অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'एकलव्य'

'एकलव्य'


सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल.. पण हे वातावरण होते नाशिकमधील आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूलमधील... आदिवासी जमातीच्या या मुलांचे ज्ञान व इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व पाहून राज्यपाल सी. विद्यासागर रावही आश्चर्यचकित झाले होते.
शुक्रवारी, दि. 30 जानेवारी 2015 रोजी महामहीम राज्यपाल सी. विद्यासागर राव हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मलाही सहभागी होता आले अन् राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने राबविलेल्या योजना समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरील आदिवासी बांधवांच्या मुलांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचल्याचे दिसले. एरवी आपण फक्त ऐकून असतो.... अनेक वेळा फक्त बोलत असतो की, आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात. शासनही हा विचार करूनच अनेक योजना राबविते. पण त्याचे फायदे मात्र समाजापर्यंत पोहोचत नाहीत, अशी टिका होते. परंतु या कार्यक्रमाने हे सिद्ध करून दाखविले की संधी मिळाली तर समाजाच्या अगदी खालच्या स्तरावरील विद्यार्थीही त्याचे सोने करू शकतो व उज्ज्वल भवितव्य घडवू शकतो.
नाशिकच्या पेठ रोड भागात हे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल वसलेले आहे. सीबीएसई पॅटर्नच्या या शाळेत सातशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात. राज्यपाल महोदय शाळेला भेट देत आहेत हे कळाल्यावर या शाळेतील मुलांचा उत्साह वाढला होता. मान्यवर येण्यापूर्वी या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या स्थानिक भाषेत चर्चा सुरू होती अन् काय करायचे याचे नियोजनही सुरू होते. त्यांच्यातील स्थानिक भाषेतील चर्चेवरून वाटले की हे नेहमीच्या शाळेसारखीच मुले असतील, पण नंतरच्या कार्यक्रमांनी हा समज साफ खोडून काढला.
शाळेतील विज्ञान केंद्राचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाले. विज्ञानाच्या या अभिनव प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानंतर राज्यपाल महोदयच काय तर उपस्थित सर्वांच्याच आर्श्चयाला पारावर राहिला नाही. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाणी शुद्धीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जा, पर्यावरण रक्षण, जैवविविधता अशा विविध विषयांवरील प्रयोग तयार केले होते. राज्यपाल महोदयांनी प्रत्येक प्रयोगाची सविस्तर माहिती घेतली. प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाची 'प्रॅक्टिकल'सह माहिती सफाईदार इंग्रजीतून दिली. त्यांचे इंग्रजी संभाषण ऐकून ही मुले खरचं आदिवासी भागातून आली आहेत का? अशी शंका उपस्थितांच्या चेहऱ्यावर दिसत होती. राज्यपाल महोदयांनी विचारलेल्या प्रयोगासंबंधीच्या शंकांचे त्याच तातडीने व अभ्यासपूर्ण विवेचन हे विद्यार्थी-विद्यार्थिनी करताना दिसत होते. त्यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण व अभ्यासू सादरीकरण पाहून सर्वच जण आवाक झाले होते.
विज्ञान केंद्राच्या उद्घाटनानंतर खरा आश्चर्याचा धक्का उपस्थितांना बसला, तो म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन शाळेतील विद्यार्थीच करत होते. सूत्रसंचालन करणाऱ्या प्रार्थना गावित व शाळेची माहिती देणाऱ्या मालती भोये या विद्यार्थिनींनी व आभार प्रदर्शन करणारा पंकज पावरा यांनी आपल्या सफाईदार इंग्रजीतून मान्यवरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही छाप पाडली. प्रार्थना व मालती यांच्या अभ्यासू भाषणाने शाळेच्या उपयुक्ततेची खात्रीच पटली.
राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या या टॅलेंटचे कौतूक केले. या विद्यार्थ्यांनी एकलव्य शाळेची पताका देशभरच नव्हे तर जगभर फडकवावी. या शाळेच्या माध्यमातून आपले ज्ञान वाढवून पुढील आयुष्यात आयएएस, आयपीएस, वकील, डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच तुम्ही दिसायला सुंदर आहात.. तुम्ही चांगले टीव्ही 'अँकर' व अभिनेतेही बनू शकता, असेही त्यांनी सांगितले.
'एकलव्य' शाळेत शिकलेले 18 जण डॉक्टर आहेत. तर 12 जण फार्मसी, 52 जण अभियंते, 24 जण कृषी पदवीधर, 26 जण विज्ञान पदवीधर, 9 विद्यार्थिनी या नर्सिंग केलेल्या तर बी.टेक आणि पीएच.डी केलेले प्रत्येकी एक जण आहेत. या शाळेची ही संपत्ती पाहिल्यास एका छोट्या योजनेचे हे रोपटे आता वटवृक्ष होत असल्याची साक्ष देत असल्याचे दिसते.
महाभारतात ज्याप्रमाणे आदिवासी समाजातील एकलव्यने सर्व अडीअडचणींवर मात करून एकाग्र चित्ताने गुरुकडून विद्या प्राप्त केली, त्याचप्रमाणे आजचे 'एकलव्य' हे राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ज्ञान घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या या 'एकलव्य' स्कूलचे मॉडेल जगभर पोहोचल्यास नवल वाटणार नाही. हा आशावाद मनात ठेवूनच राज्यपाल महोदय आणि इतर वरिष्ठ मान्यवरांसह तेथून निघालो. पुन्हा एकदा येथे भेट देण्याच्या इच्छेने.

- नंदकुमार वाघमारे
माहिती अधिकारी, शिर्डी

-माहिती स्रोत: महान्यूज, रविवार, ०१ फेब्रुवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate