(नॅशनल फिझिकल फिटनेस स्कीम). भारत सरकारने १९५९-६० मध्ये सुरू केलेली एक योजना. शारीरिक शिक्षण व मनोरंजन यांवरील १९५६ सालच्या राष्ट्रीय आराखड्यातील एका शिफारशीनुसार ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) भारतातील जनतेमध्ये शारीरिक क्षमतेबद्दल जाणीव निर्माण करणे, (२) आपल्या शारीरिक क्षमतेचे मूल्यांकन करू शकणाऱ्या व्यक्तींना तशा प्रकारच्या चाचणी कार्यक्रमांत भाग घेण्याची संधी देणे. या योजनेच्या कार्यक्रमात शारीरिक क्षमता अजमावण्याकरिता निवडक कसोट्यांचा समावेश केलेला असून पुरुष, स्त्रिया तसेच कनिष्ठ गट यांसाठी निरनिराळे निकष ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक कसोटीतील निकष हे तीन स्तरांवरून ठरविण्यात येतात. योजनेच्या मूल्यांकन पद्धतीत पुढील कसोट्यांची निवड करण्यात आली आहे. (१) ५० मीटर धावणे, (२) लांब उडी, (३) उंच उडी, (४) ८०० मीटर धावणे, (५) गोळाफेक, (६) चालणे आणि धावणे, (७) पुल अप्स, (८) उभे राहून उडी मारणे, (९) शटल रन, (१०) पडवेस (सीट अप्स), (११) वजन घेऊन ठराविक अंतर चालणे.
प्रत्येक कसोटीत तीन निकष आहेत. (१) किमान पात्रता असणाऱ्यांकरिता एक तारका कसोटी, (२) चांगली पात्रता मिळविणाऱ्यांकरिता दोन तारका कसोट्या, (३) उत्तम पात्रता मिळविण्याऱ्यांकरिता तीन तारका कसोट्या. सुरुवातीस ३५ वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना वरीलपैकी पाच कसोट्या निवडाव्या लागत. त्याहून जादा वयाच्या स्त्री-पुरुषांना तीन कसोट्या निवडण्याची मुभा होती. निवडलेल्या कसोट्यांमध्ये एक तारका, दोन तारका व तीन तारकास्तर मिळवला, तरच त्यांचा दर्जा ठरवला जात असे. उदा., एका व्यक्तींने पाच कसोट्यांपैकी तीन कसोट्यांमध्ये दोन तारका व दोन कसोट्यांमध्ये एक तारका प्राप्त केली, तर तिचा दर्जा एक तारका स्तरावर ठरविला जात असे.
देशातील सर्व राज्यांत १९६२ मध्ये खास चाचणी केंद्रे अनुदान पद्धतीने स्थापन करण्यास चालना देण्यात आली. अशा चाचणी केंद्रांत प्रशिक्षण देण्याची व सराव करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली.
सुरुवातीस ही योजना वर्षांतून एकदा भारतात सर्वत्र एक आठवडाभर आयोजित केली जात असे. पुढे राज्यांना याबाबतीत वर्षांतून सोईनुसार योजना राबविण्याची मुभा देण्यात आली. तसेच वयोगट व कसोट्या यांच्यामध्ये अनुरूप असे बदल करण्यात आले (१९६२), त्यानुसार असलेला पुरूषांचे वयोगट पुढीलप्रमाणे : (१) १८ वर्षांखालील, (२) १९−३४ वर्षांमधील, (३) ३५ ते ४४ आणि (४) ४४ वर्षांवरील, त्याचप्रमाणे स्त्रियांचे वयोगट पुढीलप्रमाणे : (१) १६ वर्षांवरील, (२) १७−२० वर्षांमधील आणि (३) २० वर्षांपुढील.
या मोहिमेचे सर्व व्यवस्थापन १९७२ पासून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ग्वाल्हेर येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयाकडे (स्था. १९५७) सोपविले. मोहिमेचा प्रचार व प्रसार विस्तृत प्रमाणात व्हावा, म्हणून प्रतिवर्षी प्रत्येक राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांचे एक चर्चासत्र आयोजित करून त्यांच्या सूचनेप्रमाणे वेळोवेळी चाचण्या, निकष आदींबाबत योग्य ते बदल केले जात असत. या योजनेचे नाव १९७२ पासून ‘राष्ट्रीय शारीरिक स्वास्थ्य कार्यक्रम’ (नॅशनल फिझिकल फिटनेस प्रोग्रॉम−एन्पीएफ्पी) आहे देण्यात आले. याच वर्षी कसोटयांचे बॅटरी ‘अ’ व बॅटरी ‘ब’ असे दोन गट करण्यात आले. बॅटरी अमध्ये मैदानी स्पर्धांतील पुढील बाबींचा समावेश करण्यात आला : १०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, ८०० मीटर धावणे, दुसऱ्या गटात म्हणजे बॅटरी ‘अ’ सर्वसाधारण, विशेषतः ग्रामीण भागांतील लोकांकरिता सोईचे होईल अशा चाचण्यांचा समावेश करण्यात आला. उदा., दंड-बैठका, चालणे व धावणे, क्रिकेट चेंडू फेकणे किंवा फुटबॉल फेकणे, सिट अप्स काढणे इत्यादी. त्याचप्रमाणे पहिल्या गटातील चाचण्यांमध्ये तीन तारकांच्या निकषांत उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. प्रत्येक वयोगटात पहिल्या पाच क्रमांकांच्या व्यक्तींना खास बक्षिसे व शिष्यवृत्त्या सुरू करण्यात आल्या. अशा राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी निरनिराळ्या राज्यांत तीन तारका मिळविणाऱ्यांसाठी राज्यपातळीवर स्पर्धा आयोजित करून त्यांतून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांकरिता योग्य स्पर्धकांची निवड केली जात असे. सध्या प्रचलित असलेला वयोगट व चाचण्या यांचा तपशील पुढीलप्रमाणे असून विशषतः स्त्री व पुरुष यांचे वयोगट समान आहेत : (१) १−११ वर्षे, (२) १२−१३ वर्षे, (३) १४−१५ वर्षे, (४) १६−१७ वर्षे, (५) १८−२४ वर्षे, (६) २५−३४ वर्षे व (७) ३५ व त्यापुढील.
बॅटरी अमध्ये समावेश केलेल्या पुरुषांसाठी चाचणी−विषम : १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी, ७०० मीटर धावणे. स्त्रियांसाठी : १०० मीटर धावणे, ऊंच उडी, लांब उडी, गोळाफेक, ४०० मीटर धावणे, बॅटरी व पुरुषांसाठी : ५० मीटर धावणे, लांब उडी, क्रिकेट चेंडू फेकणे, सिट अप्स, शटल रन, ६०० मीटर धावणे/चालणे. यांतील कसोट्या प्रत्येक स्पर्धंकाने निवडावयाच्या असतात. स्त्रियांसाठी : ५० मीटर धावणे, उभी लांब उडी, क्रिकेट चेंडू फेकणे, शटल रन, सिट अप्स, ६०० मीटर धावणे/चालणे, पोटावर झोपून पाठ उचलणे, पाठीवर झोपून पाय ३०° कोनात अधांतरित धरणे. यापैकी ४ ते ६ कसोट्या आपल्या वयोगटांप्रमाणे स्त्रीस्पर्धकाने निवडावयाच्या असतात. साधारणपणे सर्व देशांतून ३० लाख स्त्री-पुरुष स्पर्धंक या कार्यक्रमांतून भाग घेतात. १९८७ मध्ये ही योजना बंद करण्यात आली असून तीऐवजी ‘भारतियम्’ ही योजना राबविण्यात येणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)
अंतिम सुधारित : 7/23/2020