অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जळगावच्या निशा पाटीलच्या शौर्याचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक

जळगावच्या निशा पाटीलच्या शौर्याचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक

विविध क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्राला थोर नररत्नांची परंपरा आहे. राज्यातील महापुरुषांनी गाजविलेल्या शौर्य गाथेने आपल्या देशाला सकारात्मक दिशा देण्याचं मोलाचं काम केलंय. शौर्याची हीच परंपरा राज्यातील नव्या पिढीनेही कायम ठेवली आहे. जळगांव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिच्या शौर्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ जानेवारी २०१७ रोजी तिचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याच्या शौर्याची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा होत आहे.

भारत देशाच्या वेग-वेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या ६ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून निशा पाटील हिची राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली. निशा हिने सहा महिन्याच्या चिमुरडीला आगीच्या विळख्यातून सुखरूपपणे बाहेर काढत दाखविलेल्या साहसाची नोंद घेत तिची या पुरस्कारासाठी निवड झाली.

१४ जानेवारी २०१५ ला सकाळी १० वाजताच्या सुमारास निशा पाटील आपल्या मैत्रिणीकडे आली असता शेजारच्या घरातून धूर निघत असल्याचे तिने पाहिले. समोर घराला आग लागली आणि घरात लहानगी असल्याचे कळताच निशाने त्या चिमुरडीचा जीव वाचविण्यासाठी घरात उडी घेतली.

घराच्या छताला आग लागलेली, पडद्यांनीही पेट घेतली आणि ज्या पाळण्यात लहानगी झोपली होती तो पाळणाही जळून तुटला होता. पाळण्यातली लहानगी पूर्वी देशमुख जिवाच्या आकांताने रडत होती हे चित्र पाहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता निशाने लहानग्या पूर्वीला आगीतून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. मोठ्या मुलाला शाळेत पोहचविण्यासाठी गेलेली पूर्वीची आई, कौशल्या देशमुख परत आली तेव्हा घराला लागलेली आग आणि त्यातून सुखरूप बाहेर दिसलेली आपली लहानगी पाहून तिने निशाचे शतश: आभार मानले.

या प्रसंगानंतर गावात व परिसरात निशाच्या धाडसाचे व शौर्याचे कौतुक होत होते. भडगाव येथील निशा शिकत असलेल्या आदर्श कन्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी निशाच्या धाडसाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात यावी म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अर्ज केला. या अर्जासोबत उचित कागदपत्र आणि माहिती जोडली. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत दिल्लीस्थित राष्ट्रीय बालकल्याण परिषदेकडे यासंबंधित पत्रव्यवहार केला.

या कामी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळाली. परिणामी निशाची यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले. याचा आनंद निशाच्या शाळेत व पंचक्रोशीत साजरा करण्यात आला. या सर्व शुभेच्छा व आशीर्वाद घेऊन निशा ही थोरला भाऊ योगेश पाटीलसह राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार वितरण समारंभ आणि प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाली.

सध्या निशा ही भडगाव येथील आदर्श कन्या कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीत शिकत आहे. आठव्या वर्गात हिंदीच्या पुस्तकात ‘साहसी बालक’ या धड्यातून तिला साहसीकृत्याची प्रेरणा मिळाल्याचे ती सांगते. निशाचे आई-वडील शेतकरी आहेत. निशाला दोन थोरले भाऊ असून भावंडामध्ये ती धाकटी आहे. ‘धावणे’ आणि ‘लांब उडी’ हे निशाचे आवडते खेळ आहेत आणि या खेळांमध्ये तिने तालुकास्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करण्याचे निशाचे ध्येय आहे.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त बालक उघड्या जिप्सीमधून उपस्थितांना अभिवादन करणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने निशाचा सम्मान झाला. मोठ्या शहराच्या ठिकाणीही अभावानेच गेलेली निशा केवळ आपल्यातील धाडस आणि शौर्याच्या बळावर मानाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीत दाखल झाली. ती सध्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनाच्या सरावात सामील झाली आहे. दिल्लीच्या वास्तव्यात निशाने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून केवळ आपल्यातील धाडसाच्या जोरावर निशाने केलेले कार्य महाराष्ट्रासह देशवासियांना प्रेरणादायी असेच आहे.

लेखक - रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate