অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन

परिचय

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावाने शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान आणि शास्त्रीय संगीत कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या युवक-युवतींना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देणारी युवा शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. या योजना शास्त्रीय संगीत क्षेत्राला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. संगीत क्षेत्रातील कलावंत आणि संस्थांसाठी या योजनेची थोडक्यात माहिती...

महाराष्ट्राला गीत-संगीताची एक महान सांस्कृतिक परंपरा आहे. महाराष्ट्र शासन आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हा सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असते. आपल्या सांस्कृतिक परंपरेतील शास्त्रीय संगीताला अनन्य महत्व आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्राला व या क्षेत्रातील कार्यरत संस्थांना अर्थसहाय्य देण्याची योजना शासन राबवित आहे. या योजनेचे नाव भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान असे आहे.

भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदान

नियम व आटी

  • या योजनेसाठी संस्था पूर्णत: शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणारी असावी.
  • संस्था नोंदणी अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असली पाहिजे.
  • संस्था या क्षेत्रात किमान 10 वर्ष काम करणारी असावी.
  • संस्था शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम वर्षभर सादर करत असावी.
  • संस्था शास्त्रीय संगीताच्या जतन व संवर्धनाचे काम करीत असल्यास त्या संस्थेस अनुदानासाठी प्राधान्य देण्यात येईल.
  • संस्थेच्या दरवर्षीच्या हिशोबाची तपासणी धर्मादाय आयुक्तांची मान्यता दिलेल्या किंवा संमती दिलेल्या लेखा परीक्षकांकडून किंवा सनदी लेखापालाकडून ( चार्टर्ड अकाऊंट ) करण्यात यावी.
  • संस्थेस एकदा अनुदान मिळाल्यानंतर पुढील चार वर्ष सदर संस्था अनुदानासाठी पात्र राहणार नाही.
  • सस्थांनी कार्यालयास चुकीची/ खोटी कागदपत्रे सादर केल्यास व तसे आढळून आल्यास सदर संस्था भविष्यात शासनाच्या अनुदानासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल. तसेच सदर संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • संस्थेचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक, ई-मेल तसेच बेबसाईट असल्यास त्याबाबतची माहिती सोबत सादर करण्यात यावी.
  • त्यामध्ये संस्थेच्या स्थापनेचे वर्ष, संस्था नोंदणी अधिनियम, सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणी क्रमाक (संस्थेच्या नोंदणीच्या प्रमाणपत्राची छायाकिंत सत्यप्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • संस्थेचे कार्यक्षेत्र (शहरी, ग्रामीण, औद्योगिक, आदिवासी), संस्थेचे शास्त्रीय संगीतातील कार्याचे उद्दिष्टे, मागील 3 वर्षात संस्थेने कोणत्या कलाक्षेत्रात व कोणत्या स्वरुपाचे कार्य केले आहे.
  • त्याबाबत थोडक्यात माहिती, संस्थेने केलेल्या कार्याबाबत जोडवयाची कागदपत्रे ही पुढील माहितीनुसार देण्यात यावी.
  • संस्थेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत कोणते ? संस्थेच्या जमा व खर्च लेख्यांची सनदी लेखापालाकडून तयार केलेल्या मागील 3 वर्षाच्या आर्थिक लेखापरिक्षणाच्या अहवालाच्या प्रती सादर कराव्यात.

अहवालात पुढील बाबी नमूद करणे आवश्यक आहे

  • अ. नफा / तोटा पत्रक,जमा व खर्च लेखे, ताळेबंद, सांस्कृतिक कार्यक्रमावर केलेल्या खर्चाच्या बाबींचा तपशील, सनदी लेखापालांचा लेखा परिक्षणात्मक अहवाल, मागील 3 आर्थिक वर्षात संस्थेने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती, त्याबाबतच्या प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • ब. संस्थेची कलाक्षेत्रात राज्य, देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती व त्याबाबतच्या प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • क. मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून कलाक्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यास त्याबाबतची माहिती व संबंधित आदेशाची छायाकिंत सत्यप्रत आवश्यक आहे.
  • ड. संस्थेला अनुदानासाठी पात्र ठरविल्यास बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी संस्थेच्या बँकेचे नाव, ठिकाण, खातेधारकाचे नाव,एमआयसीआर व आयएफएससी संकेतांक क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक व खाते क्रमांक याबाबतची माहिती देण्यात यावी.
  • मागील 3 वर्षात संस्थेने कोणत्या कलाक्षेत्रात व कोणत्या स्वरुपाचे कार्य केले आहे.

माहिती सादर करताना जोडावयाची कागदपत्रे

माहिती सादर करताना पुढीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे अत्यावश्यक आहे.
  • अ. केलेल्या कार्यक्रमाची मुळ छायाचित्रे सादर करावीत. छायाकिंत झेरॉक्स प्रती चालणार नाहीत.
  • ब. संस्थेचे नाव, कार्यक्रमाचे नाव, दिनांक व ठिकाण इ. बाबीचा स्पष्ट उल्लेख असणारा फलक अथवा बँकड्रॉप कार्यक्रमाच्यामागे लावणे अत्यावश्यक असून कार्यक्रमाच्या मूळ छायाचित्रात सदर फलक असणे आवश्यक आहे.
  • क. कार्यक्रमाबाबत स्मरणिका असल्यास त्याची प्रत सादर करावी.
  • ड. कार्यक्रमाबाबत मान्यवरांचे अभिप्राय असल्यास त्याची प्रत सादर करावी. कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिध्दी झालेले वृत्तांत अथवा परीक्षणे, संबंधित वृत्तपत्राची नावे आणि वृत्तांताचा वार व दिनांकासह माहिती आवश्यक आहे.
  • ई. कार्यक्रमाच्या नियंत्रणपत्रिका, हँडबील, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण. प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांनी त्यांनी केलेल्या कार्याचे मुळ पुरावे शासनास सादर करावेत. ही सर्व माहिती व सोबत प्रमाणित केलेली कागदपत्रे खरी आहेत. माहिती व कागदपत्रे खोटी, चुकीची आढळल्यास संस्था पदाधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील.

भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती

नियम व आटी

  • सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने याशिवाय भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती ही योजना सुध्दा राबविली जात आहे.
  • शास्त्रीय संगीत कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या युवक-युवतींना ही प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्यात येते. अटी व शर्ती
  • विद्यार्थांचे वय कमाल 25 वर्षे इतके असावे.
  • विद्यार्थांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • केंद्र शासनाची किंवा इतर संस्थेची शास्त्रीय संगीताच्या शिक्षणास्तव शिष्यवृत्ती मिळत असल्यास विद्यार्थी या योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणार नाही.
  • विद्यार्थ्यांच्या कलेच्या सादरीकरणाची सी.डी.अर्जासोबत देणे आवश्यक राहिल.
  • शासनामार्फत गठित तज्ञ समितीमार्फत प्राप्त अर्जाची छाननी करुन प्रतिवर्षी गुणवत्तेनुसार 12 गरजू विद्यार्थांची (6 गायन व 6 वादन क्षेत्रातील) शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते.
  • समितीच्या निर्णय अंतिम राहील.
  • शारिरीकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थांसाठी वरील अटी काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील.
  • अर्जाचा नमुना शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • तहसीलदार कार्यालयाने दिलेला कुटूंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थांस अपंगत्व असल्यास त्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र.
  • केंद्र शासन किंवा अन्न खाजगी संस्थांची शास्त्रीय संगीताच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत असल्यास त्याबाबतच्या आदेशाच्या साक्षंकित प्रती.
  • गुरुकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्यांषंनी गुरुकडे किमान 10 वर्ष शिक्षण घेत असल्याचे गुरुचे शिफारसपत्र.
  • विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची गुणपत्रिका ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

    सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या शास्त्रीय संगीतातील नोंदणीकृत संस्थांना सहाय्यक अनुदानाची योजना आणि शास्त्रीय संगीत कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या युवक-युवतींना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देणाऱ्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती योजना या शास्त्रीय संगीत क्षेत्राला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. संगीत क्षेत्रातील कलावंत आणि संस्थांनी योजनेचा लाभ घेतला पाहिजे.


लेखक - अनिल आलुरकर जिल्हा माहिती अधिकारी, बीड

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate