অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जगातील सात नवी आश्चर्ये

जगातील सात नवी आश्चर्ये

मेक्सिकोच्या युकातान व्दीपकल्पातील चिचेन इत्झा येथील पिरॅमिड (इसवी सन पूर्व ८००)

मेक्सिको देशातल्या पुरातन माया संस्कृतीमधील ‘देवळांचे शहर’ म्हणजे चिचेन इत्झा. हे त्या काळातील राजकीय आणि आर्थिक घडामोंडीचेही एक महत्त्वाचे केंद्र होते. येथील अनेक पुरातन वास्तुरचना प्रसिद्ध आहेत – कुकुल्कानचा पिरॅमिड, चक मूलचे मंदिर, हजार खांबांचे सभागृह, कैद्यांचे खास क्रीडांगण इ. इ. ह्या वास्तू पाहिल्यावर त्या काळातील वास्तुरचनाकारांच्या कौशल्याची आपणांस प्रचीती येते. माया संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ आणि अखेरचे स्मृतिचिन्ह म्हणजे हा पिरॅमिड होय.

ब्राझीलमधील रिओ द जानिरो येथील ख्रिस्त रेडीमर (१९३१)

ब्राझीलमधल्या रिओ द जानिरो ह्या महत्त्वाच्या शहरामागील कोर्कोवादो पर्वतावर उभारलेला सुमारे ३८ मीटर उंचीचा हा पुतळा जगभरच्या पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तेथून रिओ द जानिरो शहराचे व समुद्रकिनार्‍यांचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. हा पुतळ्याची संकल्पना ब्राझीलच्याच हैतर दा सिल्वा कोस्ता ह्यांची असून त्याची निर्मिती फ्रेंच शिल्पकार पॉल लँदोव्स्की ह्यांनी केली आहे. हा पुतळा बनवण्यास पाच वर्षे लागली आणि १२ ऑक्टोबर १९३१ रोजी ह्याचे अनावरण झाले. हा पुतळा म्हणजे रिओ द जानिरो ह्या शहराचे आणि आपल्यास भेटायला येणा-यांचे खुल्या बाहूंनी स्वागत करणा-या ब्राझिलिअन लोकांच्या औदार्याचे प्रतीकचिन्ह बनले आहे.

इटलीमधील रोम येथील रोमन कलोसियम (इसवीसन ७० ते ८२)

रोम शहराच्या मध्यभागी असलेले हे भव्य खुले प्रेक्षागृह रोमन साम्राज्यातील यशस्वी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आणि रोमन साम्राज्याची कीर्ती साजरी करण्यासाठी बांधण्यात आलेले होते. ह्या प्रेक्षागृहाची संकल्पना आजही वापरली जाते आणि आज २००० वर्षांनंतरही प्रत्येक आधुनिक क्रीडागृहाच्या बांधणीवर कलोसिअमची छाप दिसते. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ह्या क्रीडागृहामध्ये झालेल्या अनेक क्रुर शर्यती आणि झुंजींची माहिती आपणांस चित्रपट आणि इतिहासांच्या पुस्तकांमधून मिळते.

आग्रा, भारत येथील ताजमहाल (इसवी सन १६३०)

पाचवा मुघल सम्राट शाहजहान ह्याने आपल्या दिवंगत पत्नीची आठवण म्हणून ही भव्य रचना शुद्ध संगमरवरी दगडातून यमुनेच्या तीरावर उभारली. त्याभोवती मोठे आखीव-रेखीव उद्यानही आहे. भारतातील मुघल वास्तुरचनेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये शाहजहानला कैदेत टाकण्यात आले. असे म्हणतात की त्याच्या कोठडीला असलेल्या छोटया खिडकीतून त्यास केवळ ताजमहाल दिसत असे.

चीनची भिंत (इसवी सन पूर्व २२० ते इसवी सन १६४४)

मंगोल आदिवासी टोळ्यांच्या हल्ल्यांपासून देश सुरक्षित ठेवण्यासाठी, अस्तित्वात असलेल्या अनेक छोट्यामोठ्या तटबंद्या एकसंध करून, ही एकच अवाढव्य अखंड भिंत बनवण्यात आली. माणसाने बनवलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वास्तुरचना आहे. ही एकमेव वास्तू अंतराळयानांमधूनदेखील दिसते असे म्हणतात. ही बांधण्यासाठी हजारो-लाखो लोकांनी भरपूर कष्ट उपसले असणार ह्यात शंकाच नाही.

माचू पिचू, पेरू, द. अमेरिका (इसवी सन १४६०-१४७०)

दक्षिण अमेरिकेतील इंका संस्कृतीचा सम्राट पाचाक्युटे ह्याने माचू पिचू (म्हणजे पुरातन पर्वत) पर्वताच्या मेघाच्छादित शिखरांमध्ये एक शहर वसवले होते. ही आश्चर्यकारक वसाहत अँडीज पठारापासून अर्ध्या उंचीवर अमेझॉनच्या घनदाट जंगलामध्ये उरूबाम्बा नदीव्या वरील भागामध्ये वसलेली आहे. तत्कालीन इंका लोकांना बहुधा देवीच्या भयानक साथीमुळे हे शहर सोडावे लागले असावे. स्पॅनिश वसाहतवाद्यांनी स्थानिक रेड इंडिअन्सचा पाडाव केल्यानंतरची जवळजवळ तीनशे वर्षे ह्या शहराची कोणासही माहिती नव्हती. हायरॅम बिंग्हॅम यांनी १९११ मध्ये या शहराचा पुनर्शोध लावला.

पेट्रा, जॉर्डन (इसवी सन पूर्व ९वे शतक – इसवी सन ४०)

अरब वाळवंटाच्या एका कडेला असलेल्या नाबात साम्राज्याची पेट्रा ही वैभवशाली राजधानी होती. आरिटास (चौथा) (इसपू ९ ते इस ४०) हा त्यावेळी तेथील सम्राट होता. पाणी व्यवस्थापनामध्ये अत्यंत कुशल असणा-या नाबातावासियांनी या शहरामध्ये मोठाले बोगदे आणि जलकुंभ बांधले होते. ग्रीक-रोमन पद्धतीची वास्तुरचना असलेले आणि ४००० आसनक्षमतेचे एक नाट्यगृहदेखील तिथे होते. आज ह्या मध्यपूर्वेतील गतवैभवाची साक्ष देणारे, एल देईर आश्रमाचे ४२ मीटर उंचीचे प्रवेशद्वार आणि पॅलेस टोम्ब्स ऑफ पेट्रा या वास्तू तेथे उभ्या आहेत.

Source:
1. The New 7 Wonders Of The World

2. 7 Wonders Of The World Images© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate