অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुंदर माझे घर

सुंदर माझे घर

सुंदर माझे घर बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! '

माहिती संकलन - अमरीन पठाण

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate