भिंतीबाहेरील कृतियुक्त शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे. क्षेत्रभेटी, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचे कौशल्य, एकत्रितपणे काम करण्याची मानसिकता, शारीरिक व बौद्धक क्षमतांचा विकास अशा अनेक विषयांतील अध्ययन अध्यापन तंत्राचा वापर करणे म्हणजेच शिक्षणाचे संक्रमण आहे
चहुबाजुला वाजवित डंखे नव्या उदयाचे नव्या युगाचे, सारे जमले नव्या दमाचे, निमित मकर संक्रमणाचे।” सर्व शिक्षक-वाचकांना मकर संक्रमणाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! १४ जानेवारी -मकर संक्रमण 'तिळगुळ घ्या. गोड जिव्हाळा, प्रेम जपण्याचा दिवस. नवीन वर्षाची ख-या अर्थाने गोड सुरुवात होते ती मकरसंक्रांतीने तीळगुळ देऊन गोड बोलण्याचे आश्वासन मागून नात्यांमधील गोडवा कायम ठेवण्याचा भावनिक संदेश ह्या दिवशी आपण देतो. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सण हे चंद्राच्या कलेवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक सणाच्या तारखा या वेगवेगळ्या असतात. पण मकरसंक्रात हा एकमेव सण असा आहे कि जो सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असतो. त्यामुळे २०५० पर्यंत मकरसंक्रात ही जानेवारीच्या दर १४ तारखेला किंवा क्वचित १५ तारखेलाच येते. मकर संक्रात म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ! अनेक गोष्टीतील संक्रमणाचा हा काळ! 'तेच ते अन् तेच ते, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते अन् तेच ते' अशा दिनक्रमात गुरफटलेल्या आपल्याला हा
मकर संक्रमणाचा काळ बदल करण्यास सांगत असतो. या काळात निसर्गात पण बदल होतो. शारीरिक वाढ व विकासाचा हा काळ. या दिवशी शास्त्रानुसार सुवासिनी गहू, कापूस, हळकुंडे, तीळ, बोरे, ऊस आदि या दिवसात तयार होणा-या वस्तू सुगडातून दुस-याला देतात. आपल्या घरी, सुघटातून दुस-या सुघटात दयायची. जे असेल ते सर्वांनी विभागून घ्यायचे, ही संविधान रुचिता मनाचा सत्वगुण दर्शविते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे' या शिक्षकी पेशाच्या तत्वाशी हे समीकरण मिळते जुळते आहे.
म्हणूनच या संक्रमणाच्या पर्वात आपणही अनेक गोष्टीतील संक्रमणास प्रारंभ करूयात. पारंपारिक
शिक्षणपद्धतीत ‘विचार वही, पर सोच नयी' या तत्वाचा अवलंब करूयात. ख-या अर्थाने शिक्षणाचे संक्रमण घडवूयात. वर्गातील चार भिंतीत भाषेतील व्याकरण नियम शिकविता शिकविता त्यांना भाषा सौंदर्य संभाषण कौशल्य लोकांची मने जिंकून घेण्याचे कौशल्य शिकवूयात.
गणितातील बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार शिकविता-शिकविता त्यांना प्रत्यक्ष व्यवहारपण शिकवूयात पैशाचे व्यवहार, बचतीचे महत्व, नफा तोटा यांचे प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांना व्यवहार कुशल बनवूयात. (भाजीवाला, फळवाला, पोस्ट ऑफीस, बस वाहक यांच्याशी घडलेल्या प्रत्यक्ष भेटी या कामी निश्चितच उपयोगी पडतील.) प्रयोगशाळेतील रासायनिक अभिक्रिया, समीकरणे, त्यांचे पाठांतर यापेक्षा घरातील विज्ञान, कुतुहलातील विज्ञान, 'हे असे का?' हे शोधायला शिकविणे जास्त उपयुक्त नाही का? शारीरिक शिक्षण, चित्रकला, संप्रेषण तंत्रज्ञान या विषयाच्या लेखी नोंदी शिकविण्यापेक्षा त्यांना त्यातील कौशल्य शिकविणे जास्त चांगले नाही का? भिंतीबाहेरील कृतियुक्त शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे. क्षेत्रभेटी, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्याचे कौशल्य, एकत्रितपणे काम करण्याची मानसिकता, शारीरिक व बौद्धक क्षमतांचा विकास अशा अनेक विषयांतील अध्ययन अध्यापन तंत्राचा वापर करणे म्हणजेच शिक्षणाचे संक्रमण आहे. आजकाल ज्ञान खूप मोठ्या प्रमाणात मुक्त आणि सर्वांना उपलब्ध झाले आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा संबंध जर आपण आपल्या शिक्षणाशी जोडला तरच शैक्षणिक व वैचारिक संक्रमण घडेल. आजचे शिक्षण ख-या अर्थाने प्रयोगशील होऊ पाहात आहे. त्या प्रक्रियेत आपणां सर्व शिक्षकांना फार मोठी जबाबदारी पार पाडावयाची आहे. या प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका ही आता बदलू लागली आहे. आपण या संक्रमणाच्या युगात केवळ विदयार्थ्यांच्या विकासाच्या मार्गातील मार्गदर्शक व सहायक बनायला हवे. '.....पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा' अशी आश्वासक व प्रेरक भूमिका आपणा सर्वांकडून अपेक्षित आहे. विदयार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्यामध्ये विवेक व मूल्यांचा संस्कार करण्यामध्ये आपला महत्वाचा सहभाग हवा. यातून शिक्षणाचे योग्य संक्रमण होईल असे मला वाटते. हे सर्व बदल आपल्याला कदाचित वेगळे किंवा अवघड वाटतील पण ते अशक्य नाहीत कारण
'Changing the world may be almost impossible,
changing the nation may take lifetime, changing your community may take a longtime, changing yourself won't happen overnight but changing
anything for the betteris worthwhile."
यातील शेवटचे वाक्य जास्त महत्वाचे कारण चांगल्यासाठी बदल गरजेचा असतो. म्हणून या मकर संक्रमणाच्या निमित्ताने आपणही शिक्षण संक्रमण घडवूयात आणिा‘क्षितिजावर जाऊन आपण, क्षितिज नवे पाहूया। जे घडले नव्हते कधी आजवर ते सारे घडवूया सहकार्याची वाट नवी, ती आपण सारे चालूया।
शिक्षणाचे ते सोनेरी क्षण फिरूनी पुन्हा आणूया।।’
लेखिका : मुक्ता विनायक कौलगुड, पुणे
स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७
अंतिम सुधारित : 7/26/2023
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
राष्ट्रीय संरक्षणासाठी ज्या जवानांनी लष्करी सेवा क...
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...