भाषेचा विचार करताना किंवा तिचा भाषा म्हणून अभ्यास करताना आपण भाषेच्या प्रमाण रूपांचाच विचार करतो. तो आवश्यकही आहे. एक 'व्यवस्था' म्हणून तिचे अमूर्त स्तरावरील पण मूर्त वाटणारे रूप गृहीत धरावे लागते. असे असूनही भाषेच्या सौंदर्याचे विविध स्तर शोधून मग तिचा विचार व्हायला हरकत नाही. या विविध स्तरांचे विज्ञान अद्याप करता आले नसले तरी त्या स्तरांमुळे भाषा अधिक सुंदर होते, हे आपण नाकारून चालणार नाही.
भाषा ही अभिव्यक्तीचे महत्त्वाचे अंग असते. ती आपणास एक प्रकारचा मुक्तीचा आनंद देत असते. जर आपण व्यक्त नाही झालो तर कोंडमारा होण्याचे प्रकरण उद्भवते. तर अशा या मुक्तीचे उत्तम नमुने रमेश इंगळे उत्रादकरांच्या 'निशाणी डावा अंगठा' या कादंबरीत सापडतात. जेव्हा निरक्षर स्त्रियांच्या जागी परीक्षेसाठी साक्षर स्त्रियांना बसवायचे ठरते, तेव्हा त्या साक्षर स्त्रियांना आपला नवरा म्हणून निरक्षर स्त्रियांच्या नवऱ्याचे नाव घ्यावे लागणार म्हणून मास्तरीन त्या साक्षर स्त्रियांबद्दल आभाराची- उपकाराची भाषा वापरू लागतात, तेव्हा साक्षर स्त्रियांमधील रूख्मिणा म्हणते, 'मास्तरीन बाई, उपकार-गिपकार असं काई मनू नका बहिना. खरं सांगू का? मले तं असं वाटतं, की हे समदं खोटं हाये नं. ते समंद खरं खरं होऊन जावं. .. म्हणजे असं समद्याहीले नवं घर, नवं संसार, नवा गडी नवा राज. कोणबी मागचं काहीच आठवायचं नाय. कित्ती मजा येईल नाही. जनमभर एकाच गड्यासंग खेळायचं. तेच्या लपायच्या जागा आपल्याले माहित अन् आपल्या सगळ्या त्याले. लपन्यात मजा नाय न् धुंडण्यात मजा नाय.... नवे नवे गडी पाह्याचे. राज द्यायचं. घ्यायचं. आपून लपलो की तो रडकुंडीला येस्तवर सापडायचं नाय.... समोरचा रडकुंडीला येतो तव्हाच तं खेळ रंगतो. माणसापेक्षा जनावरं बरे. मनासारखं जगतेत. त्याहीच्यात एकाले एक अशी भानगड नाही'.
रुख्मिणाचे हे मनोगत म्हणजे पुरूषसत्ताक व्यवस्थेला झुगारून एक मुक्तीचा प्रत्यय तिने घेतला आहे. त्याचवेळी पुरूषांच्या दबावाच्या राजकारणाला नाकारण्याचा हा भाषिक प्रयत्न महत्त्वाचा आहे.
भाषिक मुक्तीचा हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण दरवेळी तो घेता येतोच असे नाही. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक दडपणांमुळे व्यक्तीला कोंडमारा सहन करावा लागतो. मग माणूस त्यातूनही मार्ग काढून अभिव्यक्ती करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी तो कधी सांकेतिक, कधी रूपकात्मक तर कधी अलंकारिक बोलत असतो. अशा व्यंगात्मक पद्धतीने व्यक्त होण्यातूनही एक प्रकारची मुक्ती अनुभवता येते. विशेषत: अशी व्यंगात्म अभिव्यक्तीतून मुक्तीचा प्रत्यय तरूणाई मोठ्या प्रमाणात घेत असते. यातून त्यांची स्वतंत्र कट्टाबोली आकारत जाते. 'निशाणी डावा अंगठा..' मध्ये व्यंगात्म अभिव्यक्तीमधून मुक्ती मिळवण्याचेही प्रसंग पहावयास मिळतात. हा प्रकार जास्त करून पुरूष मंडळीमध्ये अधिक पहावयास मिळतो. या कादंबरीतील जुंबड सर आपल्या तरूण सहकाऱ्यांना म्हणतात. "गड्याहो, तुमचं हेच वय हाये, चांगल्या चालवा तलवारी, आमचं काय तलवारी गंजल्या आन् ढाला झिजल्या. आता लढाईले उतरायचं म्हटलं तं आठ-आठ दिवस आधी तयारीले लागावं लागतं."
अशा प्रकारे भाषिक मुक्ती अनुभवताना समूह, परिचयात्मकता, व्यावसायिक संबंध, लिंगभेद, स्थळ-काळ अशा अनेक गोष्टी आणि संदर्भ कारणीभूत असतात. या सगळ्यांचे भान सुटले की मग अपेक्षित मुक्तीचा आनंद मिळेनासा होतो. म्हणूनच भाषिक व्यवहारामध्ये सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ महत्त्वाचे असतात. या अंगाने भाषेचा अभ्यास अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो. जरी तो तत्त्वाच्या किंवा व्यवस्थेच्या पातळीवर पोहचू शकत नसला तरी तो अभ्यास भाषेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवू शकतो. निषिद्ध शब्दांच्या उपयोजनाचे महत्त्व आणि त्यातील सांस्कृतिकता लक्षात घेतली की त्यांचेही वेगळेपण आपणाला मान्य करावे लागते. हे लक्षात घेऊन विल्यम लबवने भाषेचा सामाजिक अंगाने अभ्यास केला आहे. एवढेच नव्हे तर या अंगाने अभ्यास करताना त्याने भाषाविज्ञान हे समाजभाषाविज्ञान असल्याचा दावा करून आपल्या समाजभाषाविज्ञानाची मांडणी केली आहे. मराठीमध्ये या अंगाने अभ्यास होणे अधिक आवश्यक आहे.
लेखक - प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदम
स्त्रोत:महान्यूज
अंतिम सुधारित : 4/26/2020
इंग्रजीचा किंवा मराठीचा द्वेष आणि अभिमान बाळगणं नव...
जपानने इंग्रजीला विरोध केला होता. तेही आता जागतिक ...
प्लेटोने प्रवर्तित केलेल्या ग्रीक अकादमीची परंपरा ...
यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाष...