महाराष्ट्र राज्याला 720 कि.मी. लांबीचा अत्यंत सुंदर असा समुद्र किनारा लाभला असून त्यातील 70 कि.मी.चा सागरी किनारा हा पालघर जिल्ह्याला लाभला आहे. सागरी पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. समुद्र किनाऱ्याची स्वच्छता, देखभाल व व्यवस्थापन यासाठी संत गाडगेबाबा निर्मलग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत “निर्मल सागर तट अभियान” ही योजना लोकसहभागातून राबविली जात आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सागरी मंडळ व आशियाई विकास बँकेमार्फत विशेष तरतूद करण्यात आली आहे.
निर्मल सागर तट अभियानांतर्गत ग्रामपंचायत हा घटक मानला जाणार असून समुद्र किनारा व किनाऱ्यावर असलेल्या गावांचा सर्वांगीण विकास याचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. “किनारा स्वच्छता” तसेच “पर्यावरणाची हानी न होता पर्यटनाचा विकास” हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पालघर जिल्ह्यातील झाई, बोर्डी, चिखला, नरवड, घोलवड, चिंचणी, शिरगाव, सातपाटी, केळवा, माहीम, एडवण, अर्नाळा, कळंब आणि रानगाव या सागरी किनाऱ्यालगतच्या 14 गावात हे अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सागरी पर्यटन व परिवहनदृष्ट्या सागरी किनाऱ्याचे रोजगार क्षमतेच्या आधारावर अ+, अ आणि ब असे 3 गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. अशा सर्व सागर किनाऱ्यावरील गावातील नागरिकांच्या मिळून ग्रामपंचायतस्तरावर सागर तट व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आल्या आहेत. सागर किनारा विकास व व्यवस्थापन यासाठी प्रति अ+ वर्गातील सागर किनाऱ्यासाठी रु.20 लाख, “अ”’ वर्गासाठी 15 लाख रूपये आणि ब वर्गीय सागर किनाऱ्यासाठी 10 लाख रूपये इतकी रक्कम पहिल्या वर्षी देण्यात येत आहे. त्यातील 75 टक्के निधी पर्यटन व परिवहनदृष्ट्या आवश्यक बाबींवर खर्च करण्यात येईल. उर्वरित 25 टक्के निधी तर व्यवस्थापन जलवाहतूक व जलपर्यटन विषयी प्रशिक्षण, पर्यावरण जागृती आणि कौशल्य विकासावर खर्च करण्यात येईल. यास “स्किल इंडिया” मोहिमेची जोड देण्यात आली आहे.
या योजनेमुळे पालघर जिल्ह्यातील चौदा गावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणार आहे. यामुळे समुद्र किनारे स्वच्छ करणे हे तर आहेच. परंतु त्यासोबतच त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि पर्यटन, पर्यावरण आणि परिवहन यांचा पण विकास होणार आहे. स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत हा घटक मानला जाणार असून समुद्र किनारा व किनाऱ्यावर असलेला गावाचा सर्वांगीण विकास याचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. किनारा स्वच्छ तसेच पर्यावरणाची हानी न होता पर्यटकांचा विकास हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
लेखक: दत्तात्रय कोकरे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/14/2020