অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वसामान्य व्यवहारातही वापरली जात असते. या संकल्पनेचा वापर मानसशास्त्रात काही फार वेगळ्या अर्थाने होतो असे नाही. व्यवहारात इतर प्राणी आणि माणूस यांच्यात भेद करताना किंवा माणसामाणसांतील भेदाचा एक महत्त्वाचा आयाम या संदर्भात बुद्धिमत्ता ही संकल्पना वापरली जात असते. तिच्याकडे एक ‘नैसर्गिक’ किंवा ‘ईश्वरी’ देणगी म्हणूनही बघितले जाते.

मानसशास्त्राच्या विकासात जे वेगवेगळे टप्पे पडतात, त्यांमध्ये व्यक्तीच्या क्षमतेविषयीच्या धारणाही बदलत गेलेल्या दिसतात. परंतु बुद्धिमत्ता ही संकल्पना मात्र पारिभाषिक नेमकेपणाला अद्यापही हुलकावणी देत राहिली आहे. दीर्घ चर्चेच्या शेवटी ‘बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्तेच्या चाचण्या जे काही मोजतात ते’. अशी मजेशीर व्याख्या पुढे केल्याचा दाखला मिळतो

परिसराशी प्रत्येक प्राण्याचे काही एक नाते जमते. या नात्यातून प्राण्याचे आणि प्राणिजातीचे जीवनमरण घडते. या समायोजनाची पातळी प्राण्याच्या वेदक आणि कारक क्षमतांशी निगडित असते. प्राण्याची आणि प्राणिजातीची निव्वळ उपस्थिती हा केवळ परिसराच्याच वर्णनाचा भाग होईल. परंतु प्राणी आपण होऊन परिसरातील घटकांची पुनर्रचना करू लागतात त्या ठिकाणी या प्राण्याचा परिसरावरील प्रभाव महत्त्वाचा ठरतो. माणसाच्या बाबत हे अतिशय स्पष्टपणे दिसून येते; कारण माणूस परिसराच्या पुनर्रचनेचे प्रयत्न सतत करत आलेला आहे. थंड प्रदेशात ऊबदार वातावरण मिळवणे,उष्ण प्रदेशात थंड हवा-पाणी मिळवणे यांसारख्या प्राथमिक भौतिक गोष्टी मनुष्य स्वतःच्या कृतींनी, स्वतः बनवलेल्या साधनांच्या वापरांनी प्राप्त करत असतो. यासाठी त्याच्या मूलभूत क्षमतांची एक तयारी व जोडणी आवश्यक असते. या क्षमता केवळ शारीरिक नाहीत.‘सर्वसामान्य मानसिक क्षमता’ (जनरल मेंटल ॲबिलिटी) असल्यामुळे माणूस एक प्राणी म्हणून इतर प्राण्यांपेक्षा गुणात्मक दृष्ट्या वेगळ्या पातळीवरचे जीवन जगतो. तो स्वरक्षण आणि वंशरक्षण यांना एक इतिहासाचा थर देतो. एक पिढी स्वतःचे शहाणपण दुसऱ्या पिढीला देते. यासाठी प्राणभूत असणारी सांकेतिक वर्तनाची क्षमता माणसामध्ये आहे. अर्थ लावणे, अर्थाची देवाणघेवाण करण्यासाठी माध्यमाचा वापर करणे, क्षणिक अनुभवाला माध्यमाच्या साहाय्याने दीर्घजीवित्व देणे,केवळ विचारांची साखळी मांडणे, बदलणे यांसारख्या चढत्या श्रेणीने होणारे अमूर्त व्यवहार माणसाच्या माणूसपणाचे आधार आहेत. या संपूर्ण कार्याचा आवाका कवेत घेणारी संकल्पना म्हणजे बुद्धिमत्ता. या सगळ्याच्या मुळाशी ‘ती’ आहे.याप्रकारे, ज्या क्षमतेच्या संकल्पनेची व्याख्या करायला आपण बसतो, तिलाच या व्याख्येसाठीही काम करावे लागते, असा हा पेच होतो (वुई नीड इन्टेलिजन्स टू डिफाइन इन्टेलिजन्स).

व्यक्तिगत क्षमता म्हणून बुद्धिमत्तेची व्याख्या करताना, या पेचातून सुटण्याचे काही मार्ग आतापर्यंत वापरले गेले आहेत. त्यांमध्ये पहिला मार्ग असा: ही क्षमता असेल तर काही कृती अधिक सहजपणे करता येतात आणि ती जसजशी कमी होईल तसतशी सहजता कमी होऊन शेवटी अशक्य होईपर्यंत व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन दिसते. उदा., कोडी सोडवणे हे वर्तन घेतल्यास बुद्धिमान व्यक्ती अधिक सहजपणे कोडी सोडवते, तर बुद्धिमत्ता जसजशी कमी होईल तसतसे हे काम कठीण वाटत जाईल आणि शेवटी आपल्याला अशाही व्यक्ती दिसतील, की त्यांना ‘कोडी सोडवणे’ अशक्य कोटीतील वाटेल. या मार्गाने बुद्धिमत्तेची व्याख्या केल्यास आपण ती काही प्रक्रियांच्या आधारेच करतो; संवेदन, स्मरण, अनुमान, अध्ययन, अमूर्त संकल्पन इ. प्रक्रिया ज्याला सुलभतेने जमतात, तो बुद्धिमान आणि त्याच्या अंगी असणारी या प्रक्रिया करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता. या पेचातून सुटण्याचा दुसरा मार्ग म्हणजे बुद्धिमत्तेने जे निष्पन्न होते, त्यावर भर देऊन व्याख्या करणे ही निष्पत्ती सामाजिक संबंधात, मूर्त वस्तूच्या संबंधात किंवा अमूर्त पातळीवरील संबंधात येऊ शकते. या अनुषंगाने केलेल्या व्याख्या बुद्धिमत्ता व्यक्त होण्याच्या क्षेत्राचा विचार करतात. तिसरा मार्ग म्हणजे अनेक प्रकारच्या बुद्धिमत्तादर्शक गणल्या जाणाऱ्या वर्तनाच्या चाचण्यांच्या परस्परसंबंधातूनच ‘घटक’ प्राप्त करून बुद्धिमत्तेची व्याख्या करण्याचा. यांपैकी पहिल्या प्रकारच्या काही व्याख्या : ‘बुद्धिमत्ता म्हणजे क्षमता प्राप्त करून घेण्याची क्षमता’, ‘बुद्धिमत्ता म्हणजे समायोजनाची क्षमता’, ‘बुद्धिमत्ता म्हणजे जीवनातील प्रश्न सोडवण्याची क्षमता’ इत्यादी.

दुसऱ्या प्रकारच्या व्याख्यांमध्ये ‘बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त व्यवहार, यांत्रिक कारक व्यवहार आणि सामाजिक संबंध यांमधील कौशल्य’;यासारखी ⇨ई. एल्. थॉर्नडाइक (१८७४-१९४९) याने केलेली व्याख्या येईल, तर तिसऱ्या प्रकारात ⇨सी. ई. स्पिअरमन(१८६३-१९४५), ब्राऊन,थर्स्टन इत्यादींनी संख्याशास्त्रीय विचारावर आधारित मांडलेल्या संकल्पनांचा समावेश होईल.

व्याख्या करणे कठीण असले, तरी अभ्यासकांनी आज या सर्व मार्गांनी या क्षमतेचे रूप समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याविषयी काही प्रमुख सिद्धांत खालीलप्रमाणे :

थॉर्नडाइकचा सिद्धांत

संकल्पना म्हणून जरी बुद्धिमत्ता अमूर्त असली, तरी मेंदू हे तिचे शारीर अधिष्ठान आहे. थॉर्नडाइक याने मज्जासंस्थेतील वेदक तंतू व कारक तंतू यांतील संबंध हे बूद्धिमत्तेचे आधार मानले. उद्दीपक ग्रहण केला, की वेदक तंतू नसावेगांचे वहन करतात. त्या नसावेगांतील‘माहिती’ चे संस्करण होऊन त्या संदर्भात प्रतिक्रिया देण्याचा आदेश देणारे नसावेग ‘कारक’ तंतूंमध्ये निर्माण होतात. तेव्हा या प्रकारे उद्दीपकापासून प्रतिक्रियेपर्यंत सहभागी होणाऱ्या नसतंतूंचे बंध हे बुद्धिमत्तेचे आधार होत, असा सिद्धांत त्याने मांडला. हे बंध कमीअधिक गुंतागुंतीचे असू शकतील,त्यांची निर्मिती म्हणजे अध्ययन वा ज्ञानसंपादन आणि या बंधांची व्यक्त रूपे म्हणजे प्रत्यक्षात दिसणारे ‘बुद्धिमान वर्तन’ होय.

स्पिअरमनचा सिद्धांत : स्पिअरमन याच्या सिद्धांतानुसार प्रत्येक ‘बुद्धिमान वर्तना’त एक क्षमतेचा अंश असा असतो, की तो सर्वच वर्तनासाठी लागतो. पण त्याबरोबरच, त्या विशिष्ट वर्तनासाठी म्हणून एक क्षमतेचा अंश असा असतो, की तो तेवढ्यापुरता असतो, सर्व वर्तनासाठी आवश्यक नसतो. यानुसार बुद्धिमत्ता म्हणजे सामान्य क्षमतेचा अंश, अधिक, विशिष्ट क्षमतेचा अंश (इन्टेलिजन्स = जी + एस्) असे त्याने मांडले. सामान्य क्षमतेचा अंश अधिक प्रमाणात असणारी व्यक्ती बहुगुणी (व्हर्सटाइल) असते, तर विशिष्ट क्षमतेचा अंश अधिक असणारी व्यक्ती एखाद्याच बाबतीत चमक दाखवते.

स्पिअरमन याने क्षमतेचे अंश मेंदूच्या कार्यपद्धतीशी निगडित आहेत, असे मानले होते. मेंदूतील निरनिराळे विभाग वेगवेगळी विशिष्ट कार्ये वाटून करतात आणि संपूर्ण मेंदू एकत्रितपणेही कार्य करतो, हे तेथवर कळून आले होते. प्राण्यांवरील प्रयोगांत मेंदूचे शरीराशी प्रमाण, मेंदूची सुस्थितीत असणारी टक्केवारी इ. वैशिष्ट्यांशी सर्वसामान्य समायोजनक्षमता निगडित असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे, एखादा भाग निकामी झाला, तर त्या भागाची कार्ये करू लागण्याची लवचिकताही मज्जातंतूंमध्ये दिसून येते. या सर्व शारीर-मानसशास्त्रीय माहीतीच्या आधारे स्पिअरमन याने सिद्धांत मांडला. त्यानुसार, मेंदूची एकत्रित, समग्रतेने काम करण्याची क्षमता हा‘सामान्य क्षमतेचा अंश’ (जी फॅक्टर) ठरवणारा घटक आहे, तर विशिष्ट क्षेत्राची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता हाविशिष्ट क्षमतेचा अंश’ (एस फॅक्टर) ठरवणारा घटक आहे, असे प्रतिपादन केले.

सामान्य मानसिक क्षमता अशी एक क्षमता मानण्याऐवजी अनेक प्राथमिक मानसिक क्षमता मानाव्यात अशी मांडणी एल्.एल्. थर्स्टन याने केली. त्याने बुद्धिमत्ता या संकुल क्षमतेचे सात मूलघटक मांडले आहेत. हे घटक फलन-विश्लेषण या संख्याशास्त्रीय प्रक्रियेने साधित केले आहेत. हे घटक म्हणजे:(१) अंकक्षमता, (२) शब्दसौकर्य (वर्ड फ्लूअन्सी), (३) दिक्संबंध, (४) भाषिक क्षमता, (५) निगामी आणि विगामी तर्कण, (६) संवेदनक्षमता आणि (७) स्मृती.

बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयीच्या सिद्धांतांची रचना चालू असताना अतिशय झपाट्याने विकसित झालेले क्षेत्र म्हणजे बुद्धिमापनाच्या कसोट्यांची वा चाचण्यांची (टेस्ट्स) निर्मिती आणि बुद्धिमत्तेच्या विकासाचा दीर्घकालीन अथवा समसामायिक अभ्यास. बुद्धिमापन आणि ज्या मापाने ती सांगितली जाते तो बुद्धिगुणांक (इन्टेलिजन्स कोशन्ट-आय्.क्यू.) ही खास या शतकाच्या शास्त्रीय पारिभाषिक संग्रहातील भर आहे. मानसिक वय बुद्धिगुणांक = ---------------- १०० हे सूत्र पाहताच यातील कालिक वय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक वय हीच आहे हे स्पष्ट होईल. एकाच वयाच्या व्यक्तींच्या बुद्धिमत्तेत जे व्यक्तिभेद आढळून येतात, त्यांची अंशात्मक श्रेणी लावण्याचा हा प्रयत्न आहे. बुद्धिगुणांक (बु.गु.) १०० म्हणजे व्यक्ती मानसिक व कालिक दृष्ट्या एकाच पातळीवर आहे. तो शंभरांपेक्षा कमी याचा अर्थ वयाच्या मानाने ती व्यक्ती मागे पडलेली आहे आणि शंभरांपेक्षा जास्त याचा अर्थ ती बरोबरीच्या इतर व्यक्तिंपेक्षा मानसिक क्षमतेत पुढे आहे. म्हणजेच बुद्धिगुणांक केवळ व्यक्तीच्या स्वतःच्या कालिक व मानसिक विकासाच्या प्रमाणाचे मापन नसून इतर समवयस्क व्यक्तींशीही तौलनिक मापन सांगणारा गुणांक आहे. यामुळे ही पट्टी फूटपट्टीसारखी नाही, हे नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बुद्धिगुणांक त्या चाचणीशी, ती चाचणी ज्या लोकसमूहात तयार केली, त्याच्याशी त्या चाचणीमागील व्याख्यात्मक गृहीतकांशी संबद्ध आहे.

मानसिक वय ठरविण्यासाठी चाचण्यांमध्ये अशी रचना केलेली असते, की काही भाग विशिष्ट वयाच्या सर्व व्यक्ती करू शकतील, क्रमाक्रमाने ही यशस्वितेची टक्केवारी कमी होत जाईल. जे काम सरासरीने निघते, ते ज्याला साध्य होते, त्याच्या मानसिक वयाचा पाया तेथे पक्का होतो आणि तेथून पुढचे त्याला किती करता येते, यावरून मानसिक वयात पडणारी भर ठरत जाते. उदा. सहा वर्षे वयाच्या मुलाने सहा वर्षाची सरासरी गाठली आणि काही गोष्टी पुढील वयोगटाच्या क्षमतेनुसारही केल्या, तर त्याचे मानसिक वय सहापेक्षा जास्त ठरते. अर्थात याविषयीची तांत्रिक प्रक्रिया प्रत्येक चाचणी रचताना केलेली असते, त्याविषयीच्या सूचना चाचणीबरोबरच असतात.

बुद्धिगुणांक ही एक मापनसिद्ध संकल्पना हाती लागल्यावर या क्षेत्रातील अभ्यासाला मोठी चालना मिळाली. या चालनेचा अग्रमान ⇨आल्फ्रेड बीने(१८५७-१९११) आणि तेओदोर सीमोन (१८७३ -१९६१) या फ्रेंच मानसशास्त्रज्ञांकडे जातो. त्यांनी अक्षम व्यक्तींना वगळून काढण्यासाठी सुरू केलेले मनोमापनाचे काम आज एका विशेषज्ञतेचे क्षेत्र बनले आहे.

बीनेच्या चाचण्यांची सुधारित आवृत्ती स्टॅनफर्ड या अमेरिकन विद्यापीठात एल्. एम्. टर्मन याने काढली. त्याने तीन सुधारित आवृत्या काढल्या. बीनेने स्वतः तीन वेळा स्वतःची चाचणी सुधारली होतीच. अशा प्रकारे १९०५, १९०८ व १९११ मधील बीनेच्या आवृत्या आणि १९१६, १९३७ व १९६० या स्टॅनफर्डमधील सुधारित आवृत्त्या असा या पहिल्या चाचणीचा इतिहास आहे.

बुद्धिमापनाच्या चाचण्यांचे नंतर इतर प्रकार पुढे आले, तरी हा साचा या ना त्या रूपात त्यांनी वापरला. शब्दार्थ, व्याख्या, अंकमालांचा एकपाठ,भाषिक आकलन,अनुमान, गणित सोडवणे, साम्यभेद ओळखणे, विसंगती शोधणे, म्हणींचा अन्वय इ. मूळ उपचाचण्या बुद्धिमत्तेच्या निदर्शक कार्यासाठी अद्यापही वापरल्या जातात. [⟶मानसिक कसोट्या].

मापनाचे स्वरूप लक्षात न घेतल्यामुळे बुद्धिगुणांक या संज्ञेभोवती काही विपरीत अर्थांची वलये निर्माण झाली आहेत. बुद्धिगुणांक हा एक ईश्वरेच्छेने मिळणारा अपरिवर्तनीय, अपरिहार्य विशेष आहे आणि त्यावर सर्व प्रकारचे यश अवलंबून असते, ही समजूत अनेकांची आहे. परंतु व्यक्तीच्या आनुवंशिक क्षमता कार्यान्वित होताना कितपत परिणामकारकता मिळवतात याचा अभ्यास करताना असे दिसते, की प्रत्यक्ष वर्तनात व्यक्त होण्यावर परिस्थितीचा,संधीचा परिणाम होत असतो. ग्रामीण विभागातून शहरी विभागात स्थलांतर केल्यावर, विशेष संधी मिळाल्यावर, भावनिक ताण कमी झाल्यावर व्यक्त बुद्धिमत्ता बदलताना दिसते.यामुळे‘बुद्धिमत्ता’ अशी भाववाचक नामाच्या रूपात ही संकल्पना वापरण्यापेक्षा बुद्धियुक्त वर्तन (इन्टेलिजन्ट बिव्हेविअर) अशा विशेषणाच्या रूपात ती वापरावी, असेही काही विचारवंतांचे मत आहे. प्रत्येक व्यक्ती काही प्रसंगी बुद्धियुक्त वर्तन करते,परंतु ही पातळी सर्व प्रसंगांत ठराविक आणि एकच एक असेल असे नाही. या विचारात तथ्य असले,तरी सामान्य मानसिक क्षमतेला एक नैसर्गिक मर्यादा असते आणि तिच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करता आला, तरी तिला उल्लंघन करणे शक्य नसते, असे मानण्यास जागा आहे. त्यामुळे निर्बुद्धतेपासून अतिहुशार पातळीपर्यंत अशा श्रेणीत बुद्धिमत्ता व्यक्त होताना दिसते.

स्त्रिया आणि पुरुष, वेगवेगळया जाती, वेगवेगळे वंश यांच्यातील बुद्धिमत्तेचे भेद नैसर्गिक, जन्मजात व कायमचे नसतात हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. सर्व पातळ्यांवरील बुद्धिमत्ता सर्व प्रकारच्या मानवसमूहांमध्ये दिसते, हे या क्षेत्रातील संशोधनाचे एक महत्वाचे सार आहे.

लोकोत्तर बुद्धिमत्ता वा प्रतिमा (जीनिअस) आणि बुद्धिमत्ता यांचे नाते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अत्यंत बुद्धिमान व्यक्तीच्या ठिकाणी सृजनशीलता,कल्पकता,शोधकता हे गुण असतीलच असे सांगता येत नाही; परंतु जगविख्यात प्रतिभावंतांचा बुद्धिगुणांक वरच्या दर्जाचा असलेला आढळून येतो. सृजनशीलता ही स्वभावतःच मापनाच्या काट्यात अडकविण्यास कठीण अशी संकल्पना आहे. कारण मूलभूत क्षमता, त्यांच्या आविष्कारप्रेरणा आणि विशिष्ट क्षेत्रात त्यांची अभिव्यक्तीयांचा एकच एक साचा-अगदी कामचलाऊ रूपातही-मिळणे दुरापास्त आहे.

स्त्रोत : मराठी विश्वकोश© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate