय चपट्या तबकडीसारखा आहे. याच भागात साधारणपणे मध्यापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर सूर्यकुल आहे. या तबडकीच्या भोवती बऱ्याच कमी घनतेचे तेजोमंडल आहे. आकाशगंगेचा व्यास सु. ३०,०००पार्सेक (एकपार्सेक = ३·२६ प्रकाशवर्ष) इतका प्रचंड असून मध्यभागी जाडी सु. ५०००पार्सेक आहे. सूर्य तिच्या मध्यापासून सु. ८,३०००पार्सेक दूर असून या ठिकाणी जाडी सु. १,०००पार्सेक आहे.

काशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या व मध्यातून जाणाऱ्या प्रतलास ‘गांगीय प्रतल’म्हणतात. या प्रतलाच्या अगदी जवळ उत्तर बाजूस फक्त ५० प्रकाशवर्षे (सु. २५ पार्सेक) अंतरावर सूर्य आहे. सूर्यकुलाच्या दृष्टीने आकाशगंगेचा मध्य पूर्वाषाढा व उत्तराषाढा या नक्षत्रांच्या दिशेला आहे व सूर्यकुल जवळजवळ गांगेय प्रतलातच आहे.

काशगंगेतील घटकांचा स्थाननिर्देश करताना काही निर्देशक लागतात. भोग आणि शर हे क्रांतिवृत्तास धरून किंवा विषुवांश आणि क्रांती हे विषुववृत्ताला धरून किंवा दिगंश आणि उन्नतांश हे क्षितिजाला धरून सहनिर्देशक मानले जातात [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. तशी गांगेय निर्देशकांचीही एक सहनिर्देशक पद्धती वापरण्यात येते. गांगेय प्रतल हे ज्या ठिकाणी खगोलास छेदील ते गांगेय विषुववृत्त होय. या विषुववृत्त-प्रतलाला गांगेय मध्येपासून काढलेल्या लंब रेषेत दोन गांगेय ध्रुव असतात. उत्तर गांगेय ध्रुव अरुंधती केश या समूहात (होरा १२ ता. ४० मि.;क्रांती +२८) व दक्षिण गांगेव ध्रुव शिल्पागार (स्कल्प्टर) या समूहात (होरा ० ता. ४० मि.; क्रांती -२८ ) असतो. विशिष्ट ताऱ्यापासून गांगेय विषुववृत्तावर टाकलेले बृहद्‍वृत्तीय लंबांतर म्हणजे गांगेय शर आणि गांगेय विषुववृत्त व खगोलीय विषुववृत्त ज्या ठिकाणी ६२ कोन करून छेदतात त्या बिंदूपासून (होरा १८ ता. ४० मि.) विषुवांश ज्या बाजूस मोजतात, त्याच बाजूकडे गांगेय विषुववृत्तावर मोजलेले अंतर म्हणजे गांगेय भोग, असे सहनिर्देशक पूर्वी मोजीत. परंतु आता आंतरराष्ट्रीय ठरावानुसार गांगेय विषुवांश आकाशगंगेच्या केंद्रदिशेपासून मोजतात.

काशगंगेसारखेच स्वरूप असलेल्या आपल्या जवळपास असलेल्या इतर दीर्घिकांशी तुलना करता आकाशगंगा ही एक सर्पिल (मळसूत्राकार) प्रकारची दीर्घिका आहे असे दिसते. ह्या बाह्य दीर्घिकांच्या चक्रभुजांत उष्ण व दीप्तिमान तारे तसेच वायुमेघ आणि धूळ आढळते व अशाच प्रकारची लक्षणे आकाशगंगेतही आढळतात. आकाशगंगेच्या मध्यातून काढलेल्या लंब अक्षाभोवतो ती फिरत आहे. परंतु इतर दीर्घिकांप्रमाणे ती अपसव्य (घड्याळातील काट्याच्या हालचालीच्या विरुद्ध) दिशेने फिरत नसून सव्य दिशेने तिचे परिभ्रमण होते. एखाद्या भरीव चाकाप्रमाणे हे परिभ्रमण एकसंधी नसून त्याचा वेग निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा आहे. ज्या ठिकाणी सूर्य आहे त्या ठिकाणी वेग दर सेकंदास २५० किमी. असून सूर्य हंसपुंजाकडे जात आहे असे दिसते, तर जवळच्या घटकांशी तुलना करता तो वेग दर सेकंदास २० किमी. असून या गतीचा रोख शौरीपुंजाकडे आहे असे दिसते. दर सेकंदास २५० किमी.यावेगाने सूर्याला आकाशगंगेची एक फेरी करावयास सु. २५ कोटी वर्षे लागतात. आकाशगंगेच्या तीन चक्रभुजांसंबंधी १९५१ मध्ये मॉर्गन व त्यांच्या सहाध्यायांनी महत्त्वाचे वेध घेतले. त्यानंतर व्हान डी हूल्स्ट, म्यूलर, ऊर्ट, कार इ. शास्त्रज्ञांनी आकाशगंगेच्या चक्रभुजांतील उदासीन (निर्विद्युत्) हायड्रोजनाच्या २१ सेंमी. तरंगलांबीच्या रेडिओ-कंप्रता (दर सेकंदास होणारी कंपनसंख्या) उत्सर्जनांचे निरीक्षण करून आकाशगंगेच्या सर्पिल स्वरूपाचा सिद्धांत अधिक बळकट केला. या रेडिओ निरीक्षणांच्या आधारे आकाशगंगेच्या चक्रभुजांचा एक नकाशाही तयार करण्यात आलेला आहे. या सर्व पुराव्यावरून आकाशगंगा ही हबल यांच्या वर्गीकरणानुसार Sb या प्रकारची सर्पिल दीर्घिका आहे असे दिसून येते [→ दीर्घिका].

लीकडील मापनांनुसार आकाशगंगेतील द्रव्यांचे वस्तुमान ३×१०४४ ग्रॅ. म्हणजे सूर्याच्या१६ × १०१० पट आहे आणि आंतरतारकीय द्रव्य व इतर घटकांसह तिची सरासरी घनता दर घ.सेंमी. ला ७×१०-२४ ग्रॅ. आहे. आकाशगंगेसारखेच स्वरूप असलेली दुसरी एक दीर्घिका एम ३१ (होरा ० ता. ४० मि.; क्रांती +४१) ही देवयानी (अँड्रोमेडा) समूहात अंधाऱ्या रात्री निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकते. (चित्रपत्रे)

संदर्भ : 1. Bok, B. J.; Bok, P. F. The Milky Way, Cambridge, Mass., 1957.

2. Goldberg, L., Ed. The Structure of the Galaxy, Michigan University, 1951.

फडके, ना. ह.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 8/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate