অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सशस्त्र दल ध्वजदिन

सशस्त्र दल ध्वजदिन
राज्य शासनाच्या सैनिक कल्याण विभागामार्फत 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र दल ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो...
भारताने स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर लगेचच सरकारला सैनिक कल्याणाचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज भासू लागली. त्यासाठीच 28 ऑगस्ट 1949 रोजी तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने दरवर्षी 7 डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 7 डिसेंबर हा दिवस ‘ध्वजदिन’ म्हणून साजरा केला जातो. यामागील संकल्पना अशी होती की, देशाच्या नागरिकांना सैनिकांचे स्मरण म्हणून एक छोटा ध्वज भेट द्यायचा आणि त्यांच्या बदल्यात नागरिकांकडून देणगी स्वीकारायची.

स्वातंत्र्यानंतर ध्वजदिनाचे औचित्य दिवसेंदिवस वाढत गेले आहे कारण देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचे व शहिदांच्या परिवारांचे पुनर्वसन व कल्याण यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. हे सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्ये नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल आदर असल्याची भावना व्यक्त केली जाते. 

मूळ ध्वजदिन निधीची उभारणी संरक्षण मंत्रालयाच्या समितीद्वारे 1949 मध्ये करण्यात आली. 1993 मध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाद्वारे सैनिक कल्याणासंबंधी सर्व निधी सशस्त्र दल ध्वजदिन फंडामध्ये एकत्रित करण्यात आला.

हा निधी शासनातर्फे पुढील गोष्टींसाठी वापरला जातो

  • कल्याणकारी निधीच्या एकूण 44 प्रकारच्या योजनांसाठी आर्थिक मदत. या समितीचे अध्यक्ष माजी सैनिक कल्याण मंत्री असतात.
  • विशेष निधीमधून सैनिकी मुलां/मुलींचे वसतीगृहे व माजी सैनिक विश्रामगृहे माफक दरात चालविली जातात. या समितीचे अध्यक्ष मा. राज्यपाल असतात.
  • सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील बहुमोल कामगिरी करीत असते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, यासाठी त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व आलेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वजदिन निधीपैकी बहुतांशी रक्कम उपलब्ध करून दिली जाते. 

सशस्त्र दल ध्वजदिन निधीला आपण मदत करु शकता...
Flag Day Fund (Public) Saving A/c no 60061347784 या शासकीय अकाऊंटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, घोरपडी शाखा, पुणे येथे 
1.Direct Cash भरु शकता.
2.चेकद्वारे भरणा करता येतो.
3. www.mahasainik.coM या वेबसाईटवरुन कॅश भरता येईल.
4. पेटीएम (PAYTM) किंवा ॲप (APP) द्वारे कॅश भरता येईल.
5.सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे येऊन थेट चेक किंवा कॅश जमा करता येईल.

ध्वजदिन निधीला सढळ हाताने मदत करा....

लेखिका - वर्षा फडके,
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)
स्त्रोत : महान्युज


© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate