অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जरेवाडीची ‘आय.एस.ओ.’ शाळा !

जरेवाडीची ‘आय.एस.ओ.’ शाळा !

गावोगावी खाजगी शाळांचे वाढलेले पेव, इंग्रजी शाळांची वाढती संख्या पाहून या तुलनेने शासनाच्या शाळांची अवस्था फारशी चांगली नसल्याचे समजले जाते. मात्र या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील जरेवाडी या ऊसतोडणी मजुरांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने लौकिक प्राप्त केला आहे. भौतिक सुविधा, गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा विकास यामुळे आय.एस.ओ. मानांकनाचा बहुमान मिळविणारी ही जिल्ह्यातील एकमेव आदर्श शाळा ठरली आहे.

पाटोदा तालुक्यातील 65 कुटूंबे व 431 लोकसंख्येचे जरेवाडी हे छोटसे गाव आहे. 1995 पर्यंत येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत केवळ 24 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 1995 मध्ये या शाळेवर संदीप पवार हे शिक्षक रुजू झाले आणि हळूहळू शाळेचे रुप बदलण्यास सुरुवात झाली. ऊसतोडणी मजुरांच्या या छोट्याशा गावात श्री. पवार यांनी पालकांना विश्वासात घेऊन घेऊन मुलांच्या कल्याणासाठी काही तरी वेगळे करुन करण्याची भावना बोलून दाखविली आणि ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. आधी केले मग दाखविले याप्रमाणे श्री. पवार हे दिवाळी-उन्हाळ्याची सुटी न घेता शाळेत विविध उपक्रमातून विद्यार्थी घडवित होते. त्यांना इतर शिक्षकांचीही भक्कम साथ होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणित प्रगती उंचावत होती. हे पाहून ग्रामस्थांनी शाळेला दरवर्षी भरभरुन मदत करण्याचा शिरस्ता घातला.

येथे सध्या पहिली ते आठवीपर्यंत 515 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज जरेवाडीची शाळा जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून नावारुपास आली आहे. शाळेस भेट देण्यासाठी राज्यभरातील शिक्षक- विद्यार्थी दर शनिवारी, रविवारी जरेवाडीत येत आहेत. शाळेचा लौकिक उंचावण्यासाठी कष्ट घेणारे शिक्षक संदीप पवार यांना 2009 मध्ये सकाळ माध्यम समुहाने औरंगाबाद येथील कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला. 2013 मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. मान्यवरांनी या शाळेस भेट देऊन शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले आहे. जिल्हा परिषदेनेही शाळेस आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या जरेवाडी येथील हायटेक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, डिजिटल क्लासरुम, ई-लर्निंग सुविधा, संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, विद्यार्थ्यांची बचत बँक, विद्यार्थ्यांसाठी बाग, सुसज्ज वसतीगृह आदी सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही उंचावली आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी विविध परीक्षांत तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर दरवर्षी चमकत आहेत. या शाळेचा आदर्श इतर शाळांना प्रेरणादायी आहे.

लेखक: अनिल आलुरकर,

जिल्हा माहिती अधिकारी, बीड.

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 12/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate