অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे, त्यातही या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो, मात्र आर्थिक अडचणींमुळे परदेशात उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. योग्य व हुशार विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दर वर्षी अर्ज मागविण्यात येतात. यंदाही सन 2017-18 या वर्षात परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी 3 जुलै 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसे करावे व त्याची प्रक्रिया काय आहे, यासंबंधी थोडक्यात माहिती.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मुला / मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना असे या योजनेचे नाव आहे. अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) उच्च शिक्षण पूर्ण करणेसाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

महाराष्ट्रातील अनूसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत QS world University Ranking 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते.

योजनेच्या अटी व शर्ती :-

1. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. विद्यार्थी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध असावा.

3. विद्यार्थ्यांना परदेशातील अद्ययावत QS world University Ranking 300 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा.

वयोमर्यादा :

जाहिरात प्रसिद्ध झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस उमेदवारांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. तथापि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत आहे.

उत्पन्न मर्यादा :

1. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 मध्ये (QS world University Ranking top 100) असणाऱ्या परदेशी विद्यापीठामध्ये आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही.

2. QS world University Ranking 101 ते 300 पर्यंत अद्ययावत जागतिक रॅंकिंग असणाऱ्या विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटूंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु 6.00 लाखापेक्षा जास्त नसावे.

3. नोकरदारांसाठी मासिक पगारपत्रक आणि आयकराचे Assessment Statement किंवा फॉर्म नंबर 16 दाखल करणे आवश्यक आहे. तसेच इतरांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार वा शासनाने प्राधिकृत केलेल्या पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांनी दिलेल्या मागील वर्षाचे (सन 2016-17) कुटूंबाचे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

शैक्षणिक अर्हता :

1. पदव्युत्तर पदवीसाठी विद्यार्थ्यांने पदवी परीक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. पीएच.डी.साठी विद्यार्थ्यांने पदव्युत्तर पदवीची परिक्षा एकाच प्रयत्नात उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी :

1. पीएच.डी.साठी कमाल 4 वर्षे तर पदव्युत्तर पदवीसाठी कमाल 2 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी असेल.

2. पदव्युत्तर पदवीसाठी कमाल 2 वर्षे किंवा यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी.

एकाच कुटूंबातील कमाल पात्रता धारक :

एका कुटूंबातील एका पेक्षा जास्त व्यक्तींना लाभ घेता येईल. मात्र ज्या उमेदवाराच्या कुटूंबातील अन्य सदस्यांस यापूर्वी या योजनेचा लाभ झाला असेल त्या उमेदवाराचा शेवटी विचार करण्यात येणार आहे. जेणेकरुन त्या उमेदवाराच्या घरातील कोणास यापूर्वी लाभ झाला नसेल त्या उमेदवारास प्राधान्य मिळेल.

अनिवार्य अटी :

1. सन 2017-18 मध्ये ज्या परदेशी विद्यापीठाचे दिनांक 1 एप्रिल, 2017 रोजीचे (QSWR) क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 300 पर्यंत आहे. अशा नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

2. ज्या परदेशी विद्यापीठांची जागतिक क्रमवारी (Latest QSWR) 300 पर्यंत आहे, अशाच विद्यापीठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील. मात्र निवड ही गुणवत्तेनुसारच होईल.

3. परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी स्वत: प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा (उदा. GRE / TOFEL / IELTS इत्यादी आवश्यक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन असल्यास विद्यार्थ्यानी ते पूर्ण केले असले पाहिजे.)

4. परदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे प्रवेश पत्र (offer Letter) विद्यार्थ्यांना मिळालेले असणे बंधनकारक असेल.

5. पासपोर्ट, व्हिसा मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.

6. विद्यार्थ्यास ज्या परदेशी शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळालेली आहे, त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक असेल.

7. ही शिष्यवृत्ती केवळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास देण्यात येईल.

8. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल; परंतु द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पूर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही.

9. या शिष्यवृत्तीची निवड करतांना शेवटच्या क्रमांकावर एकापेक्षा अधिक विद्यार्थी पदव्युत्तर पदवी / पदवी परीक्षेमध्ये समान गुण असलेले असतील तेव्हा त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.

10. एकदा निवडलेले परदेशातील विद्यापीठ व अभ्यासक्रम कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाहीत. परंतू काही कारणास्तव विद्यार्थ्यास त्याची निवड झालेल्या अभ्यासक्रमास त्या वर्षी प्रवेश घेता आला नाही, तर त्यास पुढील वर्षीच्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्याची मुभा राहील.

11. अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास विद्यार्थ्यांवर शासनामार्फत खर्च करण्यात आलेली संपूर्ण रक्कम संबंधित विद्यार्थी / विद्यार्थ्यांचे पालक / जामीनदार यांच्याकडून एक रक्कमी वसूल केली जाईल व अशा अर्थाचे बंधपत्र संबंधित विद्यार्थी / विद्यार्थ्यांचे पालक / जामीनदार यांनी देणे बंधनकारक असेल.

12. अभ्यासक्रम संपल्यानंतर तीन महिन्याच्या आत संबंधीत विद्यार्थ्याने आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अंतिम गुणपत्रिका व प्रमाणपत्र यासह अहवाल सादर करणे बंधनकारक राहील.

13. परदेश शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांने परदेशात जाण्यापूर्वी परदेशातील विद्यापीठाने त्यांच्या लेटर हेडवर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासह विहीत केलेल्या विवरणपत्रात माहिती समाज कल्याण आयुक्तालयास सादर करणे आवश्यक राहील, ही विवरणपत्रे घेऊन जाणे व परदेशातील विद्यापीठास त्वरीत सादर करणे अनिवार्य राहील.

सदर शिष्यवृत्तीसाठी शाखानिहाय विभागणी :

अक्र.

शाखा / अभ्यासक्रम

पदव्युत्तर पदवी

डॉक्टरेट (पीएच.डी.)

1

कला

--

10

2

वाणिज्य

--

4

3

विज्ञान

--

6

4

व्यवस्थापन

8

--

5

अभियांत्रिकी

10

4

6

वैद्यकीय

8

--

 

एकूण

26

24

लाभाचे स्वरुप :

विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो.

• विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु. एस. डॉलर 14,000 तर यु.के.साठी जी.बी.पौंड 9,000 इतका अदा करण्यात येतो.

• विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस. ए. व इतर देशांसाठी यु. एस. डॉलर. 1375 तर यु. के. साठी जी.बी.पौंड 1,000 इतके देण्यात येतात. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

• विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च (Shortest Route & Economy Class) ई-तिकीट व मुळ बोर्डिंग पास सादर केल्यानंतर मंजूर करण्यात येतो.

अर्ज करण्याची पध्दत :

1. विद्यार्थ्याने जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज विभागाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा.

• www.maharashtra.gov.in

• https://mahaeschol.maharashtra.gov.in

• https://sjsa.maharashtra.gov.in

2. अर्जामधील प्रत्येक रकाने पूर्ण भरावेत, जो रकाना लागू नाही तेथे “लागू नाही” असे स्पष्ट लिहावे. अर्ज हा परिपूर्ण भरलेला असावा, अपूर्ण अर्जाचा व कोरे रकाने सोडलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2017 अशी आहे.

3. विहीत मुदतीत अर्ज आयुक्त, समाज कल्याण (शिक्षण शाखा), 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411 001 या पत्यावर पाठवावा.

राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील तरुणांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची ही एक चांगली संधी दिली आहे. या संधीचा फायदा तरुणांनी घ्यावा.

- नंदकुमार वाघमारे, सहायक संचालक (माहिती)

माहिती स्रोत: महान्युज



© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate