(अभ्यासक्रम). शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजतात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते. अभ्यासक्रम साधन होय, साध्य नव्हे; म्हणून तो उद्दिष्टांच्या अंकित असतो. उदा., ‘प्रत्येक व्यक्तीच्या अंगी स्वतःचे विचार प्रकट करण्याचे व दुसऱ्यांचे विचार समजून घेण्याचे सामर्थ्य असावे’ हे शिक्षणाचे एक उद्दिष्ट असते, म्हणून मातृभाषेच्या अभ्यासाला अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान देतात. ‘मुलांना आत्मनियंत्रण करता यावे’ हे लोकशाही शासनाचे शैक्षणिक उद्दिष्ट असते. म्हणून आण्यासक्रमात ‘मुलांचे स्वराज्य चालविणे’ हा अनुभव समाविष्ट करतात. हुकूमशाही शासनाची शिक्षण योजना असे अनुभव समावेश्य समजत नाही.
शिक्षणाच्या अवस्थेनुसार उद्दिष्टे बदलतात, म्हणून अभ्यासक्रमही बदलतो. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकाला ज्ञानार्जनाची मूलभूत साधने प्राप्त करून देणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात लेखन, वाचन, गणन या कौशल्यांना प्राधान्य असते. माध्यमिक शिक्षणाचे उद्दिष्ट बालकांच्या नैसर्गिक क्षमतेचे अन्वेषण करून तदनुसार शैक्षणिक अनुभव पुरविणे हे असते. म्हणून तेथील अभ्यासक्रमात अनेक विषय वैकल्पिक असतात. उच्च शिक्षणाचे ध्येय पारंगतता असल्यामुळे तेथील अभ्यासक्रमात एका विषयाच्या सखोल अभ्यासक्रमाची अपेक्षा असते. प्रत्येक अवस्थेत वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांखेरीज काही सामान्य उद्दिष्टे असतात. उदा.,‘आदर्श नागरिक घडविणे’ हे उदिष्ट सर्व अवस्थांना सामान्य आहे. अशी सामान्य उदिष्टे साधणाऱ्या अनुभवांचाही अंतर्भाव अभ्यासक्रमात होतो.
तथापि अवस्थानुसार अभ्यास योजना करताना पुढील दोन तत्त्वे पाळावी लागतात : (१) प्रत्येक अवस्थेच्या शेवटी जे विद्यार्थी जीवनात प्रवेश करतात, अशांसाठी अभ्यास योजना स्वयंपूर्ण असावी. (२) ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढील अवस्थेत चालू राहणार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यास योजना दोन्ही अवस्थांचा सांधा साधणारी, पहिल्या अवस्थेची उद्दिष्टे साधणारी व पुढील अवस्थेच्या शिक्षणाची पूर्वतयारी करणारी असावी.
महाराष्ट्रात प्राथमिक शाळेचा विद्यार्थी भाषा, अंकगणित, जमाखर्च, भूमिती, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व हिंदी हे विषय शिकतो. शिवाय त्याला सूतकाम, शिंपीकाम, सुतारकाम, कृषिविद्या, भरतकाम यांपैकी एक व्यवसाय हस्तगत करावा लागतो. ज्ञानार्जनाची साधने हस्तगत करणे व नागरिकासाठी आवश्यक ते ज्ञान संपादन करणे, हा दुहेरी उद्देश या अभ्यासक्रमाच्या रचनेत आढळतो. माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी चार विषय आवश्यक असतात व तीन अथवा चार वैकल्पिक असतात. आवश्यक विषय पुढील होत : १. मातृभाषा, २. हिंदी, ३-४. समाजशास्त्र, सामान्य विज्ञान, प्राथमिक गणित, बीजगणित, भूमिती व जमाखर्च यांपैकी दोन. वैकल्पिक तीन वा चार विषय साठ विषयांतून निवडावयाचे असतात. या साठांत इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, युद्धशास्त्र, वाणिज्य, कृषिविद्या, तंत्रविद्या, संगीत इ. विषय मोडतात. सारांश, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमात सामान्य उद्दिष्टांसाठी आवश्यक विषय व विद्यार्थ्यांची क्षमता व आवड यांना अनुसरून ऐच्छिक विषय असे दोन भाग वर उल्लेखिलेल्या तत्त्वांनुसार आढळतात. महाविद्यालयीन अभ्यास योजनेतही एकूण विषयांची संख्या ठराविक असून तिच्यामध्ये काही आवश्यक व काही ऐच्छिक असतात.
या कल्पनेची आधुनिक व्याप्ती, तिच्यामधील अंतर्भूत विषय व मांडणी या गोष्टी त्रिकालाबाधित या स्थिर नाहीत. त्या शेकडो वर्षे विकसित होत आल्या आहेत, बदलत आहेत. आपल्याकडे वैदिक व प्राचीन काळी आश्रम, विहार, मठ, तसेच तक्षशिला, नालंदा, काशी, उज्जयिनी यांसारख्या विद्याकेंद्रांतून वेद, वेदांगे, उपनिषदे, रूढ धार्मिक आचार, बौद्धधर्मानुसार व्रते, तत्त्वज्ञान इ. तत्कालानुसार उपयुक्त धार्मिक शिक्षण देत. शिवाय व्यावहारिक शिक्षण म्हणून धनुर्विद्या, अन्य क्षत्रिय वा युद्धविद्या, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नानाविध कला, निरनिराळे व्यवसाय काही आश्रमांत व विद्याकेद्रांत शिकवीत. व्यवसायांचे शिक्षण घराघरांतून अनुकरणाने मिळे. राजगृहासारख्या ठिकाणी राजधर्मानुकूल विषय व नानाविध कला यांचे शिक्षण देत. सामान्यतः व्यक्तिमात्राला वर्णानुकूल विद्या शिकवीत अशी अभ्यास योजना असे.
पुढे मध्ययुगात मदिरशाळा, पाठशाळा व घर यांतून ब्राह्मंणांना धार्मिक व्यवस्यायानुकूल विशिष्ट विद्या व अन्य वर्णांना राजवाड्यांत, घराघरांत विशिष्ट व्यावसायिक विद्या शिकवीत. मुसलमान राजवटीतही मुसलमान धर्म-समाजानुकूल भाषा व विद्या मकतब-मद्रसासारख्या संस्थांतून शिकवीत. एकोणिसाव्या शतकापासून पाश्चात्त्यांचा संपर्क व इंग्रजांचे वर्चस्व यांमुळे जुन्या संस्था व विषय नाहीचे होत गेले आणि नव्या संस्थांतून इंग्रजी भाषा, वाङ्मय, गणित, भारताचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास अशा विषयांची योजना झाली. पहिल्या व विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान व तांत्रिक व्यवसाय-धंदे यांच्या शिक्षणाकडे ओघ वळू लागला. याच काळात शिक्षणाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाची व महत्त्वाची जाणीव होऊन राष्ट्रीय दृष्टीने अभ्यास योजना होऊ लागली [®राष्ट्रीय शिक्षण]. स्वातंत्र्योत्तर काळात तर हे दोन्ही प्रवाह एकत्र आले व नवप्रवाह जास्त खोल व प्रभावी झाला. माध्यमिक शिक्षण, विश्वविद्यालयीन शिक्षण. अशांचे परीक्षण उच्च आयोग नेमून झाले.
पाश्चात्त्य न अन्य देशांतही असेच विकसन दिसते. स्पार्टा या प्राचीन ग्रीक नगर राज्यात शारीरिक व तत्कालीन पद्धतीचे सैनिकी शिक्षणच दिले जाई. त्याचीच राज्याला व समाजाला गरज होती. सुधारलेल्या व समृद्ध अशा अथेन्सच्या नगरराज्यांत, स्वातंत्र्याचे हक्क उपभोगणाऱ्या नागरिकांसाठी राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान, वक्तृत्वकला, वाङ्मय, नानाविध ललितकला शिकवीत. असे नागरिक मात्र १० टक्केच असत. त्यानंतर रोमन साम्राज्यात व पुढे ख्रिस्ती मठमंदिरांत वेगळ्या अभ्यास योजना झाल्या. रोमन साम्राज्यात न्यायशास्त्राला महत्त्व आले, तर मठमंदिरांत बायबल-धर्मतंत्र, धार्मिक रूढी यांच्या अभ्यासाने कला, व्यावहारिक शास्त्रे, वाङ्मय यांना बाजूला सारले. विद्येचे पुनरुज्जीवन व धर्मसुधारणा यांमुळे अभ्यास योजनांत पुन्हा बदल झाले.
अठराव्या शतकाच्या शेवटी रूसोने विचारक्रांती घडविली. अभ्यास योजनेत मोठे बदल होऊ लागले. निसर्ग, विज्ञान, समाजजीवन यांचा अभ्यास व अनुभवजन्य ज्ञान यांना स्थान मिळू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकात नवनवे व्यवसाय, धंदे, वाफ-तेल, वीज-अणू यांच्या शक्तीवर चालणारी विविध यंत्रे आली व नवनव्या अनेक विषयांची योजना होऊन लागली. याच काळात मानसशास्त्राचा विकास झाला. प्रातिनिधिक लोकशाहीसारखी नवी राजकीय रचना विकास पावली. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली. या सर्वांमधून अभ्यास योजनेला आणखी निराळे वळण मिळाले. पूर्वी अभ्यास योजनेत विशिष्ट विषय नियोजित करीत. या काळात विषय व त्यांची आखणी तर बदलू लागलीच, शिवाय विषयाबरोबरच व काही वेळी विषयाऐवजी प्रयोग, अनुभव, स्वयंकृती, योजनासंधी, विषयांचा समवाय-अशा गोष्टींना अभ्यास योजनेत स्थान मिळू लागले. नव्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीने जरूर असे विषय, अनुभव यांचाही समावेश झाला. शिक्षणाच्या अवस्थांचे रचनेत बदल झाले व याचाही अभ्यास योजनांवर परिणाम झाला. एकंदरीत अभ्यास योजना विकसनशील आहे, हेच खरे.
अभ्यास योजनेच्या उत्क्रांतीच्या या इतिहासात अभ्यासविषय निवडण्याची दोन सूत्रे अंतर्भूत आहेत : एक उपयुक्तता व दुसरे संस्कारक्षमता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत संस्थांतर्गत शिक्षण फक्त उच्चवर्गीय मुलांना मिळे. म्हणून त्या शिक्षणाचा भर बौद्धिक संस्कारांवर होता व ते शिक्षण व्यवसायविन्मुख होते. अशा शिक्षणाला उदार संस्कारी शिक्षण ही संज्ञा देतात. शिक्षणाचा प्रसार होऊन सर्व थरांच्या मुलांना शिक्षण मिळू लागल्यावर उदार संस्कारी शिक्षणाच्या उणिवा दृष्टोत्पत्तीस आल्या व अभ्यासक्रमात उपयुक्त विद्येचा समावेश होऊ लागला. आधुनिक कल अभ्यासक्रमात संस्कारक्षम व उपयुक्त विद्याकलांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हा होय.
अभ्यास योजनेच्या विकसनामधून स्पष्ट झालेले प्रवाह, त्यांचे महत्त्व व कार्य पुढीलप्रमाणे संकलित येतील : (१) अभ्यास योजना विकसनशील व लवचिक राहावी. शिक्षण हे समाजजीवनाची धारणा तसेच समाजविकसनाची शक्तीही आहे. बदलती परिस्थिती, विकसित शास्त्रे, विचार, विज्ञान, तंत्रविद्या, यंत्रसाधना यांच्याबरोबर व अनुरोधाने अभ्यास योजनाही बदलत राहावी. नाही तर कोणत्याही समाजातील शिक्षणाची उद्दिष्टे सफल होणार नाहीत. (२) अभ्यास योजना करताना व्यक्तिव्यक्तींमधील आणि समाजासमाजांमधील भिन्नता व साधर्म्य या दोन्ही गोष्टी विचारात घेणे जरूर आहे. काही साधर्म्य स्वाभाविकच आहे. पण बुद्धी, रुची, शरीरक्षमता, परिस्थिती, आनुवंशिकता यांमुळे व्यक्तिभिन्नता निर्माण होते. तसेच समाजाच्या व राष्ट्राच्या बाबतही असते. त्यांचा इतिहास. त्यांची स्थिती, त्यांच्या समस्या, गरजा, त्यांची उपलब्ध साधने यांमुळे भिन्नता निर्माण होते. पण मूलभूत उद्दिष्टे, तत्त्वे या दृष्टीने काही साधर्म्यही असते. हे सर्व लक्षात घेऊन अभ्यास योजना करावी लागते. यामुळे अभ्यासक्रमाचे आवश्यक व ऐच्छिक असे विभाग पडतात. साधर्म्य वा सामान्य गरजा लक्षात घेऊन आवश्यक विभाग ठरवितात. त्याला ‘मूलभूत वा गाभाभूत अभ्यासविभाग’ म्हणतात. शिवाय भिन्नता लक्षात घेऊन ऐच्छिक विभागाची योजना केली जाते. ऐच्छिक विभागातून व्यक्तीला आपल्या क्षमतेप्रमाणे व अभिरूचीनुसार विषय निवडता येतील अशी योजना केल्याने सांस्कृतिक, बौद्धिक व लैंगिक भेदांतून निर्माण होणाऱ्या समस्या आपोआप सुटतात. (३) अभ्यास योजनेवर चौरस वा सर्वांगीण शिक्षण या कल्पनेचा परिणाम झालेला दिसतो. सामान्य शिक्षण ही कल्पना व प्रस्तुत चौरस शिक्षण ही कल्पना व्यापक दृष्टीने समानार्थी मानली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणात विशेष भाग असावा, पण याबरोबरच प्रत्येकाला जीवनाच्या विविध पैलूंची किमान ओळख असावी. व्यक्तीच्या जीवनाची एकांगी वाढ न होता ते चौरस व्हावे, नटविलेले व समृद्ध असावे, याची आता जाणीव झाली आहे. आधुनिक अभ्यास योजनांवर या विचारांचा प्रभाव पडलेला दिसेल. चौरस अभ्यास योजनेचे स्थान सार्वत्रिक सक्तीच्या प्राथमिक शिक्षणामध्ये सर्वांत मोठे आहे. पुढील अवस्थांमध्येही ते आहे;पण उतरत्या श्रेणीचे आहे. (४) अभ्यास योजना शिक्षणाच्या निरनिराळ्या अवस्थांनुसार असावी लागते. प्रत्येक अवस्थेसाठी ती स्वयंपूर्ण असावी लागते व त्याचबरोबर पुढील अवस्थेसाठी पूर्वतयारी करणारी असावी लागते. आरंभी हे निर्दिष्ट केलेले आहे. आपल्याकडे व अन्य देशांतही हे मान्य झाले आहे, पण शिक्षणाच्या अवस्थांचीच पुनर्रचना चालू आहे. ऐच्छिक, तांत्रिक, व्यावसायिक शिक्षणाच्या व सामान्य शिक्षणाच्या अवस्था ह्या काही वेळी व व्यवसायानुरूप वेगवेगळ्या असतात. यामुळे आधुनिक अभ्यास योजना करणे आणखी अवघड झाले आहे. ठिकठिकाणचे अनुभव लक्षात घेऊन हे प्रश्न सोडविले जातात. (५) अभ्यास योजना कृतिप्रधान, अनुभवावर आधारलेली असावी. शिक्षणाचे विशिष्ट उद्दिष्ट साधण्यासाठी विशिष्ट विषय वा विषयगटांची योजना अशी अभ्यास योजनेची परंपरागत कल्पना असे. विसाव्या शतकाबरोबर ही दृष्टी बदलत आहे. निव्वळ ज्ञानसाधना करून जीवन समृद्ध, यशस्वी होऊ शकत नाही. ज्ञान जीवनासाठी वापरता येण्याची क्षमता, निव्वळ पुस्तकी ज्ञानसाधनेने येत नाही. प्रयोग, अनुभव, प्रत्यक्ष कृती, योजनास्वातंत्र्य वा योजना करण्याची प्रत्यक्ष संधी, सवय यांतूनच निर्माण होणारे ज्ञान व जीवनक्षमता मोलाच्या आहेत, याची जाणीव होत आहे. ज्ञानही झपाट्याने विकसित होत आहे. आजचे तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, समाजशास्त्रांचे ज्ञान लवकरच अपुरे वाटेल, काही वेळी जुने व टाकाऊ ठरेल. अशा वेळी प्रत्यक्ष ज्ञानापेक्षा ज्ञानार्जनक्षमता, ज्ञानोपयोग करण्याची क्षमता हीच शिक्षणाची मूलभूत व महत्त्वाची उद्दिष्टे आता मानली जात आहेत. विशेषतः प्राथमिक वा सर्वांच्यासाठी असलेल्या सामान्य शिक्षणयोजनेत ही गोष्ट प्रामुख्याने दिसते. यामुळे आधुनिक अभ्यास योजना म्हणजे निव्वळ विषय योजना नव्हे. त्यात आता प्रत्यक्ष जीवनाधारित कृती, अनुभव, प्रयोग, योजनासंधी यांची नियुक्ती होत आहे. कित्येक ठिकाणी दोहोंचाही (विषययोजना व कृतियोजना) समावेश केला जात आहे. पण प्रवाहाची दिशा निश्चित आहे. ही आधुनिक कल्पना मुख्यतः अमेरिकेत विकसित झाली असून तेथे जास्त प्रमाणांत दिसून येतो. अन्य देशांतही हिचा प्रवाह निरनिराळ्या प्रमाणांत दिसून येतो. शिशुशिक्षण, धंदेशिक्षण इ. आधुनिक शिक्षणप्रकारांत अशा प्रकारची कृतीप्रधान अभ्यास योजना असते. विषयनिष्ठ अभ्यासयोजनेची जागा कृतीनिष्ठ अभ्यास योजनेने घ्यावी, हे आधुनिक तत्त्व आहे. (६) निरनिराळ्या विषयांमध्ये ज्ञानाची विभागणी ही कल्पना अपुरी आहे. कोणत्याही विषयाचा अर्थ पूर्ण घ्यावयाचा असेल तर त्या विषयाशी असणारा अन्य विषयांचा संबंधही लक्षात घेतला पाहिजे; किंबहुना, ज्ञान हे मूलतः एक आहे, त्याचा विकास होत असताना करावे लागणारे पोटभाग म्हणजे निरनिराळे विषय; त्यांचे मूळ एकच, ते तोडणे योग्य नाही-या विचाराचाही आधुनिक अभ्यास योजनांवर परिणाम झाला आहे. ड्यूईच्या योजनापद्धतीतील अभ्यास योजना काही दृष्टीने याच पायावर आधारल्या आहेत. मात्र अभ्यास योजना आणि कृतिमूल अभ्यास वा अध्यापनपद्धती या दोहोंचा एकत्र विचार करून या योजनांना मूर्त रूप आले आहे. निरनिराळ्या देशांतील अभ्यास योजनांत व अध्यापनपद्धतींवर या विचाराचा प्रभाव दिसतो. (७) ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय, सांस्कृतिक वारसा, प्रचलित समस्या या दृष्टीने राष्ट्राराष्ट्रांत फरक असतो. यामुळे राष्ट्रीय शिक्षण ही कल्पना व त्यासाठी जरूर ती अभ्यास योजना या गोष्टी पुढे आल्या. अभ्यास योजनांचा विकास व निरनिराळ्या राष्ट्रांच्या प्रचलित अभ्यास योजना यांमध्ये ही कल्पना साकार झालेली दिसेल. आपल्याकडील लोकमान्य टिळकांची व प्रा. विजापूरकरांची राष्ट्रीय शिक्षण ही कल्पना व महात्माजींची जीवनशिक्षणयोजना यांच्यामधील अभ्यास योजना व स्वातंत्र्योत्तर अभ्यास योजनांतून होत असलेली विज्ञान, व्यवसाय, ऐच्छिक विषय इत्यादींची तरतूद राष्ट्राच्या प्रचलित समस्यांतून निर्माण झाली आहे. एका राष्ट्रास उपयुक्त झालेली अभ्यास योजना दुसऱ्या राष्ट्रास मार्गदर्शक होईल; पण जशीच्या तशी उपयुक्त होईलच, असे नाही. (८) आंतरराष्ट्रीय व अखिल-मानवी दृष्टीकोनही अभ्यास योजनेत आता सामावला जात आहे. जगाच्या पार्श्वभूमीवर भारताचा इतिहास, जागतिक भूगोल, संयुक्त राष्ट्रे व तदंतर्गत कार्य अशा विषयांची आपल्या अभ्यास योजनेतील तरतूद ही याची द्योतक आहे. आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षणही अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे.
अभ्यास योजना योग्य तर्हेने प्रत्यक्षात आणण्यात अन्य घटकांना फार महत्त्व आहे. अभ्यास योजना राबविणाऱ्या शिक्षकांना तिच्या दृष्टिकोनाची व उद्दिष्टांची जाणीव पाहिजे. त्यांच्यामध्ये प्रयोगशीलता पाहिजे. अभ्यास योजना यशस्वी व्हावयाची तर त्यासाठी अध्यापनपद्धती योग्य पाहिजे. साधने, प्रयोगशाळा, छंदशाला, वेळापत्रके, क्रमिक व पूरक पुस्तके यांची योग्य जुळणी केली पाहिजे. परीक्षापद्धतीचाही अभ्यास योजनेच्या यशावर परिणाम होतो. या सर्वांचे व्यवस्थापन परस्परपूरक, सुरळीत झाले पाहिजे. अशा सर्व घटकांची योग्य योजना व्हावी लागते. निव्वळ अभ्यास योजना स्वतंत्रपणे यशस्वी होत नाही. आधुनिक काळात याची जाणीव झाली आहे व त्या जाणिवेतून अभ्यास योजनांची सर्वंकष पुरर्रचना होत आहे.
योग्य अभ्यास योजना तयार करण्याच्या कार्यात आता शास्त्रीय दृष्टी, प्रयोगशीलता आली आहे. प्रचलित वा सूचित अभ्यास योजनांच्या यशापयशांचे आता प्रयोगद्वारा परीक्षण केले जाते. नंतर जरूर वाटतील त्या सुधारणा केल्या जातात. असे हे प्रयोगाचे व मूल्यमापनाचे कार्य वेळोवेळी ठिकठिकाणी केले जाते.
अभ्यास योजनेमागील महत्त्वाची तत्त्वे व प्रवाह यांचा अंतर्भाव भारतीय शिक्षणयोजनांतून होत आहे व या क्रियेला स्वातंत्र्योत्तर काळात बराच वेगही आला आहे. या काळाच्या सुरुवातीस माध्यमिक शिक्षण-आयोग (मुदलियार आयोग), विश्वविद्यालयीन शिक्षण-आयोग (राधाकृष्णन आयोग) व पुढे विद्यापीठीय अनुदान-मंडळ यांनी आपापल्या क्षेत्रातील अभ्यास योजनांची छाननी केली. भारतीय शिक्षण-आयोगाने (कोठारी आयोग, १९६४-६६) अभ्यासक्रमरचनेचा व तत्त्वाचा नव्या दृष्टिकोनातून विचार केला. मार्गदर्शक तत्त्वनिश्चिती व मार्गदर्शक आराखडेही दिले. निरनिराळ्या राज्यांतून प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यास योजनांचा विचार झाला. त्यानुसार नव्या अभ्यास योजना अंमलातही आल्या. त्यांची रूपरेषा प्रस्तुत लेखाच्या आरंभीच दिली आहे.
कोठारी आयोगाच्या मते आजच्या माध्यमिक अभ्यासक्रमात पुढील दोष आढळतात : (१) विशिष्ट विषयांच्या सखोल अभ्यासाला आरंभ फार लवकर होतो. (२) तात्त्विक दृष्ट्या जरी ऐच्छिक विषय अनेक असले, तरी प्रत्यक्षात ते फार थोडे आहेत. (३) बहुसंख्य विद्यार्थ्यांची वृत्ती माध्यमिक शाळेतून महविद्यालयात जाण्याची असते, म्हणून विज्ञानशाखेत संख्याधिक्य आढळते. म्हणून अशी सूचना करण्यात आली आहे, की (अ) सामान्य अभ्यासक्रम दहा वर्षांचा असावा. नंतर विशिष्टीकरण व्हावे. (आ) ऐच्छिक विषयांचा अभ्यास उच्च व निम्न अशा दोन स्तरांवर चालावा. (इ) प्रत्येक अवस्थेच्या शेवटी अपेक्षित असणाऱ्या ज्ञानप्राप्तीचे स्वरूप निश्चित करावे. (ई) सामान्य शिक्षण व व्यावसायिक शिक्षण यांची फारकत करू नये. (उ) एकंदर शालेय अभ्यासक्रमाची योजना एकात्म दृष्टीने व्हावी.
संस्कारकारी अनुभवांचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या अनुभवांनी ज्ञानार्जन व कौशल्यसंपादन होते. दुसऱ्या प्रकारच्या अनुभवांकडून मूल्ये, वृत्ती, सवयी यांचे घडण होते. फक्त पहिल्या प्रकारच्या अनुभवांचाच अभ्यासक्रमात समावेश करण्याचा परंपरागत रिवाज असून दुसऱ्या प्रकारच्या अनुभवांना अभ्यासेतर उपक्रम अशी संज्ञा देण्यात येते [®अभ्यासेतर कार्यक्रम] वास्तविक असा भेद करणे सयुक्तिक नाही. जे जे व्यक्तिमत्त्व घडविते ते शिक्षण, या तत्त्वानुसार सहकार व शिस्त बाणविणारे मैदानी खेळही संस्कारकारी अनुभव होत. उलट संस्कृतसारख्या विषयाचा अभ्यास करूनही ते ज्ञान व्यक्तिमत्त्वात समाविष्ट झाले नाही, तर तो अनुभव शिक्षणदृष्ट्या विफल ठरतो. म्हणूनच अभ्यासक्रमाची व्याख्या करताना ‘संस्कारकारी अनुभव’ अशी शब्दयोजना केली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत:मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020