অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मनातलं..मनासाठी...भावनिक बुद्धिमत्तेचा उगम

मनातलं..मनासाठी...भावनिक बुद्धिमत्तेचा उगम

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ती कशी ओळखावी, याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. याच भावनिक बुद्धिमत्तेमुळे आयुष्यातील विविध समस्यांवर आपण मात करू शकतो.
भावभावनांविषयीची जाणीव आजमितीइतकी पूर्वी कधीही नव्हती. यापूर्वी तर भावना दाबून ठेवणे हा गुणधर्म मानला गेला. आज लोकांच्या भावनिक अडचणींकडे सहानुभूतीने पाहिले जाते; तसेच तुमच्या भावना व्यक्‍त करण्यासाठी प्रोत्साहन दिले
जाते. आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भावनांचे महत्त्व आजइतके पूर्वी कधीच डोळसपणे पाहिले गेले नाही. मानसिक ताणतणाव हा मोडलेल्या हाडाइतका किंवा त्याहूनही भयानक असू शकतो याबद्दल आज दुमत नाही.
आजच्या काळातील मानसशास्त्रातील संशोधन पूर्वी उपलब्ध नव्हते. मानवी मनोव्यापाराबद्दलची जिज्ञासा या संशोधनांच्या मुळाशी होती.
सिग्मंड फ्रॉइड यांनी सर्वप्रथम मानवी मन आणि त्याला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी या संबंधात सिद्धांत मांडले. त्यानंतरही अनेक सिद्धांत मांडले गेले; पण मूळ उद्देश अर्थातच लोकांच्या मानसिक यातना कमी करणे हा होता. भावनिक स्वास्थ्य (Emotional Health) विषयी बोलताना 8 पासून 0 पर्यंतची अवस्था मनस्वास्थ्य कमी असणारी तर 0 पासून 8 पर्यंत चांगले मनस्वास्थ्य असणारी अशी मोजपट्टीही सांगितली गेली. नंतरच्या काळात फक्‍त अस्वस्थता दूर करणे एवढाच उद्देश न ठेवता एरिक्‍सन बॅंडर आणि ग्राईंउर यांनी Neuro Linguistic Programming म्हणजे NLP द्वारा 0 पाशी न थांबता 4, 5, 6, 7 अशी स्थिती मिळवण्यावर भर दिला. 1990 च्या दशकात सेलिग्मन यांनी "How to be as happy as possible' या कल्पनेवर भर दिला. आणि 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी Emotional Intellegence यामध्ये मानवी जीवनातील व्यावसायिक यश व वैयक्‍तिक सुख यासाठी आवश्‍यक असे काही घटक मांडले. या घटकांचा एकत्रितपणे विचार म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता.
भावनिक बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता गुणांक यातील फरक : बुद्धिमत्ता गुणांक चाचण्या सुमारे 100 वर्षांपासून बुद्धिमापन चाचण्या म्हणून वापरल्या जात आहेत. या संदर्भाने बुद्धिमत्ता म्हणजे 1. तर्कसुसंगतता क्षमता. 2. विश्‍लेषणात्मक विचार चाचण्या 3. भाषिक कौशल्य 4. इतर चाचण्या
या चाचण्या आपल्या मेंदूची वस्तुनिष्ठ माहिती संदर्भातील आकलन साठवून ठेवण्याची क्षमता व स्मरण याबद्दलची पडताळणी करतात. या चाचण्या आपली तोंडी आणि गणिती पद्धतीने विचारक्षमता तपासतात; तसेच समस्या सोडवण्याची क्षमता व काल्पनिक व पृथ:करणात्मक विचारक्षमता तपासतात.
याचा परिणाम म्हणून ज्यांचा बुद्‌ध्यांक उच्च आहे. (100 हा साधारण बुद्‌ध्यांक) ते शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होण्याची शक्‍यता असते. या लोकांना सामान्यपणे चांगल्या नोकऱ्या मिळतात व सर्वसाधारपणे त्यांचे आयुष्य यशस्वी म्हणता येईल. यशस्वी आयुष्यासाठी बुद्‌ध्यांक ही एकमेव गुरुकिल्ली मानली गेली; पण एखाद्या व्यक्‍तीची जीवनातील आनंद लुटण्याची क्षमता किंवा अगदी वेगळ्या प्रकारची जीवन कौशल्ये वापरून यशस्वी होण्याची क्षमता, सुखीसमाधानी आयुष्य जगण्याची क्षमता याविषयी बुद्‌ध्यांक काहीही सांगत नाही. आज 21 व्या शतकात भावनिक बुद्धिमत्ता आणि "सुखसमाधान असलेले यशस्वी जीवन' या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकेच नव्हे तर "भावनिक बुद्धिमत्ता' ही सुखी जीवनाची मोजपट्टी म्हणावी लागेल.
बुद्‌ध्यांक आणि भावनिक बुद्धिमत्ता या जरी दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी बऱ्याचदा त्या ऐकमेकांना पूरक असतात. या दोघांच्या संयोजनाने कोणचेही आयुष्यातले यशापशय व सुख ठरविले जाते.

भावनिक बुद्धिमत्ता आणि सॉफ्ट स्किल्स

ज्या कौशल्यांमध्ये आपल्याला डिग्री, डिप्लोमा किंवा प्रशस्तिपत्रके मिळतात. त्यांना हार्ड स्किल्स म्हणतात. हार्ड स्किल्स अचूकपणे मोजता येतात. आपण पदवी किंवा इतर परीक्षेत मिळवलेले गुण याच प्रकारातले. हार्ड स्किल्सना आज बाजारात चांगली मागणी आहे. शैक्षणिक गुणवत्ता, एखादी गोष्ट प्रत्यक्ष करायला शिकणे यात अगदी नवशिक्‍यापासून ते तज्ज्ञांपर्यंत स्तर उपलब्ध असतात. उदा. बॅंकिंग, आयटी, इंजिनिअरिंग इ. हार्ड स्किल्समध्ये प्रावीण्य मिळविण्याचे मार्ग त्यामानाने साधे, सरळ असतात. हार्ड स्किल्स शिकण्याच्या पद्धती बहुतांश साचाबंद असतात. तुमची सर्टिफिकेट्‌स, तुमच्या डिग्री, तुमचे त्या विषयातील प्रावीण्य सिद्ध करतात.
आज 21 व्या शतकात फक्‍त हार्ड स्किल्स पुरेशी नाहीत, तर अतिशय उच्च दर्जाची सॉफ्ट स्किल्स मागितली जातात. उदा. 1. इतरांशी मिळून मिसळून वागण्याची वृत्ती व क्षमता. 2. परिणामकारक नेतृत्वशैली. 3. इतर लोकांचा विकास व त्यांना नवीन शिकण्याची संधी देणे इ. 4. स्वत:च्या क्षमता अधिक प्रगल्भ करणे. 5. इतरांशी सुसंवाद व संभाषण कौशल्य 6. आपल्या विचारप्रणालीचा यथायोग्य उत्तम वापर. 7. टीका किंवा अवघड प्रसंगातील सकारात्मक दृष्टिकोन 9. धोक्‍याच्या काळात शांत व स्थिर राहणे. 10. इतरांची मते आणि विचार समजावून घेण्याची क्षमता.
वरील सर्व सॉफ्ट स्किल्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय.

लेखक : प्रा. कालीदास देशपांडे

स्त्रोत : साप्ताहिक सकाळ

माहिती संकलन : छाया निक्रड© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate