कवकांचे तंतू कठिण पेशीभित्तीने वेढलेले असून त्यांमध्ये कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही आणि इतर बहुशर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता कवकांमध्ये नसल्यामुळे ती अन्नासाठी सेंद्रिय (कार्बनी) पदार्थांवर अवलंबून असतात.
बहुतांशी कवके नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मातीत व मृत पदार्थात ती आढळत असून वनस्पती, प्राणी आणि इतर कवकांमध्ये सहजीवन घडवून आणण्यात ती मोलाची कामगिरी बजावतात. सर्व परिसंस्थांमध्ये ती विघटन घडवून आणतात. पोषकद्रव्यांच्या चक्रातील आणि देवाण-घेवाणीतील ती अपरिहार्य घटक आहेत.
कवकांचे एकपेशीय तंतुमय तसेच बहुपेशीय भूछत्रांसारखे प्रकार आहेत. यांच्या अनेक जातींमध्ये अलैंगिक प्रजनन होते व बीजाणूंची निर्मिती होते. याच बीजाणूंपासून नवीन जीवांची उत्पत्ती होते. यांची संख्या, लैंगिक प्रजननाच्या पद्धती, जीवनचक्राचे प्रकार, वाढीचे स्वरूप आणि अलैंगिक प्रसाराच्या पद्धती यांनुसार कवकांचे वर्गीकरण केले जाते.
कवकांची परिचित उदाहरणे म्हणजे किण्व (यीस्ट), बुरशी, तांबेरा, काणी, भूछत्र वगैरे. कवक सृष्टीमध्ये यूमायकोफायटा (सत्यकवके) हा एकच संघ आहे, असे मानले जाते. काही वैज्ञानिक कवकातील बीजाणूंना प्रकेसल किंवा कशाभिका आहे किंवा नाही, यावरून दोन उपसंघ मानतात. काही वैज्ञानिक श्लेष्मबुरशी इत्यादींचाही समावेश कवकांमध्ये करतात. त्यांचा मिक्सोमायकोफायटा हा वेगळा संघ मानला जातो. कवके उपयुक्त तसेच नुकसान करणारीही आहेत. सफरचंद, बटाटा, गहू, द्राक्षे यांवरील भुरी आणि बाजरीवरील अरगट व तांबेरा असे वनस्पतींचे रोग कवकांमुळे होतात. तसेच चामड्याचे नुकसान, अन्न विटणे, कपड्यांना बुरशी लागणे इ. नुकसान त्यांमुळे होते. कवकांमुळे माणसांना तसेच प्राण्यांना गजकर्ण व नायट्यासारखे त्वचेचे रोग होतात.
कवकांच्या अनेक जाती मनुष्याला उपयुक्तदेखील आहेत. त्यांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. किण्वन प्रक्रियेमागील शास्त्र नीट समजण्यापूर्वीदेखील द्राक्षे आणि इतर पदार्थांपासून मद्यार्क (अल्कोहॉल) बनविण्यासाठी ब्रुअर यीस्ट वापरले जात असे. किण्वानामुळे तयार होणार्या अल्कोहॉलचा रासायनिक आणि औषधी उपयोग केला जातो. पाव बनविण्याच्या उद्योगात बेकर यीष्ट मोठ्या प्रमाणावर वापरतात. पेनिसिलियम कॅम्बर्टी यामुळे चीजला विशिष्ट वास प्राप्त होतो. चिनी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे सोया सॉस हे विशिष्ट कवकांद्वारे किण्वन प्रक्रियेने बनवितात.
पेनिसिलियम नोटॅटम यापासून मिळणार्या पेनिसिलिनचा उपयोग करून पहिल्यांदा प्रतिजैविके तयार करण्यात आली. या कवकाची प्रतिजैविक क्षमता ब्रिटिश वैज्ञानिक अॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२९ मध्ये दाखवून दिली. दुसर्या महायुद्धात केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी संयुक्त संशोधन करून पेनिसिलियम क्रायसोजिनम यापासून प्रतिजैविकांचे जास्त उत्पादन देणारे उत्परिवर्ती वंशप्रकार मिळविले. तेव्हाच पेनिसिलियमचे औद्योगिक उत्पादन करणे शक्य झाले. या उद्योगाने जगभर मोठे रूप धारण केलेले आहे, मात्र सध्या उपलब्ध प्रतिजैविकांपैकी फक्त काहीच प्रतिजैविके कवकांपासून बनलेली आहेत. ग्लुकॉनिक, आयटोकॉनिक, सायट्रिक इ. सेंद्रिय आम्ले तयार करण्यासाठी तसेच इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये विविध सूक्ष्मकवकांचा वापर होतो. दरवर्षी जवळजवळ एक लाख टन सायट्रिक आम्लाचे उत्पादन अॅस्परजिलस नायगरया कवकांद्वारे होते. काही देशांत पाव उद्योगासाठी आणि मांस टिकविण्यासाठी लागणारे अॅसिड प्रोटीझेस नावाचे विकर तयार करण्यासाठी कवकांची मुद्दाम वाढ करतात.
ढेपे, राजा
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/20/2020
काणी रोग : बहुतांशी तृणधान्यांच्या कणसांवर दाण्याऐ...
निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकर...
कवकांमुळे मानवात दोन प्रकारचे रोग होतात. एक स्थानि...