पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली शासनाने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले. या वर्षात अडीच कोटीहून अधिक असंघटीत कष्टकरी जनता अभिमानाने राष्ट्रीय बँकेचे खातेदार झाली. त्यानंतर त्यांना घरपोच मिळणारे एटीएम कार्ड आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना झालेला आनंद हा अविस्मरणीय असा ठरला. यासह नारी शक्ती सबलीकरण यासाठी सन 21 वर्षापासून सुरु असलेल्या बेटी बचाओ अभियानास बेटी पढाओ या संकल्पनेची जोड देत पंतप्रधान यांनी एक नवी विधायक आणि रचनात्मक पाऊलवाट सुरु केली. जी आता महामार्ग होण्याच्या टप्प्यावर आहे.
यापूर्वीच्या विधायक आणि चांगल्या योजना ही कालानुरुप बदल करुन त्यास अधिक व्यापक स्वरुप देण्यामध्येही केंद्र सरकार आग्रही राहीले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या लोकप्रिय घोषणेत अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान अशी समर्पक भर घातली.
त्या परंपरेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशातून सुरु झालेल्या बेटी बचाओ या अभियानास बेटी पढाओ अशी जोड देत अभियान अगदी व्यापक बनविण्यास दमदार प्रारंभ केला. पानिपत येथून भव्य प्रारंभ स्त्रीभ्रुण हत्येचे अत्यंत चिंताजनक प्रमाण असलेल्या हरियाणातील पानिपत येथून 21 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा भव्य प्रारंभ करण्यात आला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला अणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी, दळण वळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री, मंत्री आणि पानिपत पंचक्रोशीतील महिला युवतींच्या उत्साही उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
आज 21 व्या शतकात चंद्रासह मंगळावर पोहचत असताना विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. मात्र स्त्री-पुरुष समानतेबाबत आपली मानसिकता अजूनही 18 व्या शतकातील आहे. मातेच्या गर्भातच हत्या करण्यापासून लहानपणापासून मुलगा-मुलगी वाढविताना पालकाकडून होणारा दुजाभाव हा अत्यंत अस्वस्थ करणारा विषय आहे. अमेरिकेतील नासाद्वारे अंतराळात जाणारी कल्पना चावला ही हरियाणा व देशाची सुकन्या होती. अशा असंख्य कल्पनांना त्यांची प्रतिभा खुली करत चौफेर विकसित करा, असे आवाहन त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बेटी नहीं, तो बहु कैसी आयेगी : ब्रँड ॲम्बेसिडर माधुरी दीक्षित स्वत: गृहिणी असलेल्या आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आपल्या परिवारात दोन मुलीं सह माता-गृहीणी पदाची जबाबदारी यशस्वीपणे आणि अगदी मनापासून पार पाडत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. आपल्या वडीलांनी आम्हा तिन्ही बहिणींना अभिमानाने व आनंदाने वाढविले, याचा आपणास सार्थ अभिमान आहे, असे सांगत मुली वाढविताना पुनश्च: हेच बालपण मीसुद्धा जगले असे सांगत जर आपण मुलीची हत्या करु लागलो तर उद्या घरामध्ये सून तरी कशी येणार असा जाहिर समर्पक प्रश्न करत माधुरी दीक्षित यांनी या अभियानाची नितांत गरजच स्पष्ट केली.
याच दिवशी आपली आई उपचार घेत असतानाही माधुरी दीक्षित यांनी अभियानात सहभाग घेवून आपली आत्मियता कृतीशीलपणे दाखवली. शंभर जिल्ह्यासाठी शंभर कोटी रुपये बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानासाठी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शंभर कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. त्याद्वारे पहिल्या टप्प्यात स्त्रियांचे प्रमाण कमी असणाऱ्या शंभर जिल्ह्यात ही मोहिम विशेष लक्ष देवून राबवली जाणार व जात आहे.
भविष्यात यांची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सुकन्या समृद्धी योजना या अभियानास पुरक जोड म्हणून सुकन्या समृद्धी योजना ही राष्ट्रीय बँकतून सुरु करण्यात आली आहे. याद्वारे शून्य ते दहा वर्षाच्या मुलीच्या व पालकांच्या नांवे संयुक्तपणे खाते काढून त्यामध्ये प्रतिवर्षी किमान एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. याद्वारे एकविसाव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या नांवे व्याजासह किमान अडीच लाख रुपयाहून अधिक रक्कम जमा होतील, असे या योजनेचे स्वरुप आहे.
महाराष्ट्रही आघाडीवर सन 2001 मध्ये एक हजारी 927 असणारे मुलीचे प्रमाण सन 2011 मध्ये 918 पर्यंत घसरली. काही राज्यात तर हे प्रमाण 800 इतके चिंताजनक असे आहे. या मुळेच बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची नेमकी गरज लक्षात येते.
महाराष्ट्राच्या नवीन मंत्रीमंडळात गोपनीयतेची शपथ घेताना विनोद तावडे यांनी आपल्या भाषणांत आईचाही उल्लेख केला आणि शासन हे नारी शक्तीच्या सन्मानाचे असल्याचे कृतीशीलपणे दाखवून दिले. त्यामुळेच अनेकजण आपल्या नावात वडीलांपूर्वी आईच्याही नावाचा अभिमानाने उल्लेख करीत आहेत. तसेच त्याची शासकीय नोंदही (गॅझेट) करीत आहेत. हा एक मोलाच्या सामाजिक बदलाचे संकेत आहेत.
पुरोगामी चळवळीतील आणि विधायक विचारासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या महाराष्ट्राने या अभियानातही पुढाकार घेतलेला आहे. ऑलिंपिक पर्यंत धडक मारत पदावरही हक्क सांगणाऱ्या नेमबाजपटू राही सरनोबत, तेजस्विनी सावंत तसेच राष्ट्रीय महिला क्रिकेट मध्ये असणारी अनुजा पाटील, आय.टी.आय क्षेत्रात थेट अमेरिकेतही बाजी मारणाऱ्या अश्विनी दानीगोंड अशी मोठी दैदिप्यमान परंपराही महाराष्ट्रासह देशाला कोल्हापूरने दिली आहे.
लेखक - राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे
कोल्हापूर.
माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ०४ जून, २०१५.
अंतिम सुधारित : 10/7/2020