অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बुद्धिमान मुलांचे शिक्षण

बुद्धिमान मुलांचे शिक्षण

गेल्या शतकात बुद्धिमत्ता, बुद्धिमापन आणि बुद्धिगुणांक या मानसशास्त्रातील संज्ञा व्यवहारात सर्रास वापरल्या जाऊ लागल्या. कुशाग्र बुद्धीची किंवा १४० पेक्षा अधिक [बुद्धिगुणांक ]असलेले मूल म्हणजे बुद्धिमान बुद्धिमत्ता असलेले मूल म्हणजे बुद्धिमान मूल (गिफ्टेड चाइल्ड) अशी व्याख्या काही तज्ञांनी मांडली. तथापि बुद्धिमान ही संज्ञा इतक्या मर्यादित अर्थाने सर्वत्र वापरली जात नाही. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ज्यांना उत्तम गती आहे व जे त्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळावू शकतात, त्यांना त्या क्षत्रातील बुद्धिमान म्हणावे, असे सामान्यतः मानले जाते. साहित्य, शास्त्र, यंत्रज्ञान, कला वाणिज्य यांसारख्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांत बुद्धिमान व्यक्ती असू शकते. त्यामुळे त्यांपैकी कोणत्याही क्षेत्रात जी मुले उत्तम यश संपादन करण्याची शक्यता आहे, अशा मुलांना बुद्धिमान मुले समजले जाते.

बुद्धिमान मुले (१) सर्वसाधारण बौद्धिक क्षमता, (२) अभ्यासातील यश, (३) सर्जनात्मक अथवा रचनात्मक विचार, (४) नेतृत्व, (५) विविध कला आणि (६) कारक कौशल्य या गुणांमध्ये विशेष प्रगती दर्शवितात.

मूल ज्या क्षेत्रात बुद्धिमान असते, त्या क्षेत्रातील त्याची अभियोग्यता शोधता येते. उपलब्ध बुद्धिमत्ता व इतर अभियोग्यता (ॲप्टिट्युड‌स), चाचण्या आणि पालकांकडून मिळालेली माहिती यांच्या साहाय्याने बुद्धिमान मूल कोणते, हे समजू शकते. सामान्यतः बुद्धिमान मुलांच्या बाबतीत संकलनक्षमता, सर्जनात्मक विचार, कुतूहलवृत्ती, विचारप्रकटनाची क्षमता, वाचनाची आवड, सिद्धिप्रेरणा (इन-अचिव्हमेंट), कल्पकता, एखादी गोष्ट साध्य होईपर्यंत धडपड करण्याची क्षमता आणि एखाद्या विशेष विषयात असलेला रस हे गुण प्रकर्षाने दिसतात. शाळकरी मुलांच्या बाबतींत पालकांच्या मताप्रमाणेच शिक्षकांचे मतही उपयोगी पडते.

बुद्धिमान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तीन गोष्टींत वेगळेपणा असावा लागतो : १. अभ्यासक्रम सधन असणे, २. विशेष कौशल्य आणि सर्जकता वाढीस लागतील अशा अध्यापन पद्धती ठेवणे आणि ३. मुख्य म्हणजे अशा मुलांचे उपजत गुण वाढीस लागतील असे वातावरण असणे. नेहमीच्या शाळांतून असे वातावरण नसल्यास ते निर्माण करणे किंवा सुधारलेल्या वातावरणात अशा मुलांचे शिक्षण करणे उचित ठरते. बुद्धिमान मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना त्यात सहभागी करून घेणे आणि शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक असते. शिक्षकंना प्रशिक्षण देताना वरचेवर सेवांतर्गत वर्ग, नेतृत्वाचे शिक्षण, या विषयातील संशोधन आणि विकासाची माहिती आणि तांत्रिक बाबींमध्ये साहाय्य या गोष्टींचा अंतर्भाव असतो. जितक्या लवकर बुद्धिमान मूल, ते वेगळे असल्याचे, ध्यानात येईल व त्याचे विशेष शिक्षण सुरू होईल, तितके ते अधिक लवकर प्रगती करते.

बुद्धिमान मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यावयाचे असल्यास पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात : या मुलांची अभिरूची किंवा कल लहानपणापासून दिसू लागतो; त्यानुसार त्याना योग् व व्यक्तिगत स्वरूपाचे शिक्षण द्यावे लागते. या मुलांना व्यावसायिक शिक्षणातील पर्याय चटकन कळतात; त्यांपैकी कोणत्या व्यवसायात भविष्यकाळात काय प्रगती होऊ शकेल, याचा अंदाज करता येतो. त्यांच्या शिक्षणात काम (वर्क) आणि क्रीडा (प्ले) या पद्धतींचा सारखाच वापर करणे जरूर असते.

योग्य कौटुंबिक आणि शालेय वातावरण नसल्यास बुद्धिमान मुलांची कुचंबणा होते आणि ती अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकत नाहीत. परिणामतः मुलांना वैफल्य येते. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टया मागासलेल्या कुटुंबातील मुलांकडेही असेच दुर्लक्ष होते; त्यांनाही गुणास वाव मिळण्याजोगे वातावरण प्राप्त होत नाही.

बुद्धिमान मुलांना शिक्षण देताना पुढील सर्वसाधारण तत्त्वे उपयुक्त ठरतात. (१) विशिष्ट मुलात कोणत्या विशिष्ट क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याची क्षमता आहे, हे लक्षात घेणे, (३) अभ्यासक्रमाची सधन उद्दिष्टे स्पष्ट राखणे, (३) विविध प्रकारच्या मुलांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आखणे, (४) स्वतंत्र विचार, संकल्पना निर्मितिक्षमता, अमूर्त विचारक्षमता आणि वरच्या दर्जांची प्रगत शक्य होईल अशा तऱ्हेच्या अध्यापनपद्धती योजणे, (५) त्यांच्या नेहमीच्या आणि विशेष शिक्षणात संतुलन ठेवणे, (६) तसेच त्यात लवचिकता राखणे, (७) विविध प्रकारची कोशल्ये शिक्षणाच्या वेगवेगळया स्तरांबर विकसित करता येतात यांची जाण ठेवणे, (८) या शिक्षणात विशेष कौशल्य असलेले अध्यापक नेमणे, (९) या शिक्षणात उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करणे आणि (१०) या मुलांच्या शिक्षणात शक्य तितके पालकांचे सहकार्य घेणे.

लेविस टर्मन (१८७७-१९५६) या मानसशास्त्रज्ञाने अमेरिकेतील एक हजार बुद्धिमान मुलांचा सतत ५0 वर्षे अभ्यास केला आहे. टर्मन बुद्धिचाचणीचा बी याने उपयोग करून १९२२ साली हा अभ्यास सुरू केला. १९२५-५९ यादरम्यान त्याचे चार अहवाल प्रसिद्ध झाले. त्याच्या मृत्यूनंतर इतरांनी याच अभ्यासातील अगदी अलीकडील अहवाल १९७२ साली प्रसिद्ध केला. बुद्धिमान मुलांच्या बाबतीत कुटुंबातील अध्यापन व शाळेत इयत्ता गाळून वर जाण्यास दिलेले प्रोत्साहन उपयोगी पडतात, हे त्या अहवालातील प्रमुख शैक्षणिक निष्कर्ष होत.

बुद्धिमान मुले हुडकून काढून त्यांना प्रोत्साहन द्यावे ही कल्पना स्वतंत्र भारतात अधिक प्रमाणात पुढे आली. सामान्यतः शालेय विषयांतील प्रगती हाच निकष त्यासाठी लावला जातो. अलीकडे मात्र सामान्य ज्ञान, तार्किक विचार इ. चाचण्या शालेय अभ्यासाबरोबर वापरल्या जातात. पूर्वी इयत्ता चौथी व इयत्ता सातवीमध्ये घेतल्या जाणाऱ्या शासकीय शिष्यवृत्ती-परीक्षा या एकमेव चाचण्या होत्या. त्यानंतर विविध स्तरांबर होणाऱ्या सार्वजनिक परीक्षांत वरचे क्रम मिळविणाऱ्यांना शिष्यवृत्त्या देण्याची पद्धत सुरू झाली. अलीकडे ग्रामीण भागातील मुलांना इयत्ता चौथीनंतर विशेष चाचणी देऊन व त्यानुसार योग्य विद्यार्थी निवडून त्यांना विशेष प्रकारचे माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा शासनाने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात अशा शाळा सातारा, औरंगाबाद इ. ठिकाणी आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनी ही संस्था अशाच तऱ्हेने लहान बुद्धिमान मुले हुडकून काढून त्यांना विशेष शिक्षण देण्याचे काम करते.

------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 5/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate