मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या. मुलींचा शिक्षणातील टक्का वाढावा यासाठीही शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबतची माहिती देणारा लेख…
“विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापासी, आहे तो खरा धनवान” अशा शब्दात शिक्षणाचे महत्व सांगून स्त्री शिक्षणासाठी अहोरात्र सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अज्ञान, अनिष्ट रुढी व परंपरांच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रियांकडे तुच्छ म्हणून पाहिले जात होते. अशा काळात समाजाची वक्रदृष्टी स्वीकारुन स्त्रियांना चूल आणि मूल यातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढून सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला.
सावित्रीबाई यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख शाळांतील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान” राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे अभियान 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-2009 नुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद करण्याची जबाबदारी राज्य शासनास सोपविली आहे. त्यानुसार राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थतीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरीत पालकांच्या मुलींच्या अखंडीत शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रुजविणे, वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे, शारीरिक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशीलतेस वाव देणे तसेच विशेष करुन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी होणे यासाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फले लेक शिकवा” अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात येत आहे.
या अभियानात सहभागाचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
संकलन - संजय बोराळकर,
जिल्हा माहिती कार्यालय, धुळे.
स्रोत - महान्यूज
अंतिम सुधारित : 5/29/2020
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातर्फे जागरुकता अभियान...
अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत वाता...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...