অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खो-खोची सुवर्णकन्या सारिका काळे...

खो-खोची सुवर्णकन्या सारिका काळे...

मराठवाडा विभागातील उस्मानाबाद तालुक्यातलं रुईभर गाव… तालुक्याच्या ठिकाणी जायला दहा ते पंधरा किलोमीटरचा रस्ता, या भागात दुष्काळ पाचवीला पूजलेला. घरी कुणी शिकलं सवरलेलं नाही… नित्यनियमाने दुसऱ्याच्या शेतात राबराब राबणे हेच दररोजचे काम. अशा कौटुंबिक पार्श्वभूमीतून सारिका सुधाकर काळे हिने राज्यात, देशात व आशिया खंडात खो-खो स्पर्धेत भारताचे नेतृत्व करुन उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे. गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढविला आहे.

सारिका काळे हिचे गाव रुईभर, ता.जि. उस्मानाबाद असून घरची परिस्थिती हलाखीचीच, वडील अपंग, आई व आजी यांच्या अथक मेहनतीने सारिकाने पहिली ते 12 वीपर्यंतचे शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल, उस्मानाबाद येथे करुन पदवीचे शिक्षण तेरणा महाविद्यालय उस्मानाबाद येथे तर पदव्युत्तर शिक्षण कला, वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग येथे केले. प्राथमिक शिक्षण घेत असताना इयत्ता 5 वीपासून श्रीपती भोसले हायस्कूलमध्ये खो-खो खेळ खेळतच आपल्या खेळाचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरली. प्रथमच 2006-2007 मध्ये महाराष्ट्र संघात निवड झाली. आपल्या अथक प्रयत्नाने सलग 20 राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड, या सांघिक खेळामध्ये 12 सुवर्ण, 4 रौप्य व 4 कांस्यपदके मिळवून दिली. सन 2010-11 ला सारिकाची प्रथमच महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली व छत्तीसगढमध्ये सुवर्णपदक मिळाले. नंतर तिने तीन राष्ट्रीय स्पर्धाकरिता कर्णधारपद भूषविले.

सन 2015-16 मध्ये प्रथमच भारतीय संघात निवड व भारतास सुवर्णपदक मिळवून दिले. सन 2016 मध्ये आसाम गोहाटी येथे खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड व तेथेही सुवर्णपदक पटकाविले. रुईभर येथील या कुमारिकेने महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी 4 वेळा, भारत देशाच्या खो-खो संघाच्या कर्णधारपदी 1 वेळा राहून भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात यशस्वी भूमिका बजावली आहे. तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खो-खो संघाची सदस्य व तिसऱ्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमानही प्राप्त केला आहे.

सारिकाचे प्रशिक्षक उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. चंद्रजित जाधव यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, सारिकाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश संपादन केले आहे. मैदानावरील सातत्य, 14 वर्षे अविरतपणे रोज सराव, काहीवेळा उपाशीपोटी पण सराव केला. सारिका मितभाषी असून गुणी खेळाडू आहे पण मैदानावर मात्र ती फार आक्रमक खेळी करते.

सारिकाविषयी बोलताना उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांची कमतरता असतानाही सारिकाने अथक परिश्रमाने खो-खो या खेळात गरुड भरारी घेऊन भारतास आशियाई खो-खो स्पर्धा व दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताचे नेतृत्व करुन सुवर्णपदक मिळवून देवून नावलौकिक केले आहे.

सारिकाने क्रीडा क्षेत्रातील खेळाडू म्हणून अतुलनीय यश मिळविले आहे. दि. 21 ते 25 नोव्हेंबर 2006- 28 वी ज्युनियर नॅशनल खो-खो स्पर्धा- चिमनबाग मैदान इंदोर - सुवर्ण, दि. 13 ते 17 फेब्रुवारी 2007- 52 वी स्कूल नॅशनल- विशाखापट्टनम - आंध्रप्रदेश- सुवर्ण, 4 ते 8 जानेवारी 2008-53 वी स्कूल नॅशनल बिजापूर कर्नाटक - रौप्य, दि. 8 ते 12 डिसेंबर 2008- 54 वी स्कूल नॅशनल, वेस्ट बंगाल - सुवर्ण, दि. 11 ते 14 नोव्हेंबर 2009 - 35 वी महिला नॅशनल, गोवा-कास्य, दि. 20 ते 24 जानेवारी 2010, 29 वी ज्युनिअर नॅशनल, गोवा - रौप्य, दि. 27 ते 02 डिसेंबर 2010 - 56 वी स्कूल नॅशनल, अमृतसर, पंजाब - रौप्य, दि. 16 ते 20 मे 2010 44 वी सिनिअर नॅशनल - मुंबई - सुवर्ण, दि. 23 ते 27 ऑक्टोबर 2010 - 30 वी ज्युनिअर नॅशनल, बिजाई छत्तीसगड - सुवर्ण, दि. 1 मे 2011 रोजी जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार, दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2012 - 22 वी फेडरेशन कप - बेंगलोर कर्नाटक - कास्य, दि. 8 ते 12 डिसेंबर 2012 - 46 वी सिनिअर नॅशनल - बारामती - सुवर्ण, दि. 27 ते 30 नोव्हेंबर 2013 - 39 वी महिला नॅशनल - कर्नाटक - सुवर्ण, दि. 12 ते 16 फेब्रुवारी 2014- 47 वी सिनिअर नॅशनल - गोवा - रौप्य, दि. 31 जानेवारी 14 फेब्रुवारी 2014 - 35 वी नॅशनल गेम्स - केरळ - सुवर्ण, दि. 23 ते 25 एप्रिल 2015 - 25 वी फेडरेशन कप - सांगली - सुवर्ण दि. 7 ते 11 जानेवारी 2015, 48 वी सिनिअर नॅशनल - बेंगलोर - सुवर्ण, दि. 11 जानेवारी 2015 रोजी बेंगलोर (कर्नाटक) येथे राणी लक्ष्मीबाई पुरस्कारप्राप्त.

दि. 23 ते 27 नोव्हेंबर 2015 रोजी 49 वी सिनिअर नॅशनल - सोलापूर सुवर्ण, दि. 20 ते 23 डिसेंबर 2015 महिला नॅशनल दक्षिण आशियाई स्पर्धा - पंजाब - सुवर्ण व दि. 6 ते 9 फेब्रुवारी 2016 रोजी आसाम गोहाटीमध्ये भारतीय खो-खो संघाचे कर्णधारपद धारण करुन सुवर्णपदक संघास प्राप्त झाले.

तिने सांगितले की, आमची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असली तरी मी माझ्या आई व आजी यांच्या मेहनतीने व मला मिळालेल्या खो-खो खेळातील रोख रकमेच्या परिक्षेत्रातून, शिष्यवृत्तीतून कुटूंब चालवतोय. यापुढे मी खो-खो हा खेळ माझे ध्येय असून नवीन खेळाडू तयार करणे, तसेच भारतीय रेल्वेकडून खो-खो खेळण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

-मनोज शिवाजी सानप,

जिल्हा माहिती अधिकारी, उस्मानाबाद.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate