सातवी पास-नापास !
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात सर्वात जास्त बिनडोक प्रयोग आपल्या महाराष्ट्रात राबवले जात असावेत, असे वाटते. पहिलीपासून इंग्रजी-सेमीइंग्रजी, आठवीपर्यंत परीक्षाच नको, विद्यार्थी नापास झाला तर आत्महत्या करील म्हणून शक्य तो सर्वांना पास कसे करता येईल ते बघा. निकाल कमी, अनुदानात कपात. हे सारे प्रयोग कशासाठी चालले आहेत ? ८० पैकी ०६ गूण मिळवणारा विद्यार्थी पास झाला म्हणून आनंद व्यक्त करायचा की शिक्षणव्यवस्था नापास झाली म्हणून रडायचे ? बरे, दहावी-बारावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणून जल्लोष करावा म्हटले तर ९० टक्क्याच्या वर मार्कस मिळवणारे अनेक विद्यार्थी कुठल्याही घटनेवर शुद्ध मराठीत किंवा शुद्ध इंग्रजीत आपले मत लिहू किंवा बोलू शकत नाहीत, हे विदारक वास्तव आहे. इंग्रजीही नाही, मराठीही नाही आणि बौद्धिक विकासही नाही. कारण मायमराठीतून विचार करणेच आम्ही सोडून दिले आहे.
आमच्या काळी आमच्या ‘सातवी पास’ गुरुजींनी ज्या विद्यार्थ्याला ‘सातवी पास’ म्हणून जाहीर केले तो त्याच्या उर्वरीत आयुष्यात जीवनाच्या कुठल्याही परिक्षेत सहसा नापास झाला नाही. त्यातलाच मी एक भाग्यवान ! ज्या विद्यार्थ्याला आमच्या गुरुजींनी ‘सातवी नापास’ म्हणून जाहीर केले त्याच्या किंवा त्याच्या आई-बापाच्या मनात त्यांच्या निकालाविषयी कुठलाही किंतू नसे. उलट गुरुजी, आमचा धोंड्या जरा कच्चा आहे. त्याला परत सातवीतच बसवा, असं सांगणारे अंगठे बहाद्दर आई-बाप त्याकाळी होते.
आज काय परिस्थिती आहे ? सर्वांनी, सर्व वैद्द-अवैद्द मार्गांनी प्रयत्न करुनही फेल झालेला बंटी ‘मी फेल कसा झालो’ म्हणून टीचरशी हुज्जत घालतो. ‘आमचा बंटी ? फेल होणे इंपॉसिबल ? त्याला चांगल्या चार चार प्रायव्हेट टूशन्स उगाच लावल्या होत्या का ?’ म्हणत त्याचे पॅरेंट्सही थयथयाट करतात. ‘डोनेशन भरुन ॲडमिशन घेतली होती, फुकट नाही ?’ असेही सुनावतात.
केवढी ही प्रगती ! क्रांतीच म्हणायची की ?
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर.
९७६३६२१८५६