অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतमजूराचा मुलगा झाला नायब तहसीलदार

शेतमजूराचा मुलगा झाला नायब तहसीलदार

गरिबी काय असते हे अत्‍यंत जवळून अनुभवले आहे. माझ्‍या आई वडिलांनी मोलमजुरी करून अत्‍यंत हलाखीच्‍या परिस्थितीत मला शिकवलं. वीस गुंठे शेतीसोबतच इतरत्र मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या माझ्‍या आई वडिलांमुळेच आज मी नायब तहसीलदार होऊ शकलो, अशी प्रतिक्रिया राज्य लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षेत यश मिळवून नायब तहसीलदार झालेल्‍या महेश सुभाष हांडे यांनी दिली आहे.

संगननेर तालुका मुख्‍यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर डोंगराच्‍या कुशीत वसलेले कोठे बुद्रुक गाव. गावात अजूनही मोबाईलची रेंज नाही. अशा छोट्याशा गावात हांडे परिवार राहतो. सुभाष हांडे, त्‍यांच्‍या पत्‍नी अलका हांडे, मुलगी प्रतिक्षा व यश मिळविलेले महेश असा चार लोकांचा छोटासा परिवार आहे. शेती हाच हांडे कुटुंबाचा मुख्‍य व्‍यवसाय. वीस गुंठे शेतीत कांद्यासह इतर पिके घेतात. स्‍वतःच्‍या शेतीतील काम झाले की मोलमजूरी करून मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. राबणाऱ्‍या हातावर त्‍यांचा मोठा विश्‍वास आहे.

पहिली ते सातवीपर्यंतचे महेश यांचे शिक्षण गावातीलच जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षणही गावातील अमृतेश्‍वर विद्यालयात झाले. दहावीत महेश यांनी दुसरा क्रमांक मिळविला. संगमनेर येथे अमृतवाहिनी तंत्रनिकेतन येथे मॅकेनिकल पदविकेसाठी प्रवेश घेतला, चांगले यशही मिळाले. मात्र शिक्षणाच्‍या खर्चाचा भार सोसवत नसल्‍यामुळे महेश यांनी पदाविकेपर्यंतच्‍या शिक्षणानंतर पिंपरीचिंचवड येथील टाटा मोटर्स मध्‍ये 2011 ते 2012 मध्‍ये नोकरी करण्‍याचा निर्णय घेतला. याच दरम्‍यान पुणे विद्यापिठात बी.ए.ला प्रवेश घेतला. दिवसभर नोकरी व रात्री अभ्‍यास असा दिनक्रम सुरू होता, महेशचा हा दिनक्रम पाहून गावातील गोरक्ष सपकाळ यांनी आर्थिक मदतीसह धीर देण्‍याचे काम केले. 2014 मध्‍ये राज्‍यशास्‍त्रात पदवी मिळाली. 2015 ला राज्‍यसेवेची पूर्व परिक्षा दिली, मात्र पहिल्‍या प्रयत्‍नात अपयश आल्‍याचे महेश सांगतात, मात्र अपयशानंतर चांगली तयारी करून परीक्षा देण्‍याचा निश्‍चय केला.

महेश यांनी पिंपरी चिंचवड येथील नोकरी सोडून थेट कोपरगाव येथील आत्‍मा मालिक या संस्‍थेत प्रवेश घेतला व अभ्‍यासाला सुरुवात केली. 2016 मध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली यामध्‍ये महेश यांना 900 पैकी 482 गुण मिळाले आणि नायब तहसीलदार पदावर त्‍यांची निवड झाली. त्‍यांच्‍या निवडीने त्‍यांच्‍या आई वडिलांच्‍या चेहऱ्‍यावर काही वर्षापासून केलेल्‍या मेहनतीला यश आल्‍याचं समाधान आहे तर क्‍लासवन अधिकारी होण्‍याचं स्‍वप्‍न लवकरच पूर्ण करणार असे महेश मोठ्या आत्‍मविश्‍वासाने सांगतात.

लोकराज्‍यने दिली प्रेरणा

महाराष्‍ट्र शासनाच्‍या लोकराज्‍य मासिकातील यशोगाथा व उपयुक्‍त माहितीने आपल्‍याला प्रेरणा दिल्‍याचे महेश हांडे सांगतात. नायब तहसिलदारपदी निवड झाल्‍यानंतर शिर्डी उपमाहिती कार्यालयाला महेश यांनी भेट देत लोकराज्‍यचा आपल्‍याला खूप उपयोग झाल्‍याचे आवर्जुन सां‍गितले.

लेखक - गणेश फुंदे
प्रभारी माहिती अधिकारी, 
उप माहिती कार्यालय, शिर्डी
स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate