অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजपथावर चमकले महाराष्ट्राचे तारे : देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आयुष्याला नवे वळण देणारी

राजपथावर चमकले महाराष्ट्राचे तारे : देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी आयुष्याला नवे वळण देणारी

प्रजासत्ताक दिनी राजपथावर आयोजित पथसंचलनात नॅशनल कॅडेट कोर्प्स (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकांचे नेतृत्व करणारे अमन जगताप व खुशबू जोशी हे महाराष्ट्राचे तारे चमकले. महाराष्ट्रातर्फे देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची मिळालेली ही संधी आयुष्याला नवे वळण देणारी आणि आयुष्याच्या यशकथेची सुरूवात ठरेल, अशी भावना या दोघांनीही व्यक्त केली आहे.

अहमदनगर महाविद्यालय अहमदनगरच्या बीकॉम प्रथम वर्षाचा विद्यार्थी अमन जगताप याने पहिल्यांदाच एनसीसीत भाग घेतला. एनसीसीचे अनिवार्य कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करत अल्पावधीतच त्याने राजपथावरील पथसंचलनात देशभरातील ३०० कॅडेट्सचे नेतृत्व करण्याचे कठीणतम लक्ष्य साध्य केले.

मुंबई विद्यापीठाच्या व्हीपीएमआरझेड शाह महाविद्यालयात बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुंबईच्या खुशबू जोशीनेही एनएसएसच्या १६० सदस्यीय दलाचे नेतृत्व करून महाराष्ट्राला दुहेरी बहुमान मिळवून दिला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह गणमान्य व्यक्ती व राजपथावरील अलोट जनसमूहाच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा प्रेरणादायी आणि आयुष्यभर आठवणीत राहणार असल्याचे हे दोघे सांगतात.

येथील कॅन्टॉन्मेंट बोर्ड परिसरातील डिजी एनसीसी आर्मी परेड ग्राऊंडवर १ जानेवारी पासून सुरु झालेल्या देशभरातील १७ विभागातील २०७० एनसीसी कॅडेट्समधे चमकून उठण्याचे आव्हान अमन जगताप समोर होते. महाराष्ट्रातून बेस्ट कॅडेट ठरलेल्या अमनने त्याचे शिक्षक वडील डॉ. हनुमंत जगताप यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे व आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या शिबीरात प्रवेश केला, असं तो अभिमानाने सांगतो.

उत्तम ड्रील, उत्तम गायन, नृत्य आणि वक्तृत्व या अमनच्या जमेच्या बाजू. तुलनेने थोडे कमजोर असलेल्या सामान्य ज्ञानावर त्याने मनोरमा इयर बुक आणि क्रॉनीकल स्पर्धा पुस्तकाच्या माध्यमातून मात केली. त्याने शिबिरातील फ्लॅग एरिया स्पर्धेत महाराष्ट्रात साजरा होणारा गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान, संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या अभंगाचा लोक जीवनावर प्रभाव, राज्यातील गढ-किल्ले आणि बॉलीवूडबाबत माहिती देऊन प्रथम क्रमांक पटकवला.

राजपथावरील पथसंचलनासाठी शिबिरात १० जानेवारी २०१५ ला एकूणातून २०० कॅडेट्सची निवड झाली. त्यातील १५० मुलांची अंतिम निवड करण्यात आली. अशाच पद्धतीने मुलींचीही निवड होऊन राजपथावर एकूण ३०० कॅडेट्स परेड करणार आणि त्यात महाराष्ट्रातील १७ मुले आणि १७ मुली असणार हेही निश्चित झाले. महाराष्ट्रातून 76 मुले आणि ३७ मुली असे एकूण ११३ एनसीसी कॅडेट्स या शिबिरात सहभागी झाले होते.

आता खरी शर्यत होती ती राजपथावरील पथ संचलनाच्या नेतृत्वासाठी कोणाची निवड होते याची. या शर्यतीत बिहार, पंजाब आणि महाराष्ट्रातून अमन आणि कोल्हापूरचा सैफअली नदाफ हे कॅडेट्स होते. अशात नवीन आव्हान सुरु झाले. १७ जानेवारी २०१५ पासून शिबिरापासून जवळपास १० ते १२ किमी लांब अंतरावर असणाऱ्या राजपथावर प्रत्यक्ष परेड करण्याचे ते आव्हान होते. यासाठी रात्री १ वाजता उठून आम्ही सर्व आवरून २ वाजता कॅम्पमधून बाहेर पडायचो.

३.३० ला राजपथावर आल्यानंतर आमच्याकडे बंदूक असल्याने कसून तपासणी व्हायची. त्यानंतर पहाटे ४ वाजता पासून आम्ही राजपथाच्या अडीच किमी रस्त्यावर परेड करायचो. दुपारी १२ वाजता परेड करून शिबीर स्थळी पोहचायचो. १७ जानेवारीलाच माझा गळा खराब झाला, त्यामुळे राजपथावरील नेतृत्वाची संधी हुलकावनी देणार की काय असं वाटून गेलं. पण तेलकट खानं बंद करून आणि नियमीत मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून त्यावर मात केली.

अखेर २३ जानेवारीच्या राजपथावरील फुल ड्रेस परेडचे नेतृत्व माझ्याकडे आले, अन् तेव्हाच मी २६ जानेवारीच्या पथसंचलनात एनसीसीचे नेतृत्व करणार हे स्पष्ट झाल्याचे अमन सांगत होता. २६ जानेवारीचा दिवस उजाडला. आता राजपथावर पाय ठेवताना वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावण्याचे ध्येय समोर ठेवून आतापर्यंतचे सर्वोत्तम संचलन केल्याचे अमन सांगतो.

या शिबिरातील विविध स्पर्धा अन परेडवरील आपल्या हुकमतीमुळे आर्मीच्या बऱ्याच ऑफीसर्सशी बोलून मनातील शंका दूर झाल्या. आता आपल्याला पदवी शिक्षण पूर्ण करून आर्मीच्या आर्टेलरी विभात अधिकारी बनायचे असल्याचे सांगत त्यासाठी राजपथावरील पथसंचलनाचे नेतृत्व करण्याची संधी खूप मोठी उपलब्धी असल्याचेही अमन सांगतो.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पहिल्या वर्षात असतानाच खुशबू जोशीला प्रजासत्ताक दिन पथसंचलन प्रशिक्षण शिबिरातून परत आलेल्या आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्या अंगावरही प्रजासत्ताक दिनाचा कोट असावा असे सारखे वाटायचे. समाजसेवेची आवड असल्यानेच खुशबूने एनएसएसमधे भाग घेतला.

नागपूर, अमरावती आणि आंध्रप्रदेशातील राजमंड्री येथील प्रजासत्ताक दिन पूर्व शिबिरात सहभाग घेऊन तिने बेस्ट एनएसएस स्वयंसेवकाचा मान मिळवला. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्पोर्ट कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित प्रजासत्ताक दिन पथसंचलन पूर्व शिबिरात महाराष्ट्रातून सहभागी ७ मुले आणि ७ मुली आणि गोव्यातील २ मुले-मुली अशा एकूण १६ स्वयंसेवकांमधे माझा समावेश होता, असे खुशबू सांगते. देशभरातील ५ विभागातून २०० स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते. यातील १६० जणांची निवड राजपथावरील अंतिम पथसंचलनासाठी झाली होती.

नियमित सरावात खुशबूला पथसंचलनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. अन् इथेच तिला राजपथावरील पथसंचलनासाठी आपली निवड होईल असे वाटले. या निवडीच्यावेळी तिला हरियाणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकी एक अशा तिघांचे आव्हान होते. खुशबू ने आलेली संधी दवडायची नाही याची खूणगाठ मनात बांधून पथसंचलनाचा सराव केला. पथसंचलनाच्या घोषणा देण्यासाठी मैदानावर जाऊन तासन् तास सराव केला.

तेलकट पदार्थ वर्ज्य केले, असेही ती सांगते. खुशबूच राजपथावर एनएसएसच्या पथकाचे पथसंचलन करणार हे २३ जानेवारीच्या फुल ड्रेस परेडमधे निश्चित झाले.
“२६ जानेवारीच्या सकाळी राजपथावर पहिले पाऊल ठेवले तोच तीन वेळा माझ्या नावाची घोषणा झाली. पण मला माझं नाव आणि आडनाव ऐकू येत नव्हतं.... फक्त माझ्या वडिलांचं नारायण हे नाव ऐकायला येत होतं.... तेव्हा मला फक्त वडिलांसाठी आणि माझ्या राज्याच्या नावासाठी राजपथावर चालायचे आहे हे ठरवून मी पथसंचलनाचे नेतृत्व केले.” हे सांगताना खुशबू भावूक झाली होती.

खुशबूचे वडील नारायण जोशी हे एका खाजगी कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत आहेत तर तिची आई लीना जोशी या व्यावसायिक आहेत. खुशबूला भारतीय परराष्ट्र सेवेत जायचे असून राजपथावर पथसंचलनात नेतृत्व करण्याचा अनुभव आपल्या आयुष्याला महत्वाचे वळण देणारा ठरल्याचे खुशबू सांगते.

एकूणच अमन आणि खुशबू यांनी राजपथावर एनसीसी आणि एनएसएस परेडमध्ये नेतृत्व करण्याची मिळविलेली संधी ही त्यांनी ध्येय समोर ठेवून केलेल्या परिश्रमांचे फलितच म्हणावे लागेल. त्यांनी मिळविलेले हे यश आयुष्यासाठी ठरविलेले ध्येय गाठण्यासाठीची सुरूवात ठरणार, हे निश्चित.

-रितेश मो. भुयार
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, २९ जानेवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate