অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाल कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी

बाल कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी


आपला देश कृषी प्रधान देश म्हणून जगविख्यात आहे. शेती हीच आपली जीवनदायिनी आहे. मात्र आता बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कृषी विकास व कृषी उत्पादन वाढविणे काळाची गरज ठरत आहे. हीच संकल्पना अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेतील बालकांनी पुढे नेत अभिनव कृषी प्रदर्शनी साकारली.
बारा वर्षाच्या आतील बालवयोगट इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिकणारा आहे. मात्र या बालकांची कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. या प्रदर्शनीत कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान, शेतकऱ्यांचा झोपडीतील संसार, जात्यावरचे दळण, शेतकऱ्याची न्याहारी आदी बाबी अत्यंत सुबक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. अशा परंपरागत मॉडेल्ससह आधुनिक यंत्रसामग्री, कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारे मॉडेल देखील प्रदर्शनीला भेट देणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. इतकेच नव्हे तर हे बालशास्त्रज्ञ कृषी प्रदर्शनीला भेट देणाऱ्या नागरिकांना कृषी प्रदर्शनीत ठेवलेल्या विविध मॉडेल्सची उपयोगिता अगदी सराईतासारखी सांगताना दिसत होते.
कृषी संबंधित शेतीचा शोध, वनराई बंधारा, मशरूम लागवड, पिपरीची शेती, आयुर्वेदिक मच्छर अगरबत्ती अशा अनेक मॉडेलची रचना येथे साकारण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळील ‘काळ्या मातीत मातीत; तिफण चालते, भारनियमनातही फुलवा बाग, जगाचा पोशिंदा, आधुनिक पेरणी यंत्र आदी अनेक मॉडेल्स या प्रदर्शनीत विशेष आकर्षण ठरत आहेत.
लहान मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणाला विकसित करण्याच्या दृष्टीने संगई संस्थेच्या वतीने आयोजित केलेली ही प्रदर्शनी सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. या प्रदर्शनीमध्ये 7 कक्ष असून या कक्षांना डॉ. पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, लाल बहादूर शास्त्री, जगदीशचंद्र बोस, डॉ. पंचानन महेश्वरी आणि डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची नावे देण्यात आली आहेत. कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या महापुरूषांची, शास्त्रज्ञांची नावे या कक्षांना देण्यात आल्यामुळे त्यांच्या कार्याचा या माध्यमातून निश्चितच गौरव होत आहे.
अंजनगाव (सुर्जी) येथे 15 ते 17 जानेवारी 2015 या तीन दिवसाच्या कालावधीसाठी संगई प्राथमिक शाळेच्या वतीने डॉ. एम. एस. स्वामिनाथन परिसरात वर्ग 1 ते 4 च्या 222 बालशास्त्रज्ञांनी सहभागी होऊन प्रदर्शनीत 111 विविध प्रकारचे मॉडल्स प्रेक्षकांसाठी सादर केले आहेत. या बालकृषी प्रदर्शनीचे उद्घाटन दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या हस्ते व संस्थेच्या अध्यक्ष अरूण संगई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अरूणा गोरले, ॲग्रोवनचे विदर्भ प्रमुख श्री. इंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, संस्थेचे सचिव अविनाश संगई आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली होती. मान्यवरांनी बालशास्त्रज्ञांचे भरभरुन कौतूक केले. ही कृषी प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असून बालकांचे कौतूक करण्यासाठी नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला अवश्य भेट दिली पाहिजे, असे मनापासून वाटते.

- अशोक खडसे,
सहाय्यक संचालक, अमरावती

माहिती स्रोत: महान्यूज, शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate