অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय हरीत सेना

राष्ट्रीय हरीत सेना एक चळवळ, पर्यावरणप्रेमी मुलांची….

आपण राहत असलेल्या सभोवताली बहुतेक सर्व समस्यांचे मूळ हे पर्यावरणविषयक प्रवृत्तींमध्येच दडलेले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम समाजाची पर्यावरणाबाबतची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असून ती देशाची भविष्यातील सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यातच पर्यावरण रक्षणाबाबत गोडी व जागरूकता निर्माण केल्यास भविष्यात त्याचा निश्चितच चांगला परिणाम अनुभवावयास मिळेल. नेमके हेच लक्षात घेऊन केंद्र शासनाने देशातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरीत सेना या योजनेंतर्गत ‘इको क्लब’ स्थापन करण्यासंबंधीचा कार्यक्रम मंजूर केला.

या योजनेचा मुख्य उद्देश

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाबद्दल शिक्षण देणे हा असून त्यांना परिसंस्था, त्यांचे परस्परांवरील अवलंबित्व व त्याच्या अस्तित्वाची गरज यांचे शिक्षण, प्रत्यक्ष भेटी व प्रात्यक्षिकांद्वारे देणे तसेच त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयक समस्यांबाबत शास्त्रीय चौकस बुद्धी निर्माण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यामध्ये त्यांचा सहभाग प्राप्त करून घेणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात 250 इको क्लब स्थापन करावयाचे आहेत. ही योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत असून राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राबविली जाते. संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे यांची योजनेचे स्टेट नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भारती विद्यापीठ पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्था, पुणे या संस्थेची रिसोर्स एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.योजनेची उद्दिष्टे  शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणात्मक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.  शालेय विद्यार्थ्यामार्फत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे. शालेय विद्यार्थ्यांना समाजाला भेडसावत असलेल्या पर्यावरणविषयक समस्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आणणे.त्याबाबत उपाय शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, पर्यावरणाशी संबंधित कृती कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे.

योजनेची कार्यपद्धती

प्रत्येक इको क्लबमध्ये अंदाजे 30 ते 50 विद्यार्थी/विद्यार्थिनींचा समावेश. प्रत्येक इको क्लबसाठी एका इको क्लब शिक्षकाची नियुक्ती.  इको क्लबमधील शिक्षकांना प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी इको क्लबच्या शिक्षकांमधून मास्टर ट्रेनर्सची निवड. राज्यातील मास्टर ट्रेनर्सना रिसोर्स एजन्सीद्वारा प्रशिक्षण.  प्रत्येक इको क्लबला विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी केंद्र शासनामार्फत प्रतिवर्षी 2500/- रूपये इतके अनुदान. योजनेच्या संनियंत्रणासाठी सचिव (पर्यावरण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना. योजनेच्या संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी व संनियंत्रण समितीची स्थापना. राज्याच्या केंद्रस्थ यंत्रणेमार्फत (सामाजिक वनीकरण संचालनालयामार्फत) योजनेच्या राज्यातील कार्याचे समन्वयन.  राष्ट्रीय संनियंत्रण समितीकडून कार्यक्रमाला योग्य दिशा देण्याचे व सर्व स्तरावरील समन्वयन करण्याचे कार्य.

इको क्लबमार्फत करावयाचे काही प्रमुख उपक्रम

शाळेमध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादीचे आयोजन.

पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या स्थळांना जसे प्रदुषित व अवनत क्षेत्रे, प्राणीसंग्रहालये इत्यादींना भेटीचे आयोजन. पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी संचलन, मिरवणूका, मानवी साखळी व पथ नाट्यांचे आयोजन.

वृक्ष लागवड, स्वच्छता मोहिम इत्यादी कृती कार्यक्रमांचे शाळेच्या आवारात तसेच शाळेबाहेर आयोजन.

परसबाग लागवड करणे, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प स्थापन करणे, शाळेमध्ये जलसंचयनाची कामे करणे, कागदांचे पुनर्चक्रीकरण करणे इत्यादी उपक्रमाचे आयोजन.  प्

रदूषण करणाऱ्या स्त्रोतांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आयोजन.

सार्वजनिक ठिकाणे विद्रुप करण्याविरुद्ध जनजागृती अभियान उपक्रमाचे आयोजन.

सार्वजनिक ठिकाणी भितीपत्रके लावणे, वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी लावण्याबाबत उपक्रमाचे आयोजन.

शाळेत तसेच शाळेबाहेरील बागा, उद्याने इत्यादी सार्वजनिक स्थळे यांच्या स्वच्छतेबद्दल उपक्रमाचे आयोजन.

पर्यावरणास हानीकारक सवयी उदा.अनधिकृत ठिकाणी कचरा टाकणे, रुग्णालयातील कचऱ्याची असुरक्षित विल्हेवाट लावण्याविरुद्ध चळवळ उभारणे.

महाराष्ट्रातील नवीन उपक्रम

सामाजिक वनीकरण विभागाने जानेवारी 2007 मध्ये राष्ट्रीय हरीत सेना योजनेसाठी केंद्रस्थ यंत्रणेचा कार्यभार स्विकारला तेव्हापासून प्रस्तुत योजनेअंतर्गत राज्यात काही नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

राष्ट्रीय हरित सेना उद्यान (एन.जी.सी.पार्क)

राष्ट्रीय हरीत सेनेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयक शिक्षणाचा प्रथम हाती स्वयं-अनुभव प्राप्त व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक राष्ट्रीय हरीत सेना उद्यान (एन.जी.सी. पार्क) उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या ताब्यात असलेल्या रोपवाटिकेत निसर्ग पाऊलवाटा निर्माण करण्यात आल्या आहेत.

या ठिकाणच्या वृक्षांवर माहितीफलक लावण्यात आले असून त्या भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची चित्रे मुलांच्या पर्यावरणविषयक ज्ञानात भर घालतात. याशिवाय या उद्यानात निर्माण करण्यात येणारे फुलपाखरु उद्यान, औषधी वनस्पती बाग, नक्षत्रवन इत्यादी संकल्पनामुळे मुलांची ज्ञानवृद्धी होईल. या उद्यानात पर्यावरणपूरक तंत्रज्ञान उदा. सौरऊर्जा प्रकाशयंत्रे, गांडूळखत निर्मिती प्रकल्प याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणपूरक व साहसी खेळ यांचाही अंतर्भाव असेल. अशारितीने एन.जी.सी. पार्क विद्यार्थ्यांसाठी निसर्गात राहून त्याच्याबद्दल शिकण्याचे एक हक्काचे ठिकाण निर्माण झाले आहे.

श्रद्धावने

वृक्षराजीचे संवर्धन होण्यासाठी लोकांच्या मनातील ईश्वराबाबतच्या श्रद्धेचा उपयोग करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी श्रद्धावन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावाचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी हरीत सेनेच्या सहकार्यातून व संनियंत्रणातून श्रद्धावन अंतर्गत विशिष्ट प्रजातींची रोपवने हाती घेण्यात आली आहेत. सुरुवातीस राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक श्रद्धावन निर्माण करण्यात आले असून कालांतराने त्याची व्याप्ती वाढविण्याचा संकल्प आहे.

राष्ट्रीय हरीत मानांकन (ग्रीन रेटींग)

सुदृढ पर्यावरण रक्षणाच्या दिशेने राष्ट्रीय हरीत सेना योजनेंतर्गतच्या शाळांची वाटचाल व्हावी, या हेतूने त्यांना गुण देण्यात येऊन त्यांचे मानांकन करण्यासाठी तारांकित शाळा ही पद्धत सुरु करण्यात येत आहे. ज्या शाळा या पद्धतीत सर्व निकष पूर्ण करतील त्यांना पंचतारांकित हरीत शाळेचा दर्जा देण्यात येईल. या मानांकन पद्धतीमुळे शाळांमध्ये एक निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्यांचे पर्यावरणविषयक विचार व आचारात जाणीपूर्वक बदल होईल.

बीज संकलन

उन्हाळ्याच्या सुट्टीतील विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा व त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यातील सर्व इको क्लबना त्यांच्या विद्यार्थ्यांमार्फत विविध वृक्ष प्रजातीच्या बिया गोळा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार गोळा करण्यात येणाऱ्या बियांपैकी काही बिया शाळेमध्ये सीड बँक तयार करण्यासाठी राखून ठेवून उर्वरित बियांची इको क्लबच्या विद्यार्थ्यांमार्फत सुयोग्य जागी पेरणी करण्यात येते. तसेच जास्तीत जास्त प्रजातीच्या बिया गोळा करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचा सत्कार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येतो. विभागीय

 

माहिती कार्यालय

कोकण विभाग, नवी मुंबई

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 2/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate