हा उत्सव महाराष्ट्रात पेशव्यांच्या कारकिर्दीत सुरू झाला. त्या काळी भाद्रपद शु. चतुर्थीपासून दशमीपर्यंत सात दिवस हा उत्सव होत असे. मुख्यत: धार्मिक स्वरूपाच्या या उत्सवात कथाकीर्तनादी कार्यक्रमही केले जात.
गणेशोत्सवाला सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप १८९३ सालापासून प्राप्त झाले. लोकजागृतीचे एक साधन म्हणून त्यावेळच्या नेत्यांनी या उत्सवाला व्यापक, सार्वजनिक व ज्ञानसत्रात्मक स्वरूप दिले. लोकमान्य टिळक प्रभृतींनी समाजातील ऐक्याची भावना वाढावी या हेतूने ⇨गणपती या उपास्यदेवतेची निवड केली. हा उत्सव गणेशचतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यत दहा दिवस सुरू करण्यात आला. पूजाअर्चादी धार्मिक विधींबरोबर कीर्तने, प्रवचने, व्याख्याने इ. सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच मेळे, पोवाडे, भावगीते, नकला, जादूचे प्रयोग असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा परिणाम चांगला होतो, याची लोकमान्य टिळकांना खात्री होती. गणेशोत्सव हे प्रचाराचे एक प्रभावी साधन करून पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटित करावे आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत करावी, हाही त्यात उद्देश होता. नकळत धार्मिक प्रवृत्तीबरोबर राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने मेळ्यातील पदे व पोवाडे रचण्यात आले. गेल्या साठसत्तर वर्षांच्या अनुभवावरून राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना या सार्वजनिक उत्सवाच्या द्वारे होत गेली, असे दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात सार्वजनिक गणेशोत्सवाने केलेले लोकजागृतीचे कार्य उल्लेखनीय ठरते.
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यात झाली व हळूहळू तो महाराष्ट्रभर साजरा होऊ लागला. दिल्ली, कलकत्ता, गोवा, मद्रास यांसारख्या इतर प्रांतांतील शहरीही तो छोट्या प्रमाणावर सुरू झाला.
सार्वजनिक गणेशोत्सवामुळे पोवाडे, मेळे, भावगीते, नकला, जादू इ. कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन मिळाले. नवे नवे कलाकार उदयास आले. कार्यक्रम विनामूल्य असल्याने सर्वसामान्य जनतेलाही उत्सवात सहभागी होता आले.
पुणे, मुंबई इ. शहरी पेठापेठांतून हा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी उत्सवमंडळे स्थापन झाली. मनोरंजन करण्याचे सार्वजनिक मेळा हे एक प्रभावी साधन ठरले. अनेक मेळे निघाले. मेळ्यांतील पदांची रचना देशाभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने करण्यात आली. उल्लेखनीय अशा पुण्यातील मेळ्यांत ‘सन्मित्र समाज मेळा’, ‘भारत मित्र समाज मेळा’, ‘वज्रदेही शूर मेळा’, ‘बाल सन्मित्र पथक’, ‘रणसंग्राम मेळा’, ‘बाल संगीत मेळा’, ‘स्वातंत्र्य मेळा’, ‘काळभैरवनाथ मेळा’, ‘यशवंत मेळा’, ‘पैसा फंड मेळा’, ‘मावळी मेळा’, यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मेळ्यांप्रमाणे अनेक शाहीर, भावगीतगायक, जादूगार, नकलाकार यांचेही कार्य महत्त्वाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रमांना प्रतिष्ठा प्राप्त झाली व त्यांत समाजाच्या सर्व थरांतील स्रीपुरूष उत्साहाने भाग घेऊ लागले.
सार्वजनिक गणेशोत्सवात व्याख्याने व प्रवचने देण्यासाठी बहुश्रुत पंडित, निष्णात वक्ते व थोर पुढारी येत. लो.टिळक, न.चिं.केळकर, कृ.प्र.खाडिलकर, चिंतामणराव वैद्य, लोकनायक अणे, दादासाहेब खापर्डे, सरोजिनी नायडू इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होतो. हिंदुमुस्लिम जमातींतील तेढ कमी करण्यास त्या काळी सार्वजनिक गणेशोत्सव हे साधन प्रभावी ठरले होते.
व्याख्यानांचे विषय धार्मिक, सामाजिक, शास्रीय, आर्थिक व राजकीय असत. व्याख्यानांचा सारांश वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होई. त्यामुळे व्याख्यानांच्या द्वारे मांडलेले विचार सर्वत्र पसरले जात.
गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आल्यापासून आजतागायत त्यात अनेक स्थित्यंतरे झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात या उत्सवाचे स्वरूप धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय होते. त्यात राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती, एकात्मता, स्वदेशी यांवर भर असे. स्वातंत्र्योत्तर काळात सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले. धार्मिक कार्यक्रम कमी झाले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्वही कमी कमी होत गेले. उत्कृष्ट रोषणाई करणे, करमणुकीचे व मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यांवर अफाट खर्च करणे यांवर भर देण्यात येऊ लागला. मेळे व पोवाडे मागे पडले. संगीत, नृत्य, भावगीते, जादू, नकला या कार्यक्रमांना विशेष महत्त्व मिळाले. अलीकडे तर गणेशमूर्तींचे नावीन्य व सजावट, विद्युत्रोषणाई व विसर्जनाची मिरवणूक यांवर फारच खर्च होऊ लागला आहे. सांस्कृतिक व धार्मिक मूल्यांची जोपासना हा मूळ उद्देश अलीकडे दुर्लक्षित होऊ लागला आहे. आजचा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ रंजनप्रधान व भपकेबाज झाला आहे.
सध्याच्या कालमानानुसार सार्वजनिक गणेशोत्सवाला नवे वळण लावणे सामाजिक हिताच्या व प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे.
संदर्भ : करंदीकर ज. स. संपा. श्रीगणेशोत्सवाची साठ वर्षे, पुणे, १९५३.
करंदीकर, ना. स.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
स्त्रोत : मराठीविश्वकोश
अंतिम सुधारित : 3/11/2020
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात, जनजागृती...
प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्...
'लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ आणि 'लोकमान्...