महाराष्ट्र राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे सुरु करणे या योजनेविषयीची माहिती.
अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींना उच्च शिक्षण देणे, उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने नवीन तंत्रनिकेतन संस्था सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याअंतर्गतच राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यात येत आहेत.
योजनेचा लक्ष्यगट:राज्यातील अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम, बौद्ध ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन) बेरोजगार उमेदवार.
योजनेचे उद्दिष्ट:
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांमधील बेरोजगार उमेदवारास रोजगार मिळण्यास मदत करणे.
योजना:
अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्यातील औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे व वाशिम येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या कायम विनाअनुदान तत्वावर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याच्या धोरणानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे सहा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात येतील. याकरिता कायम विनाअनुदानित तत्वावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणाऱ्या व चालवू इच्छिणाऱ्या नामांकित अशासकीय अल्पसंख्याक (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन) शैक्षणिक संस्थांची विहित निकषांच्या आधारे निवड करून अशा संस्थांना प्रत्येकी 3 कोटी रुपये इतके अनुदान अल्पसंख्याक विकास विभागाकडून उपलब्ध करुन दिले जाईल. या योजनेच्या स्वरूपात बदल करून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची बाब विचाराधीन आहे.
भौतिक उद्दिष्ट:सहा संस्था
अंमलबजावणी यंत्रणा:अल्पसंख्याक विकास विभाग आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (प्रशिक्षण)
-वर्षा फडके, वरिष्ठ सहायक संचालक.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2023