অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किशोरस्वास्थ कार्यक्रम

किशोरस्वास्थ कार्यक्रम


भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 वर्षे) व 1/3 लोकसंख्या ही 10 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे. एवढी मोठ्या संख्येतील किशोरवयीन व युवा देशाचा सामाजिक व आर्थिक विकास घडवू शकतात. या युवा शक्तीला ऊर्जा आहे, जिद्द आहे. हे खरे असले तरी त्यांच्यापुढे अनेक प्रश्नही आहेत. किशोरावस्थेत शारीरिक वाढ, मानसिक अवस्था व संप्रेरकांमध्ये बदल होत असतात. त्यामुळे या अवस्थेतील मुलामुलींना अनेक प्रश्न, शंका असतात. त्यांची उत्तरे शाळा महाविद्यालयात मिळत नाहीत. अशावेळी हे लोक जी माहिती गोळा करतात त्यात त्यांना चुकीची माहिती मिळाली तर त्यांचा प्रवास वेगळ्या वाटेवर घेवून जावू शकतो व त्याला आळा घालणे कठीण होऊन बसते. म्हणून त्यांच्या शारीरिक व मानसिक प्रश्नांची सोडवणूक वेळेत व अचूक करणे गरजेचे ठरते.या सर्व बाबींचा विचार करुन केंद्र शासनाने राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रम हाती घेतला असून किशोरवयीनांकरिता हेल्पलाईन याबरोबरच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत आहे. या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे हे प्रथम समजून घेऊया.

उद्देश

  • किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रजनन व लैगिंग आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
  • बाल मृत्यू, माता मृत्यू एकूणच प्रजननदर कमी करणे आणि प्रसुती काळात निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीस प्रतिबंध करणे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे

उद्दिष्ट

किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी समुपदेशन व जनजागृती करणे.
  • सुरक्षित व गर्भपात संबंधित सुविधा पुरविणे.
  • प्रजनन व लैगिंग आरोग्याबाबत जागृती करणे व त्यांचा यात सहभाग वाढविणे.
  • त्याचप्रमाणे किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयीच्या समस्यांबाबत माहिती देणे.

किशोरवयीन आरोग्यअंतर्गत विविध आरोग्यसेवा देण्यात येतात. या आरोग्यसेवा किशोरवयीन आरोग्य क्लिनिक, शाळा, कॉलेज व कार्यक्षेत्रामध्ये बाह्य संपर्क कार्यक्रम आयोजित करुन दिले जातात. किशोरवयीन आरोग्य क्लिनिक हे राज्यात निवडलेल्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहेत. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक कार्यरत आहेत. प्रत्येक क्लिनिकमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविका/स्टाफ नर्स आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये किशोरवयीन आरोग्य समुपदेशक कार्यरत आहेत. ते किशोरवयीनांना मार्गदर्शन व समुपदेशन करतात.सन 2014-15 मध्ये राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड व गडचिरोली हे ते जिल्हे आहेत. या कार्यक्रमांतर्गत खालील उपक्रम राबविण्यात येत आहेत. • प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे अडोलेसंट हेल्थ क्लिनिकची स्थापना करणे.

  • किशोरवयीन आरोग्य दिवसाचे आयोजन करणे.
  • किशोरवयीनांकरिता हेल्पलाईनची स्थापना करणे.
  • आरोग्य शिक्षण उपक्रम अंमलबजावणी.

किशोरवयीन आरोग्य क्लिनिकमधून किशोरवयीनांना मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. त्वचेच विकार, मासिक पाळीविषयक समस्या, प्रजनन मार्गाचे आजार, गर्भनिरोधक साधनांविषयक माहिती, व्यसनाधिनता, हिंसा, वर्तणुकीतील बदल, आत्महत्येच्या प्रवृत्ती इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाते. समुपदेशकामार्फत शाळा व कॉलेजमध्ये बाह्य संपर्क कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जेणे करुन जास्तीत जास्त किशोरवयीनांना माहिती दिली जाईल.
किशोरवयीनांकरिता हेल्पलाईन (अडोलेसन्ट हेल्पलाईन) • नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यामध्ये राज्येस्तरावर किशोरवयीन हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे.

  • किशोरवयीन हेल्पलाईनचा नं. 1800 233 2688 हा आहे.
  • या हेल्पलाईनवर किशोरवयीन मुला-मुलींना योग्य व अचूक माहिती दिली जाईल.
  • ही हेल्पलाईन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असेल.
  • किशोरवयीन आरोग्यविषयक माहिती किंवा आरोग्यविषयक असणाऱ्या गैरसमजुती याबाबत या हेल्पलाईनवर माहिती दिली जाईल. जेणे करुन किशोरवयीनांचे आरोग्य संवर्धन करता येईल.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सुरु केलेल्या अडोलेसन्ट हेल्पलाईनचा जास्तीत जास्त किशोरवयीन मुला-मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

लेखक - आकाश जगधने,सहाय्यक संचालक (मा)

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार,१८ जून, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate