অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल


भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावची इयत्ता सहावीत शिकणारी अश्विनी उघडे ची राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार वितरण व प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अश्विनी उघडे सद्या दिल्लीत दाखल झाली आहे.
अश्विनी, दिनांक २१ जून २०१४ च्या सकाळी १० वाजताच्या सुमारास गावापासून जवळपास ३ किमी अंतरावर रानात आंबे वेचायला धाकटी बहीण रोहिणीला घेऊन गेली. आंबे वेचत असताना अचानक कसला आवाज झाला.... अन् पाहते तर धाकटी रोहिणी बिबट्याच्या जबड्यात. याआधीच तिच्या कानावर होते की बिबट्याच्या डोक्यावर वार केला तर तो पळतो म्हणून अश्विनीने गोळा केलेले आंबे बिबट्याच्या दिशेने भिरकविले. तरीही तो ऐकेना. अशात बिबट्याच्या जबड्याच्या बाजुला रोहिणीचा पाय दिसत होता. तोच पाय खेचून अश्विनीने आपल्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले, अन् आरडा-ओरड करून बिबट्याच्या दिशेने आंबे भिरकवून बिबट्याला पळवले व आपल्या बहिणीचे प्राण वाचवले. अश्विनी एक एक प्रसंग कथन करत होती तस-तसे तिचे कौतुक वाटत होते अन उर अभिमानाने भरून येत होता.
या प्रसंगानंतर गावात व परिसरात अश्विनीच्या धाडस व शौर्याचे कौतुक होत होते. मेहंदुरी येथील अश्विनी शिकत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे सहायक शिक्षक ज्ञानेश्वर वैरागकर यांनी अश्विनीच्या धाडसाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात यावी म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यासाठी पुरक ठरली बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकात एका धाडसी मुलीच्या पाठातून मिळालेली प्रेरणा आणि काही वर्षांपूर्वी परिसरातील एका मुलाने राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी केलेला अर्ज आणि त्यासाठी जोडलेले उचित कागदपत्र याची माहिती.
अश्विनीचे वडील अशिक्षीत. हातमजूरीवर कुटुंबाचा निर्वाह चालतो. अश्विनी, रोहिणी आणि एक मुलगा व बायको असे त्यांचे कुटुंब. घरी अठराविश्व दारिद्र्य. मग सहायक शिक्षक ज्ञानेश्वर वैरागकर यांनीच पुढाकार घेत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत दिल्लीस्थित राष्ट्रीय बालकल्याण परिषदेकडे यासंबंधित पत्रव्यवहार केला. या कामी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळाली. परिणामी अश्विनीची यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले. याचा आनंद अश्विनीच्या शाळेत व पंचक्रोशीत साजरा करण्यात आला.
महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्य मंत्री विद्या ठाकूर यांनी मंत्रालयात अश्विनीचा सत्कार करत तिच्या धाडसाचे व शौर्याचे कौतुक केले. तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार वितरण समारंभासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व शुभेच्छा व आशिर्वाद घेऊन अश्विनी ही वडील बंडू उघडे आणि सहाय्यक शिक्षक वैरागकर यांच्यासह राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार वितरण समारंभ आणि प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त बालक उघड्या जिप्सी मधून उपस्थितांना अभिवादन करणार आहेत. तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सम्मान होणार आहे.
शहराच्या ठिकाणीही अभावानेच गेलेली अश्विनी केवळ आपल्यातील धाडस आणि शौर्याच्या बळावर मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत दाखल झाली आहे. ती प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाच्या सरावात १६ जानेवारी २०१५ रोजी सामील झाली आहे. यावर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या दिमाखदार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यामुळे अश्विनीला सन्मानाने ओबामा यांना अभिवादन करण्याची संधीही मिळाली आहे. दिल्लीच्या वास्तव्यात अश्विनी ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटून आशीर्वाद घेणार आहे. अश्विनीच्या शौर्याची गाथा महाराष्ट्रासह देशावासीयांना प्रेरणादायी अशीच आहे.

-रितेश मो. भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate